You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: उद्धव ठाकरे वि. पियुष गोयल - अडकलेल्या मजुरांसाठीच्या रेल्वेवरून खडाजंगी
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी केंद्रानं श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या खऱ्या, पण त्यांची कमतरता भासत असल्याची खंत महाराष्ट्र सरकारनं व्यक्त केली, आणि त्यावरून एक नवीनच 'तू-तू-मैं-मैं' सुरू झाली.
मजुरांच्या ट्रेनवरून आता महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा ‘सामना’ रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
काल म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अडकलेल्या मजुरांसाठीच्या ट्रेनवरून केंद्राबाबत नाराजी व्यक्त केली.
80 ट्रेनची मागणी, मात्र 35-40 ट्रेनच मिळतायेत - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्र सरकारकडे लॉकडाऊनच्या आधीपासून ट्रेन मागत होतो. इतर राज्यातील मजूर इथे थांबायला तयार नाहीत. त्यांना घरी जाण्याची परवानगी द्या, असं केंद्राला सांगत होतो. आम्हाला ट्रेन द्या, आम्ही खर्च करतो. दुर्दैवानं किंवा काही कारणं असतील, पण त्यावेळी काही परवानगी मिळाली नाही. आता हे संकट वाढल्यानंतर परवानगी दिली गेली.”
एवढंच नव्हे, तर केंद्राकडून आवश्यक असलेल्या संख्येच्या निम्म्याच ट्रेन मिळत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
“आपण रोज 80 ट्रेनची केंद्र सरकारकडे मागणी करतोय. आम्ही सोय करायला तया र आहोत, पण आम्हाला ट्रेन द्या. मात्र आपल्याला निम्म्याच म्हणजे 35-40 ट्रेनच आपल्याला मिळत आहेत. आपली क्षमता आहे. तुम्ही ट्रेन द्या, आम्ही आमच्याकडून सगळ्या मजुरांची नोंदणी करून व्यवस्था केलीय,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पियुष गोयल यांच्याकडून ट्वीट्सची मालिका
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर ट्वीट्सची मालिकाच सुरू केली आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राला 125 श्रमिक स्पेशल ट्रेन द्यायला तयार आहे, असं म्हणत पियुष गोयल पुढे म्हणाले, “तुम्ही म्हणालात की मजुरांची यादी तुमच्याकडे तयार आहे. ट्रेन कुठून सुटेल, प्रवाशांची यादी, मेडिकल सर्टिफिकेट आणि ट्रेन कुठपर्यंत हवीय इत्यादी सर्व माहिती पुढच्या एक तासात रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे पोहोचवण्याची कृपा करावी. जेणेकरून ट्रेनची व्यवस्था आम्ही वेळेवर करू शकू.”
पियुष गोयल यांनी काल संध्याकाळी सव्वा सात वाजता हे ट्वीट केलं.
त्यानंतर त्यांनी पुन्हा दीड तासांनी ट्वीट केलं आणि महाराष्ट्र सरकारनं अद्याप मजुरांची यादी दिली नसल्याची खंत व्यक्त केली.
पियुष गोयल एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रात्री 12 वाजता पुन्हा याबाबत ट्वीट केलं.
“रात्रीचे 12 वाजलेत आणि पाच तास झालेत, तरीही अद्याप महाराष्ट्र सरकारनं 125 ट्रेनची माहिती आणि प्रवाशांची यादी दिली नाहीय. तरीही तयार राहण्याचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिलेत.”
संजय राऊतांचं प्रत्युत्तर
दरम्यानच्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्र सरकारनं रेल्वे मंत्रालयाला हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केलीय, अशी माहिती देणारं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.
राऊतही एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना टोमणाही मारला. ते म्हणाले, “पियुषजी, फक्त एक विनंती आहे की, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी, त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी. गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओडिसाला पोहोचू नये.”
महाराष्ट्राकडून 46 ट्रेनची यादी मिळाल्याचं गोयल यांचं मध्यरात्री ट्वीट
आरोप-प्रत्यारोपांची मालिका दिवसभर झाल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता पियुष गोयल यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आणि महाराष्ट्रानं 46 ट्रेनची यादी दिल्याची माहिती दिली. मात्र, तेव्हाही गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला टोला लगावला.
“125 ट्रेनची यादी कुठेय? आता दोन वाजलेत आणि केवळ 46 ट्रेनची यादीच मिळालीय. त्यातही पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी पाच ट्रेन आहेत. मात्र, तिथं सायक्लोन अम्फानमुळे ट्रेन जाऊ शकत नाहीत. त्यामुळे 41 ट्रेनची व्यवस्था करत आहोत,” असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
एकूणच अडकलेल्या मजुरांबाबत महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना गेल्या काही तासात पाहायला मिळाला.
सोमवारी सकाळी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जवळपास 30 ते 35 गाड्या सोडण्यात आल्या असून, महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे 134 ट्रेन्सची मागणी केली आहे.
फडणवीसांनी केली केंद्राची पाठराखण
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची पाठराखण करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
फडणवीस म्हणाले, "रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्राला आतापर्यंत 525 ट्रेन दिल्या. त्यातून 7 लाख 30 हजार मजुरांनी प्रवास केला. ज्या ज्या वेळी जेवढ्या ट्रेन मागितल्या जात आहेत, तेवढ्या ट्रेन दिल्या जात आहेत. स्वत: रेल्वेमंत्री यात लक्ष घालतायेत. रात्री एक-एक वाजता ते समन्वय साधत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण या करण्याची आवश्यकता नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा खासदार संजय राऊत ज्याप्रकारे सांगत आहेत, ट्रेन मिळत नाही. तसं नाहीय. जेवढ्या ट्रेन मागितल्या जात आहेत, तेवढ्या दिल्या जात आहेत."
याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत, राजकारण करणं योग्य नसल्याचं म्हटलं.
"महाराष्ट्र आणि मुंबईतली परिस्थिती अत्यंत खराब होतेय. कोव्हिडवर कुठलेही नियंत्रण सरकार करू शकत नाही. आपलं अपयश झाकण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर टाकली जातेय. राजकारण करू नका म्हणायचं आणि आपण राजकारण करायचं, हे योग्य नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून काम केलं पाहिजे. त्यामुळे असं राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे," असं फडणवीस म्हणाले.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)