रुबीना दिलैक : राहुल वैद्य, निक्की तांबोळीला हरवत बिग बॉस जिंकणारी रूबीना कोण आहे?

रिअलिटी शो बिग बॉसचा 14 वा सीझन अभिनेत्री रुबीना दिलैकनं जिंकला आहे. या विजयाबरोबरच तिला बक्षीसाची रक्कम म्हणून 36 लाख रुपयेही मिळाले आहेत.

गायक राहुल वैद्य फर्स्ट रनर अप ठरला. याआधीही इंडियन आयडॉल या गाण्याच्या रिअलिटी शोमध्येही तो उपविजेता ठरला होता.

रूबीनाव्यतिरिक्त राहुल वैद्य, राखी सावंत, निक्की तांबोळी आणि अली गोनी हे पण बिग बॉसच्या फायनलपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे पाच फायनलिस्टपैकी राहुल, राखी आणि निक्की हे तीन फायनलिस्ट मराठी होते.

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खाननं फायनलपर्यंत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांना 14 लाख रुपये घेऊन कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. यावर विचार करण्यासाठी स्पर्धकांना अवघा 30 सेकंदांचा वेळ दिला गेला. राखी सावंत हिने 14 लाख रुपये घेऊन शो सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कमी व्होट मिळाल्यामुळे अली गोनीही स्पर्धेतून बाहेर पडला. निक्की तांबोळीलाही नंतर बाहेर पडावं लागलं आणि शेवटी रुबीना आणि राहुलच उरले. निक्की आणि राहुल या दोन मराठी स्पर्धकांना हरवत रुबीना बिग बॉस 14 ची विजेती ठरली.

कार्यक्रमाची विजेती असलेली रुबीना दिलैक ही तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लासोबत कार्यक्रमात सहभागी झाली होती. मात्र अभिनव फायनलपर्यंत पोहोचू शकला नाही.

राखी सावंतसोबतचा वाद

काही दिवसांपूर्वी रूबीना बिग बॉसच्या घरातील स्पर्धक राखी सावंतसोबतच्या कडाक्याच्या भांडणामुळे चर्चेत आली होती. रुबीना दिलैकच्या रागाचं कारण होतं, राखी सावंतचं अभिनेता आणि रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लासोबतचं वर्तन.

'बिग बॉस'च्या चौदाव्या सीझनमध्ये अभिनव आणि रुबीना स्पर्धक म्हणून घरात आले. पहिल्या दिवसापासून हे कपल 'बिग बॉस'च्या घरात होतं, तर राखी सावंत वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात आली होती.

घरात आल्यानंतर राखीने अभिनव शुक्लासोबत 'फ्लर्ट' करायला सुरूवात केली. सुरूवातीला हे सगळं गमतीत आणि हसत-खेळत सुरू होतं.

मात्र एकदा राखीने लिपस्टिकने आपल्या अंगभर 'I love ABhinav' लिहिलं आणि घरभर फिरत होती. आपल्याला अभिनव आवडतो असंही ती सातत्यानं सांगायला लागली.

एका टास्कदरम्यान तर तिने अभिनवच्या शॉर्ट्सची नाडीच ओढली. हा प्रकार अभिनव आणि रूबीनाला आवडला नाही. इतकंच नाही एका टास्कमध्ये मदत केली नाही, म्हणून घरात जाऊन राखीने अभिनवची अंतर्वस्त्रच कात्रीने कापली.

राखीच्या या वर्तनामुळे रुबीनाने 'एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. एका मर्यादेत राहणं चांगलं' असं तिला बजावलं होतं. एकदा तिने राखीच्या अंगावर पाणीही फेकलं होतं.

सोशल मीडियावर या घटनांनंतर रुबीनाला समर्थन मिळालं होतं, तर राखी सावंतला ट्रोल व्हावं लागलं होतं.

लग्नाबद्दलचा 'तो' गौप्यस्फोट

बिग बॉसच्या घरात रूबीनानं आपल्या लग्नाबद्दल केलेल्या खुलाशानंतरही खळबळ उडाली होती. आपल्या लग्नात तणाव होते. अभिनव आणि आपलं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं होतं, असं रुबीनानं म्हटलं होतं. आपल्या नात्याला एक संधी देण्याच्या विचारानंच आपण बिग बॉसमध्ये आल्याचंही रुबीना आणि अभिनवनं स्पष्ट केलं होतं.

त्यांच्या या खुलाशावर घरातील अनेक स्पर्धकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. रूबीना केवळ लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी हे सांगत आहे, असंही काही स्पर्धकांनी म्हटलं होतं.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनव शुक्लानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आता आपल्या नात्यात सगळं सुरळीत असल्याचं म्हटलं. आम्ही 'कपल' म्हणून अधिक स्ट्राँग झालो आहोत आणि आता घटस्फोटाचं कसलाही विचार नसल्याचं त्यानं म्हटलं.

कोण आहे रुबीना दिलैक?

मूळची शिमल्याची असलेल्या रूबीनानं 2008 साली झी टीव्हीवरील 'छोटी बहू' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने सास बिना ससुराल, देवों के देव महादेव, पुनर्विवाह या मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

2016 मध्ये तिनं कलर्स वाहिनीवरील 'शक्ती- अस्तित्त्व के एहसास की' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. यात तिनं ट्रान्सजेंडर व्यक्तिची भूमिका केली होती.

2018 साली रूबीना अभिनेता अभिनव शुक्लासोबत विवाहबद्ध झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)