नेटफिल्क्सवरची सीरीज मंदिरातील किसिंग सीनवरून वादात

नेटफ्लिक्स या ऑनलाईन स्ट्रिमिंग वेबसाईटवर बहिष्कार टाकण्याची मागणी करणारे ट्‌वीट करण्यात येत आहेत.

नेटफ्लिक्सवरील 'अ सुटेबल बॉय' या सीरिजमधल्या एका दृश्यामुळे वाद पेटला आहे.

या दृश्यात मंदिरात एक किसिंग सीन दाखवण्यात आला आहे आणि बॅकग्राउंडला भजन ऐकू येत आहे. मंदिर परिसरात किंसिंग सीन दाखवल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. इतकंच नाही तर एक हिंदू मुलगी एका मुस्लीम मुलाला चुंबन देतेय, यावरही काहींनी आक्षेप नोंदवला आहे.

रविवारी देशात #BoycottNetflix हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.

या दृश्याविरोधात मध्यप्रदेशातल्या रिवामध्ये पोलीस तक्रार नोंदवल्याचं गौरव तिवारी नावाच्या एका ट्वीटर यूजरने म्हटलं आहे.

मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

हा सर्व वाद सुरू असताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या कथित आक्षेपार्ह दृश्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखवल्या गेल्याचं म्हटलं आहे, तसंच पोलिसांना या वादग्रस्त कंटेटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आपल्या ट्वीटर अकाउंटवरून एक व्हीडिओ पोस्ट करत नरोत्तम मिश्रांनी म्हटलं, "एका ओटीटी मीडिया प्लॅटफॉर्मवर 'अ सुटेबल बॉय' मालिका दाखवण्यात येत आहे. माझ्या मते ती आक्षेपार्ह आहे. एका मंदिरात एक व्यक्ती किसिंग सीन चित्रीत करतो आणि मागे भजन सुरू आहे. सलग दोन-तीन वेळा असं दृश्य आहे.

माझ्या मते यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासंदर्भात चौकशी करावी, असे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करण्यामागचा उद्देश काय आहे? निर्माते-दिग्दर्शकांवर कारवाई होऊ शकते का? या सर्व मुद्द्यांची पडताळणी करून मला लवकरात लवकर कळवण्यात यावे."

ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रिया

ट्वीटरवर यूजर्स #BoycottNetflix या हॅशटॅगसह ट्वीट करत आहेत. काहींनी नेटफ्लिक्सवरून 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रवादी कॅप्टन जॅक नावाच्या एका ट्वीटर यूजरने म्हटलं आहे, "नेटफ्लिक्सला मंदिर परिसरात चुंबन दृश्य चित्रित करून हिंदुंच्या भावना दुखावल्यामुळे आजच अनइन्स्टॉल करा."

विक्रांत लिहितात, "#BoycottNetflix केल्याने काहीही होणार नाही. प्रत्येकच प्लॅटफॉर्म हिंदूफोबियाने भरलेल्या कंटेटला स्थान देत आहे. आता तर या गुन्हेगार दिग्दर्शक आणि कलाकारांची ही किंवा भविष्यातली कुठलीही सीरिज बघू नये. त्यांना व्ह्यूज मिळाले नाही तर हे सर्व बंद होईल. मी अशी कुठलीच सीरीज बघितलेली नाही."

प्रिया मिश्रा लिहितात, "नेटफ्लिक्स केवळ एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. आपण मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचा बहिष्कार करायला हवा. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे."

स्वतःला वकील आणि भाजप प्रवक्ते असल्याचं सांगणारे गौरव गोएल ट्वीटरवर लिहितात, "एखादा ओटीटी प्लॅटफॉर्म जाणीवपूर्वक हिंदू देवी-देवतांचा अपमान करत असेल तर कृपया आयपीसीच्या कलम 295A अंतर्गत स्थानिक न्यायालय किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल करा."

हॅशटॅगविरोधातही प्रतिक्रिया

मात्र, काही ट्वीटर युजर्स #BoycottNetflix या हॅशटॅगवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

अक्षय बॅनर्जी नावाचे ट्वीटर यूजर खजुराहोच्या मंदिरातल्या मूर्तींचा फोटो ट्‌वीट करत उपरोधिकपणे लिहितात, "मंदिर परिसरात किसिंग सीन कसा बरं दाखवू शकतात? ही आपली संस्कृती नाही."

तर स्वाती लिहितात, "भारतात #BoycottNetflix हा हॅशटॅग ट्रेंड करणारे तेच आहेत जे फ्रान्समध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करत होते. इतका ढोंगीपणा? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक सहिष्णुता एकत्रच असतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)