IPL 2020: श्रेयस अय्यर- दिल्लीच्या ऐतिहासिक प्रदर्शनामागचा किमयागार

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

दिल्ली कॅपिट्लस संघाने मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आयपीएल फायनल गाठली. दिल्लीचं नशीब पालटवणाऱ्या श्रेयसच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.

दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. तारीख- बुधवारची दुपार. आयपीएलचा हंगाम सुरू होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने पत्रकार परिषद आयोजित केलेली. आयपीएलमध्ये एकामागोमाग एक मॅचेस सुरू असतात. खेळाडूंचं हॉटेल, विमानतळ, स्टेडियम अशी कसरत सुरू असते. यामध्ये पत्रकार परिषद कशाला असा प्रश्न अनेकांना पडला.

या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर गौतम गंभीर, रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर होता. गंभीरने वैयक्तिक प्रदर्शन लौकिकासारखं होत नसल्याने कर्णधारपद सोडून देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रेयस अय्यर संघाचा नवा कर्णधार असेल असंही त्या परिषदेत घोषित करण्यात आलं. त्यावेळी दिल्लीची गुणतालिकेत तळापर्यंत घसरण झाली होती.

गंभीर आणि पॉन्टिंग या दोन माजी अनुभवी खेळाडूंनी श्रेयस कर्णधारपदाची जबाबदारी योग्य प्रकारे हाताळू शकतो असं सांगितलं. गंभीरने हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडणं ही मोठी बातमी होती. कारण तांत्रिकदृष्ट्या गंभीरच्या नेतृत्वासंदर्भात कुठेच काही चर्चा नव्हती.

टीम इंडियाचा माजी सलामीवर, भरवशाचा बॅट्समन, आयपीएल विजेता कर्णधार अशी सशक्त गोष्टी गंभीरच्या नावावर होत्या. मात्र गंभीरने स्वेच्छेने बाजूला होण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रेयससारख्या युवा खेळाडूकडे कर्णधारपदाचा काटेरी मुकूट सोपवणं ही त्याहून मोठी बातमी होती. पण दिल्लीने हा धाडसी निर्णय घेतला होता.

दोनच दिवसात दिल्लीचा मुकाबला कोलकाताशी झाला. दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या लढतीत श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने कोलकातावर 55 रन्सने विजय मिळवला. श्रेयसने 40 बॉलमध्ये 3 चौकार आणि 10 षटकारांसह नाबाद 93 रन्सची वेगवान खेळी साकारत संघाच्या विजयाच मोलाची भूमिका बजावली. दिल्लीने 219 रन्सचा डोंगर उभारला. कोलकाताला 164 रन्समध्ये रोखलं.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन, हंगामाच्या मध्यात, गौतम गंभीरने कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवलं होतं.

मॅचपूर्वी श्रेयस म्हणाला होता- आमच्या संघात क्षमता आहे. बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर एकत्रितपणे आम्ही सर्वोत्तम प्रदर्शन करू शकलेलो नाही. गौतम गंभीर हा आयपीएल विजेता कर्णधार आहे. गंभीर आणि पॉन्टिंग ही अनुभवी जोडगोळी मला मार्गदर्शनासाठी मिळते आहे हा माझा सन्मान आहे.

दिल्लीची कर्णधारांची परंपरा

सातत्याने खेळाडू, कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ यामध्ये घाऊक बदल करणारा संघ अशी दिल्लीची ओळख होती. श्रेयसआधी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, जेम्स होप्स, महेला जयवर्धने, रॉस टेलर, डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन, जेपी ड्युमिनी, झहीर खान, करुण नायर यांनी दिल्लीचं नेतृत्व केलं आहे. दिल्लीचं नेतृत्व करणारा श्रेयस हा बारावा कर्णधार आहे.

गंभीरकडून श्रेयसकडे नेतृत्वाची धुरा आली तरी दिल्लीच्या नशिबात मोठा बदल झाला नाही. 2018 हंगामात दिल्लीने 14 मॅचेसमध्ये 5 विजय आणि 9 पराभवांसह 10 गुण मिळवले. दिल्लीला गुणतालिकेत तळाचं स्थान मिळालं. फरक हा झाला की श्रेयस कर्णधारपद सांभाळू शकतो हे सिद्ध झालं.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर सहकारी पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि शिखर धवन यांच्याबरोबर

दिल्लीच्या तत्कालीन संघाकडे नजर टाकली तर त्यांच्याकडे ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिस्तियन, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी असे अनुभवी खेळाडू होते. मॅक्सवेलकडे पंजाबचं नेतृत्व करण्याचा अनुभव होता. पण दिल्ली संघव्यवस्थापनाने भविष्याचा विचार करून श्रेयसच्या पारड्यात वजन टाकलं.

श्रेयसने त्या हंगामात 411 रन्स केल्या. त्याचा स्ट्राईकरेट होता 132.58. त्याच्या नावावर चार अर्धशतकंही होती. कर्णधारपदाने त्याच्या बॅटिंगवर परिणाम होत नाही हेही सिद्ध झालं.

2019 हंगामासाठी दिल्लीला शिखर धवन आणि इशांत शर्मा हे अनुभवी खेळाडू मिळाले. धवनकडे नेतृत्वाचा अनुभव होता. इशांतने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिल्लीचं नेतृत्व केलं आहे. तरीही दिल्लीने श्रेयसच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास ठेवला. संपूर्ण हंगामासाठी कर्णधारपद मिळालेल्या श्रेयसने दिल्लीचं नशीब पालटवलं.

लीग स्टेजमध्ये दिल्लीने 14 पैकी 9 मॅच जिंकत 18 गुण मिळवले आणि तिसरं स्थान पटकावलं. दिल्लीने एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादला नमवलं परंतु क्वालिफायर2 मॅचमध्ये अनुभवी चेन्नईने त्यांची वाट रोखली. दिल्लीने तिसरं स्थान पटकावलं यातून श्रेयसचं महत्त्व अधोरेखित झालं.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, श्रेयस सहकाऱ्यांसमवेत विजय साजरा करताना

शिखर धवनने 521 तर ऋषभ पंतने 488 रन्स केल्या. स्वत: श्रेयसने 463 रन्स करत कर्णधारपद आणि बॅटिंग ही कसरत यशस्वीपणे सांभाळता येते हे दाखवून दिलं. दिल्लीच्या कागिसो रबाडाने 25 विकेट्स मिळवल्या. परपल कॅपचा मान एका विकेटने हुकला होता. श्रेयसच्या नेतृत्वात खेळताना अन्य खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत हे स्पष्ट झालं.

कर्णधारपद हे मैदानावरच्या हारजीत यापेक्षाही व्यवस्थापकीय कौशल्याचं काम आहे. मॅन मॅनेजमेंट म्हणून विविध संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, अनेकविध भाषा-खाणंपिणं-आचारविचार असणाऱ्या खेळाडूंची मोट बांधण्याचं काम आयपीएल संघाच्या कर्णधाराला करावं लागतं. संवाद कौशल्य सहज असावं लागतं. संघातल्या खेळाडूंचा विश्वास जिंकावा लागतो. श्रेयसने हे केल्याचं दिसून आलं.

टीम इंडियात स्थान पक्कं नाही तरीही..

आयपीएलमधील अन्य संघांचे कर्णधार हे प्रस्थापित कर्णधार आहेत. राष्ट्रीय संघातील प्रस्थापित खेळाडू आहेत. ते खेळाडू स्वत:च एक ब्रँड आहेत.

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, दिनेश कार्तिक यांनी खेळाडू म्हणून, कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करून झालं आहे. राष्ट्रीय संघाचा ते अविभाज्य भाग आहेत. श्रेयसकडे ते संचित नाही. श्रेयस अजूनही भारतीय टेस्ट टीमचा भाग नाही. वनडे तसंच ट्वेन्टी-20 संघाचा भाग असेलच असं सांगता येत नाही.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, MICHAEL BRADLEY

फोटो कॅप्शन, श्रेयसचं टीम इंडियातलं स्थान अजूनही पक्कं नाही.

टीम इंडियात स्थान पक्कं करण्यासाठी संघर्ष सुरू असलेल्या श्रेयसने दिल्ली संघाची कमान समर्थपणे सांभाळली. वैयक्तिक पातळीवरील चढउताराचा परिणाम त्याने दिल्लीचं नेतृत्व करताना होऊ दिला नाही.

यंदा तर श्रेयसच्या संघात धवन, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन अशा माजी आयपीएल कर्णधारांचं त्रिकुट आहे. त्याच्याकडे कागिसो रबाडा, मार्कस स्टॉइनस असे अनुभवी खेळाडू आहेत. तरीही दिल्लीने श्रेयसकडेच नेतृत्व कायम राखलं. त्याचा स्पष्ट परिणाम दिल्लीच्या कामगिरीत दिसून आला. श्रेयसच्या नेतृत्वाखालील दिल्लीने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये धडक मारली.

यंदाच्या हंगामादरम्यान श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर नसली तरी थ्रो करताना त्याला त्रास जाणवतो. मात्र तरीही तो खेळत राहिला. हैदराबादविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याच्या खांद्यात त्रास जाणवू लागला. पण आपण उपचारांसाठी मैदानाबाहेर गेलो तर संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल हे ओळखून श्रेयस मैदानावरच थांबला. 30 यार्ड वर्तुळात फिल्डिंगला उभा राहिला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो पॅव्हिलियनमध्ये परतला.

विशेष म्हणजे श्रेयस मुंबईतल्या मैदानांवर कर्तृत्व गाजवून मोठा झालेला खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत असलेल्या श्रेयसने डोमेस्टिक क्रिकेटमधली दादा टीम असलेल्या मुंबईचं नेतृत्व केलेलं नाही.

नकला, नृत्य, व्यायाम आणि जादू

कर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असला तरी श्रेयसने त्याच्या वैयक्तिक स्वभावाला मुरड घातलेली नाही. कोरोना काळात, घरी बहिणीबरोबर त्याने केलेला डान्स व्हायरल झाला होता. युएईत टीम हॉटेलमध्ये पृथ्वी शॉबरोबर तो नाचताना दिसतो. प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण मॅचआधी काही तास श्रेयसचा सहकारी स्टॉइनसची हुबेहूब नक्कल करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

त्याआधी काही दिवस सहकारी शिमोरन हेटमायर मुलाखतकाराशी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहून त्याची नक्कल करताना दिसला होता.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्येही स्वत:ला फिट ठेवलेल्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयसचा समावेश होतो. जिममधले त्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर दिसतात. फोटोंप्रमाणे मैदानावरही त्याचा फिटनेस दिसतो हे त्याहून महत्त्वाचं आहे.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन, जिममध्ये श्रेयस शिखर धवनसह

श्रेयसच्या घरी त्याचा लाडका कुत्रा आहे. त्याच्यासोबत खेळतानाचे अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर वारंवार दिसतात. असंख्य प्रकारच्या शूजचं कलेक्शन त्याच्या घरी दिसतं.

जादूचे प्रयोगही करू शकणारा श्रेयस इतकी वर्ष ढेपाळणाऱ्या दिल्लीसाठी जादुई ठरला आहे.

अशी झाली होती दिल्ली संघात एंट्री

2015 मध्ये आयपीएल लिलावावेळी घडलेला किस्सा तत्कालीन परफॉर्मन्स अॅनालिस्ट प्रसन्न यांनी शेअर केला आहे. श्रेयसचं नाव लिलावकर्त्यांनी घेताच प्रसन्न यांनी कर्स्टन यांना त्याला संघात समाविष्ट करून घेण्याचं सुचवलं.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेयसची तेव्हा ओळख नव्हती. हा दिल्लीचा भविष्यातला कर्णधार असू शकतो असं प्रसन्न यांनी कर्स्टन यांना म्हटलं.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर

श्रेयसने 2014-15 रणजी हंगामात 50.56च्या सरासरीने रन्स करताना दोन शतकं आणि सहा अर्धशतकं झळकावली होती. 2015-16 रणजी हंगामातही श्रेयसने हा फॉर्म कायम राखला. त्याने 73.39च्या सरासरीने 1321 रन्स केल्या. हंगामात सर्वाधिक रन्सचा विक्रम त्याच्या नावावर होता. फायनलमध्ये श्रेयसने शतकी खेळी साकारत मुंबईच्या 41व्या रणजी जेतेपद मिळवून निर्णायक भूमिका बजावली होती.

2015 आयपीएल हंगामानंतर श्रेयसची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर अर्थात सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली होती. याआधी हा पुरस्कार पटकावणाऱ्यांपैकी रोहित शर्मा, संजू सॅमसन, सौरभ तिवारी, मनदीप सिंग, अक्षर पटेल आयपीएल संघांसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

प्रसन्न गेली अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे परफॉर्मन्स अॅनालिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचा शब्द प्रमाण मानून कर्स्टन आणि दिल्ली संघव्यवस्थापनाने श्रेयसला 2.6 कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात समाविष्ट केलं. त्यावेळच्या त्या संभाषणाची फळं दिल्ली चाखत आहेत.

उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर

श्रेयसला रिकी पॉन्टिंगसारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं आहे. मोहम्मद कैफ, रायन हॅरिस, विजय दहिया यांच्यासह सपोर्ट स्टाफ श्रेयसच्या पाठीशी असल्याने त्याचं काम सुकर झालं आहे.

श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन, कोच रिकी पॉन्टिंगसह श्रेयस

इशांत शर्मा आणि अमित मिश्रा हे अनुभवी योद्धे दुखापतीमुळे बाहेर जाणं हा दिल्लीसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर श्रेयसच्या स्वत:च्या खांद्याला दुखापत झाली. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत जवळपास दीड आठवडा खेळू शकला नाही. त्यामुळे संघात बदल करावे लागले. परंतु श्रेयसने उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करत दिल्लीला विजयपथावर ठेवलं.

श्रेयसच्या संघात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, नेपाळसह भारतीय खेळाडू आहेत. या सगळ्यांना समजून घेत श्रेयसनं नेतृत्वाची कमान सांभाळली आहे.

कागिसो रबाडा, अँनरिक नॉर्किया, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉइनस यांच्यासह सतत बदलत राहणारा तिसरा फास्ट बॉलर यांना श्रेयसने शिताफीने हाताळलं आहे.

पॉवरप्ले, मधल्या ओव्हर्स, हाणामारीच्या ओव्हर्स, दव, मैदानाचा आकार, खेळाडूचा फॉर्म, दुखापती हे सगळं लक्षात घेऊन श्रेयसने बॉलिंग युनिटला सांभाळलं आहे. त्यांना सर्वोत्तम बॉलिंग करण्यासाठी प्रेरित केलं आहे.

बॉलर्ससाठी योग्य फिल्डिंग सेट करण्याचं कामही श्रेयसने केलं आहे. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत शाब्दिक चकमकी पाहायला मिळतात. श्रेयसने स्वत: आणि दिल्ली संघही संघभावनेने खेळले याची दक्षता घेतली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)