You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीजोती: नवऱ्याची लफडी, सासू-सुनांची भांडणं हेच प्रेक्षकांना आवडतं का?
समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर बेतलेली 'सावित्रीजोती' मालिका टीआरपी नसल्याने बंद होत आहे.
स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी अवहेलना झेलून काम करणाऱ्या फुले दांपत्याच्या कामावर आधारलेली कलाकृती आधुनिक काळात प्राईम टाईमच्या स्पर्धेत मात्र पिछाडीवर गेली.
सोनी मराठीवर प्रक्षेपित होणारी ही मालिका दशमी क्रिएशन्सची निर्मिती आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रक्षेपित होत असे. 26 डिसेंबरला मालिका संपत आहे.
यंदाच्या वर्षी 6 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात झाली होती. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे बाकी मालिकांप्रमाणेच या मालिकेचं कामकाज स्थगित झालं होतं. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर या मालिकेचं शूटिंग सुरू झालं होतं. ओंकार गोवर्धन महात्मा फुले यांची तर अश्विनी कासार सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत. उमेश नामजोशी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
या मालिकेसाठी संशोधन सल्लागार म्हणून कार्यरत हरी नरके यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये मालिका बंद होण्यासंदर्भात सविस्तर लिहिलं आहे.
मात्र मालिका बंद होते आहे का? यासंदर्भात सोनी मराठीने कोणतंही प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं नाही. येत्या काही दिवसात सोनी मराठीतर्फे पत्रक जारी करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
सावित्रीजोती मालिकेचे निर्माते नितीन वैद्य यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. निर्माता म्हणून त्यांनी बाजू स्पष्ट केल्यास आम्ही या बातमीत ते समाविष्ट करू.
सावित्रीजोतीने पुरवली मूल्यभानाची रसद
नरके लिहितात, "सावित्रीजोती मालिका बंद होत असल्याचं दु:ख होत आहे. टीआरपीच्या रेसमध्ये यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या सध्याच्या इतर मराठी वाहिन्या आणि मालिकांबदल माझ्या मनात किंचितही आकस नाही. उलट कुतुहलच आहे. कौतुकच आहे. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मूल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात."
ते पुढे लिहितात, "या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ट निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत".
'अतिशय वाईट वाटलं'
मालिका बंद होते आहे कळलं तेव्हा अतिशय वाईट वाटलं. जोतिबा फुले हे महाराष्ट्राचे वैचारिक नायक आहेत. त्यांच्यासारख्या महापुरुषाची भूमिका साकारायला मिळणं हा सन्मान होता आणि आव्हानही होतं. मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा होता, असं महात्मा फुलेंची भूमिका साकारणाऱ्या ओंकार गोवर्धन यांनी सांगितलं.
"टीआरपी ही प्रेक्षकसंख्या मापनाची आकडेमोड आहे. टीआरपी का नाही याची कारणं वेगवेगळी असू शकतात. टीआरपीच्या आकडेवारीवर कलाकारांचं नियंत्रण नाही. प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून आहे. नेमकं किती लोकांनी मालिका बघितली म्हणजे त्याचं रुपांतर टीआरपीत होतं हे समजत नाही."
"सॅलड आणि पावभाजी यामध्ये सॅलड पौष्टिक असतं. शरीराला पौष्टिक गोष्टी आवश्यक असतात हे कुणीतरी बिंबवावं लागतं. महाराष्ट्राचे मानबिंदू असणाऱ्या व्यक्तिमत्वांवर मालिका होती. कंटेटमध्ये काही उणं असण्याचा प्रश्न नव्हता. ही मालिका पोहोचवण्यात कमी पडलो का असं वाटत राहतं. मालिकेबद्दल जागरुकता निर्माण करण्यात, पाहण्यासाठी आवाहन करण्यात कमी पडलो का असं वाटत राहतं," असं ओंकार यांनी पुढे सांगितलं.
सावित्रीजोतीच्या वेळेत अन्य चॅनेल्सवर कुठल्या मालिका?
संध्याकाळी 7 ते 10 हा प्राईम टाईम स्लॉट मानला जातो. या वेळात चालणाऱ्या मालिका स्त्रीवर्ग केंद्रित ठेऊन केलेल्या असतात. दिवसभर घरसंसार, ऑफिस यामध्ये व्यग्र असणाऱ्या महिला या वेळात आवर्जून मालिका बघतात. या वेळातल्या मालिकांना टीआरपी अर्थात टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट चांगले मिळतात. मात्र बाकी चॅनेल्सच्या मालिकाही स्त्रियांना समोर ठेऊनच केलेल्या असतात. त्यामुळे स्पर्धा चुरशीची असते.
सावित्रीजोती मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रक्षेपित होते. झी मराठीवर नोव्हेंबरपासून याच वेळेत 'कारभारी लयभारी' ही मालिका असते. परंतु ही मालिका महिनाभरापूर्वी सुरू झाली आहे. त्याआधी झी मराठीवर साडेसात वाजता 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही मालिका प्रक्षेपित होत होती. त्याआधी या वेळेत 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रक्षेपित व्हायची.
कलर्स मराठीवर बाळूमामाच्या नावाने चांगभलं ही मालिका असते. त्याचवेळी स्टार प्रवाहवर यावेळेत 'आई कुठे काय करते?' ही मालिका प्रक्षेपित होते.
ऐतिहासिक कथानक असलेल्या मालिका
इतिहासकालीन कालखंड किंवा व्यक्तिमत्वांवर आधारित मालिका मराठीत नियमितपणे तयार होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
झी मराठीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका चांगली चालली होती. अनेक वर्षांपूर्वी पेशवाईतल्या व्यक्तिमत्वांवर आधारलेली 'रमा' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता.
कलर्स मराठीवर माधवराव पेशवे आणि रमाबाई यांच्या आयुष्यावर आधारित 'स्वामिनी' मालिकेनेही प्रेक्षकांवर चांगलं गारुड घातलं होतं. स्टार प्रवाहवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' या मालिकेला प्रेक्षकाला चांगला प्रतिसाद आहे.
रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित 'उंच माझा झोका' या झी मराठीवरील मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित 'तू माझा सांगाती' मालिका सुरू झाली होती.
नवऱ्याची लफडी, सासूसुनांची भांडणं हेच आवडतं का?
नवऱ्याची लफडी, सासूसुनांची भांडणं, एकमेकांवर कुरघोड्या हे महिला प्रेक्षकांना आवडतं का? असा सवाल दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी केला आहे. फेसबुक पोस्टद्वारे सावित्रीजोती मालिका बंद होत असल्याबद्दल त्यांनी परखडपणे मत मांडलं आहे.
टिळेकर लिहितात, "सावित्री ज्योती' ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झालं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?
"नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींच्यावर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर काही कलाकार माकडचाळे करून प्रेक्षकांना हसविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना पाहून नक्की विनोद कश्याला म्हणायचा असा प्रश्न पडतो. पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे काही कलाकार आहेत."
"सावित्री ज्योती सारखी उत्तम मालिका प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी?" असा सावल त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)