बिग बॉस : कथित विवाहबाह्य संबंधांवरून एवढा गहजब का?

दोन प्रौढांमधले संबंध कसे असावेत हे ठरवण्याचा अधिकार तिऱ्हाईत व्यक्तीला असावा का? मराठी बिग बॉसच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

या शोमधले स्पर्धक राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे समाजात अशा प्रकारच्या संबंधांना प्रोत्साहन मिळतं, असा आरोप करत नाशिकमधले कायद्याचे विद्यार्थी ऋषिकेश देशमुख यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

"ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. यातलं राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांचं वागणं नैतिकतेला आणि संस्कृतीला धरून नाही. हा कार्यक्रम तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही, त्यामुळेच मी तक्रार दाखल केली," असं ऋषिकेश यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

विवाहबाह्य संबंधांवर बेतलेल्या अनेक सीरियल्स टीव्हीवर चालतात. त्यातल्या काही मराठी आहेत आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. अशा सीरियल्सचं काय असं विचारल्यानंतर ते म्हणाले, "त्यातली पात्रं काल्पनिक असतात. हा रिअॅलिटी शो आहे त्यामुळे लोकांवर जास्त परिणाम होतो."

टीव्हीची 'इडियट बॉक्स' म्हणून संभावना केली जाते. त्यावरच्या गोष्टी जर केवळ करमणुकीसाठी असतात, मग ही गोष्ट लोक एवढी गांभीर्याने का घेत आहेत? त्याविरुद्ध थेट पोलीस ठाणं गाठत आहेत. फेसबुकवर भरभरून लिहीत आहेत. यामुळे दोन प्रश्न निर्माण होतात. एक, दोन प्रौढांमध्ये विवाहबाह्य संबंध आहेत, असं गृहित धरलं तरी लोकांना अचानक एवढा धक्का का बसला आहे? दोन, टीव्हीमुळे खरंच समाजमनावर एवढा परिणाम होतो का?

अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणतात, "एखाद्याला धक्का बसू शकतो. तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. कारण टीव्ही आपल्या घरात येतो आणि लोकांना असं काही पाहून अस्वस्थ वाटू शकतं. ते त्याची रीतसर तक्रारही करू शकतात.

"पण नंतर अशा गोष्टींचं राजकारण केलं जातं, यात राजकारणी उतरतात आणि मग अशा प्रकरणांना वेगळं वळण लागून सर्वसामान्य लोकांना वेठीस धरलं जातं हे मला पटत नाही. 'पद्मावत'च्या वेळेस काय झालं आपण सर्वांनीच पाहिलं."

दोन प्रौढांच्या संबंधांमध्ये तिऱ्हाईताने हस्तक्षेप करण्याविषयी आम्ही विचरलं तेव्हा रेणुका म्हणाल्या, "अशा गोष्टी तुम्ही तुमच्या खासगी आयुष्यात नाही करत आहात, तर जाहीर टीव्हीवर करत आहात. मग अशी अपेक्षा करता की लोकांनी त्यावर टीका करू नये.

"अर्थात प्रेक्षकांना ते आवडत नसेल तर न बघण्याचा पर्याय आहे. पण तुम्ही ते पाहता कारण तुम्हीही त्या संस्कृतीचा एक भाग आहात."

पण अशा प्रकारच्या कथित विवाहबाह्य संबंधांने सामाजिक वातावरण बिघडत असेल तर आजवर अशा प्रकारच्या अनेक सीरियल्स आल्या. मराठीतही आल्या आणि लोकांनी भरभरून पाहिल्या. मग 'बिग बॉस'वर विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देण्याचा आरोप का?

"सीरियलमधली पात्रं खोटी आहेत हे लोकांना माहीत असतं. पण 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो आहे. तुम्ही समाजमान्य गोष्टींच्या विरुद्ध एखादी गोष्ट करत असाल तर लोक विरोध करतातच. अर्थात, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात विवाहबाह्य संबंधांना चालना मिळते असं काही मला वाटत नाही," त्या पुढे म्हणाल्या.

'पोलिसात जाणं अयोग्य'

अशा प्रकारचं वर्तन टीव्हीवर करणं योग्य नाही, असं अनेकांचं म्हणणं पडलं, पण त्याच बरोबरीने यासाठी पोलिसात जाणंही योग्य नाही, असं अनेकांनी बोलून दाखवलं.

झी आणि स्टार इंडियामध्ये प्रमुखपदी काम केलेले आणि आता निर्माते असणारे नितीन वैद्य म्हणतात, "पोलिसात अशी तक्रार दाखल करण्याची काही आवश्यकता नाही. टीव्हीवर दिसणाऱ्या कार्यक्रमांविषयी काही खटकलं तर त्याविषयी रीतसर तक्रार करण्याची सोय आहे. कोणतीही व्यक्ती तशी तक्रार करू शकते, मग पोलिसात जायची काय गरज?"

"बिग बॉस काही मराठी मातीतला शो नाही. तो जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये दाखवला जातो. आपल्याकडेही हिंदीमध्ये अनेक वर्षांपासून दाखवला जातो.

"अशा प्रकारच्या शोच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांचा फॉरमॅट ठरलेला असतो आणि कुणीही त्यात बदल करू शकत नाही. अमूक एक प्रकारचाच कंटेंट दाखवला गेला पाहिजे असं निर्मात्यांवर बंधन असतं. प्रेक्षकांना तो कंटेंट आवडला नाही तर त्यांना तक्रार करायचं स्वातंत्र्य असतं," असंही ते सांगतात.

'विवाहबाह्य संबंध नवे नाहीत'

टीव्हीवर अशा प्रकारचं वर्तन पाहून समाजावर काही परिणाम होत नाही, असं अनेक कलाकारांपैकी वाटतं.

अभिनेते चिन्मय मांडलेकर म्हणतात, "मी काही हा रिअॅलिटी शो पाहत नाही. आणि तुम्ही म्हणता तसे कथित संबंध या शोमध्ये दिसत असतील तर त्याला एवढं महत्त्व देण्याची गरज नाही असं मला वाटतं. पोलिसात तक्रार करण्याइतकं तर नाहीच नाही!"

"टीव्हीवरचा एक रिअॅलिटी शो पाहून लोकांच्या मनावर, विवाहावर किंवा आयुष्यावर परिणाम होत असेल तर लोकांनी आपले विचार तपासून पाहायला हवेत."

एका शो मुळे समाजात विवाहबाह्य संबंधांना खतपाणी मिळतं हे त्यांना मान्य नाही. "विवाहबाह्य संबंध आपल्या समाजात काय नवीन आहेत का? तुम्ही आपली पुराणं उघडून पाहा. देवदेवतांच्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला विवाहबाह्य संबंध दिसतील. मग आपली पुराणं विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालतात असं म्हणायचं का?"

मुळात असे संबंध ही दोन किंवा तीन व्यक्तींमधली अत्यंत खासगी गोष्ट आहे. त्यात नाक खुपसायचा कुणाला अधिकार नाही, असंही मांडलेकर म्हणतात.

राजेश-रेशम ठरवून वागत आहेत का?

तक्रारदाराचं म्हणणं आहे की रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्या वागणुकीमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लागत आहे.

असं खरंच घडत आहे का, हे आम्ही विचारल्यावर अभिनेते चिन्मय उदगीरकर म्हणाले, "मुळात ते ठरवून वागत नाहीत कशावरून? हा रिअॅलिटी शो जरी असला तरी त्याकडे फक्त करमणूक म्हणून पाहिलं पाहिजे. समाजात जे घडतं त्याचंच प्रतिबिंब सीरियल्स किंवा रिअॅलिटी शो मध्ये दिसतं. त्याचा धक्का बसायची काही गरज नाही. तुम्हाला ते आवडत नसेल तर चॅनेल बदला," ते म्हणतात.

सिनेमात किंवा सीरियल्समध्ये अनेक वाईट गोष्टी दाखवल्या जातात. स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार केल्याचं दाखवलं जातं. जर हे आपल्याला चालू शकतं, तर अशा कथित संबंधांचा किंवा दोन व्यक्तीमधल्या जवळकीचा आपल्याला त्रास का व्हावा, असा प्रश्नही उदगीरकर उपस्थित करतात.

"आपण 21व्या शतकात आलो तरी काही जण मात्र असूनही भूतकाळातच जगत असतात. त्याच पद्धतीने समाजात वागावं असा आग्रह धरतात. पण हे कितपत योग्य आहे किंवा मुळात नव्या पिढीच्या नव्या प्रश्नांना भुतकाळातली उत्तर देऊन चालतं का?

"एखादी व्यक्ती असं का वागते त्यामागे असंख्य सायकोलॉजिकल कारणं असतात, घटना असतात. आपण ते समजून घेत नाही. आपण सरळ लेबल लावून मोकळे होतो. हा शुद्ध दांभिकपणा आहे.

"ग्लोबलायझेशनमुळे इतके सारे प्रश्न नव्या पिढीपुढे आहेत. या प्रश्नांविषयी खुलेपणाने चर्चाही होत नाहीये. आपण सतत धावतो आहोत. त्यामुळे इतके इमोशन स्विंग होत आहेत, मूड स्विंग होत आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. याला लेबल न लावता सत्य म्हणून स्वीकारा," असंही ते म्हणतात.

एका रिअॅलिटी शोमुळे समाजावर खूप मोठा परिणाम होतो, असं बहुतेक जणांना वाटत नाही. दोन प्रौढांमधले संबंध कसे असावेत हे ठरवण्याचा अधिकार इतरांना नसावा, पण जर तुम्ही लोकांच्या नजरेत भरण्यासाठी असं काही करत असाल तर लोकांनी प्रतिक्रिया देऊ नये अशी अपेक्षाही करणं चुकीचं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)