You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्वांटिको : हिंदूंना दहशतवादी दाखवल्याप्रकरणी प्रियंकाने मागितली माफी
"हा पाकिस्तानी नाही आहे. यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. ही कोणा पाकिस्तानी मुसलमानाच्या गळ्यात असूच शकत नाही. हा एक भारतीय देशभक्त आहे, जो पाकिस्तानला फसवण्याचा प्रयत्न करत आहे."
हा डायलॉग आहे प्रियंका चोप्राच्या आमेरिकन टीव्ही सिरियल 'क्वांटिको'मधला. क्वांटिकोचा तिसरा सीझन आणि पाचव्या एपिसोडमधली ही क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली आहे आणि अनेक भारतीय यावरून प्रियंकावर जोरदार टीका करत आहेत.
दरम्यान प्रियंकाने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आज केलेल्या ट्वीटमध्ये ती म्हणते, "मला भारतीय असण्याचा अभिमान आहे. त्यात कधीही बदल होणार नाही. या मालिकेतील काही दृश्यांमुळे काहींच्या भावना दुखावल्या आहेत, याबद्दल मला दुःख झालं आहे. शिवाय मी प्रामाणिकपणे माफी मागते."
सोशल मीडियावर भारतीय यूजर्सनी #ShameOnYouPriyankaChopra आणि #BoycottQuantico हे हॅशटॅग वापरून तिला ट्रोल केलं.
क्वांटिकोच्या या तिसऱ्या सिझनचं नाव 'द ब्लड ऑफ रोमिओ' आहे. आणि त्याचा प्लॉट काहीसा असा आहे :
जेव्हा अमेरिकेच्या प्रसिद्ध विद्यापीठातले फिजिक्सचे प्राध्यापक युरेनिअम चोरून गायब होतात, तेव्हा FBIची पूर्ण टीम त्यांना शोधण्यास सुरुवात करते. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या शिखर संमेलनात अण्विक हल्ला करण्याचा या प्राध्यापकाचा कट असतो.
प्रियंका चोप्रा क्वांटिकोमध्ये FBI एजंटची भूमिका साकारत आहे. प्रियंकाची टीम एका संशयिताला ताब्यात घेते, तो पाकिस्तानी असल्याचा तिच्या टीमला संशय येतो. पण त्याच वेळी प्रियंकाची नजर त्या संशयिताच्या गळ्यात असलेल्या रुद्राक्षाच्या माळेवर पडते आणि ती हा डायलॉग मारते.
या एपिसोडची एक क्लिप सध्या सोशल मीडियवर चांगलीच व्हायरल झाली आहे.
@AsliShotgun नावानं ट्विटर अकाउंटवरून ही क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "काही पैसे आणि प्रसिद्धीसाठी एका अंतरराष्ट्रीय शोमध्ये आपल्या देशाची बदनामी? लाज वाटायला पाहिजे."
फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी देखील प्रियंकाच्या या डायलॉगवर नाराजी व्यक्त केली आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये लिहितात,"मी तुमची प्रतिभा आणि हिमतीचा आदर करतो, पण कोणत्याही भारतीयानं अशा शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला असता. आम्हाला हे अमान्य आहे."
दीपाली लिहितात,"मी 2003पासून तुमची खूप मोठी फॅन आहे. हॉलिवुड शोमध्ये लोक तुमच्या आंतरराष्ट्रीय फॅन फॉलॉइंगच्या गोष्टी करतात आणि आपण भारताला दहशतवादी देश बोलून आपल्या फॅन्सला दुखावलं आहे."
तर संदीप तोमर नावाचे एक यूजर लिहितात, "ही अत्यंत दु:खद बाब आहे की प्रियंकानं हा विचार नाही केला, की यामुळे भारताची प्रतिमा मलीन होईल. तुम्ही भारताला दग दिला आहे."
प्रियंकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
याआधीही तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना घातलेल्या कपड्यांवरून आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांना भेटायला गेल्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं आहे.
दरम्यान, या सगळ्या वादानंतर या शोचे निर्माते वॉल्ट डिस्नी आणि चॅनेल ABCनं आता माफी मागितली आहे.
त्यांनी त्यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
या पत्रकात ABCनं लिहिलं आहे, "या एपिसोडमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्यामुळे लोकांनी प्रियंकावर निशाणा साधला आहे. पण, या शोची निर्मिती ती करत नाही किंवा ती त्याचं स्क्रिप्ट सुद्धा लिहित नाही किंवा त्याचं दिग्दर्शन तिनं केलेलं नाही."
"आमच्याकडून नकळत आणि चुकून एका जटिल राजकीय मुद्दावर बोट ठेवलं गेलं आहे. पण यामधून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हात," असंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
प्रियंकाने रविवारी केलेल्या ट्विटमध्ये यात भावना दुखावण्याचा हेतू नाही, असंही स्पष्ट केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)