You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीजोती: 'टीआरपीच्या आकडेवारीत अडकलो तर मोठ्या लोकांचं आयुष्य पडद्यावर कधीच येणार नाही'
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर जीवनावर आधारित सावित्रीजोती मालिका अचानक बंद होत आहे. या मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका साकारणारे ओंकार गोवर्धन आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी कासार यांच्याशी बीबीसी मराठीने केलेली बातचीत.
सावित्रीजोती मालिकेत तुम्ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ही भूमिका साकारत आहात. ही मालिका बंद होतेय कळल्यावर पहिली भावना काय होती?
अश्विनी- पहिली भावना खंत होती. माणूस म्हणून आपण कितीही समजूतदार असलो तरी अभिनेता म्हणून या गोष्टीची सवय असली तरी कुठल्याही कलाकृतीचा आणि विशेषत्वाने अशा महान व्यक्तिमत्त्वांचा पडद्यावरचा प्रवास अर्धवट पद्धतीने थांबतो तेव्हा खूप खंत वाटते.
मालिका बंद होतेय हे समजण्याची ही पहिलीच वेळ नाही. या मालिकेच्या बाबतीत म्हणता येईल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं बरंच कार्य दाखवायचं बाकी होतं. ते पूर्ण होऊ शकणार नाही याचं वाईट वाटलं.
ओंकार-मालिका थांबतेय हे कळलं तेव्हा अतिशय दु:ख झालं. कामं सुरू होतात, कामं बंद होतात. पण असं काम दरवेळेला करत असता असं नाही. फुले दांपत्यांचं सहजीवन, कार्य हे दाखवणं बाकी होतं.
कार्य आणि वैचारिक प्रगतीचे टप्पेसुद्धा प्रेक्षकांसमोर येणं बाकी होतं. अशा भूमिका रोज मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिशय वाईट वाटतं आहे.
ऐतिहासिक कलाकृती प्रदर्शित, सुरू होताना वाद निर्माण होतात. भूमिका स्वीकारताना असं काही दडपण होतं?
ओंकार- नाही. दशमी प्रॉडक्शनची एक रिसर्च टीम आहे. या मालिकेसंदर्भात संशोधन हरी नरके सरांनी केलं होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामासंदर्भातलं त्यांचं योगदान आपण सगळेच जाणतो.
नरके सर संहिता आणि प्रक्रियेदरम्यान असल्याने ते दडपण नव्हतं. काम कसं करू, ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल. आपण एका संवेदनशील काळात आहोत. कोणाच्या भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही. ते मनात होतं.
अश्विनी- हवहवंसं दडपण होतं. कुठलंही नवीन काम सुरुवात हवहवंसं दडपण असतं. या कामाच्या बाबतीत एक टक्क्याने दडपण जास्त होतं. आपण काल्पनिक गोष्ट मांडत नाहीयोत.
इतिहासातल्या एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणार आहोत. मालिका साकारण्यासाठी अनेकजण झटत असतात. कलाकार प्रेक्षकांसमोर असतात.
काळाचे संदर्भ, त्याचा अभ्यास, कार्याचे संदर्भ, आजूबाजूच्या व्यक्तिरेखा यासंदर्भात कलाकाराला जबाबदार धरलं जाऊ शकतं कारण प्रेक्षकांना कलाकार दिसतात. ते दडपण होतं.
आपल्याकडून या व्यक्तिरेखेवर कोणत्याही बाबतीत अन्याय होऊ नये. आपल्याकडून असं काही घडू नये ज्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातील हा विचार डोक्यात असतो.
मालिकेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातले कोणते टप्पे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले होते आणि कोणते टप्पे दिसणार नाहीत?
अश्विनी- खूप बाकी होतं. मुलींसाठी शाळा सुरू करणं हे महात्मा फुले यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते मालिकेत दाखवून झालं होतं. तृतीयरत्न- महात्मा फुले यांनी हे नाटक लिहिलं होतं. सावित्रीबाईंनी शेणाचा मारा झेलला होता. तो टप्पा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
सवत आणि सवता- बायकोलाही दुसऱ्या लग्नाचा हक्क आहे. बहुजन समाजासाठी महात्मा फुले यांनी स्वत:ची विहीर खुली केली होती. केशव भट नावाचं प्रातिनिधिक पात्र होतं. तो भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समकालीन असलेल्या अनेक माणसांचा प्रवास ज्यामध्ये लहूजी वस्ताद यांचा समावेश होतो. मोरोपंत वाळवेकर, सखाराम परांजपे अशी अनेक माणसं आहेत.
ही ऐतिहासिक गोष्ट आहे. बरेचदा मालिकांमध्ये बाकी मंडळींना दुय्यम स्थान मिळतं. इकडे त्यांचा एकत्रित प्रवास होता. तो भाग प्रेक्षकांना दिसणार होता. महात्मा फुले गेल्यानंतर, यशवंतला त्यांच्या दत्तक मुलाला अंत्यविधी करायला मनाई केली होती.
सावित्रीबाईंनी ठाम भूमिका घेतली. दत्तक मुलगा असल्याने समाजाने परवानगी नाकारली होती. यशवंत हे कार्य करेल असं सावित्रीबाईंनी म्हटलं होतं. आताही स्त्रिया अंत्यविधी संस्कारात नसतात. सावित्रीबाईंनी त्यावेळी अशी भूमिका घेतली होती.
ओंकार- शेतकऱ्यांचा आसूड लिहिणं, महात्मा फुले असे समाजसुधारक होते ज्यांचा स्वत:चा व्यवसाय होता. जोतिबा फुले यांना महात्मा फुले पदवी मिळणं, विधवा आणि बालहत्याप्रतिबंधक गृह चालवणं, विधवा केशवपन प्रकरण या ठळक गोष्टी बाकी होत्या.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मूल दत्तक घेतलं होतं. महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाईंचा सात वर्षांचा एकटीने केलेली वाटचाल हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं बाकी होतं. त्यावेळी प्लेगच्या साथीत सावित्रीबाईंचा दुर्देवी मृत्यू झाला.
आठ वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन आल्या यामुळे त्यांना प्लेगची लागण झाली. हे सगळं प्रेक्षकांसमोर येणं बाकी होतं. या घटनाक्रमांमधून त्यांचा मानसिक प्रवास कसा झाला ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं नाही.
डेली सोप्सचं गणित टीआरपीशी जोडलेलं असतं. टीआरपीमुळे प्रोजेक्ट थांबतो. टीआरपीचं गणित तुम्हाला माहिती असतं का?
अश्विनी- बऱ्याचदा कलाकारांना यासंदर्भात माहिती दिली जाते पण त्यांना विचारलं जात नाही. तशी या व्यवसायाची कधी पद्धतच नव्हती. गणितं आल्या आल्या कळतात असं नाहीये. माझा फक्त 2-3 वर्षांचा प्रवास आहे. आम्हालाही काही गोष्टी आता कळू लागल्या आहेत.
एक कुठली गोष्ट याला जबाबदार नसते. आपण ठरवूनही या गोष्टीसाठी काही योगदान देऊ शकत नाही याची खंत असते. याचा त्रास होतो. या व्यावहारिक गणितांमुळे कलाकाराला फायदा होतो तेव्हा आनंद नक्कीच होतो.
काही कामांवेळी हे सगळं बाजूला ठेवलेलं असतं. खूप जीव तोडून, जीव ओतून एखाद्या व्यक्तीने नव्हे तर खूप साऱ्या माणसांनी एकत्र येऊन कलाकृती साकारत असते.
यामध्ये लेखक, दिग्दर्शक, संशोधक, चॅनेल, प्रॉडक्शन यांचे कष्ट असतात. मालिका लोकप्रिय होईल की नाही माहिती नाही पण ती प्रबोधनासाठी लोकांनी आवर्जून पाहावी अशी असेल. लोकप्रियता, मनोरंजन यापल्याड जात प्रबोधन आणि अभ्यास या गोष्टी येतात त्यावेळी व्यावहारिक गणितं बदलली जाऊ शकतील अशी आशा वाटते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता?
ओंकार- अत्यंत भारावून टाकणारा प्रतिसाद होता. पहिल्या दिवसापासून आम्हा दोघांना, टीममधल्या सगळ्यांना कलाकार म्हणून सुखावणारा, बळ देणारा आणि उत्साह वाढवणारा प्रतिसाद होता, आहे. तुम्ही महात्मा फुले यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहात. तुम्ही समजूतदारपणे काम करत आहात. समाजाच्या विविध स्तरांमधून प्रतिसाद मिळत होता.
नामदेव कस्तुरे नावाचे सांगलीचे डॉक्टर आहेत. ही मालिका का चांगली आहे, ती का पाहावी असं आवाहन त्यांनी व्हीडिओ करून केलं होतं. मालिका कुठे बघता येईल ते सांगितलं होतं.
लोक आपल्याला त्या रुपात पाहत आहेत. आपण काय करायचं आहे असं वाटावं. गेले दोन दिवस अतिशय भारावून टाकणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. मालिका बंद होणार असल्याचं कळल्यानंतर अर्थसाहाय्याची आवश्यकता आहे का विचारणारे प्रतिसाद येत आहेत. मालिका बंद होऊ नये यासाठी काय करता येईल असं विचारणारे प्रतिसाद आहेत. यासाठी आम्ही कृतज्ञ राहू.
अश्विनी- एखादी मालिका बंद होऊ नये यासाठी लोकांनी उपाय सुचवण्याची ही पहिलीच वेळ असावी. लोक मालिकेतल्या पात्रांप्रती राग किंवा आनंद व्यक्त करतात. दोन-तीन दिवस चर्चा राहते. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला लिहायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रेक्षक लिहितात, बोलतात. पहिल्यांदाच असं घडतंय की लोक सोल्यूशन देत आहेत.
हे खूप भावणारं आहे. त्यामुळे मालिका बंद होतेय याची जास्त हळहळ वाटतेय. त्यांना आम्हा कलाकारांबद्दल, मालिकेबद्दल जी तळमळ वाटतेय ते ऐकून काय बोलू असं वाटतं.
चेहरा आम्ही असल्याने प्रेक्षक थेट आमच्याशी बोलायला येत आहेत. लोकांना कसं समजवायचं, काय सांगायचं असा प्रश्न आमच्यासमोर आहे. कारण काही गोष्टी आमच्या हातात नाहीत.
सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. मी बघत नसलो तरी ही मालिका सुरू राहायला हवी. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवेत असं एका प्रेक्षकाने सांगितलं. त्यांनी आई, बहीण, काकू असा महिलावर्गाचा उल्लेख केला नाही. समाजातल्या प्रत्येकापर्यंत या दांपत्याचे विचार पोहोचायला हवेत असं त्यांना वाटलं. हा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे.
ही मालिका आता थांबली आहे. तिथून पार्ट 2, सीझन 2 होईल का?
ओंकार- आता मालिका थांबवत असल्याचा निर्णय समोर येतोय. त्यामुळे पुढच्या प्रवासाबाबत अनिश्चितता आहे. आम्हाला वाटतं की पुढचा भाग यावा. काहीवेळेला बांधिलकीचे प्रश्न असतात.
अशा पद्धतीचं कथानक असलेल्या मालिकेला टीआरपी मिळणं अवघड आहे. हे आपल्याला माहिती असतं. ज्या दांपत्याने तत्कालीन समाजाला न रुचणाऱ्या गोष्टी केल्या त्यांचं कार्य मालिकेद्वारे आपण दाखवत आहोत.
हे सगळं आताच्या समाजाला रुचेल अशी परिस्थिती आजही नाही. ही वस्तुस्थिती आहे. यातून मार्ग काढायला हवा. आयुष्याला दिशा देणाऱ्या लोकांचं काम पडद्यावर आणणं महत्त्वाचं आहे. आकडेवारीच्या सापशिडीत अडकून पडलो तर महान व्यक्तिमत्वांचं काम पडद्यावर आणणं अवघड होईल.
अश्विनी- पुढचा भाग, पुढचा सीझन असावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. आम्ही इच्छा मांडू शकतो. निर्णय आमच्या हातात नाही. मालिकेच्या माध्यमातून महान लोकांचं काम आणणं खरंच अवघड असेल.
यापुढे ऐतिहासिक भूमिका स्वीकारताना हा सल डोक्यात राहील?
अश्विनी- तोपर्यंत आपण सोल्यूशन शोधलेलं असेल. आपण अशा मुद्यांवर सल मनात घेऊन अन्य भूमिका करण्याचं थांबवू शकत नाही. माणूस म्हणून, कलाकार म्हणून माझ्या क्षेत्राद्वारे अशा द्रष्ट्या मंडळींचे विचार लोकांपर्यंत जात असतील तर ते जायला हवेत. त्या प्रयत्नांमध्ये माझा काही सहभाग असणार असेल तर तो द्यायला मी कायम तयार असेन. एक सल नक्कीच राहील.
ओंकार- कामाचं काय होईल या मुद्यासंदर्भात सल राहील. आपण जे काम हाती घेतलं ते कर्मधर्मसंयोगामुळे पूर्ण होऊ शकलं नाही. भूमिका स्वीकारताना पहिला विचार हा असतो की भूमिका तुम्हाला काय देते आहे आणि तुम्ही त्या भूमिकेला काय देत आहात हा विचार करता यायला हवा.
त्या भूमिकेने तुमच्या आयुष्यात काय बदल घडले- त्या बदलांना सामोरं जाणं हे कलाकारांसाठी महत्व आहे. प्रायोगिक नाटकात जगण्याच्या धारणेशी असतात. मालिकेत मोठ्या प्रेक्षकवर्गासाठी असतो. त्यासंदर्भात नक्कीच वाटेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)