You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे - योगी आदित्यनाथ यांच्यात महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांवरून जुंपली
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशव्यापी लॉकडाऊन लागू केला आणि विविध राज्यांमध्ये रोजगारासाठी गेलेले लाखो मजूर, कामगार अडकून पडले.
अखेर दीड महिना उलटल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करून मजुरांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी सोय करून दिली. मात्र, आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
विशेषत: महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या उत्तरेतील राज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर झालंय. लॉकडाऊनुळे हाताला काम नसल्यानं हे मजूर पुन्हा आपापल्या राज्यात परत जाऊ इच्छित आहेत.
मात्र, लाखोंच्या संख्येत मजूर असल्यानं इतक्या लोकांचं मेडिकल सर्टिफिकेट, ट्रेननिहाय वर्गीकरण याला अवधी लागत असतानाही महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत 6 ते 7 लाख लोकांना आपापल्या राज्यात पोहोचवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच रविवारी ही आकडेवारी सांगितली.
मात्र महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उत्तरेत परतणाऱ्या मजुरांच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केलीय.
योगी आदित्याथ म्हणाले, “महाराष्ट्रासाठी आपलं रक्त आणि घाम गाळणाऱ्या मजुरांना शिवसेना आणि काँग्रेस सरकारकडून छळच सहन करावा लागला. लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र सरकारनं मजुरांना धोका दिला, वाऱ्यावर सोडून दिलं आणि घरी परतण्यासाठी अपरिहार्य बनवलं. या अमानवीय वागणुकीसाठी माणुसकी उद्धव ठाकरेंना कधीच माफ करणार नाही.”
योगी आदित्यनाथ एवढेच बोलून थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या ‘योगी आदित्यनाथ ऑफिस’ या अधिकृत ट्विटर हँडलवरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीकेची मालिकाच सुरू केलीय.
“आपापल्या घरी परतणाऱ्या मजुरांचं उत्तर प्रदेश सरकार पूर्ण काळजी घेईल. आपली कर्मभूमी सोडण्यासाठी भाग पाडल्यानंतर काळजीचं नाटक करू नका. सर्व मजुरांना मी आश्वासन देतो की, तुमची जन्मभूमी तुमची कालजी घेईल. शिवसेना आणि काँग्रेसनं निर्धास्त राहावं,” अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केलीय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी निशाण्यावर धरलं. ते म्हणाले, “संजय राऊतजी, एखादा भुकेला मुलगा आईलाच शोधतो. सावत्र आई असणाऱ्या महाराष्ट्रानं मजुरांना आश्रय दिला असता, तर उत्त प्रदेशातील स्थलांतरित पुन्हा माघारी आले नसते.”
उत्तर प्रदेशात परतणाऱ्या सर्व मजुरांचं स्वागत करत आहोत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
पर्याय काढू - मलिक
योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या आरोपांबाबत बीबीसी मराठीनं महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांच्याशी बातचीत केली.
नवाब मलिक म्हणतात, "जिथं आपलं मूळ घर आहेत, तिथं सगळेजण जाऊ पाहत आहेत. अनेकजण तर जाताना महाराष्ट्र सरकार जिंदाबाद अशा घोषणा देत आहेत. अगदी उत्तर प्रदेशात जाऊनही ते महाराष्ट्र सरकारच्या घोषणा देत आहेत. या मजुरांना त्यांच्या त्यांच्या घरातून बोलावलं जात आहे, म्हणून जात आहेत. अन्यथा, महाराष्ट्र सरकारनं खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था केलीय."
एवढ्या मोठ्या संख्येत परतणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात मजुरांचा तुटवडा निर्माण होईल, याबाबतही मलिक यांनी आपलं मत मांडलं.
"आपापल्या राज्यात परणारे बहुतांश मजूर हे असंघटित क्षेत्रातील आहेत. भाजीवाले, रिक्षा चालवणारे, इस्त्री करणारे इत्यादी आहेत. कुठलेही कामगार निघून गेल्यावर तुटवडा तर निर्माण होणारच आहे. पण हळूहळू त्याबाबत पर्याय सुद्धा निर्माण होतील," असं नवाब मलिक यांना वाटतं.
तर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आदित्यनाथांना प्रत्युत्तर देताना स्थलांतरितांसाठी 'परमीट सिस्टिम'चा विचार करावा लागेल, असं म्हटलंय.
"योगी आदित्यनाथ यांच्याकडे त्यांच्या राज्यातल्या कामगारांची नोंदणी आहे का? इतके वर्षं या कामगारांना महाराष्ट्र पोसत होतं, याची जाणीव योगी आदित्यनाथ यांनी ठेवली पाहिजे. उत्तरप्रदेश हे आजही मागासलेलं राज्य आहे. त्यामुळे या मजुरांना परत याव लागेल. पण जर ते परवानगीची भाषा करत असतील तर मग महाराष्ट्रात येण्यासाठीही 'परमीट सिस्टिम'चा विचार करावा लागेल."
तसंच, राऊत यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना "राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका," असा सल्ला दिलाय.
शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनीही केंद्र सरकारला जाब विचारला आहे. "हे राजकारण आहे. गेल्या महिन्याभरात गाड्या गेल्या, तेव्हा प्रवांशांची लिस्ट मागितली होती का?"
"प्रवांशांची लिस्ट पोलीस जमा करतात. आज हा जाणीवपूर्वक खेळ केला गेला. 157 गाड्यांची मागणी केल्यानंतर 40 गाड्या दिल्या. हे लोक खोटं बोलतात आणि लोकांना भ्रमित करतात. महाराष्ट्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न विफल होईल," असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंचं प्रत्युत्तर
"महाराष्ट्रात आर्थिक, सांस्कृति वातावरण निर्माण केलं गेलंय, म्हणून इथं भांडवल आलं. इथे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात म्हणून बाहेरून लोक येतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी याचा विचार केला पाहिजे की, तेथील लोक इतर राज्यात का जातात?" असा सवाल मनसेचे नेते अनिल शिदोरे व्यक्त करतात.
शिवाय, "इथून परप्रांतीय मजूर निघून गेले, तरी इथले भूमिपुत्र पुढे येतील. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तातडीनं सर्व उद्योगधंदे सुरू होणार नाहीत. मग मजूर गेल्यानं उद्योग बंद आहेत, असं बोललं जाईल. पण तसं नाहीय. योगी आदित्यनाथ किंवा एकूणच भाजपनं अर्थशास्त्र शिकायला हवं," असं शिदोरे म्हणाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढूनच उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)