मंजू राणी :भारतीय बॉक्सिंगचा उदयोन्मुख चेहरा

मंजू राणी

मेरी कोमला ऑलिंम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावताना बघितलं आणि हरियाणाच्या मंजू राणीनेही बॉक्सर व्हायची खूणगाठ बांधली.

पदार्पणातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्पर्धांमध्ये पदक पटकवण्याचा विक्रम मंजू राणीकडे आहे.

उत्कृष्ट कामगिरी हेच जेव्हा लक्ष्य बनतं तेव्हा यश मिळतंच, हे बॉक्सर मंजू राणीने दाखवून दिलं आहे.

आपण कुठल्यातरी खेळात प्रावीण्य मिळवावं, असं तिला लहानपणापासूनच वाटायचं. मग तो खेळ कोणता, हे तिच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं.

हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातल्या तिच्या रिथल फोगाट गावात मुली कबड्डी खेळायच्या. तिनेही कबड्डीने खेळायला सुरुवात केली.

यशस्वी कबड्डीपटू होण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि चपळता आपल्याकडे आहे, असं मंजूला वाटायचं. ती काही दिवस कबड्डी खेळलीदेखील. मात्र, तिच्या नशिबात वेगळंच होतं.

नव्या स्वप्नाचा जन्म

मंजू राणी कबड्डी उत्तम खेळायची. मात्र, तिचा खेळ बघून ती सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक खेळ उत्तम खेळू शकेल, असं तिचे प्रशिक्षक साहब सिंह नरवाल यांना वाटलं.

मंजू राणी

तेव्हा राणीने स्वतःच स्वतःसाठी बॉक्सिंग हा खेळ निवडला. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये तिने एम. सी. मेरी कोमला बॉक्सिंगमध्ये कास्य पदक पटकवताना बघितलं आणि तिथूनच तिला प्रेरणा मिळाली.

मेरी कोमकडून मिळालेली प्रेरणा आणि कबड्डी प्रशिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन यामुळे ती यापुढे बॉक्सिंग खेळायचं, या निर्णयापर्यंत येऊन पोहोचली.

बॉक्सिंग खेळायचं हा निर्णय घेणं सोपं असलं तरी त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा मिळवणं, हे तितकंच अवघड होतं.

मंजूचे वडील सीमा सुरक्षा दलात (BSF) होते. 2010 साली त्यांचा मृत्यू झाला. मंजू आणि तिच्या सहा भावंडांचा खर्च वडिलांच्या पेन्शनवर चालायचा.

अशा सर्व परिस्थितीत मुलांचं भरणपोषण करणं आणि त्यात मंजूचं बॉक्सिंग प्रशिक्षण आणि त्यासाठीचा डाएट, याची काळजी घेणं म्हणजे मंजूच्या आईसाठी तारेवरची कसरतच होती.

केवळ प्रशिक्षण आणि डाएटच नाही तर चांगले बॉक्सिंग ग्लोव्ह घेणंही मंजूसाठी अवघड होतं.

मंजूच्या कबड्डी प्रशिक्षकांनी तिला मानसिक आधार तर दिलाच, शिवाय तिचे पहिले बॉक्सिंग कोच म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली. त्यांच्याच गावात शेतात मंजू राणीने बॉक्सिंगचे पहिले धडे गिरवले.

सोनेरी सुरुवात

मंजू राणीच्या कुटुंबाकडे आर्थिक चणचण असली तरी मंजूला पाठिंबा देण्यात ते जराही कमी पडले नाही. अल्प संसाधनं मात्र भक्कम पाठबळ या जोरावर 2019 साली सीनिअर नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप या स्पर्धेत पदार्पणातच मंजू राणी सुवर्ण पदक पटकावलं.

मंजू राणी

आपला पहिलाच खेळ भव्य बनवण्याची कलाच मंजुला अवगत असावी. राष्ट्रीय स्पर्धेतली कामगिरी ताजी असतानाच राणीने त्याच वर्षी रशियात झालेल्या AIBA वर्ल्ड वुमेन बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि रजत पदकाची मानकरी ठरली.

त्याच वर्षी बल्गेरियामध्ये झालेल्या बॉक्सिंग टुर्नामेंटमध्येही तिने रजत पदकाची कमाई केली.

सुरुवातीच्या या चमकदार कामगिरीनंतर हरियाणाच्या या तडफदार बॉक्सरचं पुढचं लक्ष्य आहे 2024 साली होणारी पॅरिस ऑलिम्पिक्स.

भारतातल्या महिला खेळाडूंना यशस्वी कारकीर्द घडवायची असेल तर कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याची नितांत गरज असते, असं मंजू राणीचं म्हणणं आहे. मंजू स्वतःच्या अनुभवावरून सांगेत, "कुठल्याही कुटुंबाने आपल्या मुलीला तिला जे काही करायचं आहे, ते करण्यापासून रोखू नये."

(हा लेख ई-मेलच्या माध्यमातून मंजू राणी यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)