टोकियो ऑलिम्पिक: मेडल आणि सहभागासाठी मेरी कोमने चार किलो वजनही वाढवलं...

मेरी कोम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंतची सर्वाधिक 6 मेडल मिळाली. पण या सगळ्यांतही ब्राँझ मेडल जिंकणारी मेरी कोम वेगळी होती.

तिचं ब्राँझही उठून दिसत होतं तिने त्यासाठी परिस्थितीशी केलेल्या दोन हातांमुळे...

ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी येते. आणि जगातले बहुतेक सगळे देश त्यात सहभागी होतात. म्हणून तिचं महत्त्व क्रीडा जगतात खूप मोठं, अगदी सर्वोच्च. पण आपल्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा चार वर्षांनी येत असल्या तरी खेळाडू ऑलिम्पिकचं स्वप्न अगदी दररोज जगत असतो.

ऑलिम्पिक खेळण्यासाठी आणि त्यात विजयी होण्यासाठी जीवाचं रान करत असतो. म्हणूनच खेळाडूसाठी ऑलिम्पिक हे रोजचंच. हे वाक्य शब्दश: खरं करणारी कहाणी आहे बॉक्सर मेरी कोमची आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने मिळवलेल्या ब्राँझ मेडलची…

मेरीची कहाणीच विलक्षण आणि अलौकिक आहे. ती तीन मुलांची आई आहे. तिची बाळंतपणं सिझेरियन म्हणजे शस्त्रक्रिया करून झालीत.

बॉक्सिंग शिकताना बसणाऱ्या ठोशांमुळे अनेकदा तिचा चेहऱ्याची ठेवणच बदललीय. पण, यातलं काहीही तिला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही.

एरवी खेळाडू फिटनेस राखण्यासाठी वजन कमी करत असतात. मेरीने बॉक्सिंग आणि ऑलिम्पिक वेडापायी वजन चक्क तीन-चार किलोंनी वाढवलं. आश्चर्य वाटलं ना ऐकून?

ऑलिम्पिक नव्हे स्वत:'चा स्वत:शीच लढा

वर्ल्ड चॅम्पियन म्हणून ती बॉक्सिंग वर्तुळात सगळ्यांना ठाऊक होती किंबहुना तब्बल पाचवेळा तिने जागतिक स्पर्धा जिंकली होती. पण, महिलांच्या बॉक्सिंगचा समावेश ऑलिम्पिकमध्ये नव्हता.

2006 नंतर तशा हालचाली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीत सुरू झाल्या आणि मेरी कोमचाही इरादा पक्का झाला.

रँकिंग

ऑलिम्पिक मेडलवर नाव कोरायचं आणि आपलं फायटिंग स्पिरिट भारताला आणि जगाला दाखवून द्यायचं. बॉक्सिंग हा मेरीसाठी कायम एक लढा होता. परिस्थितीशी तिने दिलेला लढा.

मेरी कोमच्याच शब्दांत सांगायचं तर "मी बालपण खूप गरिबीत घालवलंय. कधी कधी घरातले सगळेच दोन-दोन दिवस उपाशी राहायचे. खायला तांदळाचा दाणाही नसायचा. खेडं इतकं मागास होतं की, भोवती कुठल्या सुविधाही नसायच्या. अशावेळी आठवीपासून मी विचार करायचे, आताची परिस्थिती मी बदलू शकत नाही.

"पण, स्वत:ला कसं बदलू शकते? या परिस्थितीतून वर कशी येऊ शकते? बॉक्सिंगमध्ये मला याचं उत्तर सापडलं. या खेळात माझा लढा माझ्या स्वत:शी आहे. माझ्या भोवतालच्या परिस्थितीशी आहे," मेरी कोम सांगते.

मेरीचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने आपला ठसा उमटवला. पण, भारतात त्याविषयी फारशी जागृती नव्हती. बॉक्सिंग आणि खेळाशी संबंधित लोकांनाच मेरी कोमचं कर्तृत्व माहित होतं. ऑलिम्पिकसाठी मेरीला 2012 पर्यंत थांबावं लागलं.

सुरुवातीला फक्त तीन वजनी गटात महिलांची स्पर्धा होणार होती. 51 किलो, 60 किलो आणि 75 किलो.

मेरी कोम

फोटो स्रोत, Getty Images

मेरीचं वजन होतं 46 किलो. म्हणजे तब्बल पाच किलोंचा फरक होता. प्रयत्नपूर्वक मेरीने तीन किलो वजन वाढवलं. आणि ऑलिम्पिकचा सराव म्हणून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही 51 किलो वजनी गटात खेळायला सुरुवात केली.

मेरीचं वजन आता 48 ते 49 किलो म्हणजे वजनी गटाच्या खालच्या लिमिटवर होतं.

पण तिच्यासमोरचं आव्हान वाढलं होतं. कारण, बरोबरचे प्रतिस्पर्धी 51 किलो गटात मुरलेले आणि ताकदवान होते. उलट मेरी स्पर्धेआधीच्या वे-इन म्हणजे अधिकृत वजन मोजण्याच्या प्रक्रियेत पोटात दोन लीटर पाणी साठवून जायची. आणि नंतर सॉना बाथ किंवा उष्ण वातावरणात व्यायाम करून हे पाणी शरीरातून काढून टाकायची. ही सगळी कसरत तिला ऑलिम्पिकसाठीही करावी लागली.

याबद्दल मेरी म्हणते, "समोर आव्हान काय आहे या गोष्टींनी मला फरक पडणार नव्हता. कारण, माझा निर्धार पक्का होता. लंडनच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून मी पंधरा दिवस आधी लिव्हरपूलमध्ये राहिले. मला मणिपुरी पद्धतीचा भात आणि मासे आवडतात. म्हणून बरोबर माझा प्रेशर कुकर नेला आणि रोज माझं जेवण मीच बनवलं. या भातात पिष्टमय पदार्थ पुरेपूर असतात, त्याचा मला फायदाही झाला."

"स्पर्धा म्हणाल तर माझ्यासाठी प्रत्येक मॅच कठीण होती. सगळेच प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा उंच होते. पण, स्पर्धेचं मला दडपण येत नाही ही माझी जमेची बाजू आहे."

स्पर्धेचं मेरीला खरंच दडपण येत नाही. म्हणूनच असेल कदाचित मॅचच्या दिवशी रिंगमध्ये मेरी हुशारीने वावरते. क्षणात निर्णय घेऊन तिथल्या तिथे रणनिती आखते आणि प्रत्यक्षात आणते.

मेरी कोम

फोटो स्रोत, CHRIS HYDE

तिची पोलिश प्रतिस्पर्धी कॅरोलिना विरुद्धची मॅच खूप वेळ चालली होती. मॅचनंतर मेरी दमली होती. शरीरही अवघडलं होतं. पण, लगेच दुसऱ्या दिवशी असलेल्या क्वार्टर फायनल मॅचसाठी मेरी कसोशीने तयार झाली. ही मॅच हरलो तर मेडलचं स्वप्नही भंग होईल हे माहीत असल्यामुळे आपली उरलीसुरली ताकद पणाला लावून क्वार्टर फायनलमध्ये राहिलीविरुद्ध मेरी खेळली.

फक्त ऑलिम्पिकच नाही तर तिच्या कारकीर्दीतली ती सर्वोत्तम मॅच होती असं मेरी मानते. तिने राहिलीला 15-6 ने हरवलं आणि सेमी फायनलमध्ये पोहोचत ब्राँझ पक्कं केलं.

राहिली मेरीपेक्षा चार इंच उंच आहे. पुढे सेमी फायनलमध्ये मेरीची गाठ युकेच्या निकोला ॲडम्सशी पडली. निकोला या गटातली वर्ल्ड चॅम्पियन होती. आणि पुढे जाऊन तिने लंडनमध्ये गोल्डही जिंकलं. तिच्याविरुद्ध मेरीचा 6-11 असा पराभव झाला.

मेरी कोम

फोटो स्रोत, Getty Images

पण तोपर्यंत मेरीचं ब्राँझ पक्कं झालं होतं. आणि बॉक्सिंगमध्ये विजेंदर कुमारच्या नंतर ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती दुसरी भारतीय होती. विशेष म्हणजे मेरीचे कोच चार्ल्स ॲटकिनसन तांत्रिक अडचणींमुळे तिच्याबरोबर युकेला जाऊ शकले नव्हते. अख्खी ऑलिम्पिक स्पर्धा मेरी एकट्याच्या जीवावर खेळली.

आता मेरी टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज झालीय. ती म्हणते, ती जुन्या आठवणींमध्ये रमत नाही. पण, लंडनमधलं हे मेडल तिला टोकियोमध्ये गोल्ड जिंकण्याची प्रेरणा देईल असंही तिला वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)