IPL 2023 : आयपीएलचे सगळे हंगाम खेळणारे खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

धोनी, कोहली

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

आयपीएलचे सगळे हंगाम खेळणारे किती खेळाडू आहेत?

एखाद्या स्पर्धेत सलग 16 वर्षं खेळणं हे अनेकदृष्ट्या अनोखं आहे. आयपीएल दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होतं. दरवर्षी साधारण दीड महिना ही स्पर्धा चालते.

आयपीएलआधी आणि आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय कॅलेंडर अतिव्यग्र स्वरुपाचं असतं. आयपीएल खेळायचं आहे म्हणून आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणाला सूट मिळत नाही.

सलग 16 हंगाम खेळण्यासाठी खेळात प्रचंड सातत्य हवं. खेळाडू अतिशय फिट हवा. खेळाडूचं नशीबही हवं कारण निव्वळ चांगला असून भागत नाही, संघमालकांनी त्याच्या गुणकौशल्यांवर विश्वास ठेऊन त्याला संघात सहभागी करून घ्यायला हवं.

तर आयपीएलचे 16च्या 16 हंगाम खेळणारे खेळाडू किती आहेत असं विचारलं तर? कठीण रेकॉर्ड वाटतोय ना कारण एक तपाहून अधिक काळ खेळाडू खेळत राहू शकतो का? तो दुखापतग्रस्त होऊ शकतो. त्याला संघांनी लिलावात विकतच घेतला नाही असंही होऊ शकतं.

आयपीएलचा सगळा प्रवास केलेले खेळाडू किती असू शकतात यासाठी आम्ही आकडेवारी, स्कोअरकार्ड यांचा अभ्यास केला. त्यातून एक गंमतीशीर तथ्य समोर आलं आहे. आयपीएलचा हा तेरावा हंगाम आहे आणि सगळे हंगाम खेळणारे खेळाडू आहेत-13! कोण कोण आहेत या दुर्मीळ यादीत ते जाणून घेऊया. या यादीतलं स्थान थोडक्यात हुकलेले खेळाडू कोण आहेत तेही पाहूया.

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, SESHADRI SUKUMAR

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल कर्णधार महेंद्रसिंग धोनी मूळचा झारखंडचा. परंतु आयपीएल सुरू झाल्यापासून धोनी चेन्नईकरांचा झाला आहे. ते त्याला प्रेमाने थाला म्हणतात.

आयपीएल स्पर्धेत सातत्याने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची धुरा धोनीच्या हातात आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन जेतेपदं जिंकली आहेत. चेन्नई संघावर बंदीची कारवाई झालेली असताना धोनी पुणे संघासाठी खेळला.

टीम इंडियाचं कर्णधारपद आणि फिनिशरचं काम चोख बजावणाऱ्या धोनीने सलग एवढी वर्षं आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघालाही सक्षमतेने हाताळलं आहे.

चेन्नई संघातील अनेक युवा खेळाडूंच्या जडणघडणीत धोनीचा वाटा आहे. स्पर्धेतल्या सार्वकालीन संस्मरणीय मॅचेसमध्ये धोनीच्या खेळी नोंदल्या गेल्या आहेत. चेन्नईकरांनी धोनीला दिलेलं प्रेम अद्भुत आणि अचंबित करणारं आहे.

विराट कोहली

विराट कोहली

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, विराट कोहली

2008 मध्ये तरुण तडफदार विराट कोहलीच्या नेतृत्वामध्येच भारताने U19 वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हाच्या आयपीएलच्या धोरणानुसार प्रत्येक संघाला दोन U19 खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली होती.

दिल्लीकर असल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ विराटची निवड करेल अशी शक्यता होती. प्रत्यक्षात दिल्लीने विराटच्या ऐवजी फास्ट बॉलर प्रदीप संगवानची निवड केली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने कोहलीला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. पोरगेल्या विराटचा जगातला अव्वल बॅट्समन तसंच नवोदित खेळाडू ते टीम इंडियाचा कर्णधार अशी गगनभरारी विराटने घेतली.

विराट सगळे हंगाम बेंगळुरूसाठीच खेळला आहे. हा एक विक्रम आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स त्याच्या नावावर आहेत.

आयपीएलच्या एका हंगामात चार शतकं झळकावण्याचा मान त्याच्या नावावर आहे. स्पर्धेतली सर्वाधिक रन्सची भागीदारी विराट-एबी डीव्हिलियर्स यांच्या नावावर आहे.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक रन्स (973 रन्स) करण्याचा पराक्रमही कोहलीच्याच नावावर आहे. दरवर्षी या स्पर्धेत कोहली धावांच्या राशी ओततो पण एक खंत आहे- ते म्हणजे सगळे हंगाम खेळूनही कोहलीच्या संघाला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.

रोहित शर्मा

रोहित शर्मा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा

आयपीएल स्पर्धेतला जेतेपदांच्या बाबतीत सगळ्यांत यशस्वी कर्णधार ही बिरुदावली रोहितने कष्टाने कमावली आहे. रोहितच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019, 2020 अशी पाच जेतेपदं पटकावली.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सने जेतेपद पटकावलं तेव्हा रोहित विजेत्या संघाचा भाग होता.

लोकप्रिय आणि मोठ्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सची धुरा समर्थपणे सांभाळतानाच धावांची टांकसाळ उघडण्याचं काम रोहित दरवर्षी इमानेइतबारे करतो आहे. आयपीएल स्पर्धेत रोहितच्या नावावर शतक आहे आणि हॅटट्रिकही आहे.

शिखर धवन

शिखर धवन

फोटो स्रोत, Robert Cianflone

फोटो कॅप्शन, शिखर धवन

गब्बर नावाने ओळखला जाणारा, मिशांना ताव देत शड्डू ठोकणाऱ्या शिखरनेही आयपीएलचे सगळे हंगाम खेळले आहेत.

दिल्ली-मुंबई-हैदराबाद-दिल्ली-पंजाब या संघांचं शिखरने प्रतिनिधित्व केलं आहे. यंदाच्या हंगामात शिखर पंजाबची धुरा सांभाळत आहे.

खणखणीत फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा शिखर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल तीनमध्ये आहे. त्याच्या नावावर दोन शतकंही आहेत. स्पर्धेत सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम शिखरच्या नावावर आहे.

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी अधिराज्य गाजवत असल्यामुळे नेहमीच मर्यादित संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये स्वत:चं असं स्थान निर्माण केलं.

उत्कृष्ट विकेटकीपिंग, संघाची गरज असेल त्यानुसार कुठल्याही क्रमांकावर बॅटिंग, कॅप्टन्सी यामुळे दिनेश कार्तिक बहुपेडी व्यक्तिमत्व आहे.

दिनेश या स्पर्धेत दिल्ली-पंजाब-मुंबई-बेंगळुरू-गुजरात-कोलकाता अशा सहा संघांसाठी खेळला आहे.

प्रत्येक संघात दिनेशचा मित्रपरिवार आहे. 109 कॅचेस आणि 30 स्टंपिंग दिनेशच्या विकेटमागच्या प्रभावाची साक्ष देतात.

वाढत्या वयानुसार कार्तिकची उपयुक्तता वाढत गेली आहे. म्हणूनच पस्तिशीतही तो अतिशय फिट आहे आणि कोलकाता संघाचं नेतृत्व करतो आहे.

मनीष पांडे

मनीष पांडे

फोटो स्रोत, Robert Cianflone

फोटो कॅप्शन, मनीष पांडे

आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय बॅट्समन होण्याचा मान मनीष पांडेच्या नावावर आहे. 2009 मध्ये मनीषने दरबान इथं झालेल्या लढतीत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 73 बॉलमध्ये 114 रन्सची खेळी साकारली होती.

मात्र या शतकी कामगिरीची मनीषला पुनरावृत्ती करता आलेली नाही. विराट कोहलीचा समकालीन असलेल्या मनीषची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अपेक्षेइतकी बहरली नाही.

मात्र आयपीएल स्पर्धेत दरवर्षी मनीष रन्स करण्याचं काम कसोशीने करतो. मुंबई-बेंगळुरू-पुणे-कोलकाता-हैदराबाद-दिल्ली अशा पाच संघांसाठी मनीष खेळला आहे. आयपीएल स्पर्धेतल्या सर्वोत्तम फिल्डर्समध्ये मनीषचं नाव आवर्जून घेतलं जातं.

वृद्धिमान साहा

वृद्धिमान साहा

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, वृद्धिमान साहा

शिस्तबद्ध विकेटकीपिंग आणि खणखणीत बॅटिंग ही कौशल्यं असणाऱ्या साहाने आयपीएलचे सगळे हंगाम खेळले आहेत हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असू शकतो. पण हे खरं आहे.

कोलकाता-चेन्नई-पंजाब-हैदराबाद-गुजरात असा साहाचा आयपीएल संघांचा प्रवास आहे. विकेटकीपिंग चोख असल्यामुळे साहा संघासाठी विकेटकीपिंगसाठी प्रथम प्राधान्य असतो.

आयपीएल स्पर्धेत आणि तेही फायनलमध्ये शतक झळकावण्याचा दुर्मीळ विक्रम साहाच्या नावावर आहे. गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात जेतेपदाची कमाई केली होती. गुजरातच्या यशस्वी मोहिमेत साहाचा मोलाचा वाटा होता.

केवळ एक हंगाम हुकला

लेगस्पिनर अमित मिश्रा आणि पीयुष चावला या यादीच्या उंबरठ्यावर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपल्या भन्नाट फिरकीने संघाचे आधारस्तंभ होणारे हे दोघं केवळ एक हंगाम खेळू शकलेले नाहीत. यंदाच्या हंगामात हे दोघेही खेळत आहेत आणि आपली कमाल दाखवत आहेत. मिश्रा आणि चावला 2022 लिलावात अनसोल्ड गेला होते. मात्र याने नाऊमेद न होता दोघांनी दिमाखदार पुनरागमन केलं.

अमित मिश्रा

अमित मिश्रा

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अमित मिश्रा

आपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात भल्याभल्या बॅट्समनला अडकवण्याचं काम मिशीभाई दरवर्षी आयपीएलमध्ये करतात.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉलर्सची कत्तल होणाऱ्या या स्पर्धेत इतकी वर्षं विकेट्स मिळवणं आणि धावांची लूट रोखणं ही कामं यथार्थपणे करूनही मिश्राजी वलयांकित झाले नाहीत.

मिश्राने दिल्ली, हैदराबाद आणि लखनौ संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मिश्राच्या नावावर आयपीएल स्पर्धेत तीन हॅटट्रिक आहेत. हा अतिशयच दुर्मीळ असा विक्रम मिश्राच्या नावावर आहे.

2008 मध्ये रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग यांना आऊट करत विक्रम केला होता. 2011 मध्ये रायन मॅकलरेन, मनदीप सिंग आणि रायन हॅरिस यांना आऊट करत धमाल उडवून दिली होती.

2013 मध्ये भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांना आऊट करत मिश्राने अनोखा विक्रम नावावर केला. लखनौ सुपरजायंट्स या नव्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. वयाच्या चाळिशीतही मिश्राजी लखनौसाठी दमदार कामगिरी करत आहेत.

पीयुष चावला

पीयुष चावला

फोटो स्रोत, Gallo Images

फोटो कॅप्शन, पीयुष चावला

काही माणसं चित्ताकर्षक काहीही न करता आपण बरं आपलं काम बरं या न्यायाने जगतात. पीयुष चावलाचा आयपीएल प्रवास असाच काहीसा आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत पीयुष तिसऱ्या स्थानी आहे. पंजाब-कोलकाता-चेन्नई अशा तीन संघांसाठी खेळलेल्या पीयुषची बॉलिंग समजणं दर्जेदार बॅट्समननाही जमत नाही.

विकेट्स काढतानाच रन्सला ब्रेक लावण्याचं काम पीयुष इमानेइतबारे करतो आहे. आयपीएलमधल्या धनवान खेळाडूंमध्ये पीयुषचा समावेश होत असला तरी प्रसिद्धीपासून पीयुष दूरच दिसतो.

विक्रमाच्या जवळ पण

दुर्मीळ अशा या यादीत अनेकांचं नाव समाविष्ट झालं असतं. रॉबिन उथप्पा (2008-2022) तर पार्थिव पटेल (2008-2019) इतकी वर्ष आयपीएल खेळले. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल जेतेपद पटकावलं त्या मोहिमेचा रॉबिन हा अविभाज्य घटक होता. प्रदीर्घ आयपीएल कारकीर्दीत रॉबिनने मुंबई, बंगळुरू, पुणे, कोलकाता, राजस्थान, चेन्नई या संघांचं प्रतिनिधित्व केलं.

पार्थिवने चेन्नई सुपर किंग्स, कोची टस्कर्स केरळा, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं. आयपीएल निवृत्तीनंतर पार्थिव यांनी मुंबई इंडियन्स संघासाठी टॅलेंट स्काऊट म्हणून काम पाहिलं आहे.

एबी डीव्हिलियर्स आणि धवल कुलकर्णी हे दोघेही या यादीत येऊ शकले असते. राजस्थान, गुजरात, मुंबई अशा तीन संघांकडून खेळलेल्या धवलने 2019 नंतर निवृत्ती घेतली.

जेवढं प्रेम एबीला दक्षिण आफ्रिकेत मिळतं, तितकंच भारतात मिळतं अशी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखतानाच एबीने दरवर्षी आयपीएल स्पर्धेतही आपल्या अद्भुत कौशल्याची झलक सादर केली आहे.

मैदानात कुठेही फटके लगावण्याचं एबीचं तंत्र शब्दातीत आहे. फास्ट बॉलिंग असो, स्पिन बॉलिंग असो, ग्राऊंड लहान असो की मोठं- एबीचा दांडपट्टा सुरू झाला की तो रोखणं अशक्य मानलं जातं.

सुरुवातीला दिल्ली आणि नंतर बेंगळुरूसाठी खेळताना एबीने रन्सचे, भागीदाऱ्यांचे असंख्य विक्रम रचले आहेत. विराट आणि त्याचा ब्रोमान्स दरवर्षी चर्चेत असतो. आयपीएल स्पर्धेत 3 शतकं, 35 अर्धशतकं, 219 षटकार, 95 कॅचेस असा भारीभक्कम दस्तावेज एबीच्या नावावर आहे.

सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी यंदाच्या हंगामातून माघार घेतल्याने त्यांचं नाव बाजूला पडलं. सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रैना अव्वत तीनमध्ये आहे. यशस्वी बॉलर्समध्ये हरभजनचं नाव आहे.

या दोघांव्यतिरिक्त मुंबईचा आधारस्तंभ कायरेन पोलार्ड, बॅटिंग-बॉलिंगमध्ये योगदान देणारा ड्वेन ब्राव्हो हे सगळे हंगाम खेळू शकले नाहीत.

शेन वॉटसन दुखापतीमुळे एक हंगाम खेळू शकला नाही. धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पहिल्या हंगामाचा भाग नव्हता.

लसिथ मलिंगा आणि डेल स्टेन दुखापतीमुळे एक हंगाम खेळू शकले नाहीत. टीम इंडियाचे देदिप्यमान असे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अनिल कुंबळे यांनी विविध टप्प्यांवर निवृत्ती स्वीकारली.

इशांत शर्मा दुखापतीमुळे एका हंगामात नव्हता. रवीचंद्रन अश्विन पहिल्या तसंच 2017 हंगामात नव्हता. बंदीच्या कारवाईमुळे रवींद्र जडेजा 2010 हंगामात खेळू शकला नाही.

अजिंक्य रहाणे 2010चा हंगाम खेळू शकला नव्हता. युसुफ पठाण 2008 ते 2019 असे बारा हंगाम खेळला मात्र यंदा त्याला कोणत्याही संघाने समाविष्ट केलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)