You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्राह्मण अभिनेत्री ते ब्राह्मणेतर कथानक: मराठी टीव्ही सिरियलचा व्यावहारिक प्रवास
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
मी पुण्यात शनिवार पेठेतल्या एका काकूंकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. त्यावेळी 'होणार सून मी' या घरची मालिका सुरू होती. श्रीच्या आयांबद्दल बोलताना त्या एकदम म्हणाल्या होत्या, 'सगळ्या अगदी गोखल्यांच्या सुना वाटताहेत. कोकणस्थच आहेत ना...' असं म्हणून त्यांनी सुहिता थत्ते, पूर्णिमा ओक, लीना भागवत अशा कलाकारांची नावं कौतुकानं सांगितली होती.
त्यांच्या अभिनयापेक्षाही कोकणस्थ ब्राह्मणी भूमिकेला कशा या कोकणस्थ बायकाच शोभून दिसतात याचंच त्यांना कौतुक होतं. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या जातींची सांगड घालताना कुठेतरी विशिष्ट जातीची व्यक्ती त्या जातीच्या भूमिकेला न्याय देऊ शकते अशी भावना त्यांच्या बोलण्यात असावी कदाचित.
सुजय डहाकेच्या विधानामुळं मला ही गोष्ट आठवली आणि त्यानं जे म्हटलंय ते अगदीच टीका करुन सोडून देण्यासारखं नाहीये हे जाणवलं. त्यावर विचार करताना अगदी शाळेत असल्यापासून पाहत असलेल्या मालिकाही आठवल्या.
खासगी वाहिन्यांमध्ये झी मराठीचा (पूर्वीचं अल्फा मराठी) एकछत्री अंमल असण्याचा हा काळ. सुरुवातीपासून या चॅनेलचा तोंडावळा मध्यमवर्गीय ब्राह्मणी होता. त्यांचा टार्गेट ऑडिअन्सही प्रामुख्यानं पुण्या-मुंबईतलाच होता.
झी मराठी हा इंडस्ट्रीतला आद्य आणि लीडिंग प्लेअर आहे, म्हणून आपण त्यांचं उदाहरण घेऊ. कारण त्यापाठोपाठ सुरू झालेल्या चॅनेल्सना बहुतांश वेळा झी मराठीला फॉलो करायला लागल्याचं दिसलंय.
तर झी मराठीच्या सुरुवातीच्या मालिकांपासून ते अगदी आताआतापर्यंतच्या मालिकांच्या बहुतांश नायिका ब्राह्मण समाजातल्या आहेत. म्हणजे सुकन्या कुलकर्णी, मृणाल देवपासून भार्गवी चिरमुले, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, उर्मिला कानिटकर ते सध्याच्या अक्षया देवधर, गायत्री दातार, अनिता दाते...अनेकांना अजूनही नावं आठवतील.
या सगळ्या जणींच्या जातींचा मी कधी विचार केला नव्हता. पण आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाल्यावर जेव्हा आठवून पाहिलं तेव्हा लक्षात आलं. किंबहुना माझ्या फेसबुक टाईमलाईनवर अनेकांनी ही नावं आठवून दिली.
त्या सगळ्याजणी जातीमुळे तिथे पोहोचल्या असं माझं म्हणणं नाही, पण इतर जातींच्या तुलनेत एकाच समाजातल्या मुलींना जास्त संधी मिळाली, हे वास्तव नाकारता येणार नाही.
इतर जातीतल्या मुलीही कशा वेगवेगळ्या मालिकांमध्ये नायिका आहेत, अशी यादी देताना प्राजक्ता गायकवाड (संभाजी), एकता लब्धे (विठू माऊली), शिवानी सोनार (राजाराणीची गं जोडी) अशी वेगवेगळी नावं सोशल मीडियावर पुढे आली खरी...पण तुलना केली तर ही नावं फार नसतील.
असं का असावं?
शिक्षणामध्ये ब्राह्मण समाजाला सर्वांत आधी संधी मिळाली हे सर्वांना ठाऊक आहेच. त्याबरोबरीने त्यांनी संगीत, साहित्य, नाट्यकलांमध्ये रुची घेतली. शहरी, मध्यमवर्गीय ब्राह्मण समाजांमध्ये मुलांच्या अभिनयविषयक जाणिवा मोठ्या कौतुकानं जोपासल्या जातात. अशा वेळी नाट्यसंस्था, अभिनय शिबिरं, ऑडिशनमधून एका विशिष्ट समुदायातील मुलींची संख्या जास्त प्रमाणात समोर येत असेल तर निर्माते तरी काय करणार, असा प्रश्न विचारला जातोय.
पण पुण्या-मुंबईतल्या विशिष्ट चौकटींच्या बाहेर जाऊन टॅलेंट शोधण्याचे कष्ट किती निर्माते घेतायत? एका सैराटसाठी नागराजने सोलापूरमध्ये गुणी कलाकार हुडकून काढले. पण एवढी मेहनत घेण्याची आणि एवढा वेळ त्यात गुंतवण्याची तयारी सगळ्यांची नसते.
या गोष्टीकडे जातींमधल्या भांडणांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विषय म्हणून तटस्थपणे पाहायला हवं.
पण नेहमी जे होतं तेच सोशल मीडियावर झालं. जातींचे दोन गट पडले आणि शिवीगाळ सुरु झाली. या वादात ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडनं पण उडी घेतली. ब्राह्मण महासंघानं सुजयला विरोध केला तर संभाजी ब्रिगेडनं त्याच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं म्हटलं.
'अनेक मराठी वाहिन्या आहेत, त्यावर सुरू असलेल्या मालिकांमध्ये प्रमुख अभिनेत्री ही ब्राह्मणच असते', या सुजयच्या विधानावर अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता शशांक केतकर तसंच सौरभ गोखलेनं कडाडून टीका केली.
शाळा, फुंतरु, आजोबा या चित्रपटांचं दिग्दर्शन सुजय डहाकेनं केलं आहे. त्याच्या 'शाळा' या चित्रपटाची नायिका केतकी माटेगावकरही ब्राह्मणच असल्याची आठवण त्याला करुन देण्यात आली. तो प्रसिद्धीसाठी हे सगळं करतोय, असाही त्याच्यावर आरोप झाला.
सुजय डहाकेचं दिग्दर्शनाचं कौशल्य किंवा त्यानं आपल्या फिल्ममध्ये कोणाला संधी दिली यावर अधिक चर्चा झाली, पण त्यानं मांडलेलं मनोरंजन विश्वातलं जातवास्तवाकडेही तटस्थपणे पहायला हवं.
मुद्दा कलाकारांच्या पलीकडचा आहे....
सध्या चर्चा ही कलाकारांच्या जातीपुरती होताना दिसतेय. पण चर्चा कथानक, पात्रं, भाषा आणि सांस्कृतिक प्रतिकांबद्दलही व्हायला हवी.
या मालिकांमधली कुटुंबं पण बहुतांश उच्च मध्ययमवर्गीय ब्राह्मणच असायची किंवा असतात. 'आभाळमाया'मधलं जोशी कुटुंब, 'होणार सून मी या घरची' मधले गोखले-सहस्रबुद्धे, 'रेशीमगाठी'मधले देसाई... ही पटकन आठवलेली नावं.
सध्या गाजत असलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतल्या गुलमोहर सोसायटीवर एकदा नजर टाका... सुभेदार, सबनीस, महाजनी, गुप्ते... ही ब्राह्मण अथवा उच्चवर्णीयांची सोसायटीच आहे का? त्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतंय का?
मुंबईसारख्या शहराचं, जिथे अठरापगड जातींचे, वेगवेगळ्या समुदायाचे लोक नांदतात त्याचं चित्रीकरण इतकं मर्यादित चष्म्यातून का? ही मालिका प्रातिनिधिक उदाहरण झाली, पण बहुतांश मालिकांमधून असंच चित्र पहायला मिळतं. मालिका या काल्पनिक असल्या तरी आपल्या आजूबाजूच्या समाजाचं भान त्यातून उमटायला हवं. ते उमटत नसेल तर मग पुन्हा प्रश्न मूळ मुद्द्याकडेच येतो...जसं कलाकारांबाबत आहे, तसंच लेखकांबाबतही आहे का?
आपल्या सामाजिक चौकटीच्या पलीकडचं जग दाखवण्याबाबत ते उदासीन आहेत की त्याची त्यांना जाणीवही नाही?
कलर्स मराठी, स्टार प्रवाह, सोनी मराठीवरही ग्रामीण भागातील, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मालिका दिसू लागल्या. तुझ्यात जीव रंगला, लागीरं झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, जीव झाला येडपिसा, साता जल्माच्या गाठी, नवरी मिळे नवऱ्याला अशा गावाकडच्या गोष्टी दिसू लागल्या. अनेक स्थानिक कलाकारांना वाव मिळाला. या मालिकांमधले लीड चेहरेही वेगळे, फ्रेश होते.
सर्व समाजांचं प्रतिनिधित्व दाखवणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण तो सामाजिक जाणिवेपोटी होतोय की व्यावहारिक कारणांमुळे, हेही तपासून पाहायला हवं.
टीआरपीची गणितं
वाहिन्यांनी अशा ग्रामीण कथानकांना प्राधान्य देण्यामागे बिझनेस मॉडेल आणि टीआरपीचं गणित पण आहे. 2014 मध्ये टेलिव्हिजन ऑडिअन्स मेजरमेंटची (TAM) जागा BARC या यंत्रणेनं घेतली. प्रेक्षकांची संख्या, त्यांचा कल यांचा आढावा घेणारी यंत्रणा असं ढोबळमानानं BARC चं वर्णन करता येईल. TAM चं वेटेज हे मुख्यतः पुणे-मुंबई आणि मोठ्या शहरांनाच होतं. BARC नं हे चित्र बदललं. 2015 पासून BARC नं ग्रामीण आणि निमशहरी प्रेक्षकांचीही गणना सुरू केली.
त्यामुळे पूर्वी फक्त पुण्या-मुंबईचा विचार करणाऱ्या वाहिन्यांसाठी अचानक गाव-तालुके महत्त्वाचे होऊन बसले. माळरानावरच्या लोकांच्या आवडी-निवडींनाही किंमत मिळाली. त्यावेळी या भागातील प्रेक्षकांचा विचार करायला चॅनल्सनं सुरुवात केली. त्यातून या भागातील लोकांच्या आयुष्याशी रिलेट करणारे विषय समोर यायला लागले.
पण त्यातही गंमत म्हणजे या मालिकांची कथानकं ग्रामीण भागातली असली तरी त्यातली प्रमुख पात्रं ही त्या त्या भागातली मातब्बर राजकारणी, बडे उद्योजक, शेतकरी दाखवले आहेत...त्यांची नावंही देशमुख, पाटील, मोहिते अशी आहेत.
मालिका एका समाजातून बाहेर पडून दुसऱ्या समाजात अडकून पडताना दिसू लागल्या.
काही लोक म्हणतील की मालिका या मनोरंजनासाठी आहेत, त्यात एवढं बारकाईनं काय पहायचं? पण मुळात या मालिकांचा लोकांच्या बोलण्यावर, सणावारांवर, वागण्यावर होणारा प्रभाव पाहता या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच व्हायला हवा.
आधी ब्राह्मणी संस्कृती, नंतर खानदानी मराठा कुटुंबातल्या डोक्यावरून पदर घेतलेल्या बायका, सणवार-रीतीरिवाज हे मालिकांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचतात याचा विचार केला की मग रील आणि रिअल जात वास्तव अजून अधोरेखित होतं.
फुले आणि आंबेडकरांवर सिरियल
जसजसे नवे चॅनल्स येत आहेत, तसतशी स्पर्धा वाढतेय आणि नवनव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ कंटेटमध्ये बदल घडवतेय.
आता या ब्राह्मण-मराठा चौकटीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रभर पसरलेल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल्सनी इतिहास, पुराण, दंतकथांचा आधार घेतला.
मग महात्मा फुले किंवा आंबेडकरांवर मालिका निघाल्या. खरं तर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधणं चुकीचं आहे, पण प्रत्येक समाजाची अस्मिता या महापुरुषांसोबत जोडलेली असते, हेसुद्धा नाकारता येत नाही.
ग्रामीण भागात न चुकता पाहिल्या गेलेल्या-जाणाऱ्या जय मल्हार, बाळूमामाच्या नावानं चांगभलं किंवा विठू माऊलीसारख्या मालिका एखाद-दुसऱ्या समाजाची चौकट मोडून बहुजन समाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
पडद्यावरचं जातीय गणित बदलत असल्यानं कदाचित मग इंडस्ट्रीमधलं जातीय वास्तव अधोरेखित करुन मांडलं जात असावं. त्यामुळे वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या आशयासाठी प्रामुख्यानं ब्राह्मणी चेहराच का हा प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित केला जातोय.
टीव्ही इंडस्ट्रीमधल्या बदलत्या कंटेंटचा दाखला देत, कलाकारांची नावं सांगत सर्वसमावेशकतेचा दावा केला जात असला तरी तो पुरेसा आहे का? आशय आणि कलाकार दोन्ही पातळीवर सर्वच गणितं बदलणारा 'सैराट'सारखा प्रयोग मराठी टीव्ही इंडस्ट्री करु धजावेल का, हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)