IPL 2020: यशस्वीचा धोनीला नमस्कार, पूरनची हवाई भरारी आणि केन भडकतो तेव्हा

यशस्वी जैस्वाल, धोनी

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वालने धोनीला नमस्कार केला तो क्षण
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

होणार, नाही होणार अशा संभ्रमावस्था ओलांडत आयपीएलचा तेरावा हंगाम वाळवंटात युएईत सुरू झाला. बघता बघता हंगाम निम्म्यावर आला. प्रत्येक संघांच्या सात मॅच झाल्या आहेत. यंदाच्या हंगामातील आतापर्यंत सात चर्चित क्षणचित्रांचा आढावा.

1. गावस्करांची कमेंट आणि अनुष्काचं प्रत्युत्तर

टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंदर्भातील माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी काढलेल्या उद्गारांमुळे वाद निर्माण झाला.

याप्रकरणी गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोहलीच्या वाईट कामगिरीसाठी आपण अनुष्काला दोष देत नसल्याचं स्पष्टीकरण गावस्कर यांनी दिलं आहे.

गुरुवारी पंजाब-बेंगळुरू मॅच झाली. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर पंजाबने बेंगळुरूचा धुव्वा उडवला. या मॅचमध्ये विराटने दोन कॅच सोडले आणि बॅटिंगमध्ये त्याने अवघ्या एक रनचं योगदान दिलं.

एरव्ही स्वत:च्या कामगिरीने संघासमोर वस्तुपाठ सादर करणाऱ्या कोहलीला पंजाबविरुद्ध फिल्डिंग आणि बॅटिंगमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कोहलीच्या सर्वसाधारण कामगिरीविषयी गावस्कर समालोचन करत असताना म्हणाले, हा लॉकडाऊनचा परिणाम असू शकतो. कारण लॉकडाऊन काळात तो अनुष्काबरोबर खेळत होता.

कोरोना काळात विराट आणि अनुष्काचा घरातल्या घरात क्रिकेट खेळतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गावस्करांनी त्याचा संदर्भ लक्षात घेऊन टिप्पणी केली. परंतु कोहलीचे चाहते, अनुष्काचे चाहते आणि बेंगळुरू संघाचे चाहते यांना गावस्करांचं भाष्य पटलेलं नाही.

"मि. गावस्कर तुमचं बोलणं शालीनतेला धरून नव्हतं. क्रिकेटर नवऱ्याची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही यामध्ये त्याच्या पत्नीला मध्ये आणण्याची काय गरज आहे? गेली अनेक वर्ष कॉमेंट्री करताना तुम्ही खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर केला आहे. मग विराट आणि मलाही तोच आदर मिळावा असं तुम्हाला वाटत नाही का?

"विराटच्या खेळाविषयी बोलण्यासाठी, वर्णन करण्यासाठी तुमच्याकडे असंख्य शब्द-वाक्यप्रयोग होते जे तुम्हाला उपयोगात आणता आले असते. माझं नाव घेण्याची काय गरज होती? 2020 वर्षामध्येही गोष्टी बदलेल्या नाहीत हे यातून स्पष्ट होतं. क्रिकेटसंदर्भात गोष्टींमध्ये मला ओढून आणण्याची सवय कधी थांबेल? मि.गावस्कर, तुम्ही महान क्रिकेटपटू आहात. जंटलमन्स गेम असलेल्या क्रिकेटविश्वात तुमचं नाव आदराने घेतलं जातं. तुमचं बोलणं ऐकल्यावर मला जे वाटलं ते मांडावंसं वाटलं", असं अनुष्काने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

2. राहुल टेवाटियाचा चमत्कार

एका ओव्हरमध्ये 30 रन्स कुटणारा राहुल टेवाटिया हे नाव क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहील.

पंजाबने मयांक अगरवालच्या शतकाच्या बळावर 223 धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थानने स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसनच्या भागीदारीच्या बळावर शंभरपर्यंत मजल मारली. स्मिथ आऊट झाला आणि रॉबिन उथप्पाऐवजी राहुल टेवाटियाच्या आगमनाने सगळ्यांनीच भुवया उंचावल्या.

राहुल टेवाटिया

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, राहुल टेवाटिया

पिंच हिंटर अर्थात कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्यासाठी पाठवलेला प्लेयर याकरता टेवाटिया आला मात्र पंजाबच्या बॉलर्सनी त्याची चांगलीच कोंडी केली. रवी बिश्नोई, ग्लेन मॅक्सवेल आणि जेमी नीशाम यांनी त्याला अडचणीत टाकलं. त्याला चौकार-षटकार मारता येईना आणि आऊटही होत नव्हता. रनरेट प्रतिओव्हर 17 असा गगनाला भिडला होता. संजू सॅमसन एकीकडे थंड डोक्याने षटकारांची लयलूट करत होता. पण त्याच्यावरचं दडपण वाढत चाललं होतं. एका क्षणी टेवाटियाच्या नावावर 23 बॉलमध्ये 17 रन्स होत्या.

सोशल मीडियावर टेवाटियाचा उद्धार केला गेला. राजस्थानने टेवाटियाला पाठवून हातची मॅच घालवली असं अनेकांचं म्हणणं पडलं. टेवाटियाला 'रिटायर्ड हर्ट' करा असा नाराही काहींनी दिली.

टेवाटियाने शेल्डॉन कॉट्रेलने टाकलेल्या 18व्या ओव्हरमध्ये तब्बल 5 सिक्स लगावले आणि 30 धावा कुटल्या. एक बॉल डॉट पडला. अविश्वसनीय अशा फटकेबाजीमुळे पंजाबचे खेळाडू अवाक झाले. मॅचचं पारडं पंजाबकडून राजस्थानच्या दिशेने झुकलं. 31 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी करून टेवाटिया आऊट झाला तेव्हा राजस्थानच्या सर्व खेळाडूंनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं. टेवाटियाचं अर्धवट राहिलेलं काम जोफ्रा आर्चर आणि टॉम करन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पूर्ण केलं आणि राजस्थानने पंजाबने दिलेलं विक्रमी 224 धावांचं लक्ष्य पेललं.

3. यशस्वी जैस्वालचा धोनीला हात जोडून नमस्कार

यशस्वी जैस्वालने महेंद्रसिंग धोनीला केलेला नमस्कार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. मंगळवारी राजस्थान आणि चेन्नई मॅच होती. मॅचपूर्वी टॉससाठी चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि राजस्थानचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ पिचपर्यंत गेले. टॉस झाला आणि दोन्ही कॅप्टन्स परतू लागले. धोनीला पाहून प्रत्येकजण हाय फाईव्ह देऊ लागला. न्यू नॉर्मलनुसार हातांच्या मुठी पंचसारख्या करून नमस्कार चमत्कार होतात.

धोनी समोर आल्यावर यशस्वीच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण मोठ्या प्लेयरला भेटल्याचं समाधान त्याच्या डोळ्यात दिसत होतं. सगळे हाय फाईव्ह देत होते. धोनीला पाहून यशस्वीने गुरुजींना करतात तसा रीतसर हात जोडून नमस्कार केला, धोनीने नीट पाहिलं आणि छानसं स्माईल दिलं. धोनी चाळिशीत आलाय. यशस्वी विशीत आहे.

यशस्वी जैस्वाल, धोनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल

उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत धावांच्या राशी ओततोय. गेल्या वर्षी U19 वर्ल्डकपला मॅन ऑफ द सीरिज होता. राजस्थाननने त्याला संधी दिली आहे.

धोनीने करिअरमध्ये असंख्य युवा खेळाडूंनी संधी दिलेय, त्यांच्या कठीण काळात ठामपणे मागे उभा राहिलाय, खेळत असताना सल्ला दिलाय. असे असंख्य यशस्वी धोनीने पाहिलेत. यशस्वीसाठी ही सुरुवात आहे. या टप्प्यावरून हरवून जाणारेही खूप आहेत. मोठ्ठा पल्ला गाठायचाय पण अजूनतरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो स्थित्यंतराचा क्षण होता. एकीकडे सूर्यास्त जवळ आहे, एकीकडे झुंजूमूंजू होतंय.

4. कार्तिक नको, मॉर्गनला कॅप्टन करा

बीबीसी मराठीतर्फे आयपीएलच्या निमित्ताने प्रत्येक मॅचआधी इन्स्टा लाईव्ह आणि मॅच संपल्यानंतर फेसबुक लाईव्ह केलं जातं. कोलकाताची मॅच असली की चाहत्यांचं एक म्हणणं कायम असतं. कोलकाताचं नेतृत्व दिनेश कार्तिकऐवजी आयोन मॉर्गनकडे द्यायला हवं. गेल्या वर्षी वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा मॉर्गन कर्णधार आहे. परिस्थिती ओळखून स्मार्ट निर्णय घेण्यात मॉर्गन वाकबगार आहे. त्यामुळे कोलकाताला प्लेऑफ गाठायचे असेल तर कार्तिकऐवजी मॉर्गनला कॅप्टन करायला हवं असा चाहत्यांचा सूर असतो.

आयोन मॉर्गन

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR

फोटो कॅप्शन, आयोन मॉर्गन

कोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे करण्यात येणाऱ्या फेसबुक लाईव्हदरम्यानही चाहत्यांनी याच गोष्टीची मागणी केली. विशेष म्हणजे मॉर्गनला कॅप्टन करा हे म्हणण्यात भारतीय प्रेक्षक आघाडीवर होते.

5. निकोलस पूरनचा थरारक सेव्ह

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या निकोलस पूरनने हवेत झेप घेऊन अडवलेला बॉल क्रिकेटरसिकांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहील. शारजाच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांची मॅच सुरू होती. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर २२४ धावांचं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालचं शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघानेही आक्रमक सुरुवात केली.

जोस बटलर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान एक उंच फटका लगावला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत उडी मारत सुंदर कसरत करत तो षटकार अडवला.

ज्या पद्धतीने पूरनने हवेत उडी घेतली आणि बरीच सेकंद तो हवेतच होता. एक षटकारासाठी पूरनने सर्वस्व दिलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पूरनच्या या सुपरमॅन प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत मी पाहिलेली ही सर्वोत्तम फिल्डिंग अशा शब्दात तेंडुलकरने पूरनचं कौतुक केलं. सोशल मीडियावर पूरनवर कौतुकाचा वर्षाव झाला. पूरनची डाईव्हवर आधारित अनेक मीम्सही तयार झाले.

6. यंग इंडियन्स जोशात

गेल्या वर्षी U19 वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा ताऱ्यांनी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आपली छाप उमटवली आहे. प्रियम गर्गने अर्धशतकी खेळी तसंच अफलातून रनआऊटने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या संघातील अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांनीही आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्यांच्याकडे विराट सिंगही आहे.

दोन वर्षांपूर्वी ज्याच्या नेतृत्वात युवा टीम इंडियाने वर्ल्डकप पटकावला तो पृथ्वी शॉ उत्तम खेळतो आहे. पृथ्वीनंतर युवा संघाची कमान हाती घेऊन वाटचाल करणारा शुभमन गिल कोलकातासाठी सातत्याने रन्स करतो आहे. त्याचे सहकारी शिवम मावी आणि कमलेश नागरकोट्टी रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या चांगल्या रीतीने सांभाळत आहेत.

रवी बिश्नोई

फोटो स्रोत, Kxip

फोटो कॅप्शन, रवी बिश्नोई

पंजाबसाठी खेळताना फिरकीपटू रवी बिश्नोईने संधीचं सोनं केलं आहे. त्याचा सहकारी इशान पोरेलला अद्याप संधी मिळालेली नाही. वर्ल्डकप स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी ठरलेल्या यशस्वी जैस्वालला मर्यादित संधी मिळाल्या आहेत पण त्यातही त्याने कौशल्याची झलक सादर केली आहे. रायन पराग आणि कार्तिक त्यागी यांनी आपली कमाल दाखवायला सुरुवात केली आहे. ब्रेट ली आणि ख्रिस मार्टिन यांच्याप्रमाणे अॅक्शन असणाऱ्या कार्तिक त्यागीची क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे.

देवदत्त पड्डीकलने सुरुवातीच्या चारपैकी तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत सगळ्यांना प्रभावित केलं आहे. आरोन फिंचबरोबर सलामीला येत देवदत्तने बेंगळुरूला विजयासाठी पाया रचून देण्याचं काम तो सातत्याने करतो आहे. काही दिवसांपूर्वी बाऊंड्रीवर देवदत्तने घेतलेला कॅचही चर्चेत होता. वॉशिंग्टन सुंदरने तर ट्वे्न्टी-२० क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करावी याचा नमुना सादर केला आहे.

7....आणि केन विल्यमसन चिडला

संयमी आणि कलात्मक बॅटिंगसाठी केन विल्यमसन ओळखला जातो. जगभरात सातत्याने टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतण्यासाठी केन प्रसिद्ध आहे. हैदराबाद संघाचा केन अविभाज्य भाग आहे. खेळाच्या बरोबरीने चांगल्या वर्तनासाठी केन ओळखला जातो.

गेल्या वर्षी न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. फायनल टाय झाली, ,सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला. तरीही केन चिडला नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये केन रागावू शकतो याचा प्रत्यय क्रिकेटरसिकांना मिळाला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात केन रनआऊट झाला.

केन विल्यमसन

फोटो स्रोत, Sunrisers hyderabad

फोटो कॅप्शन, केन विल्यमसन

बॉल मिडविकेट क्षेत्रात खेळून केन धावू लागला. मात्र नॉन स्ट्रायकरवरच्या युवा प्रियम गर्गने कॉलला प्रतिसाद दिला. मात्र तो क्रीझमध्ये परतला. मात्र तोपर्यंत केन अर्ध्यापर्यंत आला होता. अंबाती रायुडूने धोनीच्या दिशेने थ्रो करत विल्यमसनला आऊट केलं. या प्रकारानंतर केन प्रियमवर चिडल्याचं पाहायला मिळालं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)