IPL 2020 : शेन वॉटसन रक्ताळलेल्या गुडघ्याने जेव्हा खेळत राहिला

फोटो स्रोत, Mark Kolbe
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
हैदराबादचं राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम. तारीख 12 मे 2019. निमित्त आयपीएलची फायनल. मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करताना 149 रन्सची मजल मारलेली. चेन्नईसमोर लक्ष्य खूप मोठं नाही पण सोपंही नाही. मुंबईची दर्जेदार बॉलिंग आणि साथ देणारं पिच यामुळे गोष्टी गांभीर्याने घेणं आवश्यक होतं.
चेन्नईकडून शेन वॉटसनने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली. चाळिशीकडे झुकलेल्या वॉटसनने एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही चौकार-षटकार आणि एकेरी-दुहेरी यांचा मिलाफ साधत खेळ केला. वॉटसनने नांगर टाकल्याने मुंबईने दुसऱ्या बाजूने खिंडार पाडलं.
लक्ष्य अगदी जवळ म्हणजे एका चौकाराएवढं जवळ आलेलं असताना मुंबईने वॉटसनला रनआऊट केलं. 80 रन्सची इनिंग्ज खेळून वॉटसन आऊट झाला. वॉटसन तंबूत परतला आणि इकडे मैदानावर मॅच फिरली. मुंबईने अवघ्या एका रनने सामना जिंकला आणि जेतेपदावर कब्जा केला.

फोटो स्रोत, Social Media
मॅच संपल्यानंतर चेन्नईच्या हरभजन सिंगने वॉटसनचा फोटो शेअर केला. त्या फोटोत वॉटसनच्या गुडघ्याच्या इथे रक्त दिसत होतं. हरभजनने लिहिलं- संघाप्रती, कामाप्रति निष्ठा काय असते याचं अत्युच्य उदाहरण म्हणजे वॉटसन.
मॅचदरम्यान डाईव्ह करताना वॉटसनच्या गुडघ्याला लागलं. गुडघ्याभोवती पॅड असल्याने ते फार कोणाला समजू शकलेलं नाही. रक्ताळलेल्या गुडघ्यासह वॉटसन खेळला. त्याने कुणालाही हे सांगितलं नाही. चेन्नईला जिंकून देण्यासाठी त्याने वेदनांची पर्वा केली नाही. मॅच संपल्यावर वॉटसनच्या त्या गुडघ्यावर सहा टाके घालावे लागले.
शेन वॉटसन काय अवलिया आहे हे समजून घेण्यासाठी हा प्रसंग पुरेसा बोलका आहे. ऑलराऊंडर कसा असावा याचा वस्तुपाठ असणाऱ्या वॉटसनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रवास यंदा लीग स्टेजमध्येच संपुष्टात आला.
कोलकाताविरुद्धच्या मॅचनंतर वॉटसनने निवृत्तीसंदर्भात सहकाऱ्यांना कल्पना दिली. यावेळी तो अत्यंत भावुक झाला होता. वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही वर्षांपूर्वीच निवृत्ती स्वीकारली होती. मात्र जगभरातील ट्वेन्टी-20 लीग तो खेळत होता. मात्र आता तो कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळताना दिसणार नाही.
पिळदार शरीरयष्टी, पहाडी रुंद छाती, निळसर झाक असलेले डोळे, पिंगट केस आणि व्यक्तिमत्वात पुरेपूर भरलेला आत्मविश्वास. एखाद्या अभिनेत्याला साजेसं रुपडं लाभलेल्या वॉटसनने क्रिकेटच्या मैदानावर सर्वस्व झोकून दिलं.

फोटो स्रोत, Mark Nolan - CA
सलामीला येऊन ताजेतवाने बॉलर्स आणि नवा बॉल यांचा सामना केला. मधल्या फळीत येऊन अँकर इनिंग्ज खेळण्याचं काम केलं. हाणामारीच्या षटकात येऊन फिनिशर बनून मॅच जिंकून देण्याचं काम केलं. वॉटसनने नवा बॉल हाताळला. फर्स्ट चेंज म्हणून येत भागीदारी तोडण्याचं काम इमानेइतबारे केलं. वॉटसनने स्लिपमध्ये उभं राहून भन्नाट कॅच टिपले. 30 यार्ड वर्तुळात आणि बाऊंड्रीवर सगळीकडे चोख फिल्डिंग केली.
वॉटसनने कर्णधारपद भूषवलं. कर्णधारपद नसताना संघातला वरिष्ठ खेळाडू म्हणून कर्णधाराशी सल्लामसलत केली, योग्य सल्ला दिला. नव्या खेळाडूंना दडपण कसं हाताळावं ते दाखवून दिलं.

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA
प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंकडून शेरेबाजी झाली तर वॉटसनने अरे ला का रे केलं. मूळचा ऑस्ट्रेलियन वाण असल्याने स्लेजिंगचा समोरच्याची एकाग्रता भंग करण्यासाठी वापरही केला. क्रिकेटच्या मैदानावर जे जे करण्यासारखं आहे ते त्याने केलं.
प्रचंड ताकद, अफलातून टायमिंग यांच्या बळावर बॉलिंगच्या ठिकऱ्या उडवणारा वॉटसन चाळिशीतही प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरवून देत असे. कितीही चाचपडत खेळत असला तरी वॉटसन पिचवर आहे, म्हणजे मॅच आपली झालेली नाही याची जाणीव समोरच्या संघांना असे. कारण वॉटसनने कत्तल करायला घेतली तर बॉलर्सचा पालापाचोळा होणं निश्चित.
रन्ससाठी वॉटसन चौकार-षटकारांवर अवलंबून नव्हता. सिंगल-डबल चेपण्यातही माहीर होता. फिल्डरवर दडपण आणून चोरटी धाव घेण्यात वाकबगार होता. अंपायरच्या इथे येऊन डावा खांदा मागे नेत रोरावत येणारा वॉटसनचा बाऊन्सर बॅट्समनला अडचणीत टाकत असे. त्याचवेळी फसवे स्लोअरवन, बुंध्यात पडणारे यॉर्कर यामुळे बॉलर वॉटसनचीही धास्ती वाटत असे. कॅचेस, रनआऊट्स, डाईव्ह या आघाडीवरही वॉटसन अग्रेसर होता.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE
कुठल्या ना कुठल्या प्रकारे संघाच्या विजयात त्याचं योगदान असे. एकहाती मॅच काढून देण्याची क्षमता वॉटसनकडे होती. ऑलराऊंडर्सची व्याख्याच अशी की असा खेळाडू जो एखाद्या संघात विशेषज्ञ बॅट्समन किंवा विशेषज्ञ बॉलर म्हणून खेळू शकेल. वॉटसन या व्याख्येचं जिवंत प्रारुप होतं. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कारकीर्दीत दुखापतींनी जर्जर करूनही वॉटसनची खेळण्याची, संघाला जिंकून देण्याची ऊर्मी कमी झाली नाही.
पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर, मांडीचे स्नायू दुखावणं, पोटऱ्या आणि नडग्या, निखळलेला खांदा, नितंब, बिघडलेलं पोट अशा असंख्य दुखापतींमुळे वॉटसनने अनेक मॅचेस गमावल्या. पण दुखापतींना शरण न जाता तो जिद्दीने पुनरागमन करत राहिला. ज्या संघासाठी खेळत असे त्यांच्याकरता जिगरबाज योद्धा होऊन जात असे.
प्रमुख बॉलर्सना चोपणं आणि प्रतिस्पर्धी संघातील मुख्य बॅट्समनला आऊट करण्यात वॉटसन वाकबगार होता. मोठ्या मॅचेसमध्ये प्रचंड दडपणाच्या क्षणी त्याची कामगिरी उंचावत असे. संघ देईल ती जबाबदारी स्वीकारून त्याप्रती शंभर टक्के देणारा सैनिक होता.

फोटो स्रोत, Cameron Spencer
वॉटसनने 59 टेस्ट, 190 वनडे आणि 58 ट्वेन्टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. 2007, 2015 मध्ये विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा अविभाज्य भाग होता. अशेस विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचं नेतृत्वही केलं. प्रतिष्ठेच्या अलन बॉर्डर पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी असे तिन्ही प्रकार मिळून 10,000 पेक्षा जास्त रन्स आणि 250पेक्षा विकेट्स घेणाऱ्या मोजक्या ऑलराऊंडर्समध्ये वॉटसनचा समावेश होतो.
आयपीएलच्या बरोबरीने वॉटसन ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, पाकिस्तान सुपर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग असं जगभर खेळत असे. आयपीएलच्या 2008 मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या हंगामात वॉटसन मॅन ऑफ द सीरिज होता. त्या हंगामात वॉटसनने रन्स, विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.
2009 हंगाम वगळता वॉटसन आयपीएलचे बारा हंगाम खेळला. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स अशा तीन संघांचं त्याने प्रतिनिधित्व केलं.
आयपीएल स्पर्धेत वॉटसनच्या नावावर चार शतकं आहेत. त्याने या स्पर्धेत हॅट्ट्रिकही घेतली आहे. वॉटसनने दोनदा आयपीएल विजेत्या संघाचा अविभाज्य भाग होता. आयपीएल फायलनमध्ये शतक झळकावण्याचा दुर्मीळ विक्रम वॉटसनच्या नावावर आहे.
आयपीएल स्पर्धेत वॉटसनने 145 मॅचेसमध्ये 137.91च्या स्ट्राईक रेटने 3874 रन्स केल्या आहेत. यामध्ये चार शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. वॉटसनने आयपीएलमध्ये बॉलर म्हणून ठसा उमटवताना 92 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 40 कॅचही आहेत.
यंदाच्या हंगामात वॉटसनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तो बॉलिंग करत नव्हता. खाली वाकणं, डाईव्ह लगावणं, धावत जाऊन कॅच पकडणं, दुहेरी-तिहेरी चोरणं हे सगळं करताना वॉटसनला त्रास होत होता. गात्रं थकल्याचं जाणवत होतं.
पंजाबविरुद्ध त्याने बॅटचा हिसका दाखवला मात्र ज्योत विझताना मोठी होते तो त्यातला प्रकार होता. संघासाठी शंभर टक्के देऊ शकत नाही लक्षात आल्यावर वॉटसनने थांबण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल स्पर्धेला मोठं करण्यात वॉटसनचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या स्पर्धेला, चाहत्यांना वॉटसनची उणीव प्रकर्षाने जाणवेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








