IPL 2020: अँनरिक नॉर्किया- कानामागून आला आणि स्पीडस्टार झाला...

फोटो स्रोत, BCCI/IPL
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बुधवारी (14 ऑक्टोबर) दिल्ली आणि राजस्थान यांच्यात रंगलेल्या सामन्यात सगळ्यात चर्चित राहिली अँनरिक नॉर्कियाची भन्नाट वेगाने बॉलिंग.
नॉर्कियाने चार ओव्हरच्या स्पेलमध्ये तुफान वेगाने बॉलिंग करताना राजस्थानच्या बॅट्समनची भंबेरी उडवली. वेगासह अचूकता राखत नोकियाने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत दिल्लीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नॉर्कियालाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
नॉर्कियाने बुधवारी झालेल्या मॅचमध्ये 156.22 ताशी किलोमीटर वेगाने बॉल टाकला. या स्पर्धेत नॉर्किया सातत्याने दीडशेपेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करतोय आणि प्रतिस्पर्धी बॅट्समनला अडचणीत आणतो आहे.

फोटो स्रोत, Screenshot
यंदाच्या हंगामातला वेगवान बॉल टाकण्याचा मान नॉर्कियाने स्वत:च्या नावावर केला आहेच मात्र त्याच बरोबरीने जेव्हापासून आयपीएलमध्ये बॉलचा वेग मोजला जातो आहे तेव्हापासून सगळ्यात वेगवान बॉल टाकण्याचा मानही नॉर्कियाच्या नावावर झाला आहे.
कोलकातासाठी निवड पण दुखापतीने दिला दगा
यंदाच्या आयपीएलचे पडघम वाजू लागले तेव्हा अँनरिच नॉर्किया हे नाव क्रिकेटरसिकांच्या ध्यानीमनीही नव्हतं. आयपीएलचा तेरावा हंगाम जसजसा पुढे सरकतोय तसतसं स्पेलिंगऐवजी वेगळाच उच्चार असणाऱ्या फास्ट बॉलरची महती जगभरातल्या क्रिकेटरसिकांपुढे येऊ लागलेय.
गेल्या वर्षी म्हणजे 2019 हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने नॉर्कियाला ताफ्यात समाविष्ट केलं. कोलकाताने रूपये खर्चून नोकियाला संघात घेतलं. मात्र दुर्देव म्हणजे मार्च महिन्यात नॉर्कियाच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो आयपीएल खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, MICHAEL SHEEHAN
आयपीएलसाठी निवड होऊनही खेळण्याचं भाग्य नोकियाच्या नशिबी आलंच नाही. अचूक टप्प्यावर प्रचंड वेगाने बॉलिंग करणारा नोकिया कोलकाता संघासाठी उपयुक्त ठरला असता. मात्र दुखापतीमुळे नॉर्कियाला स्पर्धेत सहभागीच होता आलं नाही. नॉर्कियाऐवजी कोलकाताने ऑस्ट्रेलियाच्या मॅट केलीला घेतलं.
लिलावात अनसोल्डचा शिक्का
यंदाच्या हंगामासाठी लिलावात नोकियाचं नाव होतं. कोरोनाचं संकट नसतं तर आयपीएल स्पर्धा एप्रिल-मे महिन्यात खेळवली जाते. उष्ण आणि प्रचंड आर्द्रतेच्या काळात विदेशी फास्ट बॉलर संपूर्ण हंगामभर खेळू शकेल का? असा प्रश्न संघमालकांना पडणं साहजिक होतं. लिलावात नॉर्कियाचं नाव होतं. 50 लाख ही नॉर्कियाची बेस प्राईज होती. मात्र लिलावात नॉर्कियाचं नाव आल्यानंतर कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही. लिलावकर्त्यांनी सर्व संघांना पुन्हा एकदा विचारलं आणि नॉर्कियाच्या नावापुढे अनसोल्ड असा शिक्का बसला. त्याच लिलावात पुन्हा एकदा अनसोल्ड खेळाडूंची नावं संघांपुढे ठेवण्यात आली. दुसऱ्या फेरीतही नॉर्कियाच्या विचार कोणत्याही संघाने केला नाही.
इंग्लंडचा ऑलराऊंडर ख्रिस वोक्सला दिल्ली कॅपिटल्स संघाने संघात घेतलं होतं. दर्जेदार किफायतशीर बॉलिंग, उपयुक्त बॅटिंग आणि अफलातून फिल्डर अशी वोक्सची ओळख आहे. गेले दोन वर्ष वोक्स इंग्लंडसाठी टेस्ट-वनडे आणि ट्वेन्टी-२० फॉरमॅटमध्ये नियमितपणे खेळतो आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने वोक्सची उपयुक्तता ओळखून त्याला 1.5 कोटी रुपये खर्चून संघात घेतलं. मात्र इंग्लंडसाठी खेळण्याला प्राधान्य देण्याचं कारण देत वोक्सने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली.
बदली खेळाडू ते मुख्य बॉलर
वोक्ससारखा सर्वसमावेशक गुणकौशल्यं असणारा खेळाडू गमावणं हा दिल्लीसाठी धक्का होता. मात्र दिल्ली संघव्यवस्थापनाने अनसोल्ड खेळाडूंच्या यादीतून एक नाव निवडलं. ते नाव म्हणजे- अँनरिच नॉर्किया
"विमानात बसून युएईला रवाना होईपर्यंत मला विश्वास बसत नव्हता. गेल्या वर्षी दुखापतीमुळे मी खेळू शकलो नाही. यंदाच्या लिलावासाठी माझी निवड झाली नव्हती. वोक्सने माघार घेतल्याने दिल्लीने मला संघात समाविष्ट केलं. गेल्यावर्षी दिल्लीची कामगिरी चर्चेत राहिली. युवा उत्साह आणि अनुभवी खेळाडू यांचा सुरेख मिलाफ या संघात आहे", असं नॉर्कियाने म्हटलं होतं.

फोटो स्रोत, BCCI/IPL
रिकी पॉन्टिंग आणि रायन हॅरिस या ऑस्ट्रेलियन जोडगोळीने कागिसो रबाडाच्या बरोबरीने अँनरिच नॉर्किया या दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सना एकत्र संधी द्यायचं ठरवलं. प्रचंड वेग, अचूक टप्पा आणि नवा बॉल तसंच हाणामारीच्या ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याची ताकद यामुळे दिल्लीने या दोघांवर आक्रमणाची जबाबदारी सोपवली. या दोघांनी आतापर्यंत या जबाबदारीला न्याय दिला आहे.
भारतातच कसोटी पदार्पण आणि पहिली विकेट- कोहली
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात पुणे कसोटीत नॉर्कियाने पदार्पण केलं. मात्र नॉर्कियासाठी हे पदार्पण संस्मरणीय ठरलं नाही. गहुंजे इथं झालेल्या या कसोटीत टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 601 रन्सचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव रन्समध्येच आटोपला. त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने रन्समध्येच गुडघे टेकले. एकमेव इनिंग्जमध्ये नॉर्कियाने तब्बल शंभर रन्स दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
रांची इथे झालेल्या पुढच्या कसोटीत नॉर्कियाला संघात कायम राखण्यात आलं. टीम इंडियाने या कसोटीतही दमदार वर्चस्व राखताना एक डाव आणि 202 रन्सने सामना जिंकला. नॉर्कियासाठी या मॅचमधली स्मरणीय गोष्ट म्हणजे त्याची पहिलीवहिली विकेट. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवणाऱ्या विराट कोहलीला नॉर्कियाने बाद केलं. नोकियाच्या सुरेख बॉलवर कोहली एलबीडब्ल्यू झाला. मात्र या विकेटनंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या भागीदारीने मॅचचं पारडंच फिरलं.
नॉर्कियाने आतापर्यंत 6 टेस्ट, 7 वनडे आणि 3 ट्वेन्टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
नाव कसं उच्चारायचं?
नॉर्कियाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाल्यापासून त्याचं नाव कसं उच्चारायचं हा यक्षप्रश्न क्रिकेटचाहत्यांना आहे. म्हणूनच दिल्ली कॅपिटल्सने त्याला ताफ्यात घेतल्यानंतर चक्क एक व्हीडिओ केला आणि त्यात हाच प्रश्न विचारला- तुझं नाव कसं उच्चारायचं?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
नॉर्कियाने सोप्या शब्दात नावाचा उच्चार समजावून सांगितला. मात्र तरीही खेळाडू, कॉमेंटेटर, चाहते वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं नाव उच्चारतात.
दक्षिण आफ्रिकेला फास्ट बॉलरचं माहेरघर समजलं जातं. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर, ड्युआन ऑलिव्हर, मर्चंट ली लाँज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी यांनी सातत्याने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.
भन्नाट वेगाला अचूकतेची जोड देत नॉर्कियाने स्थानिक क्रिकेटमध्ये छाप उमटवली. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये थोडक्यात खेळण्याची संधी हुकलेला नॉर्किया यंदा मात्र आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दखल घ्यायला भाग पाडतो आहे.
हे वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








