IPL 2020 : आयपीएल सुरू आहे त्या UAEच्या टीमबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

युएई, क्रिकेट

फोटो स्रोत, Julian Herbert-ICC

फोटो कॅप्शन, युएई क्रिकेट टीम
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते आहे. युएईचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. मात्र त्याचा मागमूसही दिसत नाही. त्यानिमित्ताने युएई क्रिकेट संघाचा घेतलेला आढावा.

युनायटेड अरब एमिरेट्स अर्थात युएईचा संघ एमिरेट्स क्रिकेट बोर्डाद्वारे चालवला जातो. 1989 मध्ये आयसीसीने युएईला अॅफिलिएट संघाचा दर्जा दिला. पुढच्याच वर्षी युएईला असोसिएट संघाचा दर्जा मिळाला.

क्रिकेट खेळणाऱ्या देशांची वर्गवारी आयसीसीकडून केली जाते. टेस्ट खेळणारे देश प्रमुख असतात. त्यांना फुल मेंबर्सचा दर्जा असतो. सध्या 12 संघांना फुल मेंबरचा दर्जा आहे.

त्याखालोखाल असोसिएट श्रेणीतील संघ असतात. असोसिएट संघांपैकी काहींना वनडे तर काहींना ट्वेन्टी-20 खेळण्याची मुभा आहे. सध्या असोसिएट श्रेणीत 92 संघ आहेत. तीन वर्षांपूर्वी आयसीसीने अॅफिलिएट श्रेणी रद्द केली आहे.

पहिली वनडे

युएई संघाने पहिली वनडे मॅच 1994 साली भारताविरुद्ध खेळली. ऑस्ट्रेलेशिया कपचा ही वनडे भाग होती. सुलतान झारावानी यांच्या नेतृत्वाखाली युएई टीम खेळली होती. त्यावेळीही मूळचे युएईचे असे झारावानीच होते. बाकी संघातले खेळाडू विविध देशांमधून येऊन युएईत स्थलांतरित झालेली माणसं होती.

भारताने 273 रन्स केल्या. विनोद कांबळीने 82 तर मोहम्मद अझरुद्दीनने 81 रन्सची खेळी केली. सचिन तेंडुलकरने 63 रन्सची खेळी केली. युएईतर्फे सोहेल बटने 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना युएईने 202 रन्सची मजल मारली. भारताने 71 रन्सने ही मॅच जिंकली. युएईकडून मझहर हुसैनने 70 रन्सची खेळी केली. भारतातर्फे जवागल श्रीनाथ आणि भूपिंदर सिंग यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. अतुल बेदाडे आणि भूपिंदर सिंग यांनी त्या मॅचमध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं.

विनोद कांबळीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

वनडेत कामगिरी

युएई संघाने 1994 ते 2020 या कालावधीत फक्त 59 वनडे मॅचेस खेळल्या आहेत. टेस्ट खेळणाऱ्या देशांसह असोसिएट संघांविरुद्ध युएईच्या संघाने मॅचेस खेळल्या आहेत. 59 पैकी 17 मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे तर 42मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. युएईने वनडेत अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेला नमवलं आहे.

पहिली ट्वेन्टी-20 आणि कामगिरी

युएईने पहिला ट्वेन्टी-20 सामना 2014 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळला. आतापर्यंत युएईने 49 ट्वेन्टी-20 मॅचेस खेळल्या असून, 24 जिंकल्या आहेत तर 24 हरल्या आहेत. ट्वेन्टी-20 मध्ये युएईने अफगाणिस्तान, आयर्लंडला नमवलं आहे.

युएईचा संघ लिंबूटिंबू का राहिला?

युएईत क्रिकेट लोकप्रिय आहे. दुबई, शारजा आणि अबूधाबी स्टेडियमच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय संघ इथे खेळायला येतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं मुख्यालयही दुबईतच आहे. आयसीसी अकामीही इथेच आहे. परंतु क्रिकेटकडे पेशा-व्यवसाय किंवा रोजगाराचं साधन म्हणून पाहिलं जात नाही. युएई संघाकडून खेळणारे बहुतांश माणसं ही पाकिस्तान, भारत, श्रीलंका या देशातून आलेली असतात.

युएई, क्रिकेट

फोटो स्रोत, Julian Herbert-ICC

फोटो कॅप्शन, युएई क्रिकेट टीम

या देशांमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. राष्ट्रीय संघात निवड होणं फारच अवघड असतं. राज्यस्तरावर किंवा वयोगट स्पर्धांमध्येही प्रचंड चुरस असते. वयाच्या ठराविक टप्प्यावर क्रिकेटची आवड सोडून नोकरी-व्यवसायाचं बघावं लागतं.

कामानिमित्ताने युएईत आलेली ही माणसं युएईत क्रिकेटही खेळतात. पाच दिवस काम सांभाळून तसंच नोकरीतून वेळेची सवलत घेऊन ते क्रिकेटची आवड जोपासतात.

पैसे कमावणं, घर चालवणं, उत्पनाचा स्रोत यासाठी ते क्रिकेटकडे पाहत नाहीत. साहजिकच नोकरी-व्यवसाय सांभाळून ते खेळासाठी किती वेळ देऊ शकतात याला मर्यादा आहेत. त्यामुळे युएईच्या संघात मूळ युएईस्थित माणसांची संख्या मोजकी आहे. अन्य देशातून आलेली माणसं मोठ्या प्रमाणावर दिसतात.

मैदानं

क्रिकेटविश्वात लिंबूटिंबू म्हणून गणना होत असली तरी युएई स्टेडियम्सच्या बाबतीत आघाडीवर आहे. शारजा क्रिकेट स्टेडियम, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी इथलं शेख झायेद क्रिकेट स्टेडियम अशी तीन अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्स युएई संघाच्या दिमतीला आहेत. या तीन मैदानांवरच यंदाच्या आयपीएलच्या मॅचेस रंगत आहेत. याव्यतिरिक्त आयसीसी क्रिकेट अकादमीचं ग्राऊंडही उपलब्ध आहे.

वनडेच्या वर्ल्डकपमधली कामगिरी

युएईचा संघ 1996 मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी पहिल्यांदा पात्र ठरला होता. त्यांनी 5 मॅच खेळल्या. त्यापैकी चारमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी लाहोर इथं झालेल्या मॅचमध्ये विजय मिळवला. यानंतर 1999, 2003, 2007, 2011 वर्ल्डकपसाठी युएईला पात्र होता आलं नाही. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी युएईचा संघ पात्र ठरला. मात्र सहाच्या सहाही मॅचेसमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमधली कामगिरी

2007 मध्ये पहिलावहिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकप आयोजित करण्यात आला. भारताने जेतेपदावर नाव कोरलं. 2007,2009, 2010, 2012 अशा चार वर्ल्डकपसाठी युएईचा संघ पात्र ठरला नाही. 2014 मध्ये त्यांना प्राथमिक फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. ब गटातल्या नेदरलँड्स, झिम्बाब्वे आणि आयर्लंड या तिन्ही संघांनी युएईवर विजय मिळवला.

रॉबिन सिंह आहेत कोच

भारताचे माजी खेळाडू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीमचा भाग असलेले रॉबिन सिंह युएईच्या राष्ट्रीय संघाचे कोच आहेत. इंग्लंडचे माजी खेळाडू डगी ब्राऊन यांच्यानंतर रॉबिन यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे.

युएई संघातील काही खेळाडूंवर मॅचफिक्सिंग प्रकरणात सहभागावरून बंदीची कारवाई झाली आहे. निवडसमितीही बरखास्त करण्यात आली आहे. अशा वादग्रस्त टप्प्यावर रॉबिन यांच्याकडे युएई संघांची धुरा सोपवण्यात आली आहे.

रॉबिन सिंह, युएई

फोटो स्रोत, Stu Forster

फोटो कॅप्शन, रॉबिन सिंह

रॉबिन यांनी एक टेस्ट आणि 136 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेत त्यांच्या नावावर 2,236 रन्स आणि 69 विकेट्स आहेत. टीम इंडियाच्या चपळ फिल्डर्समध्ये रॉबिन यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

कॅरेबियन बेटांवर जन्मलेल्या रॉबिन यांनी भारतात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तामिळनाडूचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉबिन गेली अनेक वर्षं मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीमचा भाग आहेत.

कॅरेबियन प्रीमिअर लीगमधल्या बार्बाडोस ट्रायडेंट्स तसंच जगभरातल्या अन्य काही ट्वेन्टी-20 संघांचे ते कोच आहेत. युएईत रॉबिन यांचं एक कोचिंग क्लिनिकही आहे.

दिल्लीकर चिराग सुरी

युएई संघाचा भाग असलेला चिराग मूळचा दिल्लीकर आहे. युएईत शालेय क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम चिरागच्या नावावर आहे. चिरागने 28 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. चिरागची कामगिरी पाहून त्याने भारतात येऊन खेळावं असा त्याच्या मित्रांचा आग्रह होता. पण त्याने युएईकडूनच खेळण्याचा निर्णय घेतला.

चिराग सुरी, युएई

फोटो स्रोत, Julian Herbert-ICC

फोटो कॅप्शन, चिराग सुरी

2017 मध्ये आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाने चिरागला 10 लाख रुपये खर्च करून ताफ्यात समाविष्ट केलं होतं. चिरागला अंतिम संघात स्थान मिळू शकलं नाही, मात्र दोन महिने आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर सराव करण्याचा, वावरण्याचा मोलाचा अनुभव मिळाला.

मॅचफिक्सिंगचं मळभ

महिनाभरापूर्वी आयसीसीने युएईच्या अमीर हयात आणि अश्फाक अहमद यांच्यावर मॅचफिक्सिंगप्रकरणातल्या कथित सहभागाप्रकरणी हंगामी बंदीची कारवाई केली आहे.

हयातने 9 वनडे आणि 4 ट्वेन्टी-20 सामन्यात युएईचं प्रतिनिधित्व केलं आहे तर अशफकाने 16 वनडे आणि 12 ट्वेन्टी-20 सामन्यात युएईचं प्रतिनिधित्व केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)