प्रीमियर बॅडमिंटन लीगचा भारतीय बॅडमिंटनला किती फायदा होणार?

पी.व्ही.सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आदेश कुमार गुप्ता आणि दिप्ती बथ्थीनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

2013 सालच्या पीबीएल म्हणजेच प्रीमियर बॅडमिंटन लीगचा एक सामना, स्थळ - दिल्लीतलं सिरी फोर्ट मैदान. हैदराबाद हॉटशॉट्सची सायना नेहवाल आणि अवध वॉरियर्सची पी व्ही सिंधू यांच्यात होणारा सामना बघण्यासाठी सर्व खुर्च्या भरल्या होत्या. तो सामना सिंधू हरली.

मात्र, त्याच लाजाळू सिंधूने 2017 सालच्या पीबीएलमध्ये चेन्नई स्मॅशर्सकडून खेळताना सायना नेहवालला लीग सामन्यातच नाही तर उपांत्य फेरीतही गारद केलं आणि संघाला विजय मिळवून दिला.

यापूर्वी 2016 साली पी व्ही सिंधू रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकली होती. 2017 सालीच तिने जागतिक चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकलं होतं. त्याच वर्षी सिंधू वर्ल्ड सुपरसीरिजच्या अंतिम फेरीत उपविजेती ठरली होती.

इतकंच नाही, तिने 2017 सालीच कोरिया ओपन आणि इंडिया ओपन स्पर्धा जिंकल्या होत्या.

यात पीबीएलमध्ये मिळालेलं यश, अनुभव, प्रशिक्षण, दिग्गज खेळाडू आणि उत्तम कोचिंग आणि फिटनेस यांचीही महत्त्वाची भूमिका होती, असं सिंधूला वाटतं.

News image

पुन्हा एकदा देशी-विदेशी खेळाडूंनी सजलेल्या पीबीएल म्हणजेच प्रीमियर बॅडमिंटन लीगचं सहावं सत्र 20 जानेवारीपासून सुरू झालं आहे. 9 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पी व्ही सिंधू म्हणाली, "अशा लीग खूप चांगल्या असतात. आमच्यासाठीच नाही तर नवोदित खेळाडूंसाठीही हे फायद्याचं आहे. त्यांना लोकांना जाणून घेण्याची संधी मिळेल. ज्या खेळाडूंना सिंधू किंवा सायना व्हायचं आहे, ज्यांना बॅडमिंटनमध्ये करियर घडवायचं आहे ते आमचे सामने बघू शकतात. ते बघू शकतात की किती मेहनत करावी लागते."

सायना नेहवाल

फोटो स्रोत, Getty Images

"खेळाडूच नाही तर त्यांच्या पालकांनाही अशा लीगचा फायदा होईल. ते आपल्या पाल्यांना खेळांमध्ये भाग घ्यायसाठी प्रोत्साहित करतील," असंही ती म्हणते.

भारतीय खेळाडू बीसाई प्रणीतने बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं की एक ज्युनिअर खेळाडू म्हणून त्यांनी पीबीएलमध्ये सुरुवात केली होती आणि अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला.

यंदा सात संघ भाग घेत आहेत. यात अवध वॉरियर्स, बंगलुरू रॅपटर्स, चेन्नई सुपर स्टार्स, हैदराबाद हंटर्स, मुंबई रॉकेट्स, नॉर्थ इस्ट्रन वॉरियर्स आणि पुणे 7 यांचा समावेश आहे.

पीबीएलची सुरुवात 2013 साली झाली. यानंतर 2016 साली पुन्हा एकदा जगभरातील खेळाडूंचा लिलाव झाला आणि त्यानंतर सहा संघांसह लीगला दुसरा जन्म मिळाला.

चीन, जपान, थायलँड आणि इंडोनेशियाच्या खेळाडूंसोबत आपल्याच घरात खेळण्याची संधी मिळत असल्याचं त्यावेळी पी कश्यप याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

सध्या चीनचे दिग्गज खेळाडू येत नसले तरी भविष्यात तेही येतील.

पीबीएल

फोटो स्रोत, Getty Images

यंदाच्या लीगमध्ये भाग घेणारा चिराग शेट्टी म्हणतो, "मी तीन वर्षांपासून लीगमध्ये खेळतोय. पहिल्याच वर्षी मला टॉप खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आणि मी बरंच काही शिकलो. आता मला असं वाटतं की मी कुणासोबतही खेळू शकतो."

गेल्या 10 वर्षांत भारताच्या अनेक बॅडमिंटन खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली आहे. मग तो बीसाई प्रणित असो, चिराग शेट्टी असो, सिंधू असो किंवा सायना असो. चिराग शेट्टी सारख्या खेळाडूंना वाटतं की याचं एक कारण म्हणजे बॅडमिंटनला भारतात उत्तम प्रकारे मॅनेज करण्यात आलं आहे आणि खेळाला खूप महत्त्व मिळालं आहे.

पीबीएलमध्ये 2017-18 साली सहा संघ होते. मात्र, 2017-18 मध्ये दोन संघ वाढल्याने त्यांची संख्या 8 झाली.

2018-19 साली पुणे सेव्हन एसेसच्या येण्याने पीबीएलच्या संघांची संख्या 9 झाली.

मात्र, यंदाच्या सहाव्या सत्रात 7 संघ सहभागी होत आहेत. पीबीएलला जागतिक बॅडमिंटन संघटनेने मान्यता देत जगभरातील खेळाडूंना यात खेळण्याची परवानगी दिली आहे.

अवध वॉरियर्समध्ये अजय जयराम, शुभांकर डे आणि तन्वी लाड यांच्या व्यतिरिक्त अमेरिकेची झांग वेईवेन आणि हाँगकाँगच्या वॉग विंग यांचा समावेश आहे. बंगळुरू रॅपटर्समध्ये बीसाई प्रणीत आणि चीन तैपेईची ताई जू यिंग आहे.

चेन्नई सुपरस्टार्समध्ये बी सुमित रेड्डी, लक्ष्य सेन, गायत्री गोपीचंद, मनु अत्री यांच्या व्यतिरिक्त इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तो आहे. हैदराबाद हंटर्समध्ये विश्वविजेती भारताची पी व्ही सिंधू, सौरभ वर्मा, एनसिकी रेड्डी आणि रशियाचा व्लादिमिर इवानोव आहे. मुंबई रॉकेट्समध्ये पी कश्याप, प्रणव चोपडा, नॉर्थ इस्टर्न वॉरियर्समध्ये थायलंडचा तानोंगसाक सीनसोमबुनसुक आणि पुणे सेव्हन एसेसमध्ये चिराग शेट्टी आणि रितूपर्णा दास यांचा समावेश आहे.

2013 सालच्या पहिल्या पीबीएलचा विजेता संघ असलेल्या हैदराबाद हंटर्समध्ये अजय जयराम, शुभांकर डे आणि इंडोनेशियाचा तोफिक हिदायत अशी मोठी नावं आहेत. पीबीएल खेळाडूंसाठी धनाची पेटी ठरतेय. पी व्ही सिंधूसाठी हैदराबाद हंटर्सने 77 लाखांची बोली लावली होती आणि तिला आपल्या संघात घेतल, यावरूनच या लीगमध्ये असणाऱ्या पैशांचा अंदाज येईल.

गोपीचंद

फोटो स्रोत, Getty Images

जगातली क्रमांक एकची खेळाडू चीन तैपेईची ताई जू यिंग हिला बंगलुरू रॅपटर्सने 77 लाख रुपये देत संघात घेतलं. तर याच संघाने बीसाई प्रणीतसाठी 32 लाख रुपये मोजले.

चेन्नई सुपर स्टार्सने पुरूष दुहेरीतील खेळाडू बी सुमित रेड्डीसाठी 11 लाख रुपये तर पुणे सेव्हन एसेसने चिराग शेट्टीसाठी 15 लाख रुपये मोजले. मात्र, सायना नेहवाल आणि के श्रीकांत यंदा खेळणार नाहीत.

पीबीएलमुळे भारतीय खेळाडूंना एक नवी ओळख मिळाली आहे. माजी एशियन चॅम्पियन दिनेश खन्ना म्हणतात, "पी.व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या जागतिक पातळीवर खेळतात.

त्यांच्यासोबत इतर भारतीय खेळाडूंनाही परदेशी खेळाडूंसोबत खेळण्याची, राहण्याची आणि प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. भारतीय प्रशिक्षकही उत्तम आहेत. मात्र, तरीही परदेशी प्रशिक्षकाकडून त्यांना सामन्यापूर्वीची तयारी आणि नवीन तंत्र शिकण्याची संधी मिळते."

व्हीडिओ कॅप्शन, पी.व्ही सिंधू बोलतेय प्रीमियर बॅडमिंटन लीगबदद्ल

ते पुढे सांगतात की, "पीबीएलमुळे तरुण भारतीय खेळाडूंचा चांगला फायदा होतो आहे. यात लक्ष्य सेन याचा समावेश होतो. त्याने गेल्या वर्षी अनेक स्पर्धा जिंकल्या. त्याची कामगिरी सर्वोत्तम नसली तरी तो भविष्यातला स्टार आहे."

काही महिला खेळाडूंविषयी दिनेश खन्ना म्हणतात की गुवाहाटीची 20 वर्षांची अस्मिता छलिहा नॉर्थ इस्टर्न वॉरियर्सकडून खेळते. तिने गेल्यावर्षी नेपाळ आणि 2018 साली टाटा ओपन इंटरनॅशनल आणि दुबई इंटरनॅशनल स्पर्धा जिंकल्या. याशिवाय माजी खेळाडू आणि प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची मुलगी गायत्री गोपीचंद हीदेखील उदयोन्मुख खेळाडू आहे. ती चेन्नई सुपर स्टार्सकडून खेळते.

पीबीएलमुळे भारताची पुरूष दुहेरीतली जोडी सात्विक साई राज रेंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना खूप फायदा झाल्याचंही दिनेश खन्ना यांना वाटतं.

या जोडीने 2019 साली थायलँड ओपन जिंकली होती आणि जगातल्या टॉप 10 जोड्यांमधल्या अनेकांना गारद केलं होतं.

कुठल्याही स्पर्धेमुळे सर्वात मोठा फायदा नवनवीन मैदानं तयार होण्यात आणि जुन्या मैदानांची देखभाल होण्यात होतो. हैदराबादमध्ये पी. गोपीचंद अकादमी आहेच. सोबत दिल्लीलाही दरवर्षी एका सुपरसीरिज खेळवण्याची संधी मिळते.

लखनौमध्ये सैय्यद मोदी चॅम्पियनशीप होते. याशिवाय बंगळुरू, चेन्नई आणि गुवाहाटीमध्येही उत्तम मैदानं आहेत. या मैदानांवर पीबीएलचे सामने खेळवण्यामुळे तरुण खेळाडूंमध्ये बॅडमिंटनविषयी आकर्षण निर्माण होईल.

सांकेतिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

पीबीएलमध्ये पैसा आल्याने खेळाडूंचं मनोधैर्य वाढलं आहे. तसंच कुठल्याही परिस्थिती सामना जिंकण्याच्या भावनेने त्यांच्या प्रतिस्पर्धाही निर्माण झाली आहे.

परदेशी खेळाडूंविषयी बोलायचं तर माजी विश्वविजेती स्पेनची कॅरोलिना मारिन यंदा पीबीएलमध्ये खेळणार नाही. कॅरोलिना मारिन भारतात खूप लोकप्रिय आहे. सिंधू आणि कॅरोलिना यांच्यातल्या सामन्यावर सर्वांचं लक्ष असतं.

पीबीएलमध्ये यंदा खेळाडू कसं खेळतात, हे आता बघायचं आहे. काही महिन्यानंतर ऑलिम्पिक आहे आणि मोठ्या खेळाडूंना पीबीएल स्पर्धेत त्यांची चुणूक दाखवण्याची संधी मिळेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)