IPL 2020: मिड सीझन ट्रान्सफर काय असतं?

फोटो स्रोत, Kings Eleven Punjab
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
यंदाच्या आयपीएलमध्ये स्पर्धा सुरू असतानाच खेळाडूंची देवाणघेवाण पाहायला मिळू शकते. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या धर्तीवर मिड सीझन ट्रान्सफर ही प्रक्रिया यंदा हंगामादरम्यान राबवण्यात येईल.
मिड सीझन ट्रान्सफर कधी होऊ शकतं?
हंगामाचा पूर्वार्ध झाल्यावर म्हणजे प्रत्येक संघाच्या सात मॅच खेळून झाल्या की मिड सीझन ट्रान्सफर प्रक्रिया सुरू होईल. रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबरच्या दोन्ही मॅच झाल्यानंतर प्रत्येक टीमच्या सात मॅच खेळून होतील. त्यामुळे रविवारी रात्री ही प्रक्रिया सुरू होईल आणि पाच दिवस खुली असेल.
आर्थिक व्यवहार कसा होणार?
या प्रक्रियेसाठी खेळाडू आणि दोन्ही संघ यांच्यात परस्पर सामंजस्य असणं आवश्यक आहे. खेळाडूला लोनवर विकत घेणाऱ्या संघाला यासाठीचा खर्च लिलावासाठीच्या निर्धारित खर्चाच्या बाहेरचा असेल.
दोन फ्रँचाईजींदरम्यान या खेळाडूसंबंधात करार होईल. खेळाडूला लिलावात मूळ संघाने दिलेली रक्कम मिळेल. या रकमेपेक्षा अतिरिक्त रक्कम मूळ संघाच्या खात्यात जमा होईल.

फोटो स्रोत, Robert Cianflone
उदाहरणार्थ, मुंबई संघाने लिलावात 2 कोटी रुपये खर्चून एका बॅट्समनला ताफ्यात समाविष्ट केलं. त्यांनी हा खेळाडू चेन्नईला संघाला मिड सीझन ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे लोनवर दिला. यामध्ये मुंबई-चेन्नई फ्रँचाईज यांच्यात करार होईल.
संबंधित खेळाडूला लिलावात ठरलेली म्हणजे 2 कोटी रुपये मानधन मिळेल. चेन्नईने त्याखेळाडूसाठी 2 कोटीपेक्षा जास्त रक्कम अदा केल्यास ती मुंबईच्या खात्यात जमा होईल.
अन्य कुठे?
फुटबॉल लीग साधारणत: जून ते मे अशा कालावधीत चालतात. जानेवारी महिन्यात म्हणजे लीग वेळापत्रकाच्या मध्यावर मिड सीझन ट्रान्सफर विंडो खुली होते. पहिल्या सत्रात छाप पाडू न शकलेले, पहिल्या सत्रात खेळायच्या संधीच मिळू न शकलेले खेळाडू अन्य संघांकडे जाऊ शकतात.
कशी होते ही प्रक्रिया?
सातव्या मॅचपर्यंत साधारण कोणते खेळाडू अंतिम अकरात असतील आणि कोणते राखीव खेळाडू असतील याची चाचपणी झालेली असते. कोणत्या खेळाडूंना संधीच मिळू शकणार नाही हे स्पष्ट झालेलं असतं.

फोटो स्रोत, KKR
एखादा संघ संघातल्या एखाद्याला खेळाडूला दुसऱ्या संघाला देऊ शकतो. लिलावात खरेदी करता न आलेल्या खेळाडूंना संघात सामील करून घेण्याची ही उत्तम संधी असू शकते. मात्र या प्रक्रियेसाठी खेळाडू ज्या संघात आहे आणि ज्या संघात जाणार आहे त्यांच्यात परस्पर सामंजस्य असणं अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्या खेळाडूंची देवाणघेवाण होऊ शकते?
गेल्या वर्षी आयपीएल प्रशासनाने हंगामादरम्यान अनकॅप्ड खेळाडूंसाठी म्हणजे भारतासाठी न खेळलेल्या खेळाडूंसाठी ही प्रक्रिया राबवली होती. हंगामादरम्यान पाच दिवसांकरता मिड सीझन ट्रान्सफर विंडो खुली होती.
यंदा ही प्रक्रिया सर्व खेळाडूंसाठी लागू आहे. यामध्ये भारतीय, विदेशी, भारतासाठी खेळलेले, न खेळलेले अशा सर्व खेळाडूंना लागू आहे. मात्र याकरता संबंधित खेळाडूने त्या संघासाठी दोनपेक्षा कमी मॅचेस खेळलेल्या असाव्यात.
रहाणे-गेलची चर्चा काहोतेय?
लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने भरवशाच्या अजिंक्य रहाणेला दिल्लीला ट्रेडऑफ मध्ये देऊन टाकलं. त्याबदल्यात त्यांनी मकरंद मार्कंडेय आणि राहुल टेवाटिया यांना घेतलं. दिल्लीने अंतिम अकरात पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टॉइनिस आणि शिमोरन हेटमायर यांना संधी दिली आहे.
दिल्लीची आतापर्यंतची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे त्यांनी बॅटिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामुळे आयपीएल स्पर्धेत नियमितपणे रन्स करणाऱ्या अजिंक्य रहाणेला खेळायची संधीच मिळालेली नाही.
दुसरीकडे चेन्नई आणि हैदराबाद संघांना मधल्या फळीत भरवशाच्या बॅट्समनची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत अजिंक्य मिड सिझन ट्रान्सफरद्वारे दुसऱ्या संघाकडे जाऊ शकतो.

फोटो स्रोत, Delhi Capitals
ख्रिस गेल अर्थात युनिव्हर्स बॉस पंजाबकडे आहे. 7 मॅचमध्ये फक्त एकात विजय मिळवूनही पंजाबने गेलला अद्याप खेळवलेलं नाही.
गेलच्या नावावर आयपीएल स्पर्धेत 125 मॅचेसमध्ये 4484 रन्स आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. पोट बिघडल्यामुळे गेल खेळू शकला नाही असं पंजाबचे कोच अनिल कुंबळे यांनी सांगितलं होतं. तूर्तास पंजाबने ख्रिस जॉर्डन, जेमी नीशाम, मुजीब उर रहमान, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन यांना खेळवलं आहे.
संघ खरंच उत्सुक आहेत का?
आयपीएलचा हंगाम मोठा असतो. यंदा बहुतांश खेळाडू कोरोनामुळे प्रदीर्घ काळ सराव करू शकले नाही. बरेच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आयोजन खोळंबलं होतं. त्यामुळे फिटनेस हा अनेक खेळाडूंसाठी काळजीचा मुद्दा आहे.
यंदाचं आयपीएल युएईत होत आहे. दुबई, अबूधाबी, शारजा इथं प्रचंड उकाडा आहे. पारा चाळीसपर्यंत जात आहे. आर्द्रताही खूप आहे. अशा वातावरणात खेळणं सोपं नाही.

फोटो स्रोत, Mumbai Indians
थकवा, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं असे त्रास जाणवू शकतात. प्रत्येक संघ 14 मॅच खेळणार आहे. त्यानंतर प्लेऑफच्या मॅचेस होतील.
एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याच्यासारखीच गुणवैशिष्ट्य असणाऱ्या खेळाडूला अंतिम अकरात घेता येतं. त्यामुळे पहिल्या टप्प्यात खेळायची संधी मिळाली नसली तरी दुसऱ्या टप्प्यात संधी मिळू शकते. त्यामुळे संघ आपल्या खेळाडूला रिलीज करण्यासाठी उत्सुत नसतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायोबबलची व्यवस्था असल्याने प्रत्येक संघ स्पर्धा सुरू होण्याच्या बरंच आधी युएईत पोहोचला आहे. सराव, मीटिंग यामध्ये प्रत्येक खेळाडू सहभागी होतो.
महिना-सव्वा महिना संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूला दुसऱ्या संघाला देण्यात डावपेचांची माहिती जाण्याचीही शक्यता आहे. याव्यतिरिक्त खेळाडूला अन्य संघाला देऊन मिळणारा पैसा फार नसतो. मामुली रकमेसाठी खेळाडूला गमावण्यापेक्षा त्याला संघात कायम राखणं श्रेयस्कर ठरतं.
किती खेळाडूंचा प्रक्रियेसाठी विचार होऊ शकतो?
प्रत्येक संघाकडे 24 खेळाडू आहेत. यापैकी किती खेळाडूंना त्यांनी एकदाही अंतिम अकरात संधी दिलेली नाही ते खालीलप्रमाणे- चेन्नई (5), दिल्ली (7), पंजाब (6), कोलकाता (7), मुंबई (12), राजस्थान (7), बंगळुरू (4), हैदराबाद (10)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








