You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: दिल्लीहून निघालेल्या स्थलांतरित रामपुकार पंडित यांचा फोटो व्हायरल कसा झाला
- Author, नीरज प्रियदर्शी
- Role, पाटण्याहून बीबीसी हिंदीसाठी
लॉकडाऊनमुळे घरी परतणाऱ्या हजारो प्रवाशी मजुरांचे फोटो आणि व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातलाच एक फोटो बिहारमधल्या बेगूसरायमध्ये राहणारे रामपुकार पंडित यांचाही आहे.
या फोटोत फोनवर बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाल्याचं दिसतं. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार रामपुकार पंडित यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच ते 11 मे रोजी दिल्लीहून बेगूसरायमधल्या तारा बरियारपूर या आपल्या गावी जायला पायीच निघाले.
मात्र, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर यूपी गेटजवळ त्यांना पोलिसांनी रोखलं. यूपी पोलीस त्यांना पायी जाऊ द्यायला परवानगी देत नव्हते आणि रामपुकार यांच्याकडे खासगी गाडीने जाण्यासाठी पैसे नव्हते.
रामपुकार यांच्याकडे स्मार्टफोनही नाही आणि त्यांना तो वापरताही येत नाही. असता तर त्यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनचं ऑनलाईन तिकीट काढलं असतं किंवा बिहार सरकारकडे मदतीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असता.
कुठलंच साधन नाही, हातात पैसा नाही, अशा परिस्थितीत रामपुकार तीन दिवस तिथेच अडकून पडले. अखेर एका सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने रामपुकार 15 मे रोजी श्रमिक स्पेशल ट्रेनने बिहारच्या दरभंगाला पोहोचले. तिथून ते खोदावनपूरच्या क्वारंटाईन सेंटरला गेले.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
पोलिसांनी रोखलं, भुरट्यांनी लुटलं
सोमवारी रामपुकार यांनी बीबीसीशी फोनवरून बातचीत केली. देशभरात चर्चा होत असलेल्या आपल्या फोटोविषयी बोलताना रामपुकार म्हणाले, "चार दिवसांपूर्वी मुलाचा मृत्यू झाला होता. त्याला शेवटचं बघताही आलं नाही. त्यामुळे किमान त्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमात जाऊन वडील असण्याचं कर्तव्य पूर्ण करावं, असं वाटत होतं.
"पोलिसांनी रोखलं तेव्हा मदतीची याचना करत वणवण भटकलो. तेवढ्यात दोघांनी मला म्हटलं की ते मला सीमेपलीकडे सोडतील. पण त्या दोघांनी मला कारमध्ये बसवलं आणि मारहाण करत माझ्याकडे सगळे पैसे हिसकावून घेतले."
रामपुकार पुढे सांगत होते, "रात्री एक मॅडमजी जेवण द्यायला आल्या होत्या. त्यांनी त्यांचं कार्डही आम्हाला दिलं होतं. त्यांनाच फोन करून मी सगळं सांगत असताना कुणीतरी माझा फोटो काढला."
बीबीसीशी बोलताना रामपुकार यांनी ज्या 'मॅडमजी'चा उल्लेख केला त्यांचं नाव सलमा फ्रांसीस आहे. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि दिल्लीतल्या एका सामाजिक संघटनेसाठी काम करतात.
सलमांविषयी बोलताना रामपुकार म्हणाले, "त्या माझ्यासाठी आई-बापापेक्षा मोठ्या आहेत. सर्वांनी मला फसवलं तेव्हा त्यांनी मला मदत केली."
घरी कसे परतले रामपुकार?
आम्ही रामपुकार यांच्याकडून सलमा फ्रांसीस यांचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितलं, "रामपुकार यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी मी दिल्ली साऊथ ईस्टच्या स्पेशल सीपींना विनंती केली. त्यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनच्या तिकिटाची व्यवस्था केली."
आम्ही दिल्ली साऊथ-ईस्टचे स्पेशल सीपी देवेश कुमार यांच्याशीही संपर्क करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात छापून आलेल्या एका बातमीत पूर्व दिल्लीचे डीएम अरुण कुमार मिश्र म्हणतात, "आमची टीम अहोरात्र फील्डवर आहे. रामपुकार पंडित यांची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही त्यांना बसने रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचवलं. तिथून संध्याकाळच्या ट्रेनने ते बिहारला रवाना झाले."
अशा अनेक अडचणी आणि अडथळे पार करत रामपुकार आपल्या गावाजवळ पोहोचले. मात्र त्यांना अजून घरी जाता आलेलं नाही. नियमानुसार ते सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत.
दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलाच्या तेराव्याचा कार्यक्रमही होऊन गेला.
कुटुंबीयांना भेटण्याविषयी विचारल्यावर रामपुकार सांगतात, "काल माझी मुलगी आणि बायको आल्या होत्या भेटायला. थोडं खायला आणि औषधं आणलं होतं त्यांनी. त्यांच्याशी बोलूही शकलो नाही. सगळा वेळ रडण्यातच निघून गेला. नजरेसमोर सारखा मुलाचा चेहरा येतो. काहीच कळत नाहीय. अजून जिवंत आहोत, असं म्हणत स्वतःचं सांत्वन करतो. पुढे काय होईल, काहीच माहिती नाही."
'पुन्हा दिल्लीला जाणार नाही'
रामपुकार पूर्वी घरीच असायचे. काही दिवस त्यांनी फेरीवाल्याचं काम केलं. त्यानंतर वीटभट्टीवर काम केलं. तीन मुलींनंतर गेल्या वर्षीच मुलगा झाला होता. त्यानंतर कामाच्या शोधात ते दिल्लीला गेले. रामपुकार दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या लहान भावाने घराची जबाबदारी सांभाळली.
पुढे काय करणार? या प्रश्नावर रामपुकार सांगतात, "आधी क्वारंटाईन सेंटरवरून घरी जाऊ द्या. खूप थकवा जाणवतोय. उठलं की चक्कर येतात. इथे कुणी औषधंही देत नाहीत. चाचणीचे रिपोर्ट आल्यावर देऊ म्हणून टाळाटाळ करतात. घरी गेल्यावरही तब्येत बरी व्हायला 15-20 दिवस लागतील. त्यानंतर कामाचा विचार करू शकेन."
रामपुकार कंस्ट्रक्शन साईटवर बांधकाम मजूर म्हणून काम करायचे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कामही बंद होतं.
ते म्हणतात, "एकुलत्या एक मुलाला तर मी गमावलं. आता तीन मुली आहेत."
पैसे कमावण्यासाठी आणि कुटुंबाची गुजराण करण्यासाठी दिल्लीला परत जाणार का? यावर रामपुकार म्हणतात, "आता काहीही झालं, काम मिळो किंवा न मिळो, पैसे कमी कमावेन. लाकूड विकून पैसा कमावेन. पुन्हा वीटभट्टीवर काम करेन. कुणाकडे रोजंदारीवर काम करेन. पण दिल्लीला परत जाणार नाही. शपथेवर सांगतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)