IndVsAus : टी. नटराजन याचं स्वप्नवत टेस्ट पदार्पण

टी नटराजन

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. वेगवान गोलंदाज टी. नटराजनचं हे स्वप्न आज पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियाविरोधातील ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटी सामन्यात टी. नटराजनला पदार्पणाची संधी देण्यात आलीय.

या संधीसह टी. नटराजन भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 300 वा खेळाडू ठरला आहे.

आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात स्थान मिळवून चांगलं प्रदर्शन करणाऱ्या टी. नटराजनला टेस्ट टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नटराजनने आयपीएल स्पर्धेत तब्बल 64 यॉर्कर्स फेकत निवडसमितीला प्रभावित केलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि ट्ववेन्टी-20 मालिकेत नटराजनने चांगली बॉलिंग करत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि आयपीएल स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरने नटराजनचं कौतुक केलं होतं. 'वेल डन नटराजन! तुझ्या कामगिरीचा अभिमान वाटतो'- असं वॉर्नर म्हणाला होता. वॉर्नर आणि नटराजन आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळतात.

नटराजन, वॉर्नर, सनरायझर्स हैदराबाद

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, डेव्हिड वॉर्नर आणि टी. नटराजन

नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत पदार्पण केलं. ट्वेन्टी-20 मालिकेत नटराजनने तीन सामन्यात 6 विकेट्स घेत सगळ्यांना प्रभावित केलं.

"जिंकणं, हरणं, ड्रॉ- मैदानावर आणि मैदानाबाहेरही आम्ही एकमेकांचा आदर करतो.ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 मालिका गमावली पण टी.नटराजनची यशस्वी वाटचालपाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. नट्टू अतिशय चांगला माणूस आहे. त्याला क्रिकेटमनापासून आवडतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची नेट बॉलर म्हणून निवड झाली होती.परंतु वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याने त्याला वनडे आणि ट्वेन्टी-20पदार्पणाची संधी मिळाली. त्याने दर्जेदार प्रदर्शन करत संघव्यवस्थापनाचा विश्वाससार्थ ठरवला. नट्टू, तुझं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा", असं वॉर्नरने म्हटलं आहे.

आयपीएलच्या काळात टी.नटराजनच्या नावाची चर्चो जोरात सुरू होती. पण, कोण आहे हा टी. नटराजन?

दरवर्षी आयपीएल स्पर्धेत असंख्य क्रिकेटपटूंच्या कहाण्या, त्यांची वाटचाल सामोरं येतात. यंदाचं वर्ष आहे क्रिकेटमधल्या सगळ्यात मूलभूत कौशल्यांवर अद्भुत प्रभुत्व असणाऱ्या एका गावकऱ्याची. हो, गावकरी कारण त्याचा जन्म लहानशा गावात झाला आहे, क्रिकेटही तिथेच शिकला आहे, आजही तो तिथेच राहतो मात्र आता त्याच्या नावाची चर्चा देशात नव्हे पार परदेशात होते आहे.

टी. नटराजन, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad

फोटो कॅप्शन, टी.नटराजन

यंदाच्या हंगामातला गुणकौशल्यांच्या बळावर चर्चेत आलेलं नाव म्हणजे टी.नटराजन. सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या नटराजनने 16 विकेट्स घेतल्या. मात्र चर्चा विकेटची नाही तर त्याने टाकलेल्या यॉर्कर्सची होते आहे. नटराजनने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 63 यॉर्कर्स टाकले आहेत.

सोप्या भाषेत यॉर्कर म्हणजे स्टंप्सच्या बुंध्यात बॉल टाकणं. ट्वेन्टी-20 हा बॅट्समनला अनुकूल प्रकार आहे. बॉलरची कत्तल साहजिक मानली जाते. कर्दनकाळ वाटणाऱ्या बॅट्समनला रोखायचं तर यॉर्करसारखा हुकमी एक्का बॉलर्सच्या ताफ्यात असणं आवश्यक असतं. परंतु गेल्या काही वर्षात या अस्त्रावरची बॉलर्सची पकड कमी होताना दिसते आहे.

यॉर्करऐवजी शॉर्ट बॉल टाकून बॅट्समनला रोखण्याचे प्रयत्न जास्त होताना दिसतात. मात्र नटराजनने यॉर्कर तत्वाला चिकटून राहत बॉलिंग केली. एलिमिनेटरच्या मॅचमध्ये 360 बॅट्समन एबी डीव्हिलियर्ससारख्या दिग्गजाला टाकलेला यॉर्कर आणि त्रिफळा अनेक वर्ष लक्षात राहील.

असं म्हणतात की आयुष्यात चांगलं घडायला विशिष्ट वेळ यावी लागते. यंदाचं आयपीएल सुरू होईपर्यंत नटराजन हे नाव क्रिकेटरसिकांच्याही फार परिचयाचं नव्हतं. हैदराबादने नटराजनला अंतिम अकरात संधी दिली आणि त्याचे यॉर्कर पाहून दखल घेणं भाग पाडलं. हैदराबादचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरपासून आजी-माजी खेळाडूंपर्यंत अनेकजण नटराजनच्या सातत्याने यॉर्कर फेकण्याच्या हातोटीवर फिदा झालेत.

टी. नटराजन, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad

फोटो कॅप्शन, केन विल्यमसनकडून नटराजनला शाबासकी मिळाली.

याच प्रदर्शनाच्या बळावर टी. नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून निवड झाली. काही दिवसांपूर्वी नटराजनच्या पत्नीने लेकीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर तीनच दिवसात नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ट्वेन्टी-20 मालिकेसाठी निवड झाली.

यंदाचं आयपीएल नटराजनसाठी अलवार झुळूक यावी तसं आहे. पण ही झुळूक अनुभवण्यापूर्वी नटराजनने परिस्थितीचे चटके सोसले आहेत. अनेक वर्ष संघर्ष आणि अडथळे यांनी भरलेली वाट आता हळूहळू सुकर होते आहे. आयपीएलच्या व्यासपीठावर चमकून विरुन जाणारेही अनेक आहेत. त्यांच्या यादीत नाव येऊ नये यासाठी नटराजनला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.

युएईपासून हजारो किलोमीटर दूर तामिळनाडू राज्य. तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यात नटराजनचं चिन्मापम्पट्टी हे टिंबाएवढं गाव. सर्वसाधारण भारतातल्या गावांसारखं- दुर्गम. 5G येण्याच्या काळातही या गावातलं इंटरनेट आचके देत चालतं. दैन्यावस्था नाही, श्रीमंतही नाही.

नटराजनचे वडील रोजंदारीवर काम करायचे, आई चहाची छोटी टपरी चालवायची. दोन भाऊ, तीन बहिणी असं मोठं कुटुंब. कमावण्याची साधनं बघता कमाई किती तुटपुंजी असेल याची तुम्ही कल्पना केली असेल. त्यात कमाई आणि खाणारी तोंडं यांचं व्यस्त प्रमाण. त्यामुळे मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष ठरलेला.

टीव्हीच्या प्रसारामुळे छोट्या गावांमध्ये क्रिकेटचं वेड खूप. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या गावांमध्ये हे वेड दिसतं. क्रिकेटची क्रेझ असते. नटराजनच्या गावात टेनिस बॉलच्या स्पर्धा होतात. जागा मोप असल्यामुळे खेळायचं कुठे हा प्रश्न नसतो. डावखुरा नटराजन या स्पर्धांमध्ये बॉलिंग करू लागला.

टी. नटराजन, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad

फोटो कॅप्शन, विकेटचा आनंद साजरा करताना नटराजन

आयताकृती मैदान, कर्ण्यावर चाललेली स्थानिकांची कॉमेंट्री, आपल्या आवडत्या खेळाडूंची नावं प्रिंट केलेले टीशर्ट अशा वातावरणात टेनिस बॉलच्या मॅचेस होतात. गाव सधन असेल तर विजेत्यांना चषक, बक्षीस रक्कम, फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अशी तजवीज होते. अशा स्पर्धांमध्ये एखाद्या युवा खेळाडूला टॅलेंट स्काऊट हेरतात आणि त्याचं करिअर बनतं अशा गोष्टी आपण मोठ्या खेळाडूंबाबत अनेकदा ऐकल्या आहेत. तोवर किडूकमिडूक आयुष्य जगणाऱ्या नटराजनच्या आयुष्यात असा क्षण आला.

कोच जयप्रकाश यांनी नटराजनची बॉलिंग पाहिली. यॉर्कर फेकण्याच्या क्षमतेत त्यांना या मुलाचं भवितव्य उज्वल असल्याचं दिसलं. जयप्रकाश यांनी नटराजनला गावातून शहरात आणलं. हे संक्रमण पेलण्यासाठी नटराजनकडे पैसा नव्हता. बीएसएनल संघाकडून खेळू लागल्याने नटराजनची तात्पुरती सोय झाली. तुमचं काम बोलकं असलं असेल तर प्रमोशनची गरज पडत नाही. नटराजनचे यॉर्कर पाहून विजय क्लबने त्याला ताफ्यात घेतलं.

आयपीएलचा सगळ्यात मोठा दृश्य परिणाम म्हणजे देशभरात छोट्या छोट्या पातळ्यांवर ट्वेन्टी-20 लीग सुरू झाल्या. याच धर्तीवर तामिळनाडू प्रीमिअर लीग सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी फिक्सिंग प्रकरणामुळे स्पर्धेच्या प्रतिमेला बट्टाही लागला होता. पण मुद्दा तो नाही.

तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेतल्या डिंडीगुल ड्रॅगन्सने नटराजनला संधी दिली. नटराजननने या संधीचं सोनं केलं आणि त्याचे यॉर्कर टीव्हीवर दिसू लागले. तामिळनाडू प्रीमिअर लीगचं प्रसारण देशभर होतं. या लीगसाठी अनेक देशी- विदेशी माजी खेळाडू कॉमेंट्री करतात. अनेक माजी खेळाडू कोचिंगचं काम करतात.

टी. नटराजन, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, नटराजन टीम इंडियाच्या जर्सीत

बंदे में दम है, अशी चर्चा होऊ लागली. अशा लीग आयपीएल संघांसाठी फीडर बेस ठरतात. युवा खेळाडू हेरले जातात आणि त्यांना करारबद्ध केलं जातं. आयपीएलमधल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नटराजनला संधी दिली.

लिलावात नटराजनची बेस प्राईज होती दहा लाख रुपये. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी तीन कोटी रुपयांची बोली लावत त्याला ताफ्यात घेतलं. पण घाऊक प्रमाणावर खेळाडू, सपोर्ट स्टाफला घेणं आणि अल्पावधीत सोडून देणं यासाठी किंग्ज इलेव्हनचा संघ ओळखला जातो. नटराजन किंग्जसाठी 2017 हंगामात सहा मॅच खेळला. त्याने दोन विकेट्स घेतल्या. अपेक्षेनुरुप पंजाबने त्याला रिलीजही केलं.

आयपीएलच्या पटलावर शेकडो खेळाडू येतात, लुप्त होतात. काहीजण चमकतात आणि विरुन जातात. काहीजण एका हंगामाचे चमत्कार ठरतात. नटराजन आला पण नोंद घेण्यापूर्वीच पंजाबने सोडूनही दिलं. त्याचं नशीब पातेऱ्याखालीच राहिलं.

पुढच्याच वर्षी पंजाबहून तो थेट सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्ये दाखल झाला. गुणवान परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेल्या खेळाडूंना संधी देणारा संघ अशी हैदराबादची ओळख आहे. ते माणसांवर विश्वास ठेवतात. नटराजन दोन हंगाम हैदराबाद संघाचा भाग होता. अंतिम अकरा साधारण पक्की असल्यान त्याला संधी मिळाली नाही. परंतु दीड महिना मोठ्या खेळाडूंकडून शिकायला मिळालं. पैसा मिळाला.

यंदाचं वर्ष कोरोनामुळे सगळ्यांसाठीच अवघड गेलं आहे. परंतु नटराजनसाठी हे वर्ष संधीचं, प्रसिद्धीचं, कौतुकाचं ठरलं आहे.

म्हणून जर्सीवर 'जेपी'

कारकीर्दीत नवनवी शिखरं गाठू लागल्यावर वाटेत कुणीकुणी मदत केली याचे ऋण जपणारे कमी असतात. नटराजन जयप्रकाश यांना जराही विसरलेला नाही. जयप्रकाश यांनी गावातल्या मुलाला महानगरीत आणलं, त्याच्या गुणकौशल्यांना व्यासपीठ मिळवून दिलं. गुरुप्रती आदर म्हणून नटराजनच्या जर्सीवर जेपी नट्टू असं लिहिलेलं असतं. जयप्रकाश यांच्या नावाचं आद्याक्षर म्हणून जेपी आणि नटराजनचा शॉर्टफॉर्म म्हणून नट्टू.

अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात

अक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडणं हे कोणत्याही बॉलरसाठी दुर्देवी असतं. कारण बॉलिंगवर मर्यादा येतात किंवा बंदी येते. आत्मविश्वासाला तडा जातो. आपल्या अस्त्रावर घाला पडल्यासारखं होतं. अक्शनमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बदल करावे लागतात. ते बदल तांत्रिक समितीने स्वीकारल्यानंतरच पुन्हा बॉलिंग करावी लागते.

डावखुरा फास्ट बॉलर असणाऱ्या नटराजनने तामिळनाडूकरता पदार्पण केलं. मात्र पहिल्याच मॅचमध्ये अंपायर्सनी त्याच्या अक्शन संदर्भात मॅचरेफरींना रिपोर्ट दिला. लहान खेडयातल्या खेळाडूसाठी बायोमेकॅनिक्स वगैरे संकल्पना कोसो दूर होत्या. पण तुम्ही चांगले असाल तर चांगली माणसं अडचणीच्या वेळी उभी राहतात हे नटराजनच्या बाबतीत पुन्हा सिद्ध झालं.

टी. नटराजन, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad

फोटो कॅप्शन, नटराजन

सुनील सुब्रमण्यम हे तामिळनाडू क्रिकेटवर्तुळातलं जाणकार कोच. त्यांनी नटराजनला आवश्यक बदल सुचवले. बदललेल्या अक्शनसह तो अचूक बॉलिंग करू शकतो आहे की नाही याची चाचपणी केली. यॉर्कर्स घोटीव होण्यासाठी काम केलं. अक्शनच्या मुद्यामुळे नटराजनचा आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी आधार दिला. कारण दीड वर्ष नटराजन बाजूला फेकला गेला.

गावी उभारली अकादमी, स्वप्नांना दिलं बळ

किंग्ज इलेव्हन पंजाबने करारबद्ध केल्यामुळे नटराजनकडे पैसे आले. सगळ्यात आधी त्याने चांगलं घर बांधलं. आता त्याचे कुटुंबीय या मेहनतीतून साकारलेल्या वास्तूत राहतात. पंजाबकडून हैदराबादकडे गेल्यानंतर नटराजनला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु पैसे मिळत होते.

आपण इथवर पोहोचलो पण गावातल्या, परिसरातल्या मुलांना अशी संधी कोण देणार? हा प्रश्न त्याच्या मनात होता. त्यातूनच नटराजनने गावातच अकादमी उभारली. एका मित्राने अकादमीसाठी जागा दिली. गावातल्या क्रिकेटवेड्या मुलांसाठी नटराजनने व्यवस्था उभारली.

टी. नटराजन, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad

फोटो कॅप्शन, नटराजन सरावादरम्यान

जी. पेरियास्वामी या मुलालाही क्रिकेटची आवड. परंतु सगळ्यांनाच ही आवड जोपासता येत नाही. नटराजनला या मुलाकडे चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे हे जाणवलं. त्याने पेरियास्वामीच्या घरच्यांची भेट घेतली. त्याला प्रगत प्रशिक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली. आर्थिक भारही उचलला.

पेरियास्वामी तामिळनाडू प्रीमिअर लीगमधल्या चेपॉक सुपर गिल्स संघासाठी खेळतो. उत्तम बॉलिंग करत असल्याने सुपर गिल्स संघव्यवस्थापन खूश आहे. उदयोन्मुख खेळाडूची कारकीर्द परिस्थिती नाही म्हणून भरकटली असती. नटराजनने पेरियास्वामीला त्याला जे आवडतं ते करू दिलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)