You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना नागपूर: संतापलेल्या नातेवाईकांनी 3 हॉस्पिटल्समध्ये केली तोडफोड
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून
कोव्हिड रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याच्या तक्रारीवरून संतप्त नातेवाईकांनी नागपूर जिल्ह्यातील कांद्री येथे हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
नागपूर जिल्ह्यातील क्रांद्री येथील डब्ल्यूसीएलच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. याआधी देखील नागपूर शहरात संतप्त नातेवाईकांना दोन हॉस्पिटल्सची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत.
कांद्री येथील घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. हा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे म्हणत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
या घटनेनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील कन्हान पोलीस ठाण्याकडून तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्हान पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजीत कुमार क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू रुग्णालयात 29 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते.
रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नसल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया माने यांनी दिली.
"रुग्णालयात घटनेच्या वेळी ऑक्सिजन उपलब्ध होते. मृत्यू झालेल्या पाच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जेव्हा आणले तेव्हा त्याची ऑक्सिजन लेव्हल 60 ते 70 एवढी होती. त्यांची स्थिती आधीच नाजूक होती," असं माने यांनी सांगितलं.
"नागपूर जिल्ह्यात कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने या रुग्णांना शहरापासून 20 किमी दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुळातच रुग्णांची स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचा ऑक्सिजन संपण्याशी काही संबध प्रथमदर्शनी दिसत नाही, असे सुजीत कुमार क्षीरसागर यांनी म्हटले.
अमित भारद्वाज (30), हुकुमचंद येरपुडे (56), किरण बोडखे (47), कल्पना कडू (38). आणि नमिता मानकर (28), या रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनच्या कमरतेमुळे झाला असा आरोप कोयला श्रमिक सभा, अध्यक्ष शिवकुमार यादव, यांनी केलाय.
पण यादव यांनी यासंदर्भात कुठलीही तक्रार कन्हान पोलिसांत दाखल केली नसल्याचे कन्हान पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजीत कुमार क्षीरसागर यांनी सांगितले.
कोव्हिड हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्यांचा विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने निषेध केलाय. असोसिएशनचे सचिव डॉ. अनूप मरार सांगतात, "कोरोनाच्या या वैश्विक साथीच्या काळात आम्ही खाजगी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स आपले सर्वस्व अर्पण करुन सेवा देतोय. यातच सरकारने निर्धारित केलेल्या दरातच आम्ही आमच्या आरोग्य सेवा देतोय. पण गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी नागपुरातील 'होप' हॉस्पिटल पेटविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही हादरलो आहोत."
"होप हॉस्पिटलला तळमजल्यावर या लोकांनी पेट्रोल टाकून आग लावली आणि रिसेप्शन एरिया जाळून टाकला. दैव बलवत्तर म्हणून आग पसरली नाही. नाही तर होप हॉस्पिटलमधील कोरोनाचे उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि नर्सेस अशा शेकडो लोकांचं काय झालं असतं याची कल्पना न केलेली बरी. आता या प्रकरणात हल्ला करणाऱ्यांना दहा जणांना पोलिसांनी अटक करुन कडक कलमं लावली आहेत. पण अशा घटना आमचा आत्मविश्वास कमी करतात," मरार सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)