You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रमेश भाटकर यांच्या 'या' 7 भूमिका तुम्हाला आठवतात का?
रमेश भाटकर यांचं 4 फेब्रुवारी रोजी निधन झालं. टीव्ही, नाट्यसृष्टी आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्यांनी अनेक भूमिका केल्या. रमेश भाटकर म्हटलं की हॅलो इंस्पेक्टर आणि कमांडर मालिकांमधले त्यांचे रोल आठवले नाहीत अशी 'नाइंटीज'मध्ये वाढलेली व्यक्ती सापडणार नाही, इतका त्यांचा छोट्या पडद्यावर सहज वावर होता. रमेश भाटकर म्हटलं की आपोआपच हॅलो...हॅलो...हॅलो..इंस्पेक्टर असं लोक गुणगुणायला लागत असत.
इंस्पेक्टरच्या भूमिका त्यांनी अनेक केल्या पण ते केवळ इंस्पेक्टरच्याच भूमिकांमध्ये अडकून पडले नाहीत. त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांवर आपण एक नजर टाकू.
1. लाल्या- अश्रूंची झाली फुले
"मामा म्हणतो तेच खरं, ही दुनिया काही खऱ्याची नाही. इथं खरे भिकेला लागतात आणि खोटे चैनीत जगतात." किंवा तुम्ही पोलिसात असता ना पोलिसात तुम्ही DSP झाला असता एकदम कडक.... अश्रूंची झाली फुले या नाटकातले हे संवाद. डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अजरामर केलेल्या 'लाल्या' या भूमिकेला न्याय देईल असा अभिनेता कोण मिळेल असा पेच दिग्दर्शकांसमोर पडला.
"घाणेकरांशी तुलना होईल या भीतीने कोणी अनुभवी नट ही भूमिका घ्यायला तयारच नव्हता शेवटी दिग्दर्शकांनी नाट्य सृष्टीत नवखा असलेल्या अभिनेत्याला घ्यायचा निर्णय घेतला आणि ही भूमिका मला मिळाली. एका मुलाखतीमध्ये रमेश भाटकर हा किस्सा रंगवून सांगतात.
काशीनाथ घाणेकरांनी केलेली भूमिका करताना मनावर दडपण आलं नाही का? असा प्रश्न आपसूकच तो मुलाखतकार विचारतो आणि भाटकर सांगतात, "बिल्कुल नाही. कारण गमावण्यासारखं माझ्याकडे काही नव्हतंच, झालं असतं तर माझं नाव झालं असतं."
2. हॅलो इंस्पेक्टर
भाटकर त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात, की आता शेकडो चॅनेल्स आले आहेत आणि सीरियल्सचे कित्येक भाग प्रदर्शित होतात. पण हॅलो इंस्पेक्टर ही मालिका केवळ 13 भागातच लोकप्रिय झाली होती. त्या मालिकेमुळेच माझं नाव घराघरात पोहोचलं. अधिकारी ब्रदर्स हे या सीरियलचे निर्माते होते. त्यांच्याबरोबर भाटकर हे बंदिनी नावाची सीरियल करत होते. भाटकर यांचं काम पाहून त्यांच्यासाठी एखादा टायटल रोल असावा असं निर्मात्यांना वाटलं आणि त्यांनी सेटवरचं हॅलो इंस्पेक्टरची संकल्पना जाहीर करून टाकली. या सीरिअलमुळेच आपल्याला ग्लॅमर काय असतं हे पाहायला मिळालं असं भाटकर सांगतात. या मालिकेत त्यांनी इंस्पेक्टर वर्धेंची भूमिका बजावली होती.
3. कमांडर
हॅलो इंस्पेक्टरचं यश पाहून रमेश भाटकर यांना हिंदी मालिकांमध्ये संधी का देऊ नये असा विचार अधिकारी ब्रदर्स यांनी केला. भाटकर सांगतात, "तेव्हा झी टीव्ही ही वाहिनी सुरू झाली होती. झी साठी अधिकारी ब्रदर्सना एक सीरिअल सुरू करायची होती. त्यासाठी ते हिंदी चेहऱ्याच्या शोधात होते. पण नंतर त्यांनी विचार केला की मी हॅलो इंस्पेक्टरमध्ये चांगलं काम केलं आहे आणि काही अमराठी लोकही ही मालिका पाहतच होते तर त्यांना वाटलं की मीच हा रोल करावा. त्यानंतर मला कमांडर या डिटेक्टिव्हची भूमिका मिळाली अन् मी भारतातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचलो."
त्यांच्या या भूमिकांबद्दल नाट्य लेखक विक्रम भागवत सांगतात, "रमेश भाटकर हे देखणे आणि रुबाबदार अभिनेते होते. त्यामुळे ते अशा भूमिकांमध्ये चपखल बसत." या व्यतिरिक्त त्यांनी तिसरा डोळामध्येही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अमरनाथ यांची भूमिका केली होती.
4. माहेरची साडी
"...पण फक्त इंस्पेक्टर किंवा डिटेक्टिव्ह याच भूमिकांमध्ये ते अडकून पडले नाहीत तर त्यांनी विविधांगी भूमिका केल्या," असं भागवत सांगतात. "माहेरची साडी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड समजला जातो. या चित्रपटात त्यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका केली होती. आजही त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे," भागवत सांगतात. इतर काही कौटुंबिक मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यापैकी 'हृदयस्पर्शी' हा चित्रपट विशेष गाजला होता.
5. दामिनी
रमेश भाटकर यांची गाजलेली आणखी एक मालिका म्हणजे दामिनी. दामिनी या मालिकेत प्रतीक्षा लोणकर यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं.
6. सवत माझी लाडकी
सह अभिनेता म्हणून त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केलं. सचिन पिळगावकर यांच्या अष्टविनायकमध्ये तसेच स्मिता तळवलकर यांच्या सवत माझी लाडकी या चित्रपटातल्या त्यांच्या छोट्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. सवत माझी लाडकीमध्ये एका मध्यमवयीन पण खेळकर व्यक्तीची भूमिका त्यांनी बजावली होती.
7. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
नुकताच मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात त्यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. भाटकर यांनी त्यांची भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका पडद्यावरची शेवटची भूमिका ठरली.
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करून रमेश भाटकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)