उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊनची घोषणा, 14 रात्री 8.00 पासून राज्यात लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. या संवादात ते लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

आपल्या संबोधनात मुख्यमंत्री म्हणाले. "60,212 रुग्णांची नोंद आज दिवसभरात झाली. साधारणतः वर्षभरापूर्वी आरोग्य सुविधा काय होती याची कल्पना मी तुम्हाला दिली होती. सध्या 523 चाचणी केंद्र राज्यात सुरू आहेत. वाढवलेल्या सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक भार कुठल्याही यंत्रणेवर टाकला तर काही कालावधीत ती यंत्रणा कोलमडू शकते.

"राज्यात सध्या 4 हजार कोव्हिड सेंटर आहेत. साडे तीन लाख बेड आहेत. आता सुविधांवर भार येत आहेत. 10, 12 आणि एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यात पण आपली कोरोनाविरोधातची परीक्षा अजून बाकी आहे.

"1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन रोज राज्यात होतं. दिवसाला 850-900 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण वापरतो. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी केंद्राने द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे."

हवाई वाहतुकीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. गेल्या वर्षीपेक्षा परिस्थितीमध्ये बराच बदल घडला आहे.

या संबोधनानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियमावली जाहीर होईल असं सचिवालयातील सूत्रांनी बीबीसी मराठीला सांगितले आहे.

उद्या मंत्रिमंडळाची बैठक प्रस्तावित

उद्या दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनची नियमावली जाहीर होण्याची शक्यता असल्याचं मंत्रालयातील वरिष्ठ मंत्री सांगत आहेत.

याआधी, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाऊसंदर्भात निर्णय घेतील,' असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

अस्लम शेख यांनी आज (13 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी लॉकडाऊनसंबंधी आजच मोठी घोषणा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं.

त्यांनी म्हटलं, "एसओपी बनवणं सुरू आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत अनेकांचे म्हणणे होते की, 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेणार. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे मत सर्वांचे आहे.

लॉकडाऊन कधी लागू करायचे याबाबत चर्चा सुरू होती पण रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने जास्त वेळ दवडण्यात अर्थ नाही असे सरकारचे मत आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे," अशी प्रतिक्रिया अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

बैठका सुरू, घोषणा कधी?

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लॉकडाऊन लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही अशी चर्चा शनिवारी (10 एप्रिल) रोजी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊनचे संकेत दिले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यातही चर्चा झाली.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन लावण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊनची घोषणा कधी होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजारांच्या पटीत वाढत असल्यानं आणखी कडक निर्बंध लावण्यासाठी किंवा लॉकडाऊनचा पर्याय तपासण्यासाठी मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, या कडक निर्बंधांचा ते निर्णय कधी घेणार, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले, "रुग्णसंख्या इतक्या वेगानं वाढतेय की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही, तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल. कोरोनाचं अनर्थचक्र थांबवायचं असेल, तर काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील."

टास्क फोर्ससोबत महत्त्वपूर्ण बैठक

टास्क फोर्सच्या बैठकीत ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते.

'एसओपी तयार करणे सुरू'

टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, "गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाशी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरुकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे."

"मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

"आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल, आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी काय म्हटलं?

राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, "राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली."राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, "या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)