You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले 9 महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रात नव्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या जनतेला संबोधित केले. जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे की नाही हे 8-15 दिवसांत कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"जर यावेळी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन पुन्हाला लावावा लागेल आणि यावेळी (अंमलबजावणी) अवघड असेल," असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे.
लॉकडाऊनबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "लॅाकडाऊन करावा का? मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर मी पुढचे 8 दिवस घेणार आहे. ज्यांना लॅाकडाऊन हवा ते विना मास्क फिरतील. त्यामुळे सूचना पाळा आणि लॅाकडाऊन टाळा."
उद्धव ठाकरेंच्या भाषणातले 9 महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल माहिती दिली. कोरोना रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांच्या संवादातील 9 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया :
1) 'आपल्या हातात लस ही दिलासादायक गोष्ट'
"पुढच्या महिन्यात कोरोना येऊन एक वर्ष होईल, दिलासादायक गोष्ट म्हणजे लस आपल्या हातात आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण आतापर्यंत 9 लाख कोव्हिडयोद्ध्यांना लस दिल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
2) 'लशीमुळे साईडइफेक्ट्स होत नाहीत'
लशीमुळे कोणतेही घातक साईडइफेक्ट्स आढळले नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लशीबद्दल सर्वांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
"कोव्हिडयोद्ध्यांनो, आपण सैनिक आहात, तुम्ही बेधडकपणे जाऊन लस घेऊन या," असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
3) 'सर्वसामान्यांना लस कधी मिळणार हे केंद्र ठरवेल'
सर्वसामान्य लोकांना लस कधी मिळणार, हे केंद्र सरकार ठरवतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोमणाही मारला. ते म्हणाले, "बाकीच्या लोकांना लस कधी? उपरवाले की मेहेरबानी. कारण हे सगळं केंद्र सरकार ठरवतंय. ते इतर देशांनाही पाठवत आहेत."
4) 'लस घेण्याआधी आणि नंतरही मास्कघालणं अनिवार्य'
"कोरोनासोबत आपण युद्ध लढतोय, पण हे युद्ध लढताना औषधरुपी तलवार आली नाहीय, त्यामुळे मास्करुपी ढाल आपल्याकडे हवी," असं मुख्यमंत्री म्हणाले.
तसंच, लस घेण्याआधी आणि नंतरही मास्क घालणं हे अनिवार्य आहे, असंही ते म्हणाले.
5) 'कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय'
राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढतोय, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात लाट आलीये की नाही हे 8-15 दिवसांत कळेल."
"आपल्याला वाटलं कोरोना गेला. मास्क लावणाऱ्यांना मूर्ख म्हटलं गेलं. कोरोनाची लाट वर जाते, खाली येते. ती खाली येते, तेव्हा तिला थांबवायचं असतं," असंही ते म्हणाले.
6) 'पाश्चिमात्य देशात पुन्हा लॉकडाऊन'
कोरोनाचं गांभिर्य जनतेला सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाश्चिमात्य देशांचं उदाहरण दिलं.
मुख्यमंत्री म्हणाले, अनेक पाश्चिमात्य देशात लॅाकडाऊन आहे.
7) 'लग्नाच्या हॉलमध्ये नियम मोडल्यास कारवाई'
कोरोनाची स्थिती पाहून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुलाचा लग्न सोहळा रद्द केला, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि राऊत यांच्या मुलाला सदिच्छाही दिल्या.
मात्र, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "लग्नाच्या हॅालमध्ये नियम मोडले तर कारवाई होणार"
8) 'अर्थचक्राला गती देताना पुन्हा कोरोनाचं संकट'
सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत, पण त्या सुरू करताना शिस्तीची गरज आहे, असं मत मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
ते म्हणाले, अर्थचक्राला गती देत असताना पुन्हा कोरोनाचं संकट आलं आहे.
कोव्हिड योद्धे झाला नाहीत तरी कोव्हिड दूत होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
9) 'सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम पुन्हा बंद'
"सर्व राजकीय पक्षांना विनंती की, आपण आपल्यापासून सुरुवात करुया. उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामिजक कार्यक्रम, गर्दी करणारी आंदोलनं यांना काही दिवस बंदी आणत आहोत," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सगळ्यांना पक्ष वाढवायचं आहे, पण आपल्याला पक्ष वाढवूया, कोरोना वाढवायचा नाहीय, असंही ते म्हणाले.
मास्क घाला आणि लॅाकडाऊन टाळा, शिस्त पाळा आणि लॅाकडाऊन टाळा, असं आवाहन शेवटी मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला केलं.
अकोला-अमरावतीत लॉकडाऊन
अकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागून करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा केली.
त्यानंतर अकोल्यातही आठवड्याभराचं लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा अकोल्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली.
अकोल्यातील अकोला महानगरपालिका, अकोट नगरपालिका आणि मूर्तीजापूर नगरपालिका या क्षेत्रात एक मार्च 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.
या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यानं महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी जनतेला आवाहन करून, खबरदारी आणि काळजी घेण्यास सांगितलं होतं.
लॉकडाऊनच्या दिशेनं महाराष्ट्र चाललाय - वडेट्टीवार
झी 24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, "रेल्वे, बसमध्ये होणारी गर्दी कशी कमी करता येईल, यावर चर्चा सुरू आहे. लग्नसमारंभ, आंदोलनं इत्यादी ठिकाणीही गर्दी होतेय. या सर्वांवर कुठेतरी कडक बंधनं आणावी लागतील."
नवीन नियमावली तयार करून, लॉकडाऊनच्या दिशेनं महाराष्ट्र चालला आहे, असं म्हणायला हरकत नाही, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ
महाराष्ट्रात काल (20 फेब्रुवारी) कोरोनाग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारीतून दिसून आलं. काल एका दिवसात 6 हजार 281 कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आह
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा संचारबंदी लागू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहरात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पुन्हा संचारबंधी लागू करण्यात आली आहे. शहरात विना-मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नियम मोडणाऱ्यांवर 1000 रुपयांची दंडात्मक कारवाई आणि गुन्हेही दाखल केले जातील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)