पूजा गेहलोत: व्हॉलीबॉल खेळाडू जी आता बनली पैलवान

पूजा गेहलोत

कुस्तीतली माजी राष्ट्रीय आणि आशियाई ज्युनिअर चॅम्पियन असणारी पूजा गहलोत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचा कुस्तीचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

पूजाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. अवघ्या सहा वर्षांची असल्यापासून ती तिचे काका आणि कुस्तीपटू धर्मवीर सिंह यांच्यासोबत आखाड्यात जायची.

पुढे तिला कुस्तीची आवड निर्माण झाली. मात्र, तिचे वडील विजेंदर सिंह यांना हे मान्य नव्हतं.

त्यामुळे त्यांनी पूजाला कुस्तीऐवजी दुसरा एखादा खेळ निवडायला सांगितलं. कुस्तीनंतर पूजाची दुसरी पसंती होती व्हॉलीबॉलला. तिने व्हॉलीबॉलची निवड केली आणि या खेळात ज्युनिअर नॅशनल लेव्हलपर्यंत खेळली.

मात्र, 2010 साली नवी दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हरियाणाच्या गीता फोगाट आणि बबिता कुमारी फोगाट यांनी सुवर्ण पदक पटकावलं आणि या घटनेने पूजाचं आयुष्यच बदलून गेलं.

आपल्याला फोगाट बहिणींच्याच पावलावर पाऊल ठेवायचं आहे, याची खूणगाठ पूजाने बांधली.

मात्र, पूजाचा हा निर्णय तिच्या वडिलांना आवडला नाही. त्यांनी तिला कुस्ती खेळायला नकार दिला नसला तरी ही आवड जोपासण्यासाठी आवश्यक ती सगळी व्यवस्था स्वतः तिनेच करायची, अशी अट त्यांनी घातली.

आपल्या मुलीचं कुस्तीप्रेम काही दिवसात ओसरेल, असं त्यांना वाटलं.

व्यायाम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक

मात्र, पूजासाठीचा पुढचा प्रवास सोपा नव्हता. पूजा वायव्य दिल्लीचं उपनगर असलेल्या नरेला भागात रहायची. तिथे मुलींसाठी कुस्तीसाठी कसल्याच सोयी नव्हत्या.

कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्ली शहरात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ती दररोज बसने तीन तासांचा प्रवास करून दिल्लीला जायची. यासाठी पहाटे 3 वाजता उठायची.

मात्र, प्रवासात तिचा बराचसा वेळ खर्च व्हायचा. त्यामुळे आपल्याच भागात मुलांसोबतच कुस्तीची प्रॅक्टिस करण्याचा निर्णय तिने घेतला.

मुलांसोबत कुस्ती खेळणं तिच्या कुटुंबीयांना आणि नातलगांना रुचलं नाही. मात्र, मुलीची कुस्तीची आवड आणि त्यासाठी ती घेत असलेली मेहनत बघून पूजाच्या वडिलांनी अखेर रोहतकला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. रोहतकला मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत.

कुटुंबीयांचा पाठिंबा आणि कठोर परिश्रम या जोरावर पूजाने 2016 साली रांचीमध्ये झालेल्या ज्युनिअर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं.

वर्षभराच्या ब्रेकनंतर पुन्हा खेळाला सुरूवात

मात्र, 2016 साली झालेल्या दुखापतीमुळे तिच्या कुस्ती करियरला जवळपास वर्षभराचा ब्रेक लागला.

मात्र, उत्तम उपचार आणि दृढनिश्चय या बळावर तिने वर्षभरात कुस्तीच्या आखाड्यात पुनरागमन केलं.

पुनरागमनानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय पातळीवरही पूजाने नाव कमावलं. 2017 साली तैवानमध्ये झालेल्या एशियन ज्युनियर चॅम्पियनशीपमध्ये 51 किलो वजनी गटात पूजाने सुवर्ण पदक पटकावलं.

प्रतिनिधिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

2019 मध्ये हंगेरीतल्या बुडापोस्टमध्ये झालेल्या अंडर-23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये रजत पदक पटकावत पूजाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं.

या विजयानंतर सोनीपतमध्ये तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

एकेकाळी कुस्ती खेळते म्हणून ज्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिला अपमानित केलं होतं, तिला कुस्ती खेळण्यापासून रोखा, असं तिच्या वडिलांना सांगितलं त्याच शेजारी आणि नातेवाईकांना आज पूजाचा अभिमान वाटतो.

महिला खेळाडूंसाठी पोषक वातावरण मिळणं गरजेचं असल्याचं पूजाचं म्हणणं आहे. विशेषतः अल्प-उत्पन्न गटातल्या महिला खेळाडूंसाठी. कारण बरेचदा महिला खेळाडू या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातूनच येतात.

डायट आणि महागड्या प्रशिक्षण सोयी ज्यांना परवडत नाही, अशा महिला खेळाडूंना या सोयी मिळाव्या, यासाठी सरकार आणि सहाय्यक संस्थांनी मदत करण्याचा प्रयत्न करायला हवा, असं पूजाला वाटतं.

(हा लेख ई-मेलच्या माध्यमातून पूजा गहलोत यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)