You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दीपिका कुणासोबत जास्त छान दिसते, असं विचारल्यावर रणवीर ओरडून म्हणाला...
- Author, विकास त्रिवेदी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दीपिका आणि रणवीर जेव्हा 'लहू मुंह लग गया' हे रोमांटिक गाणं चित्रित होत होतं तेव्हा त्यांना हा अंदाज असेल का की प्रत्यक्ष जीवनात या प्रेमाचा रंग आपल्याला लागेल आणि एकमेकांची आजन्म साथ देऊ अशा आणाभाका आपण घेऊ?
रणवीर आणि दीपिका हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीतले नावाजलेले कलावंत आहेत. आणि त्यांची लव्हस्टोरीही एखाद्या सिनेमाच्या पटकथेप्रमाणेच वाटते. त्यांचं प्रेम कसं फुललं ही गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांसमोर सांगितली आहे. पण ती सलग नाही. त्यांची कहाणी एखाद्या जिगसॉ पझलसारखी आहे पण तरीही त्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
दीपिका पदुकोण तेव्हा यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नव्हती पण तिचा एक चाहता वर्ग नक्कीच होता. त्यामुळेच तिच्या खाजगी आयुष्यात लोकांना रस होता. जशी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री विवाहबंधनात अडकले की बातमी बनते तसंच त्यांचं ब्रेकअपसुद्धा चर्चेचा विषय बनतो.
नैराश्याचा फास
दीपिकाचं ब्रेकअप झालं ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना आठवत असेल की दीपिकाला नैराश्यानेही ग्रासलं होतं. अर्थात तिने कधी तिच्या नैराश्यासाठी आपल्या ब्रेकअपला जबाबदार धरलं नाही. पण तिच्या आयुष्यातला ऐन मोक्याचा काळ नैराश्याने ग्रासला होता हे नक्की.
याबाबत तिनेच खुलासा केला होता, ती सांगते "15 फेब्रुवारी 2014 ला मी झोपेतून उठले आणि मला एकटेपणा जाणवला. मला वाटलं माझ्यासमोर काही दिशा नाही. मी रडू लागले. मला लोकांनी विचारलं की मला काय झालंय, माझ्या नैराश्याचं कारण व्यावसायिक आहे की वैयक्तिक?
याच काळात रणवीर आणि दीपिकाची जवळीक वाढली. नंतर जेव्हा दीपिकाने आपल्या नैराश्याबद्दल माध्यमांना सांगितलं तेव्हा रणवीरने तिचं कौतुक केलं. "दीपिकाला पहिल्यांदा जेव्हा आपल्या डिप्रेशनविषयी बोलताना पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. या गोष्टी जाहिरपणे बोलायला हिंमत लागते. मला वाटलं की तिच्या या कृतीमुळे तिने मला कायमचं जिंकलं आहे," रणवीर सांगतो.
दीपिका कुणासोबत जास्त छान दिसते?
अगदी सुरुवातीला रणवीर आणि दीपिका आपलं नातं लपवत असत. जेव्हाही दीपिकाचा विषय निघायचा तेव्हा तो तिचं नाव न घेता रणवीर तिच्याबद्दल बोलत असे. पण तो जे बोलतोय ते सगळं दीपिकाविषयी आहे हे इतकं स्पष्ट असायचं की ते एखाद्या लहान पोरालाही कळावं.
तुमच्याबद्दल काहीबाही बातम्या पेपरमध्ये येतात तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं असा प्रश्न रणवीरला एका इंटरव्यूमध्ये विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला की, "असं वाटतं की काय क्रिएटिव्ह लिहिलं आहे. वाचून जाम करमणूक होते." त्याच्या बोलण्याचा मतितार्थ हा की या सगळ्या बातम्या कोणा कल्पक माणसाच्या डोक्यातून निघाल्या आहेत आणि त्यात काही तथ्य नाही.
पण याच रणवीरला विचारलं की दीपिकाची जोडी कोणासोबत शोभून दिसते रणवीर सिंह की रणवीर कपूर तर तो जवळ जवळ ओरडूनच सांगत असे की, "हे काय विचारण झालं, अर्थातच ती माझ्याबरोबर जास्त छान दिसते."
फर्स्ट इंप्रेशन आणि दिल्लीवाला मुंडा
रणवीर आणि दीपिकाची पहिली भेट मुंबईतल्या एका रेस्तराँमध्ये झाली. रणवीर तिथे आपल्या कुटुंबासोबत आला होता. बॅंड, बाजा बारात हा चित्रपट तेव्हा गाजला होता. त्याच ठिकाणी दीपिका आली होती. त्याला पाहाताच तिने विचारलं, 'तू मुंबईत कधी आलास? बॅंड, बाजा... मध्ये त्याने दिल्लीतल्या तरुणाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचा तिच्यावर इतका प्रभाव पडला की तिला वाटलं की रणवीर खरंच दिल्लीचा आहे. हीच त्यांची पहिली भेट.
या भेटीबद्दल दीपिका सांगते की 'माझा एजंट रणवीरचा फॅन होता. तो मला सांगायचा बॅंड बाजाचा हिरो एक दिवशी खूप मोठा अॅक्टर होईल. मी त्याला म्हणाले हा माझ्या टाइपचा मुलगा नाही. नंतर मी त्याचा चित्रपट पाहिला. आता वाटतं की रणवीर जे आहे तेच दाखवतो. तो जे नाही ते बनण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.'
याच भेटीबद्दल रणवीर सांगतो, 'जेव्हा ती रेस्तराँमध्ये आली तेव्हा मी अक्षरशः ओरडलो दीपिका... दीपिका. माझ्यासोबत आलेले लोक म्हणाले तू तिला हाय म्हटलं पाहिजे. मी तिला हाय म्हटलं. आम्ही एकमेकांशी बोललो. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर अॅलर्जी आली होती. ती अॅलर्जी तिला दिसू नये म्हणून चेहरा लपवतच मी तिच्याशी बोललो."
पुढे तो सांगतो की त्यावेळी दीपिकाला पाहिलं तेव्हा वाटलं इतकं सुंदर कुणी कसं काय असू शकतं?' हे ज्या इंटरव्यूमध्ये रणवीर सांगत होता त्याच वेळी दीपिकादेखील त्याच्यासोबत होती. हे ऐकून ती चक्क लाजली.
प्रेम म्हणजे...प्रेम म्हणजे...
2013 साली एका इंटरव्यूमध्ये रणवीरने सांगितलं की दीपिका त्याला किती आवडते. तो सांगतो की मी आयुष्यात अनेकदा प्रेमात पडलो आहे. पण दीपिकाबद्दल जे वाटतं तसं कधीच कोणाबद्दल वाटलं नाही. असं म्हणतात की कुणी खूप सुंदर असेल तर दृष्ट लागते म्हणून मी आणखी काही बोलणार नाही.
त्याच इंटरव्यूमध्ये रणवीर सांगतो की ती जेव्हा स्क्रीनवर असते तेव्हा फक्त तीच पडदा व्यापून टाकते. जेव्हा मी स्वतःकडे बघतो तेव्हा वाटतं की मी माझ्याकडे लोकांनी आकर्षित व्हावं म्हणून मी काय काय करतो, माझा शर्ट काढतो, लूक बदलतो पण जेव्हा मी दीपिकाला पाहतो तेव्हा फक्त तिलाच पाहावसं वाटतं.
दीपिका आणि रणवीर यांच्यात फक्त एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्या दोघांना दही आवडत नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत.
प्रेम म्हणजे काय असतं हो? कोणत्याही अटीशर्तीशिवाय आपला स्वीकार समोरच्याने करणं. रणवीरला जेव्हा विचारलं की तुला दीपिकामध्ये कोणती एक गोष्ट बदलावीशी वाटते, तेव्हा तो म्हणाला की तिच्यात बदल व्हावा असं मला मुळीच वाटत नाही.
प्रेम म्हणजे एकमेकांना खंबीरपणे साथ देणंही असतं. जेव्हा पद्मावत चित्रपट येणार होता तेव्हा काही लोकांनी म्हटलं होतं आम्ही दीपिकाचं नाक कापू. याविषयी रणवीरला त्यावेळेस काय वाटलं, " हे लोक कोण होते? त्यांना प्रतिक्रिया द्यावी एवढीही त्यांची लायकी नव्हती. मी तर त्यांना सुनावलं असतं पण माझ्या सल्लागारांनी आणि कुटुंबाने मला शांत राहण्याचा सल्ला दिला."
ज्या आवेशात तो हे बोलत असतो ते ऐकून बाजीराव मस्तानीच्या एका दृश्याची आठवण येऊन त्याचेच संवाद कानात घुमतात.
'जो तूफानी दरिया से बगावत कर जाए वो इश्क़
भरे दरबार में जो दुनिया से लड़ जाए वो इश्क़
हर जंग जीते पर दिल से हार जाए
जो महबूब को देखे तो खुदा को भूल जाए वो इश्क़.''
दीपिका कुणासाठी गाते
रणवीर सांगतो दीपिका खूप सुंदर गाते. पण ती फक्त एकाच व्यक्तीसमोर गाणं म्हणते आणि ती व्यक्ती मी आहे. एका इंटरव्यूमध्ये तिची खूप मनधरणी केल्याननंतर तिनं गाणं गायलं...
''कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई...दीवानी हां दीवानी हो गई
मशहूर मेरे इश्क़ की कहानी हो गई.''
तिचं गाण ऐकता ऐकता वाटतं की ती हे शब्द फक्त गात नाहीये तर जगतेय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)