आरक्षण : 'ख्रिश्चन, मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही'- रवीशंकर प्रसाद #5मोठ्याबातम्या

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. ख्रिश्चन, मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलित व्यक्तीला आरक्षणाचा लाभ नाही - रविशंकर प्रसाद

जे दलित व्यक्ती ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील, त्यांना कोणत्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी वरील घोषणा केली.

ISWOTY
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

"ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे, त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना SC आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. अशा व्यक्तींना SC एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही," असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

"संविधानाच्या परिच्छेद 3 नुसार, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. 1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसूचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदू धर्मावर आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्येची व्याप्ती वाढवून हिंदू धर्मासह शीख आणि बौद्ध धर्मांचाही यात समावेश करण्यात आला होता, असंही प्रसाद म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. शरद पवारांऐवजी शहीद जवानांच्या वीर माता किंवा पत्नी, शेतकरी, मेंढपाळ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करावं - भूषणसिंहराजे होळकर

शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्याला अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी विरोध दर्शवला आहे.

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहू नये, असं आवाहन भूषणसिंहराजे यांनी पत्र लिहून यांनी केलं आहे. शरद पवारांनी पेरलेल्या घाडेरड्या राजकारणाची मुळं जर महाराष्ट्रात रुजत असतील तर याचे दीर्घकालीन परिणाम समाजाला भोगावी लागतील. याची आपणाला जाणीव असेल. याऐवजी शहीद जवानांच्या वीर माता किंवा पत्नी, शेजकरी, मेंढपाळ यांनी हे अनावरण केले असते तर तो मासाहेबांच्या कार्याचा गौरव होता, असं भूषणसिंहराजे होळकर म्हणाले.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

संभाजीराजे यांना लिहिलेल्या पत्रानुसार, "जेजुरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्या (13 फेब्रुवारी) शरद पवार यांच्या हस्ते आणि आपल्या उपस्थितीत होणार होतं. परंतु, काही धनगर आणि मेंढपाळ युवकांनी आधीच या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. यावरून बहुजन समाजात किती अस्वस्थता आहे, याचा अंदाज आपणास आला असेल, आपण बहुजन समाजाच्या भावनांचा विचार करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो," असं भूषणसिंहराजे होळकर म्हणाले. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

3. आता सीडी लावण्याचं काम बाकी - एकनाथ खडसे

ईडी लावली तर सीडी लावीन, असं मी गंमतीने म्हटलं होतं. पण आता खरंच माझ्या मागे ईडी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात आयोजित संवाद यात्रेदरम्यान एकनाथ खडसे बोलत होते.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, facebook

"मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे," असं खडसे म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

4. कायदे मागे घेतल्याशिवाय घरवापसी नाही - राकेश टिकैत

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाप्रकरणी तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत.

गेल्या काही दिवसात आंदोलनासंदर्भात नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, हे तीन कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरवापसी करणार नसल्याचा इशारा आंदोलक शेतकरी संघटनांनी दिला आहे.

"कृषी कायदे रद्द झाल्यावरच आमची घरवापसी होईल, आमचा 'मंच आणि पंच' सारखाच राहील. सिंघू बॉर्डर हे आमचं कार्यालय म्हणून कायम असेल, मग सरकारला आज चर्चा करायची असेल, पुढील दहा दिवसांत किंवा पुढीच्या वर्षी, आम्ही तयार आहोत. दिल्लीतून खिळे काढल्याशिवाय आम्ही जाणार नाही," असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. मनमोहनसिंग प्रामाणिकच व्यक्ती होते, त्यांच्या खाली काम करत असलेल्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले - अनुराग ठाकूर

डॉक्टरसाहेब (माजी पंतप्रधान मनमोहनसिंग) हे प्रामाणिक व्यक्तीच होते. पण त्यांच्या खाली काम करणाऱ्या व्यक्तींना घोटाळा केला नाही, असा एकही विभाग सोडला नाही. गेल्या सात वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारमध्ये सात पैशांचाही घोटाळा झाला नाही. हे प्रामाणिक सरकार असतं, असं वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे.

शुक्रवारी (12 फेब्रुवारी) राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ठाकूर बोलत होते.

एअर इंडियाची परिस्थिती कुणामुळे खालावली. देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाची सुरुवात कुणी केली, असे प्रश्न करत ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

सध्या व्याजदर कमी होत आहेत, लोकांना अनेक सुविधा मिळत आहेत. सामान्य व्यक्तींना घरे मिळत आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे देशाला इकोनॉमिक पॉवर हाऊस बनवेल, असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. ही बाती लोकमतने दिली आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)