SSC- HSC बोर्ड: दहावी-बारावी परीक्षा लांबणीवर

राज्यभरातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये होईल तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावी परीक्षांचं काय होणार? अशी टांगती तलवार विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यावर होती. मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

राज्य शिक्षण मंडळाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार होत्या. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली आहे. 11 एप्रिल रोजी एमपीएससीची जी परीक्षा होणार होती ती झालेली नाही. परीक्षेच्या दोन दिवस आधी ती पुढे ढकलण्यात आली.

याच धर्तीवर बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेतला जाणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्याही मनात होता.

दरम्यान सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डंना सुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना करणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)