मोहम्मद सिराज: वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारा धैर्यवान मुलगा

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, Mark Metcalfe

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. कारकीर्दीत सुरुवातीला कसोटी विशेषज्ञ असा शिक्का बसलेल्या सिराजने वनडे प्रकारातही कर्तृत्व सिद्ध करत ही भरारी घेतली आहे.

21 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व करताना सिराजने 38 विकेट्स पटकावल्या आहेत. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड इथे सिराजने वनडे पदार्पण केलं होतं. सिराजच्या आतापर्यंत वाटचालीचा घेतलेला आढावा.

क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर पहिल्यांदाच खेळण्याचं दडपण बाजूला सारत दोन वर्षांपूर्वी मोहम्मद सिराजने 8 विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी वडिलांचं छत्र गमावलेल्या सिराजने आपल्या दमदार कामगिरीतून त्यांना आदरांजली अर्पण केली होती.

कर्णधार विराट कोहलीने जेव्हा जेव्हा चेंडू सोपवला तेव्हा वेग आणि अचूकता यांचा सुरेख मिलाफ साधत सिराजने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात चिवटपणे खेळणाऱ्या जोस बटलरचा प्रतिकार संपुष्टात आणत सिराजने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वडिलांच्या निधनाचं दु:ख उराशी बाळगून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने गेल्या वर्षी ब्रिस्बेन टेस्टमध्ये पहिल्यांदाच डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली होती. सिराजने 73 रन्समध्ये 5 विकेट्स पटकावल्या.

सिराजने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबूशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद करत कारकीर्दीतील पहिल्या पंचकाची नोंद केली.

याआधी कपिल देव, अनिल कुंबळे, अजित आगरकर, बी.एस.चंद्रशेखर, एस.अबिद अली, मोहम्मद शमी, इरापल्ली प्रसन्ना, बिशनसिंह बेदी, मदन लाल, रुसी सुरती, उमेश यादव, शिवलाल यादव, झहीर खान, कुलदीप यादव, मनोज प्रभाकर, करसन घावरी, जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियात डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली आहे.

मेलबर्न इथं झालेल्या बॉक्सिंड डे टेस्टमध्ये सिराजने भारतासाठी पदार्पण केलं होतं. आज सिडनीतील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताच्या वेळेस त्याच्या डोळ्यात आज अश्रू आल्याचे दिसून आले. मोहम्मद सिराजसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण का आहे हे येथे पाहू-

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आयपीएल आटोपून विविध संघांमधले भारतीय खेळाडू एकत्र झाले आणि ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. बायोबबलच्या नियमांमुळे त्यांना दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाला जावं लागलं, मायदेशी येताच आलं नाही. 12 नोव्हेंबरला टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली.

ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनचे कठोर नियम असल्याने सगळे खेळाडू 14 दिवसांच्या क्वारंटाइनसाठी आपापल्या हॉटेल रुममध्ये बंदिस्त झाले. आठच दिवसात टीम इंडियाचा युवा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजला अतिशय दु:खद बातमी कळली. त्याच्या वडिलांचं निधन झालं. 53 वर्षीय सिराजचे बाबा फुप्फुसांच्या आजाराने त्रस्त होते.

सिराज वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतू शकला असता पण भारतातून ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्याला पुन्हा कठोर क्वारंटीनला सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे त्याची भारतासाठी खेळण्याची शक्यता अगदीच धूसर झाली असती.

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, Jason McCawley - CA

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज

वडिलांच्या जाण्याचा आघात मोठा असतो. सिराजच्या कारकीर्दीत त्याच्या वडिलांचा पाठिंबा मोलाचा होता. सिराजच्या आयुष्यातला हा सगळ्यात भावनिक क्षण होता. एकीकडे टीम इंडियासाठी खेळू शकण्याचं स्वप्न दिसत होतं आणि दुसरीकडे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले होते.

बीसीसीआयने सिराजसमोर मायदेशी परतण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांना शेवटचं बघावं असं मुलाला वाटणं साहजिक होतं. त्याचा विचार करून बीसीसीआयने सिराजला तू भारतात जाऊ शकतोस असं सांगितलं. परंतु सिराजला आईने, घरच्यांनी धीर दिला.

तू भारतासाठी खेळावंस हे वडिलांचं स्वप्न तू साकार करू शकतोस. ते देहरुपाने आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या सदिच्छा सदैव तुझ्या पाठिशी आहेत. तू भारतासाठी खेळलास तर तीच त्यांना आदरांजली ठरेल असं घरच्यांनी समजावलं. मन घट्ट करून सिराजने ऑस्ट्रेलियातच राहण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य सहकारी, सपोर्ट स्टाफ यांनीही सिराजला धीर दिला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सिराजच्या धैर्याचं कौतुक केलं. इतक्या जवळचा माणूस गमावूनही सिराजने देशाप्रतीच्या कामाला प्राधान्य दिलं. युवा वयात सिराजने मोठं धैर्य दाखवलं आहे असं गांगुली यांनी म्हटलं.

सिराज वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र कसोटी संघाचा भाग होता. डे-नाईट टेस्ट दरम्यान मोहम्मद शमीच्या हाताला बॉल लागून झालेल्या दुखापतीमुळे तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. डोमेस्टिक क्रिकेट, इंडिया ए, आयपीएल अशा विविध ठिकाणी सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सिराजला बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पणाची संधी देण्याचं टीम इंडियाने निश्चित केलं.

मात्र सिराजचा हा प्रवास सोपा नव्हता. काही महिन्यांपूर्वी युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी खेळताना सिराजने स्वप्नवत स्पेल टाकला होता.

आयपीएलच्या एका मॅचमध्ये दोन मेडन टाकणारा पहिला बॉलर

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मोहम्मद सिराजने अनोखी किमया केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत सिराजने दोन मेडन टाकण्याचा पराक्रम केला. सिराजने या मॅचमध्ये अवघ्या 8 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या.

आयपीएल स्पर्धेत एका मॅचमध्ये दोन मेडन स्पर्धेच्या 12 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही बॉलरने टाकल्या नव्हत्या. सिराज असं करणारा पहिलावहिला बॉलर ठरला. याआधी सिराजची आयपीएलमधली कामगिरी फारशी स्पृहणीय नव्हती. त्याचा इकॉनॉमी रेट 9.29 असल्याने अंतिम अकरात त्याचं नाव पक्कं नसतं. पण बॉलिंगला पोषक खेळपट्टीवर सिराजची स्विंग बॉलिंग भल्याभल्यांची भंबेरी उडवू शकते हे त्या मॅचमध्ये दिसून आलं.

खडतर सुरुवात

सिराज हैदराबादचा असून, त्याचे वडील रिक्षा चालवायचे. कमावणारे ते आणि खाणारी तोंडं बरीच असं समीकरण होतं. क्रिकेटसारख्या महागड्या खेळाची आवड जोपासणं सिराज आणि त्याच्या घरच्यांना अवघड होतं. मर्यादित संसाधनांमध्ये सिराजने फास्ट बॉलिंगची आवड सोडली नाही.

गल्लीमोहल्ल्यात खेळणारा सिराज टेनिस बॉल स्पर्धांमध्ये खेळत असे. एकदा त्याचे मामा त्याला एका स्पर्धेसाठी घेऊन गेले. 25 ओव्हरची मॅच होती. सिराजने त्या मॅचमध्ये 20 रन्सच्या मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या. मामांनी सिराजच्या कामगिरीवर खूश होऊन त्याला 500 रुपये बक्षीस म्हणून दिलं. सिराजसाठी मॅचमध्ये खेळण्यासाठीचं ते पहिलं मानधन होतं.

वडील रिक्षा चालवण्याचं कष्टाचं काम करतात याची सिराजला जाण होती. स्वत:च्या पोटाला चिमटा घेत वडिलांनी सिराज आणि त्याच्या भावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. याचीच परिणती म्हणजे सिराज भारतासाठी खेळतो आहे तर त्याचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे.

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, BRENTON EDWARDS

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज

टेनिस बॉल स्पर्धा, वयोगट स्पर्धा, हैदराबाद U22, मुश्ताक अली स्पर्धा, विजय हजारे करंडक, रणजी स्पर्धा असा एकेक टप्पा सिराजने मेहनतीने ओलांडला आहे. प्रत्येक ठिकाणी स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे.

रणजी स्पर्धेत दमदार प्रदर्शन आणि आयपीएलची दारं उघडली

रणजी करंडक स्पर्धेच्या 2016-17 हंगामात सिराजने हैदराबादसाठी खेळताना तब्बल 41 विकेट्स घेतल्या. सिराजच्या प्रदर्शनाच्या बळावर हैदराबादने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.

या कामगिरीचा चांगला परिणाम म्हणजे सनरायझर्स हैदराबादने 2017 हंगामासाठी स्थानिक मोहम्मद सिराजला तब्बल 2.6 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, Tony Marshall

फोटो कॅप्शन, सिराज बॉलिंग रनअपदरम्यान

कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातल्या सिराजसाठी ही रक्कम प्रचंड होती. पैशाबरोबरीने व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी त्याला मिळाली.

डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळता आलं. 2017-18 विजय हजारे स्पर्धेत सिराजने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या.

एक वर्ष चांगल्या संघाचा त्याला भाग होता आलं. मात्र सनरायझर्सने एका वर्षातच सिराजला रिलीज केलं मात्र तो नाऊमेद झाला नाही कारण 2018 हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्याला समाविष्ट केलं. 2.6 कोटी रुपयांची बोली लावत बेंगळुरू संघाने सिराजला संधी दिली.

सिराजमियाँच्या घरी झाली होती बिर्याणी पार्टी

आरसीबीची टीम आयपीएल मॅच खेळण्यासाठी हैदराबादला आली होती. त्यावेळी सिराजने आरसीबीच्या टीमला बिर्याणीच्या मेजवानीसाठी निमंत्रण दिलं. सिराजच्या विनंतीला मान देत आरसीबीची टीम सिराजच्या घरी पोहोचली होती. बिर्याणी पार्टीवेळी विराट कोहली खाली बसून जेवला होता.

सिराजच्या घरच्या रुचकर बिर्याणीवर टीम इंडियाचे खेळाडू ताव मारताना दिसत होते. सोशल मीडियावर या मेजवानीचे काही व्हीडिओ व्हायरल झाले होते.

इंडिया ए साठी दमदार प्रदर्शन

2018 मध्ये बेंगळुरूत इंडिया ए संघासाठी खेळताना सिराजने ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळताना पहिल्या इनिंग्जमध्ये 8 विकेट्स घेण्याची करामत केली होती. ऑस्ट्रेलिया ए संघात त्यावेळी उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हीस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, मिचेल मार्श, मार्नस लबूशेन, अलेक्स कॅरे अशा राष्ट्रीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता.

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, Tony Marshall

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराजचं कौतुक करताना बाकी खेळाडू

सिराजने दुसऱ्या इनिंग्जमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवर्षी बेंगळुरूत दक्षिण आफ्रिका ए संघाविरुद्ध खेळताना सिराजने मॅचमध्ये 10 विकेट्स घेण्याची किमया केली होती.

सिराजच्या खेळभावनेने जिंकली ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांची मनं

बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या ए संघाविरुद्ध सराव सामना होता. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि सिराज ही शेवटची जोडगोळी मैदानात होती. बुमराह मुक्तपणे फटकेबाजी करत होता.

बुमराहचा एक फटका बॉलर कॅमेरुन ग्रीनच्या डोक्यावर आदळला. फॉलोथ्रूमध्ये असणारा ग्रीन खाली कोसळला.

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, Daniel Kalisz

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज

रन्स मिळण्याची शक्यता सोडून सिराज तात्काळ ग्रीनच्या मदतीसाठी धावला. त्याची विचारपूस केली. त्याला सावरलं. सिराजच्या या खेळभावनेचं ऑस्ट्रेलियात प्रचंड कौतुक झालं.

प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूप्रती सिराजचं वर्तन खेळभावनेचा वस्तुपाठ आहे अशा शब्दात ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी त्याचं कौतुक केलं.

टीम इंडियासाठी ट्वेन्टी-20 आणि वनडे पदार्पण

सिराजने 2017 मध्ये टीम इंडियासाठी ट्वेन्टी-20 पदार्पण केलं. राजकोट इथे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत सिराजला पदार्पणाची संधी देण्यात आली.

पहिल्या लढतीत सिराजच्या बॉलिंगवर 53 रन्स कुटण्यात आल्या मात्र त्याने केन विल्यमसनसारख्या मोठ्या खेळाडूला बाद केलं होतं. सिराज आतापर्यंत भारतासाठी तीन ट्वेन्टी-20 खेळला आहे.

मोहम्मद सिराज, बॉक्सिंग डे

फोटो स्रोत, Mark Brake - CA

फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी अॅडलेड इथे मोहम्मद सिराजने वनडे पदार्पण केलं होतं.

गेल्या वर्षी सिराजने अडलेड इथं वनडे पदार्पण केलं. मात्र ही मॅच सिराजसाठी संस्मरणीय ठरली नाही. कारण ऑस्ट्रेलियासाठी बॅट्समननी सिराजच्या गोलंदाजीवर 76 रन्स कुटल्या.

मात्र आता मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या ऐतिहासिक मैदानावर कसोटी पदार्पण करताना ठसा उमटवत वडिलांना आदरांजली वाहण्याचा सिराजचा प्रयत्न असेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)