You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय महाडिकांविरोधात गुन्हा, मुलाच्या लग्नात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना कायद्याअंतर्गत खासदार महाडिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यातच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळा रविवारी (21 फेब्रुवारी) पुण्यात पार पडला.
या सोहळ्यात कोरोनाचे नियम पाळण्यात न आल्याचे आता समोर आले आहे. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. सोशल डिस्टंन्सिग, मास्क घालणे आणि 200 पेक्षा कमी लोकांची उपस्थिती या नियमांचा फज्जा उडवण्यात आल्याचे फोटो आणि व्हीडिओमधून दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
धनंजय महाडिक यांच्यासोबत जिथे हा विवाह संपन्न झाला, त्या लॉन्सचे मालक आणि मॅनेजर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या लग्न समारंभाला कोणतेही नियम मोडण्यात आले नाहीत, असं धनंजय महाडिक यांचं म्हणणं आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारो लोक उपस्थित असल्याचे समोर आले आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ समोर आले असून यात कोरोनाचे नियम पाळले न गेल्याचे दिसत आहे.
लग्नात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज आणि वैष्णवी यांचा विवाह सोहळा पुण्यातील हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे पार पडला. या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर माहोळ आदी उपस्थित होते. त्याचबरोबर इतर क्षेत्रामधील मान्यवरांनी देखील हजेरी लावली होती.
विशेष म्हणजे काही नेत्यांनी मंचावर जाताना मास्क न घातल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.
लग्नसमारंभाला 200 लोकांची परवानगी
लॉकडाऊनमधून शिथिलता दिल्यानंतर लग्न समारंभासाठी 200 लोकांना परवानगी देण्यात आली होती. परवानगी देताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक होते. परंतु लग्नात लोकांच्या संख्येचे तसेच इतर कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले होते.
रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. त्यात लग्न समारंभासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाचे नियम न पाळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.
'देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो'
"देवेंद्र फडणवीस आले होते, त्यांना मी भेटायला गेलो होतो. तिथे सर्वपक्षीय नेते, पवार साहेब देखील होते. आजपासून आम्ही कडक निर्बंध केले आहेत. जाहीर कार्यक्रमात आम्ही जाणे आता टाळणार आहोत," अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
या लग्नात नियम मोडले गेलेत का असा प्रश्न पोलिसांना विचारला असता पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी बीबीसीला सांगितले की आम्ही या प्रकरणात माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊत.
कार्यक्रमात नियमांचे पालन - महाडिक
या विवाह सोहळ्यासाठी मर्यादित लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळं गर्दी झाली नव्हती. अशी प्रतिक्रिया माजी खासदार धनंजय महाडिक यांनी बीबीसी मराठीला दिली. लग्न समारंभासाठी सरकारने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्यात आले. सोहळ्याच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मास्क बंधनकारक केले होते. सॅनिटायझरचा स्प्रे देण्यासाठी 8 ते 10 मुलींना नेमले होते. त्यामुळे येणाऱ्या लोकांना सॅनियायझर देण्यात आले.
हा सुटसुटीत कार्यक्रम झाला. आम्ही कोल्हापूर मधून आलो होतो तर मुलीकडचे लोक बीडहून आले होते. मान्यवरांना आमंत्रित करायचं असल्याने विवाह सोहळा पुणे येथे आयोजित केला होता. मोजकी लोकं आमंत्रित असल्याने शुभेच्छा देण्यासाठी मंचावर यायला कोणतीही रांग नव्हती त्यामुळं समारंभात गर्दी नव्हती असं महाडिक यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
पुण्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काय सांगते?
फ्रेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पुण्यात 634 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर 294 रुग्ण कोरोनातून बरे झाले. सध्या पुणे शहरात 2896 इतक्या अॅक्टिव्ह केसेस आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)