You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईतील बॉलीवुड उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे खरंच धोक्यात येईल?
- Author, मधु पाल
- Role, बीबीसीसाठी
दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी 'फिल्म सिटी' उभारण्याचा निर्णय घेतलाय.
नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली.
प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांसोबत फिल्म सिटीची रूपरेषा आणि बॉलीवुड समोरील आव्हानं या विषयावरही त्यांनी चर्चा केली.
पण, उत्तरप्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईच्या फिल्म उद्योगाला धोका आहे का? यावर बॉलीवुडचं म्हणणं काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित
प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि डिस्ट्रीब्यूडर राज बंसल बीबीसीशी बोलताना सांगतात, "हिंदी चित्रपटांसाठी मुंबई वगळता इतरत्र काहीच होत नसल्याचं माझं पहिल्यापासून मत आहे. जयपूरमध्ये आम्ही काही गोष्टी शक्य होतात का? यासाठी प्रयत्न केले होते. पण, काही होऊ शकलं नाही. उत्तरप्रदेश सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केलेत, ही चांगली गोष्ट आहे."
ते पुढे सांगतात, "ही अत्याधुनिक फिल्मसिटी सुरू झाल्यानंतर चित्रपटांचं प्रॉडक्शन वाढण्यास मदत होईल. मुंबईत चित्रपटांसाठी काम फार मर्यादीत होतं. इथं टीव्ही सिरिअलचं काम खूप आहे. आता, वेब सिरीज बनू लागल्या आहेत. मोठे सेट उभारल्यामुळे फिल्मसिटी बूक होत होती. आता नोएडामध्ये फिल्मसिटी तयार होत असल्याने काम वाढेल. येत्या काही दिवसात चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे."
'वेळेत पूर्ण होईल चित्रपटाचं शूटिंग'
बॉलीवूड स्टार्स मुंबईत रहातात. शूटिंगनंतर त्यांना आपल्या घरी जाणं सोपं असतं. मग, अशा परिस्थितीत आपलं घर सोडून ते नोएडामध्ये शूटिंगसाठी काही महिने रहाणं पसंत करतील?
यावर बोलताना राज बंसल म्हणतात, "असं आधी होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधी कलाकार एक दिवस शूटिंग केल्यानंतर तीन दिवस येत नव्हते. मात्र, आता चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते घरापासून दूर रहातील. काम लवकरात-लवकर संपवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल."
हल्ली, शूटिंग संपवून 40 दिवसात चित्रपट तयार होतो. शक्य तितक्या लवकर चित्रपटाचं शूटिंग संपवण्याची कलाकारांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांचा पैसा जास्त खर्च होणार नाही, असं बंसल पुढे सांगतात.
"मुंबईहून दिल्लीला जाणं सहज शक्य आहे. विमानांची संख्या जास्त आहे, पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे काहीच अडचण येणार नाही," असं राज बंसल पुढे सांगतात.
'फक्त घोषणा नको, वेळेत काम झालं पाहिजे'
बॉलीवुडमध्ये फक्त कलाकारच नाहीत. तर सेट्सवर काम करणारे मजूरही मोठ्या संख्येने काम करतात. मग या मजुरांचं काय? यावर बोलताना राज बंसल दाक्षिणात्य चित्रपटांचं उदाहरण देतात. ते म्हणतात, मुंबईतील मजुरांच नुकसान होणार नाही.
ते पुढे म्हणतात, "दक्षिण भारतातील चित्रपट निर्मात्यांची स्वत:ची टीम असते. काम करणारे मजूर वेगळे असतात. उत्तर भारतातून अनेक मजूर कामासाठी मुंबईत येतात. आता, नोएडामध्ये शूटिंग सुरू झालं तर मजुरांना कामासाठी मुंबईत यावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी मिळेल."
मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते. अशा घोषणा अनेकवेळा करण्यात आल्या. यावेळी, ही फक्त घोषणाच राहू नये, तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असं बंसल यांच मत आहे.
'परवानगी मिळाल्यानंतरही काम करणं कठीण'
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉई युनिअनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांच्या सांगण्यानुसार, "नोएडामध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे बॉलीवुडला नक्कीच फायदा होईल. फिल्म इंडस्ट्री मोठी होईल. चित्रपट बनवण्यासाठी आधी मुंबईत यावं लागत असे. आता उत्तरप्रदेशातील लोक आपल्या राज्यातच चित्रपट बनवू शकतील."
"लखनऊमध्ये मोठ्या चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. सरकार दिड ते दोन कोटी रूपयांची सब्सिडी देत आहे. सद्य स्थितीत चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्यूसर सोयी-सुविधांच्या शोधात असतो. खर्च कसा कमी करता येईल? कोणत्या शहरात स्वस्त पडेल? याचा विचार केला जातो," असं ते पुढे म्हणतात.
परदेशात शूटिंगसाठी जाणाऱ्यांना 30-40 टक्के सब्सिडी मिळते. परदेशात चांगले लोकेशन आणि सुविधा मिळत असल्याने लोक बाहेर शूटिंग करतात.
दुसरीकडे भारतात मात्र फिल्मसिटीबाहेर शूटिंग करायचं असल्यास फार कठीण आहे. अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. परवानगी असेल तरी, महापालिका, पोलीस आणि रहिवासी अडवणूक करतात, याची खंत तिवारी व्यक्त करतात.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, परवानगी घेऊनही ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणत लोक लूटतात.
'सरकारने लक्ष दिलं नाही तर परिणाम होईल'
तिवारी पुढे सांगतात, "ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, त्याच ठिकाणी काम होईल. आता आमच्या स्पर्धेत अनेक लोक उतरले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी बॉलीवुडशी चर्चा केली. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरूख खान आणि सलमान खान सारख्या कलाकारांनी उत्तरप्रदेशात शूटिंग केलं आहे."
चांगल्या सुविधा मिळत असल्याने लोक उत्तरप्रदेशात जात आहेत. महाराष्ट्रात कोणीच लक्ष देत नाही. आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला सरकारी बनवं लागतं, असा त्यांचा आरोप आहे.
बी एन तिवारी सांगतात, "सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम दिसून येईल. महाराष्ट्र सरकारने चांगल्या सुविधा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत."
ही वेळ महत्त्वाची आहे
बी. एन. तिवारी यांच्या आरोप आहे की, वारंवार प्रश्न उपस्थित करूनही महाराष्ट्र सरकारने त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. कोरोना काळात काम बंद होतं. मजुरांना सरकारकडून मदत मिळावी यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, काहीच फायदा झाला नाही.
"फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा फिल्म इंडस्ट्री लाहोरमध्ये होती. त्यानंतर कोलकातामध्ये उभारण्यात आली. कोलकात्यात युनिअनसोबत संघर्ष झाल्यानंतर मुंबईत फिल्म इंडस्ट्रीची निर्मिती झाली. मुंबईत सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत तर ही इंडस्ट्री दुसऱ्या शहरात जाईल," असं ते म्हणतात.
'पण महिलांच्या सुरक्षेचं काय?'
पण उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये चित्रपट उद्योग स्थलांतरीत झाला तर मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काही परिणाम होईल का?
यावर बोलताना ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनच अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता बीबीसीशी बोलताना म्हणाले, "मुंबईतील कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम होणार नाही. नोएडामध्ये याआधीही फिल्मसिटी यशस्वी झालेली नाही. मुंबईतून लोक उत्तर प्रदेशात जाणार नाहीत. मुंबई बॉलीवुडची आणि बॉलीवुड मुंबईच आहे."
"सद्य स्थितीतही काही कलाकार लखनऊमध्ये जाऊन शूटिंग करत असतात. त्यामुळे परिणाम झाला तर फक्त 10 टक्के होईल. तिथं महिलांच्या सुरक्षेचा सर्वांत मोठा मुद्दा आहे. मुंबईत महिला कलाकार कोणत्याही वेळेस कामाला जातात किंवा घरी येतात. मात्र यूपीत रात्र नऊ नंतर कोणीच बाहेर पडत नाही," असं गुप्ता सांगतात.
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे. पश्चिम बंगालमध्येही इंडस्ट्री आहे. पण याचा परिणाम मुंबईवर झाला नाही. कोणीच कलाकार तिथे रहाणार नाही असाही दावा गुप्ता करतात.
"यमूना एक्सप्रेस-वे जवळ ज्याठिकाणी फिल्म सिटी उभारण्याचा प्रयत्न आहे. ती जागा शहरापासून खूप लांब आहे. त्यामुळे रहाण्याचा, प्रवासाचा प्रश्न आहे," असं सुरेश गुप्ता यांना वाटतं.
एक हवा बनवण्यात येत आहे की बॉलीवूड लखनऊला जाणार आहे. हा एक राजकारणाचा मुद्दा बनवण्यात येत आहे. 2022 निवडणुकीसाठी बॉलीवुड युपीत येत असल्याचं वातावरण बनवण्यात येत असल्याचा आरोप गुप्ता करतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)