मानसी जोशी: टाईम मासिकावर झळकलेली पहिली पॅराअॅथलिट तरुणांसाठी बनतेय रोल मॉडेल

फोटो स्रोत, Manasi Joshi
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
मानसी जोशी सध्याची सध्याची वर्ल्ड चॅम्पियन पॅराबॅडमिंटनपटू आहे. टाईम मासिकाच्या 19 ऑक्टोबरच्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर मानसी जोशी विराजमान झाली आहे. टाईम मासिकाने या अंकात जगभरातील '14 नेक्स्ट जनरेशन लीडर' म्हणजे नवीन पिढीला आपल्या कामगिरीने दिशा दाखवू शकतील, अशा 14 तरुणांचा गौरव केला आहे.
या 14 जणांमध्ये मुंबईची मानसी जोशी आहे. विशेष म्हणजे, या यादीतील ती एकमेव पॅराअॅथलिट आहे. किंबहुना, टाईम मासिकावर झळकलेली ती आतापर्यंतची एकमेव पॅराअॅथलिट आहे.
एवढंच नव्हे, तर याच आठवड्यात मानसीला आणखी एक जागतिक भेट मिळाली आहे. अमेरिकेच्याच 'बार्बी डॉल' बनवणाऱ्या बाहुल्यांच्या कंपनीने मानसीला रोल मॉडेल मानून तिच्यासारखी एक बाहुलीच बाजारात आणली आहे.

फोटो स्रोत, Manasi Joshi
मानसीसारखा या बाहुलीला प्रोस्थेटिक लेग म्हणजे कृत्रिम पाय आहे. अशा बाहुलीमुळे पॅराअॅथलिटच्या व्यथा आणि समाजाने त्यांना ते आहेत तसं स्वीकारण्याची गरज अधोरेखित होईल, असं ही बाहुली बनवणाऱ्या मॅटेल या अमेरिकन कंपनीने म्हटलं आहे. खुद्द मानसीला याबद्दल काय वाटतं?
'पॅरास्पोर्ट्स आणि अपंगत्वाकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलावा'
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मानसीने आपली भूमिका मांडली. अपंग लोकांना सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासात मिळणाऱ्या सुविधा (खरंतर असुविधा) याबद्दल ती नेहमीच निर्भिडपणे बोलते.
समाजाने अशा लोकांना स्वीकारण्याची गरजही ती वारंवार स्पष्टपणे व्यक्त करते. पण यात कुठेही आक्रस्ताळेपणा नसतो. अनेकदा ती फक्त कृतीने बोलते. वर्ल्ड चॅम्पियन म्हणून मिळालेल्या व्यासपीठाचा वापर करते. आताही अगदी थोडक्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
"टाईम एशियाच्या मुखपृष्ठावर झळकणे हा मोठा सन्मान आहे. टाईमसारख्या अंकावर माझा फोटो बघून पॅरास्पोर्ट्स आणि अपंग लोकांकडे बघण्याची भारतीय आणि आशियाई समाजाची नजर बदलेल, अशी मी आशा करते. बार्बी डॉलमुळे लहान मुलींवर नकळत संस्कार होतील. कारण जितक्या लहान वयात आपण नेहमीसारख्या नसलेल्या लोकांना सामावून घेण्याबद्दल आणि लोकांच्या विविधतेबद्दल बोलू, तितक्या लवकर हे बदल समजात घडून येतील."
पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मानसीच्या बोलण्यात नेहमीच विचारांची स्पष्टता असते. मनात भावना कितीही उचंबळून आल्या असल्या तरी बोलणं-वागणं एकदम संयत असतं. बोलते तर ती खूपच तोलून मापून.
तिने दिलेल्या प्रतिक्रियेवरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल. टाईम मासिकामध्ये वर्णी लागल्यामुळे जबाबदारी वाढली का, या प्रश्नालाही तिने विचारपूर्वक उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Manasi Joshi/TIME Magazine
"माझी आतापर्यंतची मेहनत, प्रयत्न आणि कोर्टवरची कामगिरी याचा झालेला गौरव मला सुखावतो. तसंच यामुळे मी देशात आणि जगातही जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यांना माझे विचार, माझी बाजू सांगू शकणार आहे. लोकांनी अपंग लोकांना स्वीकारावं आणि त्यांचं अस्तित्व मान्य करावं यासाठी व्यापक चर्चा घडवून आणण्याचा माझा मानस आहे."
मानसीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वत:वरचा आणि मेहनतीवरचा विश्वास. म्हणूनच तर आठ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात पाय गमावल्यावर तिने सहा वर्षांत जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. आताही लॉकडाऊनमुळे न डगमगता पुढच्या वर्षीची ऑलिम्पिक तयारी तिने सुरू ठेवली आहे. तिच्या सारख्या अँथलीटसाठी कठीण असं ब्लेड-रनिंगचं कौशल्य ती शिकली आहे.
धावणं ही सामान्य क्रिया जेव्हा नव्याने शिकावी लागते...
लॉकडाऊनमुळे मागचे सहा महिने क्रीडाविश्वात अगदी सामसूम असली तरी स्वत: मानसी सध्या खूश आणि समाधानी आहे. 2020 मध्ये पॅराअॅथलिटसाठी असलेले टॉयसा आणि इंडियन स्पोर्ट्स लिजंडसारखे पुरस्कार तिने पटकावले. बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ दि ईयर या पुरस्कारासाठीही अंतिम पाच नामांकनामध्ये तिचा समावेश होता. त्यानंतर आता टाईम मासिक आणि बार्बी डॉलचे हे सन्मान तिला मिळाले.

फोटो स्रोत, Manasi Joshi
त्यापलीकडे जाऊन तिला आणखी एका गोष्टीचा अभिमान आहे. लॉकडाऊनच्या काळात ती मनाला आणि शरीराला सुदृढ करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा शिकली. तसंच तिच्यासारख्या पॅराअॅथलिटसाठी महत्त्वाचं म्हणजे धावायला आणि सायकल चालवायला शिकली. हो, तिला या दोन्ही गोष्टी पुन्हा शिकाव्या लागल्या.
"मार्चपासून कुठल्याही स्पर्धा होत नाहीत. मिळालेला वेळ मुंबईत मी वैयक्तिक गोष्टींसाठी वापरल्या. मी पुन्हा धावायला आणि सायकल चालवायला शिकले. मी खेळासाठी वापरत असलेला प्रोस्थेटिक पाय धावण्यासाठी वापरू शकत नाही. त्यासाठी लागणारं ब्लेड वेगळं आहे. ते वापरून धावणं हे नव्याने धावणं शिकण्यासारखं आहे.

फोटो स्रोत, Manasi Joshi
बरं एरवी स्वाभाविक वाटणारी ही क्रिया इथं प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. लॉकडाऊनमध्ये सराव बंद असल्याने मी नवं 'ब्लेड' मागवलं. धावायला शिकले. मग हळूहळू सायकलही पुन्हा चालवायला लागले. आठ वर्षांनंतर पुन्हा सायकल चालवली. वर्षभरातले हे आनंद अवर्णनीय आहेत," असं मानसीने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
धावणं आणि सायकल चालवणं हे व्यायाम तिच्या खेळासाठीही पोषक आहेत. त्यामुळे तिला ते करायचं होतं. आणि एकदा मनात आणल्यावर हार मानणारी ती नाहीच आहे मूळी.
रस्ते अपघात आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपपर्यंतचा प्रवास
तशी बॅडमिंटन आणि मानसीची साथ अगदी लहानपणापासून म्हणजे ती 9 वर्षांची असल्यापासून आहे. तिच्या कुटुंबात सगळेच हौसेखातर बॅडमिंटन खेळत होते. तिचे वडील गिरिशचंद्र जोशी हे तिचे खरंतर पहिले कोच. पण वडील स्वत: BARC मध्ये शास्त्रज्ञ आणि घरात अभ्यास आणि शिस्तीचं वातावरण असल्याने शिक्षण आधी असा दंडक होता. त्यामुळे मानसीने वेळ आल्यावर बॅडमिंटनपेक्षा सॉफ्टवेअर प्रणालीत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करायला जास्त प्राधान्य दिलं. तो अभ्यासक्रम पूर्ण करून ती मुंबईतच नोकरीही करत होती.
पण इतक्यात 2011 च्या डिसेंबरमध्ये चुकीच्या दिशेनं आलेल्या एका लॉरीमुळे तिला अपघात झाला आणि त्यात तिला डावा पाय गमवावा लागला. तेव्हाचा तिचा अनुभव असा होता की, दोन तास रुग्णवाहिकाही तिला धड मिळाली नाही. जे जवळचं रुग्णालय होतं, तिथे अपघात झालेल्या व्यक्तींवर उपचार शक्य नव्हते. शेवटी तिला हवे तसे उपचार मिळायला 9 तास गेले. तेवढ्यात जखमेत गँगरिन झालं आणि पाय कापावा लागला.
जुन्या गोष्टी उगाळायला मानसीला आवडत नाही. पण मुंबईसारख्या शहरात वेळेवर उपचार मिळत नाहीत याची जाणीव तिला झाली. तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टींबद्दल ती मोकळेपणाने बोलते.

अपघातातून सावरल्यावर पुढचा टप्पा होता तो कृत्रिम पाय बसवून त्याच्या सरावाचा. तिथे तिला जुनी बॅडमिंटनची साथ पुन्हा एकदा लाभदायी ठरली. रिहॅबिलिटेशनचा भाग म्हणून ती बॅडमिंटन खेळायला लागली.
पुढे तिच्या कामाच्या जागी अगदी कॉर्पोरेट स्तरावरही ती स्पर्धेत उतरली. तिथे तिच्या खेळातली व्यावसायिकता पहिल्यांदा लोकांनी आणि जाणकारांनी हेरली. तिने स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळायला हरकत नाही, असं अनेकांचं मत पडलं. मग तिनेही गांभीर्याने विचार केला. सराव सुरू केला तिचा धाकटा भाऊ कुंजन जोशी बरोबर. SL3 दर्जाच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिने खेळायला सुरुवात केली.
पुढे एकेक गड सर केला. तिच्याकडे आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली तीन पदकं (गेल्यावर्षी तिने सुवर्ण पदक पटकावलं आहे), आशियाई स्तरावरची दोन पदकं आहेत.
2018 मध्ये हैद्राबादच्या प्रतिष्ठित पुलेला गोपीचंद अकॅडमीत तिने सराव सुरू केला आहे. गोपीचंद यांनी मानसीवर मेहनत घेण्यापूर्वी स्वत: एका पायाच्या आधाराने खेळून तिला खेळात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या, अशी आठवण मानसी सांगते. अपघाताकडे संकट म्हणून बघण्यापेक्षा त्यात संधी शोधण्याच्या मानसिकतेमुळे संकटावर मात करणं शक्य झालं असं मानसी सांगते.
आताही लॉकडाऊनकडे संकट म्हणून न बघता ती सरावाची नवीन तंत्रं शोधण्यात आणि शिकण्यात गर्क आहे.
नजर नव्या आव्हानांवर...
टाईम मासिकावर झळकलेल्या फोटोमुळे सध्या मानसीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. ट्विटरवर तिचा अनेकांनी आवर्जून उल्लेख केला. पण मानसी तिच्यासमोरचं उद्दिष्ट विसरलेली नाही. एकीकडे टोकियो पॅरालिम्पिक खेळांसाठी तिची तयारी सुरू झाली आहे.

"लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. माझी समस्या होती प्रोस्थेटिक लेगच्या हालचाली कमी होण्याची. त्यामुळे निर्माण झालेली आव्हानं वेगळी होती.
आता हळूहळू सराव वाढवला आहे. फिटनेस ट्रेनर लिंडी व्हॅन झिल यांच्याकडून ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलं आहे. नवीन धावण्याच्या ब्लेडमुळे पाय, खांदे आणि हात यांनाही व्यायाम मिळतोय. शिवाय भावाबरोबर दोन सत्रांमध्ये बॅडमिंटन प्रशिक्षणही सुरू झालं आहे."
पॅराबॅडमिंटन खेळांवर मानसीचा प्रभाव
मानसी जोशी आता भारतातच नाही तर आशियाई स्तरावर पॅराबॅडमिंटन खेळांची रोल मॉडेल बनली आहे. हे मानसीच्या खेळाचं आणि स्वभावाचं मोठं यश आहे असं, मुक्त क्रीडापत्रकार अभिजीत कुलकर्णी यांनं म्हणणं आहे. त्यांनी मागची काही दशकं बॅडमिंटन खेळावर वार्तांकन केलं आहे. आणि मानसी जोशीचा प्रवासही जवळून पाहिला आहे.

"मानसी पूर्वीही पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताने विश्वविजेतेपद पटकावलेलं होतं. पण, मानसीने सुस्पष्ट विचार आणि कोर्टवरची कामगिरी यामुळे पॅरा बॅडमिंटनकडे लोकांचं लक्ष वेधलं आणि त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. मानसीमुळे पॅराबॅडमिंटन आणि त्यातल्या अडचणींकडे भारतीयांचं लक्ष गेलं," अभिजीत कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
शिवाय प्रोस्थेटिक लेग वापरून खेळण्यातल्या अडचणीही कुलकर्णी यांनी अधोरेखित केल्या.
"मानसीने निवडलेला खेळ कठीण आहे. बॅडमिंटनमध्ये कोर्टवर सगळ्या दिशेंनी हालचाली कराव्या लागतात. आणि प्रोस्थेटिक लेगने खेळताना सरळ रेषेत हालचाली जरी सोप्या असल्या तरी आडवी तिडवी हालचाल कठीण असते. अशावेळी नेटाने सराव करून मानसीने ही सफाई मिळवली आहे. त्यामुळे तिचं कौतुक होणं क्रमप्राप्त आहे," अभिजीत कुलकर्णी यांनी आपलं मत व्यक्त केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








