ISWOTY : विकीपिडियामध्ये भारतीय महिला खेळाडूंचा समावेश

व

विकीपिडियामध्ये ज्यांची माहिती उपलब्ध नाही किंवा अत्यल्प माहिती उपलब्ध आहे अशा कर्तृत्त्ववान आणि उदयोन्मुख भारतीय महिला खेळाडूंची माहिती 6 भारतीय भाषांमध्ये विकीपिडियावर उपलब्ध करून देण्यासाठी बीबीसीने विद्यार्थ्यांची निवड केली.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

या अशा महिला खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय पदकं पटकावली आहेत, राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले आणि टोकियो ऑलिम्पिक्ससाठी पात्र ठरल्या आणि तरीही त्यांची माहिती विकीपिडियावर उपलब्ध नाही.

पण, यापुढे असं राहाणार नाही. बीबीसीने अनेक महिने संशोधन केलं आणि या खेळाडूंच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या माहितीच्या आधारे भारतातील 50 महिला खेळाडूंची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती विकीपिडियावर टाकण्यात आलेली आहे.

भारतीय महिला खेळाडूंची यादी

  • यशस्विनी देसवाल

    दिल्लीनेमबाजी

    दिल्लीची यशस्विनी देसवाल (23) नेमबाज आहे. दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात ती भाग घेते. 2019 साली झालेल्या ISSF स्पर्धेत यशस्विनीने सुवर्ण पदक पटकावलं होतं. या पदकासोबतच यशस्विनीचं टोकियो ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित झालं.

    यशस्विनीने 2017 साली झालेल्या ISSF ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेतील ज्युनियर श्रेणीत जागतिक विक्रमाची बरोबरी करत सुवर्ण पदक पटकावलं होतं. ISSF ज्युनिअर वर्ल्ड कप स्पर्धेत सांघिक खेळात तिने रजत आणि कास्य पदकांचीही कमाई केली आहे. याशिवाय 2016 सालच्या साउथ एशियन खेळात वैयक्तिक प्रकारातही तिने पदकं पटकावली आहेत.

  • व्ही. के. विस्मया

    केरळअ‍ॅथलेटिक्स

    केरळच्या कन्नूर जिल्ह्यातली वेल्लुवा कोरोथ विस्मया (23) धावपटू आहे. 400 मीटर प्रकारात तिने प्राविण्य मिळवलं आहे. ती राष्ट्रीय रिले टिममध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते.

    2019 सालच्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये अंतिम फेरीत खेळणाऱ्या आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलेल्या मिक्स्ड रिले संघात ती होती. विस्मयाने 2019 सालच्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रजत पदक तर 2018 सालच्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

  • विनेश फोगाट

    हरियाणाकुस्ती

    हरियाणातल्या भिवानी जिल्ह्यातली विनेश फोगाट (26) कुस्तीपटू आहे. ती आता 51 किलो वजनी गटात खेळते. 2018 साली एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.

    त्याचवर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही विनेश फोगाटने सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर 2019 साली झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपध्ये तिने कास्य पदक जिंकलं. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराने विनेश फोगाटचा सन्मान करण्यात आला.

  • स्वप्ना बर्मन

    प. बंगालअ‍ॅथलेटिक्स

    प. बंगालच्या जलपाईगुडीजवळच्या एका खेड्यात राहणारी स्वप्ना बर्मन (24) हेप्टोथेलिट आहे. स्वप्ना 2018 साली झालेल्या एशियन्स गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. स्वप्नाने 2017 साली झालेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्येही सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

    स्वप्नाला जन्मतःच दोन्ही पायांना सहा बोटं होती. अत्यंत गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला विशेष बूट घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे अनेक वर्ष स्वप्नाने वेदना सहन करतच स्पर्धांमध्ये भाग घेतला. 2019 साली स्वप्नाचा मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

  • सुश्री दिव्यदर्शिनी

    ओडिशाक्रिकेट

    ओडिशातील ढेकानलमधून आलेली सुश्री दिव्यदर्शिनी (23) क्रिकेटर आहे. ती ओडिशाच्या अंडर-23 महिला संघाची कॅप्टन आहे.

    2019 साली एशियन क्रिकेट काउंसिलने (ACC) उदयोन्मुख खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या एशिया कप स्पर्धेत तिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. 2019 साली झालेल्या अंडर-23 वुमेन्स चॅलेजर्स ट्रॉफी स्पर्धेत तिने भारताच्या ग्रीन टीमचं नेतृत्त्व केलं होतं. मात्र, तिची टीम मॅच जिंकू शकली नव्हती.

  • सुमित्रा नायक

    ओडिशारग्बी

    ओडिशातल्या जाजपूर जिल्ह्यातली सुमित्रा नायक (20) रग्बी खेळाडू आहे. भारताच्या सीनिअर टिमसाठी खेळताने समुत्राने एशियन वुमेन्स रग्बी चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदक पटकावलं होतं. 2019 सालच्या एशिया रग्बी सेवेन्स स्पर्धेत तिने रजत पदकही पटकावलं होतं.

    सुमित्राने 2019 साली भारताच्या अंडर-18 रग्बी टिमचं आणि 2019 साली अंडर-19 टिमचं नेतृत्त्व केलं होतं. 2016 सालच्या एशियन गर्ल्स रग्बी सेवेंस स्पर्धेत भारताला कास्य पदक मिळवून देण्यात सुमित्राची भूमिका महत्त्वाची ठरली.

  • सोनम मलिक

    हरियाणाकुस्ती

    हरियाणातल्या सोनिपत जिल्ह्यातल्या एका खेड्यातून येणारी सोनम मलिक (18) कुस्तीपटू आहे. तिने 56 किलो वजनी गटातून खेळायला सुरुवात केली. सध्या ती 65 किलो वजनी गटातून खेळते.

    2017 साली वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशीप आणि वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर तिला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी तिला एक वर्ष लागलं.

    2019 साली सोनमने पुन्हा एकदा कॅडेट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावलं.

  • सोनाली शिंगाटे

    महाराष्ट्रकबड्डी

    महाराष्ट्रातील मुंबईतून येणारी सोनाली विष्णू शिंगाटे (25) प्रोफेशनल कबड्डीपटू आहे. 2019 साली साउथ एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2018 साली एशियन गेम्समध्ये रजत पदक पटकावणाऱ्या संघात ती होती.

    2014-15 साली सोनालीच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्राच्या संघाने नॅशनल ज्युनिअर कबड्डी चॅम्पियनशीपमध्ये रजत पदक पटकावलं होतं.

    2020 साली सोनाली शिंगाटेचा महाराष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या शिव छत्रपती पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

  • सिमरनजीत कौर

    पंजाबबॉक्सिंग

    पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातली सिमरनजीत कौर बाथ (25) हौशी बॉक्सर आहे. 60 किलो आणि 64 किलो वजनी गटात ती भाग घेते.

    2019 सालच्या 23व्या इंटरनॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंटच्या प्रेसिडेंट्स कप स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली होती. 2018 साली झालेल्या AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये तिने कास्य पदक पटकावलं होतं.

    2016 सालची नॅशनल चॅम्पियन असणारी सिमरजीत टोकियो ऑलिम्पिक्समध्ये खेळण्यासाठी पात्र ठरली आहे.

  • शिवानी कटारिया

    हरियाणास्विमिंग

    हरियाणातल्या गुरूग्राममध्ये राहणारी शिवानी कटारिया (23) फ्रिस्टाईल स्विमर आहे.

    शिवानीने 2019 साली झालेल्या नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. 2016 सालच्या ऑलिम्पिक्समध्येही तिने भाग घेतला होता. 2004 सालानंतर ऑलिम्पिक्समधल्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

    त्याच वर्षी तिने साउथ एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. 2017 साली क्रीडा क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हरियाणा सरकारने भीम अवॉर्ड देऊन तिचा गौरव केला होता.

  • शैली सिंह

    उत्तर प्रदेशअ‍ॅथलेटिक्स

    उत्तर प्रदेशातल्या झांसीमध्ये राहणारी शैली सिंह (17) अॅथलीट आहे. लांब उडी स्पर्धेत ती भाग घेते. शैली ज्युनिअर नॅशनल लाँग जम्प चॅम्पियन होती.

    2018 साली झालेल्या अंडर-16 ज्युनिअर नॅशनल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शैलीने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. 2019 साली अंडर-18 स्पर्धांमध्ये तिने राष्ट्रीय विक्रम रचला होता.

    अंडर-20 च्या पुढच्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळण्यासाठी शैली पात्र ठरली आहे.

  • शेफाली वर्मा

    हरियाणाक्रिकेट

    हरियाणातल्या रोहतकमध्ये राहणारी शेफाली वर्मा (17) क्रिकेटर आहे. वयाच्या 15 व्या वर्षी भारतासाठी T-20 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणारी ती सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू बनली होती.

    त्याच वर्षी शेफालीने आपल्या कारकिर्दीतलं पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशकत ठोकलं होतं. असं करणारीही ती सर्वात तरुण भारतीय महिला खेळाडू होती.

    इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलच्या महिला T-20 खेळाडूंच्या रँकिंगमध्ये शेफाली वर्मा तिसऱ्या स्थानी आहे. एकदा शेफाली मुलांसारखी दिसावी आणि स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये भावाच्या जागी खेळता यावं, यासाठी तिच्या वडिलांनी तिचे केस कापले होते.

  • संध्या रंगनाथन

    तामिळनाडूफुटबॉल

    तामिळनाडूच्या कुड्डलोरमध्ये राहणारी संध्या रंगनाथन (22) फुटबॉलपटू आहे. राष्ट्रीय फुटबॉल संघात ती मिड फिल्डर आहे. SAFF वुमेन्स चॅम्पियनशीप आणि 2019 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय संघात ती होती. सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये संध्या रंगनाथनचा समावेश आहे.

    2019 साली इंडियन वुमेन्स लीग जिंकणाऱ्या सेतू FC क्लबसाठीही ती खेळते. त्या स्पर्धेतली ती सर्वात महागडी खेळाडू होती.

  • एस. कलाईवानी

    तामिळनाडूबॉक्सिंग

    तामिळनाडूची राजधानी चेन्नईत राहणारी कलाईवानी श्रीनिवासन (21) बॉक्सर आहे. 48 किलो वजनी गटात ती खेळते

    कलाईवानीने 2019 साली झालेल्या साउथ एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याच वर्षी झालेल्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये कलाईवानीला 'मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर'चा मान मिळाला होता.

    2012 साली अवघ्या 12 वर्षांची असताना कलाईवानीने नॅशनल सब-ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदक पटकावलं होतं.

  • रतनबााला देवी

    मणिपूरफुटबॉल

    मणिपूरच्या बिसूनपूर जिल्ह्यात राहणारी नोंगमैथेम रतनबाला देवी (22) फुटबॉलपटू आहे. ती फॉरवर्ड आणि मिड-फिल्डर म्हणून खेळते.

    2017 साली राष्ट्रीय संघात रतनबाला देवीची निवड झाली होती. 2019 साली झालेल्या साउथ एशियन गेम्समध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यात रतनबालाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

    रतनबाला KRYPHSA FC या क्लबसाठीही खेळते. 2020 सालच्या इंडियन वुमेन्स लीगच्या अंतिम फेरीत तिने या क्लबचं नेतृत्त्व केलं होतं. मात्र, अंतिम फेरीत त्यांच्या क्लबचा पराभव झाला होता. रतनबालाने मणिपूरच्या फुटबॉल संघाचंही नेतृत्त्व केलं आहे.

  • राणी

    हरियाणाहॉकी

    हरियाणातल्या कुरूक्षेत्रमध्ये राहणारी राणी (26) हॉकीपटू आहे. भारतीय हॉकी संघात ती स्ट्राईकर आणि मिड-फिल्डर खेळाडू आहे.

    2018 साली राणीला भारतीय महिला हॉकी टिमचं नेतृत्त्व देण्यात आलं होतं. राणीच्या नेतृत्त्वाखाली संघाने एशियन गेम्समध्ये रजत पदक पटकावलं होतं. भारताच्या महिला संघाने राणीच्या नेतृत्त्वात टोकिया ऑलिम्पिकमध्येही स्थान निश्चित केलं आहे.

    राणीला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत. तिला 2019 साली वर्ल्ड गेम्स अथलीटचा मान मिळाला. 2020 साली तिला पद्मश्री बहाल करण्यात आला.

  • राही सरनोबत

    महाराष्ट्रनेमबाजी

    महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातली राही सरनोबत (30) नेमबाज आहे. ती 25 मीटर पिस्तुल प्रकारात खेळते. 2019 साली तिने ISSF वर्ल्ड कपमध्ये दुसरं सुवर्ण पदक पटकावलं. याच स्पर्धेत तिने 2013 सालीदेखील सुवर्णपदक पटकावलं होतं.

    2019 साली सुवर्ण पदक पटकावल्याने ती टोकियो ऑलिम्पिक्ससाठी पात्र ठरली होती. 2018 साली एशियन गेम्समध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती. त्याच वर्षी तिचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

  • आर. वैशाली

    तामिळनाडूबुद्धिबळ

    तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये राहणारी वैशाली रमेशबाबू (19) बुद्धिबळपटू आहे. कोनेरू हम्पी आणि विश्वनाथन आनंद यांच्यासोबत 2020 साली FIDE ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड संयुक्तपणे जिंकणाऱ्या संघात ती होती. ही ऑलिम्पियाड रशियात झाली होती.

    वैशालीने 2012 सालच्या अंडर-12 गर्ल्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप, 2015 सालच्या अंडर-14 वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप आणि 2017 सालच्या एशियन वैयक्तिक ब्लिट्ज चेस चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदकं पटकावली आहेत. 2018 साली ती महिला ग्रँड मास्टर बनली.

  • पीयू चित्रा

    केरळअ‍ॅथलेटिक्स

    केरळमधल्या पालक्कड जिल्ह्यात राहणारी पलक्किळील उन्नीकृष्णन चित्रा (25) अॅथलीट आहे.

    ती मध्यम अंतराची धावपटू आहे आणि 1500 मीटर प्रकारात खेळते. चित्राने 2017 आणि 2019 साली एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. चित्राने 2019 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये कास्य पदक पटकावलं होतं.

    2017 सालच्या एशियन इंडोर आणि मार्शल आर्ट गेम्स आणि 2016 सालच्या साउथ एशियन गेम्समध्येदेखील तिने पदक पटकावलं.

  • पूनम यादव

    उत्तर प्रदेशक्रिकेट

    उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात राहणारी पूनम यादव (29) क्रिकेटर आहे. 2013 साली ती पहिल्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळली. T20 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलच्या T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट पटकावणाऱ्या खेळाडूंच्या ताज्या रँकिंगमध्ये पूनम यादव सातव्या क्रमांकावर आहे.

    भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 2019 साली पूनमला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर घोषित केलं होतं. त्याच वर्षी पूनमचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

  • पूजा गहलोत

    दिल्लीकुस्ती

    दिल्लीची राहणारी पूजा गहलोत (23) कुस्तीपटू आहे. ती 51 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळते. 2017 साली एशियन ज्युनिअर चॅम्पियनशीपमध्ये मिळालेलं सुवर्ण पदक तिचं पहिलं आंतरराष्ट्रीय यश होतं.

    दोन वर्षांनंतर 2019 साली तिने अंडर-23 वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. पूजा गहलोतला कुस्ती केवळ पुरूषांचा खेळ आहे, या प्रतिगामी विचारांचाही सामना करावा लागला.

    मात्र, कुस्तीप्रती पूजाचं प्रेम बघता अखेर कुटुंबानेही तिला साथ दिली आणि तिला योग्य प्रशिक्षण मिळावं, यासाठी ते दिल्लीलाही स्थायिक झाले.

  • पूजा ढांढा

    हरियाणाकुस्ती

    हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात राहणारी पूजा ढांढा (27) कुस्तीपटू आहे. ती 57 किलो आणि 60 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळते.

    2018 साली पूजाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये रजत पदक पटकावलं होतं. तर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदकाची कमाई केली होती.

    याआधी 2010 साली पूजाने युथ ऑलिम्पिक्समध्ये रजत पदक आणि 2014 साली एशियन रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदक पटकावलं होतं. 2019 साली तिचा मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

  • पारूल परमार

    गुजरातबॅडमिंटन

    गुजरातच्या गांधीनगरची राहणारी पारूल दलसुखभाई परमार (47) पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. पॅरा-बॅडमिंटनच्या ताज्या वर्ल्ड रँकिंगमध्ये ती पहिल्या स्थानी आहे.

    पारूलने 2017 सालच्या BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या सिंगल्स आणि डबल्समध्ये सुवर्ण पदकं पटकावली आहेत.

    तीन वर्षांची असताना पारूलला पोलियो झाला आणि एक अपघात झाला. यानंतर पारुलने खेळालाच करियर बनवलं. 2009 साली पारूल परमारला मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

  • निकहत जरीन

    तेलंगाणाबॉक्सिंग

    तेलंगाणाच्या निजामाबादची राहणारी निकहत जरीन (24) हौशी बॉक्सर आहे. ती 51 किलो वजनी गटात भाग घेते. 2019 साली निकहतने थायलँड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं.

    2011 साली AIBA च्या वुमेन्स युथ अँड ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये तिने करियरमधलं पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावलं होतं.

    2015 साली निकहतने सीनिअर वुमन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. ती निजामाबादची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

  • नगांगोम देवी

    मणिपूरफुटबॉल

    मणिपूरच्या बिशूनपूर जिल्ह्यातल्या एका खेड्यात राहणारी नगांगोम बाला देवी (31) फुटबॉलपटू आहे. राष्ट्रीय फुटबॉल संघात ती फॉरवर्ड खेळाडू आहे.

    नगांगोम बाला देवी भारताची सर्वाधिक गोल करणारी फुटबॉलपटू आहे. तिने पाच वर्ष राष्ट्रीय फुटबॉल संघाचं नेतृत्त्व केलं. 2020 साली तिने रेंजर्स FC क्लबसोबत करार केला आणि असा करार करणारी पहिली भारतीय प्रोफेशनल महिला फुटबॉलपटू बनली.

    ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने 2015 आणि 2016 साली नगांगोम बाला देवीला त्यावर्षीची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून घोषित केलं होतं.

  • मेहुली घोष

    प. बंगालनेमबाजी

    प. बंगालच्या नदिया जिल्ह्यात राहणारी मेहुली घोष (20) नेमबाज आहे. 10 मीटर महिला एअर रायफल आणि मिक्स संघांच्या स्पर्धेत ती भाग घेते.

    मेहुलीने 2019 साली साउथ एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. तर 2018 साली वर्ल्ड कपमध्ये कास्य पदक पटकावलं होतं. मेहुलीने पहिलं आंतरराष्ट्रीय पदक 2017 साली एशियन एअरगन चॅम्पियनशीपमध्ये पटकावलं होतं.

    मेहुलीने 2016 साली नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये 9 पदकांची कमाई केली होती. भारताच्या नेमबाजी संघातली ती सर्वात तरुण खेळाडू आहे.

  • मनू भाकर

    हरियाणानेमबाजी

    हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एका खेड्यातून आालेली मनू भाकर (19) नेमबाज आहे. 10 मीटर एअर पिस्टल आणि 25 मीटर पिस्टल प्रकारात ती खेळते. 2018 साली इंटरनॅशनल स्पोर्ट्स शूटिंग वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती सर्वात तरुण खेळाडू ठरली होती.

    त्याच वर्षी मनूने ISSF ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये दोन सुवर्ण पदक पटकावले होते. 2019 साली मनूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत स्थान निश्चित केलं.

    2020 साली मनू भाकरचा मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

  • मंजू राणी

    हरियाणाबॉक्सिंग

    हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातल्या एका खेड्यात राहणारी मंजू राणी (21) हौशी बॉक्सर आहे. 48 किलो वजनी गटात ती भाग घेते. 2019 साली मंजू राणीने AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये रजत पदक पटकावलं होतं. याशिवाय स्टँजा मेमोरियल बॉक्सिंग टुर्नामेंटमध्येही रजत पदक पटकावलं होतं.

    2019 सालीच मंजू राणीने थायलँड ओपन आणि इंडियन ओपनमध्येही कास्य पदकांची कमाई केली.

    मंजू राणी 11 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. बॉक्सिंगसाठी ग्लोव्हज खरेदी करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. मंजूच्या आईने एकटीने आपल्या सात मुलांचा सांभाळ केला.

  • मानसी जोशी

    गुजरातबॅडमिंटन

    गुजरातच्या राजकोटची राहणारी मानसी जोशी (31) पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. 2019 साली पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मानसीने सुवर्ण पदक पटकावलं होतं.

    2017 साली याच स्पर्धेच्या सिंगल्समध्ये तिने कास्य पदक तर 2015 साली मिक्स्ड डबल्समध्ये रजत पदक पटकावलं होतं.

    मानसी जोशी इंजीनिअर आहे. मात्र, 2011 साली एका अपघातानंतर उपचाराचा एक भाग म्हणून तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. अखेर योग्य प्रशिक्षण घेऊन ती आंतरराष्ट्रीय स्पर्धाही खेळू लागली.

  • मालविका बनसोड

    महाराष्ट्रबॅडमिंटन

    महाराष्ट्रातल्या नागपूरची मालविका बनसोड (19) बॅडमिंटनपटू आहे. लेफ्ट हँड खेळाडू असलेल्या मालविकाने 2018 साली वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशीपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

    तिने 2019 सालच्या मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सीरिज आणि अन्नपूर्णा पोस्ट इंटरनॅशनल सीरिजमध्ये सुवर्ण पदक पटकावत जगातल्या टॉप 200 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं.

    त्याच वर्षी तिने ऑल इंडिया सीनिअर रँकिंग टुर्नामेंट आणि ऑल इंडिया ज्युनिअर रँकिंग टुर्नामेंटही जिंकले.

  • लवलीना बोरगोहाई

    आसामबॉक्सिंग

    आसामच्या गोलाघाटची राहणारी लवलीना बोरगोहाई (23) हौशी बॉक्सर आहे. 69 किलो वजनी गटात ती खेळते. लवलीनाने 2018 आणि 2019 साली वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदक पटकावलं होतं. 2017 साली झालेल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्येही तिने कास्य पदक पटकावलं होतं.

    केंद्र सरकारने 2020 साली लवलीनाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला होता. ऑलिम्पिक्समध्ये पात्र ठरणारी ती आसामची पहिली महिला खेळाडू आहे.

  • लालरेमसियामी

    मिझोरमहॉकी

    मिझोरमच्या कोलासिब वस्तीत राहणारी लालरेमसियामी (20) हॉकीपटू आहे. भारताच्या महिला हॉकी संघात ती फॉरवर्ड आहे. 2018 साली एशियन गेम्समध्ये भारतीय संघाने रजत पदक पटकावलं होतं. त्यावेळी एशियाडमध्ये पदक पटकावणारी लालरेमसियामी मिझोरमची पहिली महिला खेळाडू होती.

    इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने तिला 2019 साली उदयोन्मुख खेळाडू घोषित केलं होतं.

    लालरेमसियामी त्या भारतीय संघातही सहभागी आहे ज्या संघाने टोकियो ऑलिम्पिक्समध्ये स्थान मिळवलं आहे.

  • केव्हीएल पवनी कुमारी

    आंध्र प्रदेशवेटलिफ्टिंग

    आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमची राहणारी कोल्ली वरलक्ष्मी पवनी कुमारी (17) वेटलिफ्टर आहे. ती 45 किलो वजनी गटात खेळते.

    पवनी कुमारीने 2020 साली एशियन युथ अँड ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमधल्या यूथ गर्ल्स अँड ज्युनिअर वुमेन्स गटात रजत पदक पटकावलं होतं.

    या स्पर्धेत यश मिळवल्याने तिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2019 साली पवनी कुमारीने नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपचा बेस्ट लिफ्टर पुरस्कार पटकावला होता.

  • कोनेरू हम्पी

    आंध्र प्रदेशबुद्धिबळ

    आंध्र प्रदेशातल्या विजयवाडाची राहणारी कोनेरू हम्पी (33) बुद्धिबळपटू आहे. या खेळातल्या रॅपिड वर्जन प्रकारात ती विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन आहे.

    कोनेरूने 2002 साली वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ग्रँड मास्टरचा खिताब पटकावला. हा खिताब पटकावणारी ती सर्वात कमी वयाची महिला बुद्धिबळपटू ठरली होती.

    कोनेरू हम्पी भारताची पहिली महिला खेळाडू आहे जिला पुरुषांचा ग्रँड मास्टर खिताबही मिळाला आहे. 2003 साली तिला मानाचा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2007 साली केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन तिचा गौरव केला.

  • जमुना बोरो

    आसामबॉक्सिंग

    आसामच्या ढेकियाजुलीची राहणारी जमुना बोरो (23) बॉक्सर आहे. 52 किलो वजनी गटापासून तिने कारकिर्दीची सुरुवात केली. तिने या गटात पहिलं राष्ट्रीय सुवर्ण पदक 2010 साली पटकावलं होतं. आता ती 57 किलो वजनी गटात खेळते.

    2019 साली जमुनाने AIBA वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदक पटकावलं होतं.

    जमुनाने 2019 सालीच इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंट आणि 23 व्या प्रेसिडेंट कप बॉक्सिंग इंटरनॅशनल ओपन टुर्नामेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

  • इशा सिंह

    तेलंगाणानेमबाजी

    तेलंगाणाच्या हैदराबादची राहणारी इशा सिंह (16) हौशी नेमबाज आहे. 10 मी. एअर पिस्टल, 25 मी स्टँडर्ड पिस्टल आणि 25 मी पिस्टल प्रकारात ती खेळते.

    2019 साली इशाने ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये रजत पदक पटकावलं होतं. त्याच वर्षी एशियन एअरगन चॅम्पियनशीपमध्ये तिने सुवर्ण पदकाची कमाई केली.

    2018 साली इशा 10 मी. एअर पिस्टल प्रकारत राष्ट्रीय चॅम्पियन ठरली. त्यावेळी ती अवघ्या 13 वर्षांची होती.

  • इलाव्हेनिल वालारिव्हन

    तामिळनाडूनेमबाजी

    तामिळनाडूच्या कुड्डलूरची इलाव्हेनिल वालारिव्हन (21) नेमबाज आहे. कुड्डलोरची असली तरी तिचं बालपण गुजरातमध्ये गेलं. 10 मी एअर रायफल प्रकारात ती खेळते.

    इलाव्हेनिलने 2019 सालच्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक पटकावत तिच्या प्रकारात तिने रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं होतं.

    2018 साली ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये मिळालेलं सुवर्ण पदक तिचं पहिलं आंतरराष्ट्रीय यश होतं. इलाव्हेनिल टोकियो ऑलिम्पिक्ससाठीही पात्र ठरली आहे.

  • एकता भीयान

    हरियाणाअ‍ॅथलेटिक्स

    हरियाणातल्या हिस्सारची एकता भियान (35) पॅरा-अॅथलीट आहे. क्लब आणि डिस्क थ्रो प्रकारात ती खेळते.

    2018 सालच्या एशियन पॅरा गेम्समध्ये क्लब थ्रो प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावलं होतं. 2016, 2017 आणि 2018 सालच्या नॅशनल पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये तिने सुवर्ण पदकांची कमाई केली होती.

    एकता टोकियो ऑलिम्पिक्ससाठी पात्र ठरली आहे. 2018 साली तिला एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ डिसअॅबिलिटीसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

  • दुती चंद

    ओडिशाअ‍ॅथलेटिक्स

    ओडिशातल्या जाजपूर जिल्ह्यातली दुती चंद (25) धावपटू आहे. 100 मीटर प्रकारात ती धावते. 2019 साली झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सेडमध्ये 100 मीटर प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

    राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या दुती चंदवर 2016 साली इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने हायपरअँड्रोजेनिझमचे आरोप केले होते. या आरोपांचा यशस्वी मुकाबला करून तिने रियो ऑलिम्पिकचं तिकीट पक्क केलं होतं.

    2019 साली दुती चंदने आपण समलिंगी असल्याचं उघडपणे जाहीर केलं आणि अशाप्रकारे ती भारतातली समलिंगी असल्याचं जाहीर करणारी पहिली गे अॅथलीट ठरली.

  • दिव्या काकरण

    उत्तर प्रदेशकुस्ती

    उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातल्या गावातून येणारी दिव्या काकरण (22) हौशी कुस्तीपटू आहे.

    2020 साली झालेल्या एशियन रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये 68 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.

    त्याच वर्षी तिचा मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 2017 साली राष्ट्रीय चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर तिने कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीपमध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं.

  • दीक्षा डागर

    हरियाणागोल्फ

    हरियाणातल्या झज्जरची दीक्षा डागर (20) व्यावसायिक गोल्फपटू आहे. 2018 साली लेडिज युरोपीयन टूरमध्येमध्ये टायटल पटकावणारी ती सर्वात तरुण भारतीय गोल्फपटू ठरली होती.

    दीक्षाला जन्मतःच कमी ऐकू येत होतं. त्यावर तिला उपचारही घ्यावे लागले.

    2017 सालच्या डेफलिम्पिक्समध्ये रजत पटक पटकावत ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. अगदी मोजक्या डावखुऱ्या गोल्फपटूंपैकी दीक्षा डागर एक आहे.

  • सीए भवानी देवी

    तामिळनाडूफेंसिंग

    तामिळनाडूमधल्या चेन्नईत राहणारी भवानी देवी (27) फेंसर आहे. ती फेंसिंगच्या सेबर प्रकारात खेळते.

    2018 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय फेंसर आहे.

    2015 साली झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्ये तिने कास्य पदक तर 2014 सालच्या चॅम्पियनशीपमध्ये रजत पदक पटकावलं होतं. याशिवाय इतरही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने पदकांची कमाई केली आहे.

  • भावना जाट

    राजस्थानअ‍ॅथलेटिक्स

    राजस्थानमधल्या अजमेर जिल्ह्यातून येणारी भावना जाट (24) अॅथलीट आहे. 20 किमी रेसवॉकिंग प्रकारात 2020 साली झालेल्या नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भावनाने त्या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम केला होता.

    तिच्या या कामगिरीमुळे तिचं टोकियो ऑलिम्पिक्सचं तिकीट पक्क झालं. 2016 साली झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये तिने रजत पदक पटकावलं होतं.

    कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात भावना जाटला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खेळासाठी आवश्यक सोयीसुविधा नसल्याने ती रोज पहाटे उठून गावाबाहेरच्या रस्त्याने प्रॅक्सिट करायची.

  • अर्चना कामत

    कार्नाटकटेबल टेनिस

    कर्नाटकची राजधानी बंगळुरूची राहणारी अर्चना कामत (20) टेबल टेनिसपटू आहे. 2019 साली तिने सीनिअर वुमेन्स नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशीप जिंकत भारताच्या राष्ट्रीय टेबल टेनिस संघात स्थान मिळवलं होतं.

    पुढच्या वर्षी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये अर्चनाने डबल्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.

    2018 साली तिला यूथ ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत तिने सेमी-फायनल्सपर्यंत धडक मारली होती.

  • अपूर्वी चंडेला

    राजस्थाननेमबाजी

    राजस्थानची राजधानी जयपूरची राहणारी अपूर्वी चंडेला (28) नेमबाज आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारात ती खेळते.

    2019 साली ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक पटकावत तिने नवीन विश्वविक्रम रचला होता. या कामगिरीमुळे तिला टोकियो ऑलिम्पिक्समध्ये संधी मिळाली आहे.

    2014 साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये मिळालेलं सुवर्ण पदक तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा आहे. 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तिने कास्य पदक पटकावलं होतं. 2016 साली अपूर्वी चंडेलाचा मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

  • अन्नू राणी

    उत्तर प्रदेशअ‍ॅथलेटिक्स

    उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातल्या एका गावातून येणारी अन्नू राणी (28) भाला फेकपटू आहे. 2019 साली एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रजत पदक पटकावून तिने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये जागा पक्की केली. असं करणारी ती पहिली भारतीय महिला अॅथलीट आहे.

    2017 साली याच स्पर्धेत तिने कास्य पदक पटकावलं होतं. भाला फेक खेळातला राष्ट्रीय विक्रम अन्नू राणीच्या नावावर आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला हलाखीच्या परिस्थितीमुळे सराव करण्यासाठी भाला घेणं तिच्या कुटुंबाला परवडणारं नव्हतं. त्यामुळे ती बांबूपासून भाला बनवून सराव करायची.

  • अंकिता रैना

    गुजरातटेनिस

    गुजरातच्या अहमदाबादची राहणारी अंकिता रविंद्रकृष्णन रैना (28) व्यावसायिक टेनिसपटू आहे. वुमेन्स सिंगल्स आणि डबल्स प्रकारात ती सध्या भारतात पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे.

    2018 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये सिंगल्समध्ये कास्य पदक पटकावणारी ती दुसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरली. याआधी हा विक्रम सानिया मिर्झाच्या नावावर होता.

    इतकंच नाही तर त्याच वर्षी वुमेन्स सिंगल्सच्या पहिल्या 200 खेळाडूंमध्ये स्थान पटकावणारी ती पाचवी भारतीय महिला टेबल टेनिसपटू आहे.

  • अनिता देवी

    हरियाणानेमबाजी

    हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातल्या एका गावातून येणारी अनिता देवी (36) नेमबाज आहे. 10 मीटर आणि 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात ती खेळते.

    2016 साली झालेल्या इंटरनॅशनल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये तिने 10 मीटर प्रकारात रजत पदक तर 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात कास्य पदक पटकावलं होतं.

    2015 साली झालेल्या नॅशनल गेम्समध्ये अनिताने रजत पदक तर 2013 साली झालेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. तिच्या मुलालाही खेळाची आवड आहे.

  • ऐश्वर्या पिसे

    कर्नाटकमोटरस्पोर्ट्स

    कर्नाटकची राजधानी बंगलुरूमध्ये राहणारी ऐश्वर्या पिसे (25) मोटरसायकल रेसर आहे. 2019 साली FIM वर्ल्ड कप जिंकून मोटरस्पोर्ट्स स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू होती.

    भारताच्या फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब्जने 2016, 2017 आणि 2019 साली आउटस्टँडिंग वूमन इन मोटरस्पोर्ट्स पुरस्कारने गौरवलं आहे.

    नॅशनल रोड रेसिंग अँड रॅली चॅम्पियनशीपमध्ये तिने 6 टायटल्स पटकावले आहेत.

  • अदिती अशोक

    कर्नाटकगोल्फ

    कर्नाटकमधल्या बंगळुरूची राहणारी अदिती अशोक (22) एक व्यावसायिक गोल्फपटू आहे. 2016 साली लेडिज युरोपीयन टूर जिंकणारी ती पहिली भारतीय गोल्फपटू होती. त्याचवर्षी तिला रुकी खिताब मिळाला.

    त्याच वर्षी अदिती रियो ऑलिम्पिक्समध्ये खेळली. त्यावेळी ती अवघ्या 18 वर्षांची होती. जागतिक स्पर्धेत खेळणारी ती पहिली आणि सर्वात तरुण गोल्फपटू ठरली होती.

    2017 साली लेडिज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन टूर कार्ड पटकावणारी ती पहिली भारतीय गोल्फपटू आहे.

सार्वजनिक व्यक्तींविषयी माहितीसाठी वापरल्या जाणाऱ्या विकीपिडिया या लोकप्रिय वेब पोर्टलवर यापैकी बहुतेक महिला खेळाडूंविषयी भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध नसल्याचं बीबीसीला आढळून आलं.

देशभरातील 12 संस्थांमधल्या पत्रकारिता विभागातल्या तब्बल 300 विद्यार्थ्यांनी या 50 भारतीय महिला खेळाडूंची माहिती हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, तेलुगू, तामिळ आणि इंग्रजी भाषेत विकीपिडियावर अपलोड केली आहे.

या 50 महिला खेळाडूंची निवड कशी करण्यात आली?

भारतातील 40 हून अधिक मान्यवर क्रीडा पत्रकार, समीक्षक आणि लेखकांनी या 50 महिला खेळाडूंची निवड केली आहे. महिला खेळाडूंच्या 2019 आणि 2020 सालातील कामगिरीच्या आधारे या मान्यवरांनी आपल्या शिफारसी दिल्या आहेत. या महिला खेळाडूंचा यादीतला क्रम इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांनुसार लावण्यात आला आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)