सायना नेहवाल आणि पी. कश्यप विवाहबंधनात अडकले

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप

फोटो स्रोत, Twitter/Saina Nehwal

फोटो कॅप्शन, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप

बॅडमिंटन स्कोअरिंगमध्ये शून्याला लव्ह असं म्हटलं जातं. मॅचच्या सुरुवातीला 'लव ऑल प्ले' असं म्हटलं जातं. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी हे शब्द कारकीर्दीत आणि प्रत्यक्ष आयुष्यातही साकारत शुक्रवारी लग्नाची 'सर्व्हिस' केली.

सायना आणि कश्यप दोघेही हैदराबादचे. दोघांचा ध्यास एकच-बॅडमिंटन. दोघांचे गुरु एकच-पुलेला गोपीचंद. या दोघांची ओळख आणि पुढे मैत्री होण्याचं निमित्त म्हणजे गोपीचंद अकादमी.

गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ समांतर कारकीर्द घडवणाऱ्या या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच जाहीर केला. सराव, स्पर्धा यांच्या निमित्ताने गेली दहाहून अधिक वर्षं सातत्याने एकत्र असणाऱ्या सायना आणि कश्यप यांची मैत्री होतीच. या मैत्रीचं प्रेमात आणि आता विवाहबंधनात रुपांतर झालं आहे.

सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर या दोघांचे एकत्रित तसंच बॅडमिंटनविश्वातल्या आपल्या मित्रमंडळींबरोबरचे फोटो सातत्याने शेअर होत असत.

सायनाच्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाच्या प्रक्रियेत कश्यपचा वाटा मोलाचा असल्याचं सायनानं म्हटलं होतं. समकालीन खेळाडू, मेंटॉर अशा भूमिकांनंतर कश्यप आता नवऱ्याच्या भूमिकेत असणार आहे.

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप

फोटो स्रोत, Twitter/Saina Nehwal

चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत बॅडमिंटन विश्वात सायनाने स्वत:चा ठसा उमटवला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह सायनाने इतिहास रचला.

गेल्या दहाहून अधिक वर्षांत सातत्यपूर्ण खेळासह सायनाच्या नावावर कॉमनवेल्थ, एशियन गेम्स स्पर्धांसह सुपर सीरिज या बॅडमिंटन विश्वातल्या अव्वल श्रेणीच्या स्पर्धांची दहा जेतेपदं त्यांच्या नावावर आहेत.

भारतात क्रिकेटेतेर खेळांची लोकप्रियता वाढवण्यात सायनाचं नाव अग्रणी आहे. सायनाच्या ऑलिम्पिक यशानंतर देशभरात बॅडमिंटनच्या प्रसाराला गती मिळाली.

सायनाच्या योगदानाची दखल घेत तिला अर्जुन, खेलरत्न, पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

दोन वर्षांपूर्वी गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे सायना खेळापासून दुरावणार असं चित्र होतं. मात्र प्रशिक्षक, फिजिओ, डॉक्टर्स यांच्या मदतीने आणि स्वत:च्या जिद्दीच्या बळावर सायना कोर्टवर परतली.

सायना नेहवाल

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे दम्यासारखा आजाराची पार्श्वभूमी असतानाही कश्यपने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली झेप विलक्षण अशी आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कश्यपनेही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. दोन वर्षांनंतर कश्यपने कॉमनवेल्थ सुवर्णपदकाला गवसणी घातली.

विविध दुखापती वारंवार उदभवल्याने कश्यपच्या खेळावर परिणाम झाला. मात्र दुखापतींसमोर हार न मानता कश्यपने प्रत्येकवेळी जिद्दीनं पुनरागमन केलं. त्याच्या योगदानाची दखल घेत त्याला अर्जुन पुरस्काने गौरवण्यात आलं आहे.

या दोघांच्या लग्नासह भारतीय बॅडमिंटन विश्वात आणखी एक कपलची भर पडली आहे. या दोघांचे गुरु आणि प्रशिक्षक गोपीचंद आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी हे दोघेही बॅडमिंटनपटू. या दोघांना बॅडमिंटननं एकत्र आणलं.

चिरंजीवी यांच्याबरोबर सायना आणि पारुपल्ली

फोटो स्रोत, Twitter/Parupalli

फोटो कॅप्शन, चिरंजीवी यांच्याबरोबर सायना आणि पारुपल्ली

उदय आणि सुजाता पवार यांनाही बॅडमिंटनने आकर्षित केलं. गोपीचंद यांचे शिष्य असलेले प्रज्ञा गद्रे आणि प्रणव चोप्रा यांनी कोर्टवरची पार्टनरशिप प्रत्यक्ष आयुष्यातही कायम करण्याचा निर्णय घेतला.

गोपीचंद यांचेच शिष्य असलेली नागपूरची अरूंधती पनतावणे आणि अरुण विष्णू हेही विवाहबंधनात अडकले आहेत. सायली गोखले आणि सागर चोपडा यांनाही बॅडमिंटनेच एकत्र आणलं.

सायना आणि कश्यप काही दिवसांतच बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या निमित्ताने व्यग्र होणार आहेत. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी हा कालावधी निवडला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)