सूर्यकुमार, नेहल ते आकाश मढवाल... मुंबईकडे नवे छावे, तरी 'हे' प्रश्न अनुत्तरीतच

फोटो स्रोत, Getty Images
वर्षभरापूर्वी गुणतालिकेत तळाशी राहावं लागलेल्या मुंबई इंडियन्सने यंदा दमदार पुनरागमन करत तिसरं स्थान पटकावलं. गोलंदाजी कमकुवत झाल्यावरही मुंबईने वादळी फलंदाजीच्या जोरावर मोहिमेत रणशिंग फुंकलं.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक वेळा दोनशेची वेस ओलांडणारा संघ हा मान मुंबई मिळवला, पण त्याचवेळी सर्वाधिक वेळा प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्याविरुद्ध 200ची वेस ओलांडत गोलंदाजीतील मर्यादा स्पष्ट केल्या.
मोठ्या लिलावात मुंबईने नव्याने संघाची बांधणी केली. संक्रमणावस्थेत असलेल्या मुंबईसाठी यंदाचा हंगाम हा नांदीचा ठरू शकतो.
मुंबईने प्राथमिक फेरीत 14पैकी 8 सामने जिंकले तर 6मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
‘सूर्यो’दय आणि एव्हर’ग्रीन’ कॅमेरुन
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाल्यापासून सूर्यकुमार यादव दिमाखात धावा करतो आहे.
सूर्याच्या बॅटमधून निघणारे फटके पाहणाऱ्यांना अचंबित करत आहेत. सूर्याचा सुपला शॉट प्रसिद्ध झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अक्रॉस जाऊन फाईनलेग क्षेत्रात षटकार ही त्याची खासियत होते आहे. यंदाच्या हंगामात विरुद्ध खेळताना ज्या पद्धतीने बॅट खुली करून त्याने फटका मारला ते पाहणं विस्मयचकित करणारं होतं.
सूर्यकुमारने 16 सामन्यात 181.14च्या स्ट्राईकरेटने खेळताना 605 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. दशकभराच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धेत शतक झळकावण्याचं सूर्यकुमारचं स्वप्न यंदा साकार झालं.
12 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारने गुजरात टायटन्सविरुद्ध दिमाखदार खेळी साकारली. यंदाच्या हंगामात मुंबईने नियमितपणे 200ची वेस ओलांडली. याचं श्रेय सूर्यकुमारच्या बॅटला जातं.

फोटो स्रोत, Getty Images
तब्बल 16 कोटी रुपये खर्चून मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या उंचपुऱ्या कॅमेरुन ग्रीनला संघात घेतलं होतं.
ग्रीनने पहिल्याच हंगामात बॅटद्वारे, बॉलिंगमध्ये, क्षेत्ररक्षणातून आपली उपयुक्तता दाखवून दिली. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी हैदराबादविरुद्ध मुंबईला विजय अनिवार्य होता.
ग्रीनच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर मुंबईने हे लक्ष्य पेललं. अवघ्या 47 चेंडूत ग्रीनने 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 100 धावांची अफलातून खेळी साकारली होती. ग्रीनने 160.28च्या स्ट्राईकरेटने 452 धावा केल्या.
सरळ बॅटने खेळत वेगवान तसंच फिरकी गोलंदाजांना चोपून काढणारा शिलेदार मुंबईला ग्रीनच्या रुपात मिळाला आहे.
ग्रीनने 6 विकेट्स पटकावत गोलंदाजीतलं नैपुण्य सिद्ध केलं आहे. प्लेऑफच्या लखनौविरुद्धच्या लढतीत ग्रीनचं क्षेत्ररक्षण कौतुकाचा विषय ठरलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
रोहितची बॅट रुसलेलीच
कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईच्या फलंदाजीचा आधारस्तंभ. पण यंदाच्या हंगामात रोहितला म्हणावा तसा सूर गवसलाच नाही.
16 सामन्यांमध्ये रोहितने 332 धावा केल्या. रोहितचा 132 हा स्ट्राईकरेट आणि दोन अर्धशतकं ही कामगिरी वाईट नक्कीच नाही. पण ज्या धडाकेबाज रोहितची चाहत्यांना पाहायची सवय होती तो रोहित दिसलाच नाही.
कर्णधारपदाच्या जबाबदारीचं ओझंही त्याच्या कामगिरीत जाणवत होतं. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल3मध्ये समाविष्ट रोहितकडून मुंबईला आणखी अपेक्षा होत्या. पण फलंदाज रोहित धडपडतच राहिला.
क्वालिफायर2च्या महत्त्वपूर्ण लढतीत रोहितने आवडता पूलचा फटका खेळला पण तो फटका मारण्यासाठी तो स्थिर स्थितीत नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
आकाश, नेहल, तिलक- उज्ज्वल भविष्य
आयपीएल स्पर्धेत सगळ्यात सक्षम आणि सर्वसमावेशक टॅलेंट स्काऊट अर्थात प्रतिभाशोध युनिट मुंबई इंडियन्सकडे आहे. झहीर खान, पार्थिव पटेल, किरण मोरे, टी.शेखर, जॉन राईट यांच्यासह अनेक माजी खेळाडू मुंबईच्या टॅलेंट स्काऊट विभागात आहेत.
2013-14मध्ये जॉन राईट यांनी जसप्रीत बुमराह नावाच्या हिऱ्याला शोधून काढलं. संघव्यवस्थापनाने या हिऱ्याला पैलू पाडले आणि मुंबईला पर्यायाने भारतीय संघाला वेगवान गोलंदाज मिळाला. हार्दिक आणि कृणाल पंड्या जोडगोळीही याच यंत्रणेतून पुढे आले आणि यशस्वी झाले.
देशभरातून युवा खेळाडूंचा खेळ पाहून गुणवान कार्यकर्त्यांना ताफ्यात सामील करुन घेणारा संघ अशी मुंबईची ओळख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही सुपरस्टार खेळाडूंना घेण्याऐवजी युवा खेळाडूंना घेतो. ते पुढे सुपरस्टार होतात, असं मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
हार्दिक-बुमराह जसे मोठे झाले तसं पुढच्या 2 वर्षात तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्याबद्दल ऐकाल असंही रोहितने सांगितलं.
14 सामन्यात नेहलने 145च्या स्ट्राईकरेटने 241 धावा केल्या. दडपणाच्या क्षणीही गडबडून न जाता मोठे फटके खेळण्याची हातोटी आणि डाव उभारण्याची क्षमता यामुळे नेहलकडून मुंबईला खूप अपेक्षा आहेत. यंदाच्या हंगामात नेहलला नियमितपणे संधी मिळाल्या आणि त्याने त्याचं सोनं केलं.
यंदाच्या हंगामात उत्तराखंडचा आकाश मढवाल आणि नेहल वढेरा यांनी छाप उमटवली. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्याने आकाशला संधी मिळाली. प्लेऑफच्या लढतीत अवघ्या 5 धावा देत आकाशने 5 विकेट्स घेत लखनौच्या डावाला खिंडार पाडलं.

फोटो स्रोत, Getty Images
आकाश अगदी आतापर्यंत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात टेनिस बॉल स्पर्धांमध्ये खेळत असे. रुरकी या उत्तराखंडमधल्या शहरात तो राहतो.
योगायोग म्हणजे भारतीय संघाचा तडाखेबंद बॅट्समन विकेटकीपर ऋषभ पंतचा तो सख्खा शेजारी आहे. उत्तराखंडचे माजी प्रशिक्षक वासिम जाफर आणि आताचे प्रशिक्षक मनीष झा यांनी आकाशचं नैपुण्य हेरलं.
गेल्या वर्षी आकाश मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात समाविष्ट झाला.
सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याने आकाशला संघात घेण्यात आलं. यंदा त्याला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळाली.
प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी मुंबईला हैदराबादविरुद्ध विजय मिळवणं अनिवार्य होतं. त्या दडपणाच्या लढतीत आकाशने विव्रांत शर्मा, मयांक अगरवाल आणि तुफान फॉर्मात असलेल्या हेनरिच लासेनला बाद केलं.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत आकाशने जबरदस्त फॉर्मात असलेला शुबमन गिल, अनुभवी वृद्धिमान साहा आणि फिनिशर डेव्हिड मिलर यांना तंबूत धाडलं.
बुमराह-आर्चर केव्हा दिसणार?
प्रचंड पैसा ओतून मुंबई इंडियन्सने लिलावात जोफ्रा आर्चरला संघात घेतलं. बुमराह-आर्चर जोडी प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवेल असं चित्र निर्माण झालं. प्रत्यक्षात या दोघांना होत असलेल्या दुखापतीमुळे मुंबईचं मोठं नुकसान झालं.
यंदाच्या हंगामात बुमराह खेळू शकणार नसल्याचं स्पर्धा सुरू होण्याआधीच कळलं. आर्चर भारतात दाखल झाला, त्याने सरावही केला. काही सामने खेळला पण तो पूर्ण फिट नसल्याचं दिसत होतं. अखेर उपचारांसाठी त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.
बुमराह-आर्चर जोडीने तसंच एकेकटे अतिशय प्रभावी अस्त्र ठरु शकतात. पदार्पणापासूनच बुमराह हा मुंबईच्या गोलंदाजीचा कणा आहे. पण दुखापतींच्या वेढ्यात अडकल्याने मुंबईची गोलंदाजी खिळखिळी झाली.
आर्चरच्या जागी समावेश झालेला ख्रिस जॉर्डनने धावांच्या खिरापती दिल्याने मुंबईच्या अडचणीत भरच पडली.

फोटो स्रोत, Getty Images
पीयुष चावलाची सेकंड इनिंग्ज प्रभावी
आयपीएल स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव, भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या पीयुष चावलाला मुंबईने घेतलं तेव्हा जोरदार टीका झाली होती. पीयुषचा काळ सरला, तो फिट आहे का?, त्याचं पोट सुटलंय असं बरंच काही बोललं गेलं. पण फिरकीच्या या जादूगाराने आपल्या कामाच्या बळावर टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलं.
वेगवान गोलंदाजी खिळखिळी झालेली असताना पीयुषने फिरकीच्या जोरावर धावा रोखल्या, विकेट्सही पटकावल्या. पीयुषने यंदाच्या हंगामात 22 विकेट्स घेतल्या. निवृत्तीकडे झुकलेल्या पीयुषचं आयपीएल स्पर्धेतलं हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. गोलंदाजीवर तुटून पडणाऱ्या फलंदाजांना कसं जाळ्यात पकडायचं याचा वस्तुपाठत पीयुषने सादर केला.
14.5 कोटी रुपये एवढी प्रचंड मुंबईने विकेटकीपर फलंदाज इशान किशनसाठी खर्च केले. पण तो लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही.
डेवाल्ड ब्रेव्हिसने 2022 हंगामात आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. पण यंदा त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आलं नाही. अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण चर्चेत राहिलं. पदार्पणानंतर काही दिवसातच अर्जुनच्या एका षटकात 31 धावा कुटल्या गेल्या. त्यानंतर त्याला डच्चू देण्यात आला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








