सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान : फिरकीची जादूगार

ओडिशाची सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान ऑफ-स्पीन बॉलर आहे. खेळासाठीची मर्यादित साधने असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी बजावता येते, याचं सुश्री मूर्तीमंत उदाहरण आहे.
क्रिकेटचं 'पॉवर हाउस' अशी काही ओडिशाची ओळख नाही. अशा ठिकाणाहून येऊनही सुश्री दिव्यदर्शिनी प्रधानने मर्यादित संसाधनांमध्ये कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
राईट-आर्म ऑफ-स्पीन बॉलर असणारी प्रधान ओडिशाच्या स्टेट टीमकडून खेळते. 2019 सालच्या अंडर-23 वुमेन्स चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत तिने इंडिया ग्रीन टीमचं नेतृत्त्वही केलं आहे. स्पर्धेत तिच्या नेतृत्त्वाखाली इंडिया ग्रीन टीमने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
2020 साली संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या वुमेन्स T20 स्पर्धेत मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील व्हेलॉसिटी क्रिकेट टीमकडून ती खेळली. बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित केली होती.
उत्तम सुरुवात
सुश्रीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून गल्लीतल्या मुलांबरोबर ती क्रिकेट खेळायची. त्यावेळी पुढे जाऊन क्रिकेटच आपलं पॅशन बनेल आणि आपण याच खेळात करियर घडवू, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.
इतकंच कशाला भारताचा महिला क्रिकेट संघ आहे आणि मुलीसुद्धा प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकतात, हेदेखील तिला माहिती नव्हतं. तिच्या वडिलांनीही तिला क्रिकेट सोडून इतर खेळाकडे वळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, सुश्रीला क्रिकेटच खेळायचं होतं. तिने स्थानिक जागृती क्रिकेट क्लब जॉईन केला. तिथे तिला खिरोड बेहेरा प्रशिक्षक म्हणून लाभले.

क्रिकेट एक महागडा खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट करियरच्या सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्याचं सुश्री सांगते. शिवाय, महाराष्ट्र, कर्नाटकात ज्या प्रकारचं क्रिकेट कल्चर आहे किंवा क्रिकेटसाठीच्या पायाभूत सोयी आहेत, तशा ओडिशात नाही. मात्र, सुश्री गांभीर्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून तिच्या पालकांनीही सुश्रीला पूर्ण पाठिंबा दिला.
अखेर 2012 साली ईस्ट झोन अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये तिची निवड झाली. ती ओडिशा सीनिअर टीमसाठीही खेळते आणि अंडर-23 च्या T20 क्रिकेट स्पर्धमध्ये तिने ओडिशाचं नेतृत्त्वही केलं आहे.
पुढचं पाऊल
सुश्रीला मोठी संधी मिळाली 2019 साली. या वर्षी तिला अंडर-23 च्या वुमेन्स चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी ग्रीन टीमचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत आपल्या दिमाखदार खेळाने तिने संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. अंतिम सामन्यात इंडिया ब्लू संघाकडून त्यांचा पराभव झाला.
2019 साली एशियन क्रिकेट काउन्सिलच्या वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत तिला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत भारत विजयी ठरला. या स्पर्धेत सुश्रीने आपला सर्वोत्तम खेळ दाखवत सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
तिचा उत्तम खेळ बघून व्हेलॉसिटी फ्रॅन्चाइझीने 2020 साली यूएईमध्ये होणाऱ्या वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धेसाठी तिला संघात स्थान दिलं. या स्पर्धेत संघाची कामगिरी फारशी उत्तम झाली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महिला क्रिकेट खेळाडूंसोबतचा अनुभव बरंच काही शिकवून गेला, असं सुश्री सांगते.
सुश्रीला आता आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवायचं आहे. त्यासाठी तिचे अथक प्रयत्न सुरू आहेत. भारतासाठी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणं, हे तिचं स्वप्न आहे.
सुश्रीचं स्वप्न मोठं आहे. मात्र, त्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळाची गरज आहे. देशातल्या प्रतिभावान महिला खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सक्रीय भूमिका बजावली पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे.
उदाहरणार्थ पूर्व रेल्वेने ओडिशासारख्या देशाच्या पूर्वेकडील राज्यातल्या जास्तीत जास्त महिला खेळाडूंना नोकरी द्यावी. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागल्याने महिला खेळाडूंना खेळावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करता येईल, असं सुश्री सांगते.
(हा लेख सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान यांनी ईमेलद्वारे बीबीसीला दिलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








