You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ICSE बोर्डाची दहावीची परीक्षाही रद्द, बारावीची परीक्षा लांबणीवर
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता CBSE पाठोपाठ ICSE बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची परीक्षा मात्र रद्द करण्यात आली नाहीये. या परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं ICSE बोर्डानं म्हटलं आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. बोर्डाच्या विविध परीक्षांच्या आयोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली होती.
विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य असेल असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या हिताचा केंद्र सरकार विचार करेल अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही आणि त्यांचं वर्ष फुकट जाणार नाही याची काळजी घेतली जाईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा 4 मे ते 14 जून कालावधीत होणार होत्या. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 1 जून 2021 रोजी परिस्थितीचा अंदाज घेऊन बोर्ड निर्णय घेईल. संबंधित निर्णयाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी कल्पना देण्यात येईल असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दहावीच्या परीक्षेचा निकाल बोर्डाने विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकष पद्धतीद्वारे जाहीर केला जाईल.
जो विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसेल तर त्याला नंतर जेव्हा परीक्षा घेण्यासाठी योग्य परिस्थिती असेल तेव्हा पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येईल.
दरम्यान राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने तसाच निर्णय राज्य सरकारने घ्यावा असा जनरेटा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावी परीक्षांचं काय होणार? अशी टांगती तलवार विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यावर होती. मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
दहावीची परीक्षा जूनमध्ये होईल तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं. मात्र सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने राज्य सरकारवर तशा पद्धतीचा निर्णय घेण्याचं दडपण वाढणार आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणं, परीक्षा आयोजित करणं, उत्तरपत्रिका परीक्षकांकडे पोहोचवणं, निकाल प्रक्रिया हे सगळं कठीण दिसतं आहे.
राज्य सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी ती पुढे ढकलण्यात आली.
सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य सरकार निर्णय घेणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात आहे. त्याचवेळी पाल्याचं शालेय वर्ष फुकट तर जाणार नाही ना अशी भीतीही पालकांच्या मनात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)