महेंद्रसिंग धोनी : हंगामही त्याचाच आणि जादूही त्याचीच!

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

41व्या वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या पाचव्या जेतेपदावर नाव कोरलं. चाहत्यांच्या प्रेमाने भारावून गेलो, त्यांच्यासाठी आणखी एक हंगाम खेळेन असं धोनीने सांगितलं. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनीला खेळताना त्रास होता. ही दुखापत आणि वय लक्षात घेता हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. पण धोनीने तूर्तात आयपीएल निवृत्तीचा विषय बाजूला टाकला आहे.

कर्णधार धोनीने सर्वाधिक जेतेपदांच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जेतेपद कुणीही जिंकलं तरी हा हंगाम धोनीमय होता हे नक्की.

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई

फोटो स्रोत, social media

फोटो कॅप्शन, गायक अरिजित सिंह धोनीच्या पाया पडला

स्थळ- अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम. तारीख 31 मार्च.

कोरोनाचं सावट दूर झाल्यानंतर पहिल्यांदाच आयपीएल भव्य पातळीवर आयोजित करण्यात आलेलं. ओपनिंग सेरेमनीसाठी या अभिनेत्री-नर्तिका तमन्ना भाटिया, रश्मीका मन्धाना यांच्यासह प्रसिद्ध युवा गायक अरिजित सिंह उपस्थित.

लाखभर लोकांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमात अरिजित सिंह एका छोट्या बग्गीत उभा राहून हातात गिटार, कानाला माईक असा चाहत्यांना साद घालत होता. अरिजितने 'केसरिया' चित्रपटातलं 'ओ देवा हो, देवा हो' गाणं गायला सुरुवात केली आणि तो क्षण आला.

अरिजितने 'देवा देवा हो' म्हणत हात आडवे उंचावले आणि स्क्रीनवर डगआऊटमध्ये या गाण्यावर डोलणारा धोनी दिसला. त्याचक्षणी स्टेडियममधल्या लाखभर चाहत्यांचा स्वर टिपेला गेला.

पुढच्याच सेकंदाला अरिजित गाणं पूर्ण करत नमस्कार करताना दिसला. हा नमस्कार आकाशातल्या देवाला होता आणि धोनीलाही. त्याक्षणी या हंगामाचं सूत्र धोनी असेल हे स्पष्ट झालं.

काही मिनिटांनंतर औपचारिक समारंभात महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंड्या यांची पाहुण्यांशी ओळख करुन देण्यात आली. धोनीने बीसीसीआय अध्यक्ष जय शहा, रॉजर बिन्नी यांच्यासह कलाकारांशी हस्तांदोलन केलं.

अरिजित शेवटी उभा होता. धोनीने हात पुढे करण्याआधीच अरिजित झटकन वाकला आणि धोनीच्या पाया पडला. अरिजितसाठी तो फॅनबॉय मोमेंट होता. धोनीने झटपट त्याला उठवलं आणि आलिंगन दिलं.

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्थळ- चेन्नईचं एम.ए.चिदंबरम स्टेडियम. तारीख 3 एप्रिल

तब्बल चार वर्षानंतर चेन्नईकरांना थाला अर्थात धोनीला याचि देही याचि डोळा पाहता येणार होतं. सामन्याआधी धोनी सरावाला मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी एकच जल्लोष केला. नाणेफेकीवेळी त्याच जल्लोषाची पुनरावृत्ती झाली.

पण या सगळ्यावर कळसाध्याय झाला चेन्नईच्या डावातील शेवटच्या षटकात. लखनौच्या मार्क वूडने रवींद्र जडेजाला बाद केलं. जडेजा पॅव्हेलियनमध्ये परतू लागताच मैदानात धोनी धोनीचा जागर नांदू लागला. जायंट स्क्रीनवर 'थाला' ही अक्षरं उमटली. सगळ्या चाहत्यांनी उभं राहून मानवंदना दिली.

त्यांच्या प्रेमाला जागत धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. मैदानात आनंदाला उधाण आलं. मार्क वूड प्रचंड वेगात गोलंदाजी करतो. चाळिशीतल्या धोनीने त्याचा वेग धुडकावून लावला. वूडने तयारीनिशी पुढचा चेंडू टाकला.

चेंडू धोनीपर्यंत येण्याआधीच त्याने चेंडूवर अक्षरक्षः प्रहार केला आणि चेंडू बघताबघता प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. त्या षटकाराने धोनी धोनीच्या मंत्राने स्टेडियम दणाणून टाकलं. समालोचकांनाही काही क्षण थांबावं लागलं.

कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असलेला माणूस इतक्या तडफेने आणि ताकदीने षटकार लगावू शकतो याने लखनौचा संघ अचंबित झाला. तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला पण तोवर धोनीमहिमा काय असू शकते याचा प्रत्यय जगभरातल्या लोकांना आला होता.

स्थळ-चेन्नईचं एम.ए.चिदंबरम स्टेडियम. तारीख 14 मे

चेन्नई सुपर किंग्सचा प्राथमिक फेरीतला चेन्नईतला शेवटचा सामना होता. चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये जाणार का हे तोपर्यंत स्पष्ट झालं नव्हतं. कदाचित धोनीचा चेन्नईतला हा शेवटचा सामना असू शकतो अशी चाहत्यांची धारणा होती.

दरवर्षीप्रमाणे प्रचंड प्रेम दिलं याकरता सामना संपल्यानंतर चेन्नईच्या संघाने चाहत्यांचे आभार मानले.

चाहत्यांना भेट म्हणून चेंडू देण्यात आले. धोनी टेनिसच्या रॅकेटने चेंडू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होता. त्यावेळी धोनीच्या डाव्या गुडघ्याला उपचारांचा भाग म्हणून शेकायची पिशवी लावलेली होती.

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनीने सुनील गावस्कर यांना शर्टावर स्वाक्षरी दिली.

त्यावेळी टेलिव्हजन चॅनेलचा कार्यक्रम सुरू होता. केव्हिन पीटरसन, नेरोली मेडोज आणि सुनील गावस्कर त्यात सहभागी झाले होते.

धोनी आणि त्याचे सहकारी बाजूने जात असलेले पाहून गावस्कर यांनी लाईव्ह प्रक्षेपणातून बाहेर पडत धोनीच्या दिशेने धाव घेतली. कॅमेरामनने त्यांना मार्कर पेन दिलं. धोनी गावस्कर यांच्यासारखा दिग्गज खेळाडू येतोय पाहून थांबला. गावस्कर यांनी शर्टावर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली.

धोनीने हसून शर्टावर स्वाक्षरी दिली. यानंतर धोनीने गावस्कर यांना मिठी मारली. या क्षणाबद्दल बोलताना गावस्कर भावुक झाले. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी- कपिल देवने उंचावलेला विश्वचषक आणि धोनीने षटकार मारुन जिंकलेला विश्वचषक हे क्षण दाखवा. मी सुखाने या जगाचा निरोप घेईन असं गावस्कर म्हणाले.

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ

धोनीचं वय आहे 41. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली आहे. गेल्या वर्षी त्याने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं होतं. रवींद्र जडेजाने नेतृत्वाची धुरा हाती घेतली. पण काही सामन्यानंतर जडेजाने कर्णधारपद सोडलं. धोनी पुन्हा कर्णधार झाला.

चेन्नईचा संघ डॅडी संघ अर्थात तिशी-पस्तिशीतल्या खेळाडूंचा संघ म्हणून ओळखला जातो. सध्या हा संघ संक्रमणावस्थेत आहे. धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार कोण असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. धक्का देत निवृत्त होण्याची धोनीची सवय चाहत्यांना नवीन नाही.

आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या अतीदुर्मीळ खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश होतो. मूळचा उत्तराखंडचा पण लहानपण झारखंडमध्ये, नोकरी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या धोनीला चेन्नईने आपलंसं केलं. तो त्यांचा लाडका थाला झाला. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो याची जाणीव चाहत्यांनी आहे.

टेलिव्हिजन प्रक्षेपण कंपनीलाही याची जाणीव नसल्याने प्रत्येक सामन्यात धोनी येण्याचा क्षण फुरसतीत दाखवला जातो. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनी फार फलंदाजी करत नाही. तो जेमतेम दोन षटकं खेळतो. पण ते क्षण पाहायलाही चाहते आतुर असतात. याच काळात चाहते मोबाईलमध्ये टॉर्चलाईट सुरू करून मैदानात प्रकाशसाखळी करुन त्याला मानवंदना देतात.

सामना हैदराबाद-कोलकाता असो किंवा पंजाब-दिल्ली, आदल्या दिवशी धोनीचं स्वागत कसं झालं हे वारंवार दाखवलं गेलं. चेन्नईची बस मैदान परिसरात आल्यानंतर दुखापतीमुळे काहीसा पाय रेटत चालणारा धोनी दाखवला जातो. शंभर टक्के फिट नसतानाही केवळ चाहत्यांसाठी धोनी खेळतोय हे दिसत होतं.

डॅनीची गुगली, धोनीचं प्रत्युत्तर

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

स्पर्धेदरम्यान नाणेफेकेवेळी तसंच सामना संपल्यानंतर बोलताना धोनीला वारंवार निवृत्तीविषयी विचारलं. एका सामन्यात तर समालोचक डॅनी मॉरिसनने धोनीला हा तुझा शेवटचा हंगाम ना, अशी गुगली टाकली. त्यावर हजरजबाबी धोनीने, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही असं प्रत्युत्तर दिलं.

"निवृत्त होणार का हे ठरवायला माझ्याकडे सात-आठ महिने आहेत. डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होईल. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मी सीएसकेसाठी येत राहीन- खेळाडू म्हणून किंवा अन्य काहीतरी म्हणून.

यंदा मी या स्पर्धेसाठी जानेवारीत सरावाला सुरुवात केली. आता मे महिन्याची अखेर उजाडली आहे. चार महिने घरापासून दूर आहे. दोन महिने खेळत राहणं सोपं नाही, बघूया कसं होतंय असं धोनीने सांगितलं."

धोनी याचि देही याचि डोळा

कोरोना लाटेमुळे 2020 आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्यात आली. 2021 मध्ये देशभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. मात्र तरीही बीसीसीआयने आयपीएलचा घाट घातला.

क्वारंटीन आणि बबलचे कठोर नियम करुन आयपीएलचा हंगाम सुरु झाला पण कोरोना केसेस सापडू लागल्यामुळे काही दिवसातच हंगाम स्थगित करण्यात आला. स्पर्धेचा राहिलेला टप्पा 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत युएईत आयोजित करण्यात आला.

गेल्या वर्षी कोरोनाचा धोका पूर्णपणे न टळल्याने बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनात सावधगिरी बाळगली. कमीत कमी प्रवास करावा लागेल अशा पद्धतीने प्राथमिक फेरीची रचना करण्यात आली.

मुंबईतल्या तीन आणि पुणे इथे प्राथमिक फेरीचे सामने खेळवण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात असल्याने प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद इथे खेळवण्यात आले.

कोरोना आणि कोरोनापश्चातच्या परिस्थितीमुळे आयपीएल संघांना घरच्या मैदानावर खेळण्याची संधीच मिळाली नाही. महेंद्रसिंग धोनी 2019 हंगामात 7 मे रोजी चेन्नईत खेळला होता.

त्यानंतर 2021 मध्ये हंगामाच्या पूर्वार्धात धोनी काही सामने चेन्नईत खेळू शकला पण तेव्हा संपूर्ण देशच कोरोना संकटाचा सामना करत होता. त्यामुळे धोनीला घरच्या मैदानावर पाहण्यासाठी खेळताना पाहण्यासाठी चेन्नईकरांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली.

धोनीचं वय लक्षात घेता तो आणखी किती हंगाम खेळेल याविषयी साशंकता आहे. त्यामुळे धोनीची जादू पाहण्यासाठी चेन्नईकरांनी प्रत्येक सामन्याला गर्दी केली.

दुपारच्या उन्हात झालेल्या सामन्यांनाही गर्दी होती. मुंबईचा बॅटिंग कोच कायरेन पोलार्डला धोनीमहतीविषयी विचारलं असता त्याने मार्मिक टिप्पणी केली.

धोनी हा भारतीयांचा लाडका खेळाडू आहे. तो कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे धोनी कुठेही खेळत असो, चेन्नईसाठी ते घरचं मैदानच असेल कारण धोनीला मिळणारं प्रेम.

पोलार्डच्या म्हणण्याचा प्रत्यय खरोखरंच दिसून आला. कोलकाता विरुद्ध चेन्नई या इडन गार्डन्स इथे झालेल्या मुकाबल्यात कोलकाता संघापेक्षा चेन्नईचे चाहते जास्त दिसून येत होते.

धोनीने आयपीएल स्पर्धेत 249 सामने खेळले आहेत. धोनीच्याच नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 4 वेळा (2010, 2011, 2018, 2021) जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळण्याची धोनीच्या संघाची ही दहावी वेळ आहे.

सातत्यापूर्ण खेळासाठी धोनीचा संघ ओळखला जातो. खेळणं आणि जिंकण्याइतकंच मनं जिंकून घेणं ही धोनीची खासियत आहे. म्हणूनच आबालवृद्धांमध्ये धोनीचा करिश्मा आहे.

सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू मार्गदर्शनासाठी धोनीच्या दिशेने धाव घेतात. युवा खेळाडू तन्मयतेने धोनीचं ऐकताना प्रत्येक सामन्यानंतर दिसतात.

भारतीय संघाला 2007 मध्ये ट्वेन्टी20 विश्वचषक तसंच 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक धोनीनेच जिंकून दिला. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय कर्णधाराला आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)