You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: उद्धव ठाकरेंनी पाचव्या लॉकडाऊन बद्दल नेमकं काय सांगितलं?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीसह कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती, पाचव्या लॉकडाऊनच्या चर्चा इत्यादी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
हा संकटाचा काळ आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचं नाव न घेता म्हटलं, “कुणीही राजकारण करू नये. तुम्ही केलं तरी आम्ही करणार नाही. महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. तुम्ही काही बोला, मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे.”
1) ‘सव्वा ते दीड लाखांचा केंद्राचा अंदाज होता’
“आता जो टप्पा सुरू झालेला आहे, त्यामध्ये केंद्र सरकारच्या टीमच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख रुग्ण असतील असा अंदाज होता. पण आपण खबरदारी घेतली. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 33 हजार 786 पॉझिटीव्ह केसेस आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“47 हजार 190 रुग्णांपैकी 13 हजार 404 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सव्वा लाख रुग्णांची शक्यता होती, आज अॅक्टिव्ह केसेस या 33 हजार 786 आहेत,” अशी माहिती देत मुख्यमंत्री जनतेला उद्देशून म्हणाले, तुम्ही जी शिस्त पाळली, हिंमत दाखवली त्यामुळे हे शक्य झाले,
2) मुख्यमंत्र्यांनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या नव्या लक्षणांचा उल्लेख केला.
त्यांनी लोकांना आवाहन केलं की, “सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा”
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
“कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं? पुढचे काही दिवस, काही महिने आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल, आपले हात धुत राहावे लागतील, सतत तोंडाला हात न लावणे, एकमेकांपासून अंतरावर राहणे, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचे जग असे असेल,” असंही ते म्हणाले.
3) लॉकडाऊन-5 बाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
“31 नंतर लॉकडाऊन राहणार की उठणार, हा ‘हो’ किंवा ‘नाही’ असा विषय नाही. लॉकडाऊन अचानक लावणं हे जसं योग्य नाही. तसं ते अचानक उठवणं योग्य नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
“लॉकडाऊन हा शब्द वापरु नका, तो शब्द बाजूला ठेवा. त्यापेक्षा आपण हळूहळू आपल्या जीवनाची गाडी पूर्वपदावर आणतोय. जसं हळूहळू बंद करत गेलो. तसं पुन्हा परत सुरु करत आहोत. हे सुरु करत असताना पावलं अत्यंत खबरदारीने टाकायची आहेत,” असं ते म्हणाले.
4) ‘पुढील 8-10 दिवस पुरेल इतका रक्तसाठा’
“पुढील लढाई अधिक बिकट होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करत आहोत. राज्यात काही लाखांमध्ये आपण रुग्णशय्याची व्यवस्था करत आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या शेवटी हॉस्पिटल्स आहेत. त्यामध्ये हजाराच्या आसपास बेड होते. आज हे हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल्स यांची एकत्रित संख्या मोजल्यास मे अखेरीस किमान 14 हजार बेड उपलब्ध होतील.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी रक्तदानाचं आवाहनही जनतेला केलं. ते म्हणाले, “आपल्याकडे पुढचे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. मी तमाम रक्तदात्यांना नम्र आवाहन करत आहे की, महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे आणि महाराष्ट्राचं रक्त काय असतं, महाराष्ट्राच्या रक्तामध्ये संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे हे पुन्हा दाखवायचे आहे, म्हणून पुन्हा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे.”
5) मदतीच्या पॅकेजवरून विरोधकांना टोले
“काही जण असं म्हणत आहेत की तुम्ही पॅकेज का नाही दिले? पॅकेज द्यायला पाहिजे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोले लगवाले.
“सगळं काही देत आहोत, पहिले जे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकट आहे. जोपर्यंत आरोग्यविषयक सुविधा आपण करत नाही, तोपर्यंत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे,” असं ते म्हणाले.
यावेळी सरकारनं केलेल्या मदतीची माहिती दिली :
- रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य देत आहोत. रेशन कार्ड नसलेल्यांनाही आता महात्मा फुले योजनेअंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल्समध्ये शंभर टक्के मोफत उपचार दिलं जाईल.
- केंद्राने रेल्वेची सोय केल्यानंतर केंद्र सरकारने 85 % रक्कम जाहीर केली आहे. राज्याने आजपर्यंत 481 ट्रेन्स सोडल्या आहेत. 6-7 लाख प्रवासी मजुरांची सोय केली. यासाठी राज्य सरकारने 85 कोटी रुपये ट्रेनच्या भाड्यापोटी दिले आहेत.
- अडकलेल्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेण्यासाठी एसटी बसेसच्या 32 हजार फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून आपण 3 लाख 80 हजार मजुरांना स्टेशनपर्यंत किंवा त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवले आहे.
6) शेती क्षेत्राबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
खरीप हंगामाच्या तयारीची बैठक मंत्रिमंडळाने परवाच घेतल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
“मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक कर्जाचा विचार आला, विम्याची योजना आली, शेतकऱ्यांना बांधावर बी बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल हा नवीन प्रयोग राज्य सरकार करत आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
शेतीच्या कामांना कुठेही अटकाव केला नाह, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
तसंच, “कापूस खरेदीचा विषय अनेक जणांनी मांडला. आजपर्यंत आपण 75-80 टक्के कापूस खरेदी केलेली आहे. अजूनही चालूच आहे, बंद नाही केली आहे. तसचं इतर अन्नधान्याच काय करणार त्याही बाबतीत पूर्ण विचार करत आहोत, हे करत असताना आरोग्याचा विचार करत आहोत कारण तो महत्त्वाचा आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)