You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रमेश भाटकर यांचं कर्करोगाच्या आजाराने निधन
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते.
त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 'चांदोबा चांदोबा भागलास का' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' अशा चित्रपटात त्यांनी काम केलं.रंगभूमीवर त्यांचं विशेष प्रेम होतं. 'अखेरीस तू येशीलच', 'केव्हातरी पहाटे', 'मुक्ता' ही त्यांची विशेष गाजलेली नाटकं होती. आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3 ऑक्टोबर 1949 साली जन्मलेल्या भाटकर यांनी 1977 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि एक मुलगा आहे. त्यांचे वडील स्नेहल भाटकर हे ख्यातनाम संगीतकार होते.
'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या जीवनावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती.
गेल्या वर्षीच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
एक मित्र गमावला
प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी भाटकर यांना श्रद्धांजली वाहिली. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "अधिकारी ब्रदर्स या संस्थेत काम करत असल्यापासून वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्ताने त्यांचा आणि माझा संपर्क यायचा. अनेक वर्षं अगदी बाळ कोल्हटकारांच्या काळापासून अगदी आता आतापर्यंत काम करणारा एक उत्तम माणूस, एक उत्तम मित्र आज आम्ही गमावल्यामुळे आज आम्हाला अतीव दु:ख झालं आहे. त्यांनी माझा संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे. भाटकरांनी माझा संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे. मी सिद्धीविनायक न्यासाचा अध्यक्ष झालो तेव्हा अगदी त्या क्षणी मला फोन केला होता. माझ्याविषयी कोणतीही चांगली गोष्ट वाचली की त्यांचा फोन येणार हे ठरलेलंच असायचं."
"रमेश भाटकरांच्या रुपात आज मी एक चांगला मित्र, एक चांगला व्यक्ती गमावला आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती देवो हीच प्रार्थना" असंही ते पुढे म्हणाले.
अभिनेते स्वप्नील जोशी यांनीही रमेश भाटकरांना ट्विटर वरून श्रद्धांजली वाहिली.
कास्टिंग काऊचचा आरोप
चित्रपटाची संधी देण्याचं आमिष दाखवून रमेश भाटकर यांनी कास्टिंग काऊच केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. 2007 मध्ये घडलेल्या या घटनेने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. दिग्दर्शक रवी नायडू यांनी बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला होती आणि नंतर पाच महिन्यांनी रमेश भाटकर यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याासाठी अशी तडजोड करावी लागते अशा शब्दांत समजूत काढली होती. माझी बायको जज आहे त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता कुठेही करू नको अन्यथा पोलिसात तक्रार करू अशी धमकी भाटकर यांनी दिल्याचा आरोप या तरुणीने लावला होता.
2010 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणातून भाटकर यांची सुटका केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)