प्रतीक बब्बरने सान्या सागरसोबत का केलं मराठमोळ्या पद्धतीने लग्न?

बी-टाऊनमधला लग्नाचा सिझन अजूनही सुरूच आहे. गेल्या महिन्यात दीपिका-रणवीर, प्रियांका- निकच्या लग्नाचे फोटोज अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात आता भर पडली आहे ती अभिनेता प्रतीक बब्बरची.

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड सान्या सागरसोबत मराठमोळ्या पद्धतीत लखनऊमध्ये लग्न केलं.

हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व विधी मराठी पद्धतीने पार पाडले.

महाराष्ट्रीयन पद्धतीने का केलं लग्न?

३२ वर्षांच्या प्रतीकवर लहानपणापासूनच महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रभाव आहे. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांतच स्मिता पाटील यांचं निधन झालं. त्यानंतर स्मिता यांच्या आई-वडिलांनी प्रतीकचा सांभाळ केला.

त्यामुळेच कदाचित, लहानपणापासूनच आईच्या प्रेमाला मुकलेल्या प्रतीकने लग्नासारख्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी आई आणि आपल्या आजी-आजोबांच्या आठवणीत मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं.

आपल्या लग्नाबद्दल बोलताना एका मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, "या क्षणाला मी फार आनंदी आहे. मला जशी पार्टनर हवी होता सान्या अगदी तशीच आहे. ती माझ्यासाठीच बनली आहे हे जाणून घ्यायला मला जास्त वेळ लागला नाही."

प्रतीक आणि सान्या एकमेकांना १० वर्षांपासून ओळखतात. मात्र २०१७मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. गेल्यावर्षी प्रतीकने सान्याला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर २२ जानेवारीला दोघांचा साखरपुडा झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर दोघंही मुंबईत मोठं रिसेप्शन देणार आहेत. यावेळी बॉलिवूड आणि राजकारणाल्या अनेक मोठ्या व्यक्ती नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे.

सान्या सागर कोण आहे?

सान्या सागर बहुजन समाज पार्टीचे नेते आणि मायावती यांचे निकटवर्तीय पवन सागर यांची मुलगी आहे.

तिनं गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनहून आपलं कॉलेजचं पूर्ण केलं आहे. सोबतच तिनं फिल्म अकादमीतून फिल्ममेकिंगमध्ये पदवी मिळवली आहे.

त्याशिवाय तिनं आपलं फिल्ममेकिंग स्पेशलायझेशन लंडनच्या अकादमीतून पूर्ण केलं आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये क्रिएटीव्ह रायटर म्हणून नाव कमावण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रतीक बब्बरने २००८ मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर 'धोबी घाट', 'दम मारो दम', 'एक दिवाना था'या चित्रपटांमध्ये प्रतीक दिसला.

अलिकडेच रिलीज झालेल्या 'मुल्क', 'बागी २' आणि 'मित्रों' या चित्रपटांमध्येही त्यानं काम केलं आहे. त्याशिवाय लवकरच प्रतीकचे 'छिछोरे' आणि 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)