मेरी कोम : बॉक्सिंग आणि रोजच्या जीवनातलीही आयर्न लेडी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वंदना
- Role, बीबीसी न्यूज
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. बॉक्सिंगपटू मेरी कोम यांचा पराभव झाला आहे. इनग्रिट व्हॅलेन्सिया यांनी मेरी कोम यांचा 3-2 असा पराभव केला आहे.
रँकिंग
ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनण्याचं मेरी कोम यांचं गेल्या 9 वर्षांपासूनचं स्वप्न होतं.
2012मध्ये लंडन ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर त्या याच स्वप्नाच्या दिशेनं जात होत्या, पण आज (29 जुलै) कोलंबियाच्या खेळाडूनं त्यांचा पराभव केला आणि त्या ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्या.
या पराभवामुळे मेरी यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी असली तरी बॉक्सिंगच्या जगात मेरी यांची प्रतिष्ठा आणि यश मोठं आहे.
38 वर्षांच्या मेरी कोम यांचं उंची 5 फूट 2 इंच आहे. पण, त्यांच्या हिंमतीला कोणताही मर्यादा नाही. या जोरावरच गेल्या 20 वर्षांपासून त्या एकापेक्षा एक रेकॉर्ड बनवत आल्या आहेत किंवा मोडत आल्या आहेत.
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन, ऑलिम्पिक चॅम्पियन, खासदार, बॉक्सिंग अकॅडमीच्या मालक, सरकारी पर्यवेक्षक, आई आणि पत्नी अशा अनेक भूमिका मेरी एकावेळी निभावत आहेत.
त्यांना 'आयर्न लेडी' म्हटलं जातं. ते काही असंच नाही. बॉक्सिंग रिंगच्या आत मेरी ज्या ताकदीनं लढतात त्याच ताकदीनं त्यांनी आयुष्यातल्या अडचणींशी दोन हात केले आहेत.
भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..
Please wait...
2011मध्ये मेरी कोम यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या हृदयाची शस्त्रक्रिया होणार होती. त्याचवेळी त्यांना चीनमधल्या आशिया स्पर्धेसाठी जायचं होतं. काय निर्णय घ्यायचा हे आव्हान त्यांच्यापुढे होतं. शेवटी त्यांचे पती मुलाजवळ थांबले आणि त्या चीनला गेल्या. नुसतं गेल्याच नाही तर गोल्ड मेडलही जिंकलं. पण ही त्यांच्यासाठी सोपी गोष्टी नक्कीच नव्हती.
2001मध्ये पहिल्यांदा त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. तेव्हापासून 2019 पर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 8 वेळेस पदकावर नाव कोरलं आहे. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
2012मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ब्राँझ मेडल पटकावलं होतं.
गरीब कुटुंबात जन्म
मणिपूरमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोम यांचा जन्म झाला. आपल्या मुलीनं बॉक्सिंमध्ये करीअर करावं, असं त्यांच्या आईवडिलांना वाटत नव्हतं. लहानपणी त्या घरचं काम करत, शेतात जात, लहान भावंडांना सांभाळत आणि उरलेल्या वेळेत सराव करत.
त्या काळी म्हणजेच 1998मध्ये डिंको सिंह यांनी आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं. तेव्हापासूनच मेरी यांना बॉक्सिंगबद्दल आवड निर्माण झाली. आपली मुलगी बॉक्सिंग खेळते हे त्यांच्या आईवडिलांना बरेच दिवस माहितही नव्हतं.

फोटो स्रोत, AFP/GETTY
2000साली वर्तमानपत्रात छापून आलेल्या 'स्टेट चॅम्पियन'च्या फोटोवरून त्यांना हे कळालं. बॉक्सिंग करताना दुखापत झाल्यास उपचार करणं अवघड होईल आणि लग्न करतानाही अडचण येईल, अशी भीती त्यांच्या वडिलांना वाटत होती.
पण मेरी मागे हटायला तयार नव्हत्या. शेवटी आईवडिलांना मेरी यांचं ऐकावं लागलं. 2001पासून मेरी यांनी 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. यादरम्यान मेरी यांचं लग्न झालं आणि त्यांना जुळी मुलं झाली.
विश्व चॅम्पियन राहिलेल्या मेरी यांनी शेवटचे 2 विश्व चॅम्पियनशिप मेडल आणि ऑलिम्पिक मेडल आई झाल्यानंतर जिंकली आहेत.
2012च्या ऑलिम्पिकमध्ये तर मेरी यांना 48 किलो वजनी गटाऐवजी 51 किलो वजनी गटात खेळावं लागलं. या वजनी गटात त्यांनी फक्त दोनच सामने खेळले होते.
मेरी कोम यांनी कारकीर्दीत अनेक उतारही अनुभवले आहेत. 2014मध्ये त्या ग्लासगो इथल्या स्पर्धेसाठी तसंच रिओ ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरल्या नव्हत्या.
वैयक्तिक आयुष्यही खडतर
मेरी कोम यांना वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकटांचा सामना करावा लागला.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/GETTY IMAGES
हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्रात छापून आलेल्या आणि मुलांच्या नावे लिहिलेल्या पत्रात त्यांनी 17 वर्षांच्या असताना कशाप्रकारे त्यांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता, हे सांगितलं होतं. पहिल्यांदा मणिपूर, मग दिल्ली आणि नंतर हिसारमध्ये त्यांना या घटनांना समोर जावं लागलं होतं. बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी मेरी कोम संघर्ष करत होत्या तेव्हाचा हा काळ होता.
तिसरं वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल जिंकून जेव्हा मेरी परत आल्या तेव्हा त्यांच्या सासऱ्यांची हत्या करण्यात आली.
पण प्रत्येक वेळेस मेरी यांनी परिस्थितीवर मात केली. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये तर त्यांचं वेगळंच रूप पाहायला मिळतं.
1000 मेरी तयार करण्याचं स्वप्न
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदा म्हटलं होतं, "रिंगमध्ये फक्त दोनच बॉक्सर असतात. रिंगमध्ये उतरताना तुमच्या मनात धग असली पाहिजे, ती नसेल तर समजायचं की तुम्ही खऱ्या बॉक्सर नाही."
आपल्या आत असलेल्या याच धगीचा वापर रिंगमध्ये करून मेरी इथपर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः सारख्या 1000 मेरी कोम तयार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे.
ऑलिम्पिकमधील आताच्या पराभवानंतरहे यंदाचं ऑलिम्पिक त्यांचं शेवटचं असेल, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
हे ठरवण्याचा अधिकार मेरी यांना आहे. पण, मेरी यांना ओळखणाऱ्यांना हे चांगलंच माहिती आहे की, अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवम्याचा कसब मेरी यांच्यामध्येच आहे.
यहाँ उनकी कही यही बात यादी आती है- अगर मैं इतना सब कर सकती हूँ, तो आप क्यों नहीं?
इथं मेरी यांचं एक वाक्य आठवतं, मी इतकं काही करू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत?
मेरी यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटाकवेले पदकं
- लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक
- कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये पदक
- 8 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








