वसिम जाफरवरील जातीयवादाच्या आरोपांमागे कुणाचं राजकारण आहे?

फोटो स्रोत, @WASIMJAFFER14
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
मुंबईचा माजी सलामीवीर वसिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या काही अधिकाऱ्यांनी जातीयवादाचे आरोप केल्यावर त्याने रणजी टीमचं कोचपद सोडलं. पण, मूळात जाफरवरील आरोपांत खरंच तथ्य आहे का?
भारतीय लोकांचा 'क्रिकेट हा धर्म' आहे असं आपण गंमतीने म्हणतो तेव्हा त्या मागे लोकांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम अभिप्रेत असतं. त्या पलीकडे भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ना कधी धार्मिक वाद निर्माण झाला ना कधी खेळाडूंच्या धर्मावर बोट ठेवलं गेलं.
सुनील गावसकरांच्या फोर इतकंच कौतुक फॅन्सना सलीम दुराणींच्या पॅव्हेलियनमधलं घड्याळ फोडणाऱ्या सिक्सवर होतं. नंतरही महम्मद अझरुद्दिनच्या कप्तानीखाली सचिन तेंडुलकर उदयाला आला आणि बहरला. भारतीय टीमला अझरुद्दिन आणि सचिन दोघांची गरज होती. भारतीय क्रिकेटच्या जवळजवळ शंभर वर्षांच्या इतिहासात कधीच धार्मिकतेचा उल्लेखही झाला नाही.
पण, सध्या मात्र उत्तराखंडच्या रणजी टीममध्ये निर्माण झालेल्या वादामुळे भारतीय क्रिकेटमध्ये धार्मिकता किंवा जातीयवाद घुसलेला किंवा तो घुसवण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय.
उत्तराखंड क्रिकेट टीमचे कोच वसिम जाफर यांच्यावर तिथल्या क्रिकेट असोसिएशनचे सचिव महिम वर्मा आणि रणजी टीमचे मॅनेजर नवनीत मिश्रा यांनी टीममध्ये जातीयवाद पसरवल्याचा आरोप केलाय.
त्यानंतर वसिम जाफर यांनी कोच पदाचा राजीनामा दिला असला तरी असोसिएशनला खरमरीत पत्र लिहून आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत.
उत्तराखंड क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
वसिम जाफर यांची ओळख क्रिकेट फॅन्सना वेगळी करून द्यायला नको. भारतीय रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक दीडशे मॅचेस खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करताना 31 टेस्टमध्ये त्यांनी 1944 रन केले आहेत. विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरच्या उदयापूर्वी वसिम जाफर भारतीय टेस्ट टीमचे नियमित ओपनर होते.
क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यावर ते आधी बांगलादेश राष्ट्रीय टीमचे बॅटिंग कोच होते. आणि त्यानंतर गेल्यावर्षी जून महिन्यात वसिम जाफर यांची नियुक्ती उत्तराखंड क्रिकेट टीमचे कोच म्हणून झाली. त्यानंतर मागच्या सहा महिन्यात घडलेलं हे सगळं नाट्य आहे.

फोटो स्रोत, CHRIS YOUNG/GETTY IMAGES
उत्तराखंड टीमचे कोच असताना वसिम जाफर यांनी टीममध्ये गुणवत्ता डावलून मुस्लीम खेळाडूंना संधी दिली आणि टीम हडल दरम्यान खेळाडूंना 'रामभक्त हनुमान की जय' या घोषणा देण्यापासून रोखलं असे आरोप त्यांच्यावर झाले.
शिवाय कोरोना काळात अख्खी टीम लॉकडाऊनचे निर्बंध पाळत असताना बायो-बबलचे नियम धुडकावून एका शुक्रवारी जाफर यांनी नमाज पठणासाठी ड्रेसिंग रुममध्ये मौलवी आणल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
आणि हे आरोप करणारे दुसरे-तिसरे कुणी नाही तर उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि टीमचे मॅनेजर आहेत. टीमच्या खेळाडूंनी असोसिएशनकडे जाफर यांच्या विरोधात तक्रारी केल्याचं या दोघांनी म्हटलंय.
तर जाफर यांनी या प्रकरणानंतर मंगळवारी आपला राजिनामा असोसिएशनकडे पाठवून दिला. पण, तसं करताना आपल्या वरचे आरोप फेटाळले आहेत. उलट टीम निवडीत आपलं मत विचारात घेतलं जात नाही आणि आपल्याला निर्णय स्वातंत्र्य नाही, असं गाऱ्हाणं त्यांनी मांडलं आहे.
वसिम जाफर यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
वसिम जाफर यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन आपलं निवेदन पत्रकारांसमोर वाचून दाखवलं. हे निवेदनही मोठं आहे. आणि आपल्यावर झालेल्या आरोपांचा त्यांनी क्रमश: परामर्श घेतला आहे.
वसिम जाफर म्हणतात, "माझ्यावरील जातीयवादाचे आरोप गंभीर आहेत. आणि मी ते गंभीरतेनं घेतो. मला गेली अनेक वर्षं ओळखणाऱ्या लोकांनी आतापर्यंत माझ्यावर असे आरोप कधीच केले नाहीत. मी एका विशिष्ट समाजाच्या लोकांना टीम निवडीत प्राधान्य देतो असा आरोप माझ्यावर झाला. पण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी ज्या 22 जणांची टीममध्ये निवड झाली त्यात फक्त तीन मुस्लीम होते.
मॅचेस दरम्यान त्यातलाच एक खेळाडू समाद फल्लाला मी खराब कामगिरीमुळे टीममधून डच्चूही दिला. त्या स्पर्धेनंतर पुढच्या विजय हजारे स्पर्धेसाठी मला निवड समितीच्या बैठकीलाच बोलावण्यात आलं नाही. टीमचा कोच असताना माझं म्हणणं ऐकून घ्यावं असं प्रशासनाला वाटलं नाही."

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
पुढे खेळाडूंना जय हनुमान ही घोषणा देण्यापासून रोखण्याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "अशी कुठलीही घोषणा देण्याची पद्धत उत्तराखंड क्रिकेट टीममध्ये नव्हती. 'रानीमाता सच्चे दरबारकी जय,' अशी घोषणा देण्याची पद्धत होती. पण, बडोद्याला मॅचसाठी गेलो असताना मी टीमला आवाहन केलं की, उत्तराखंड टीमसाठी आपण खेळतो. अशावेळी कम ऑन उत्तराखंड किंवा गो उत्तराखंड अशी सर्वसमावेशक घोषणा टीमसाठी असावी."
ही घोषणा सुचवताना ज्येष्ठ क्रिकेटर चंद्रकांत पंडीत यांनी विदर्भ टीमला दिलेली 'कम ऑन विदर्भ' ही घोषणा आपल्या डोळ्यासमोर होती. टीम हडल दरम्यान अशी कुठलीतरी घोषणा असावी असं त्यांना वाटत होतं, असं स्पष्टीकरण जाफर यांनी दिलं आहे.
शुक्रवारी नमाज पठणासाठी मौलवींना बोलवण्याबद्दल जाफर यांनी म्हटलंय की, तो निर्णय त्यांचा नव्हता. इक्बाल पठाण या खेळाडूने मौलवींना पाचारण केलं होतं. टीमच्या सरावाच्या वेळाही नमाजसाठी कधी न बदलल्याचं जाफर यांनी स्पष्ट केलं आहे.
वसिम जाफर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे प्रकरण खरं तर उघड झालं. आणि त्यानंतर सगळीकडे प्रतिक्रिया यायलाही सुरुवात झाली.
क्रिकेटमध्ये जातीयवाद घुसला आहे का?
वसिम जाफर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे प्रकरण मोठं झालं. आणि त्यावर ट्विटर जगतात प्रतिक्रिया यायलाही सुरुवात झाली. अनिल कुंबळे, डोडा गणेश, मनोज तिवारी, इरफान पठाण हे क्रिकेटर जाफरच्या बाजूने उभे राहिले.
अयाझ मेनन, विजय लोकपल्ली, शेखर गुप्ता या क्रीडा लेखकांनीही वसिम जाफरची बाजू घेतली. वसिम जाफर हे मूळातच मितभाषी आणि मवाळ वृत्तीचा क्रिकेटर आहेत. सगळ्या सणांच्या दिवशी ओळखीच्या पत्रकारांना वसिमकडून शुभेच्छांचे संदेश जातात. अशावेळी वसिम जाफरवरच जातीयवादाचे आरोप होणं, अनेकांना रुचलेलं नाही.
भारतीय टेस्ट टीमचे व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाची फारशी माहिती नसल्याचं म्हटलं आहे. पण, सचिन तेंडुलकर सारख्या वरिष्ठ मुंबईकर क्रिकेटरने अजूनही यावर प्रतिक्रियाही दिलेली नाही. त्यावरून समाज माध्यमांमध्ये टीकाही होत आहे.

फोटो स्रोत, cau
हे खरंच जातीयवादाचं प्रकरण आहे का, हे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने 'द हिंदू' चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्यासी संपर्क साधला. त्यांनी बराच काळ देशांतर्गत क्रिकेटचं वार्तांकन केलं आहे.
त्यांच्या मते क्रिकेटमध्ये जातीयवाद नव्हताच असं नाही. पण, मेरिट म्हणजे गुणवत्ता डावलून एखाद्या खेळाडूला वारंवार संधी मिळाल्याची उदाहरणं नाहीत.
"क्रिकेट या खेळाची पाळंमुळं आपल्या समाजात रुजलेली आहेत. क्रिकेट खेळ काही समाजापासून वेगळा नाही. जर समाजात जातीयवाद असेल तर तो क्रिकेटमध्येही असणार. पण, जातीयवादामुळे एखादा गुणवान खेळाडू डावलला गेला असं उदाहरण मात्र क्रिकेटमध्ये नाही. त्यात उत्तराखंड क्रिकेट इतकं बाल्यावस्थेत आहे की, तिथल्या अननुभवी क्रिकेटरना बाहेर फारसं कुणी ओळखतही नाही. अशावेळी तिथे कुणाला डावलण्याचा प्रश्न येतोच कुठे," अमोल कऱ्हाडकर यांनी आपला मुद्दा मांडला.
वसिम जाफर यांनी पत्रकार परिषदेत दिलेलं एक उदाहरणही त्यांनी अधोरेखित केलं.
"आदित्य तरेची शिफारस सचिन तेंडुलकरने मुंबईच्या टीममध्ये केली तर कुणाचं लक्ष जात नाही. पण, वसिम जाफर मुंबईचा कॅप्टन असताना त्याने राहील शेखला संधी दिली तर त्यावर जातीयतेचा आरोप होतो."
अमोल कऱ्हाडकरांच्या मते त्याच राहील शेखला पुढे सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स टीममध्ये नेलं, तेव्हा कुणीही बोललं नाही. "अशी छोटी मोठी उदाहरणं भारतीय क्रिकेटमध्ये सापडतील. पण, त्यावरून निवडीमध्ये जातीयवाद होता, असा आरोप करणं चुकीचं ठरेल. कारण, टीममध्ये टिकून राहणं हे नेहमीच गुणवत्तेवर अवलंबून असतं."
वसिम जाफर यांच्यावरील आरोपांत कितपत तथ्य आहे?
अमोल कऱ्हाडकर यांनी आताच्या प्रकरणाचं वार्तांकनही जवळून केलं आहे. त्यांच्या मते वसिम जाफर आणि उत्तरांखंड क्रिकेट असोसिएशन दरम्यान घडलं ते फक्त जातीयवादाचं नाही तर नुसतं राजकारण होतं. आणि यात दोन्ही पक्षांचे अहंकार आड आले.
आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी झालेला घटनाक्रम उलगडून सांगितला.
"आधी मनासारखी टीम निवडता येत नाही आणि टीम रणनिती ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही, म्हणून वसिम जाफर यांनी राजीनामा दिला. त्यात टीकेचा रोख उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनवर असल्यामुळे आणि ते शेकू नये म्हणून सचिव माहिम वर्मा आणि टीम मॅनेजर नवनीत मिश्रा यांनी वसिम जाफर यांच्यावर फिरून जातीयवादाचे आरोप केले. पण, जातीयवादाचे आरोप गंभीर असल्यामुळे जाफर यांना मीडियासमोर आपली बाजू मांडावीशी वाटली. आणि त्यांनी तशी मांडल्यावर हे प्रकरण पेटलं," अमोल कऱ्हाडकर यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, @WASEENJAFFER14
म्हणजेच बुधवारी पत्रकार परिषद घेईपर्यंत हे प्रकरण लोकांना फारसं माहीतही नव्हतं.
"जातीयवादाचा मुद्दा मोठा होतोय हे बघितल्यावर माहिम वर्मा यांनीही आता आपण तसा थेट आरोप केला नव्हता. खेळाडूंचं म्हणणं फक्त मांडलं होतं. आता असोसिएशन त्यावर चौकशी करेल आणि मगच निर्णय घेईल असं स्पष्टीकरण दिलं आहे.
म्हणजेच, हे स्पष्ट दिसतंय की, अधिकृतपणे जातीयवादाचा आरोप झालाच नसल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. पण, महिम वर्मा आणि वसिम जाफर यांच्या दरम्यान टीम निवडीवरून वाद नक्की झाला. हा वाद पदाधिकारी मोठे की, टीमचा कोच मोठा, कुणाचा अधिकार मोठा, या स्वरुपाचा आहे. पण, दुर्दैवाने त्याला जातीय किनार लागली."
आठवडाभर गाजल्यानंतर प्रकरणाची तीव्रता आता कमी होत आहे. पण, जातीयवादाचा विषय असल्यामुळे त्याची झळ काही काळ राहणार आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









