IPL 2021: आरसीबी विराट-एबीच्या ब्रोमान्सपलीकडे कधी जाणार?

फोटो स्रोत, BCCI/IPL
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तेराही वर्षं आयपीएलचा भाग असलेल्या आरसीबीला मागच्या हंगामात जेतेपदाविनाच परतावं लागत आहे. त्यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.
हार-जीत हा खेळातला अंतिम टप्पा असतो. त्याआधीची प्रोसेस तितकीच महत्त्वाची असते.
गेल्या हंगामातील फायनल मॅचमधले तीन प्रसंग. टॉसवेळी विराट कोहली तणावात असल्याचं त्याच्या देहबोलीतून जाणवत होतं. दोन्ही संघांसाठी करो या मरो ची मॅच होती. पण हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण होता.
कोहलीने या महत्त्वाच्या मॅचसाठी संघात चार बदल केले. दुखापत किंवा ढासळलेला फॉर्म हे संघात बदल करण्याचं प्रमुख कारण असतं. चारपैकी एक बदल सक्तीचा होता.
बाकी बदलांचा अर्थ असा की बसवलेली घडी नीट नाही किंवा बसवलेली घडी या दडपणाच्या मॅचमध्ये चोख काम करेल याविषयी साशंकता आहे. त्यामुळेच एवढे घाऊक बदल केले. कोहलीला सगळे बदल सांगताही आले नाहीत. यातूनच प्रचंड गोंधळ आणि दबाव असल्याचं स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, IPL Twitter
अख्ख्या हंगामात कर्णधार विराट कोहली नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. एलिमिनेटरसारख्या अटीतटीच्या लढतीत अख्खी बॅटिंग ऑर्डर बदलण्यात आली आणि कोहली सलामीवीर झाला. नव्या बॉलचा सामना करणं हे कोणत्याही फॉरमॅटमध्ये अवघडच असतं. तसंच झालं आणि कोहली 6 रन्स करून तंबूत परतला.
फ्री हिटवर रनआऊट
मॅचदरम्यानच्या एका प्रसंगाने आरसीबी प्लेऑफ्ससाठी जराही तयार नसल्याचं स्पष्ट झालं. आरोन फिंच आऊट झाल्यावर मोईन अली खेळपट्टीवर अवतरला. मोईनने खेळलेला बॉल नोबॉल असल्याने अंपायर्सनी फ्री हिटची घोषणा केली.
फ्री हिट याचा अर्थ एक अतिरिक्त बॉल खेळवण्यात येतो. ज्यावर बॅट्समन चौकार, षटकार ठोकू शकतो. एकेरी-दुहेरी काढू शकतो. या बॉलवर कॅचआऊट, स्टंपिंग, एलबीडब्ल्यू काहीही लागू होत नाही फक्त रनआऊट होऊ शकतो.
सर्वसाधारणपणे फ्री हिटच्या बॉलवर षटकार ठोकणं बॅट्समनला आवडतं. जेणेकरून बॉलरचं खच्चीकरण होतं. आरबीसीने असं काही करून दाखवलं ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती.
फ्री हिटचा बॉल मोईन अलीने तटवला. बॉल रशीद खानच्या हातात गेला. रनची कोणतीही शक्यता दिसत नसताना मोईन अली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी चोरटी रन घेण्याचा प्रयत्न केला.
रशीद खानने डायरेक्ट हिटने स्टंप्सचा वेध घेतला आणि मोईन अली भोपळाही न फोडता तंबूत परतला. ज्या बॉलवर बॅट्समनला रनआऊट सोडून सगळ्या प्रकारच्या आऊट होण्यापासून अभय आहे त्या बॉलवर आरसीबीने विकेट गमावली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोईन अली हा आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडू आहे आणि एबी डीव्हिलयर्सची महान खेळाडूंमध्ये गणना होते. संघ पातळीवर तसंच वैयक्तिकही किती गोंधळ आहे याचं ते सर्वोत्तम उदाहरण होतं.
आरसीबीने मॅच 40व्या ओव्हरमध्ये गमावली परंतु मानसिकदृष्ट्या ते कधीच हरले होते.
कर्णधारपदाचा काटेरी मुकूट
आयपीएल स्पर्धेत तेरा वर्ष एकाच हंगामाकडून खेळण्याचा दुर्मीळ विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. हे नातं टिकण्याचं मुख्य कारण तेराही वर्ष कोहलीची बॅट तळपते आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स कोहलीच्या नावावर आहेत.
या स्पर्धेत खेळताना बॅटिंगचे अनेकविध कोहलीच्या नावावर आहेत. मात्र एक तपापेक्षा जास्त कालावधीचं हे नातं आता तुटूही शकतं कारण तेरा वर्षांनंतरही कोहली आरसीबीला जेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही.

फोटो स्रोत, BCCI/IPL
U19 प्लेयर ते टीम इंडियाचा कर्णधार, जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल ठरलेला विराट असं त्याचं वैयक्तिक संक्रमण देदिप्यमान असलं तरी आरसीबीचा कर्णधार म्हणून विराटची कामगिरी सर्वसाधारण आहे हे आता पुरेसं स्पष्ट आहे. कॉर्पोरेट विश्वात हायर अँड फायर नावाचं धोरण असतं. तुम्ही कामगिरी दाखवा अन्यथा बाजूला व्हा हा त्याचा सोपा अर्थ.
कोहलीकडे आरसीबीचं कर्णधारपद येऊन आठ वर्ष लोटली आहेत. पण अजूनही जेतेपदापासून ते दूर आहेत. स्वत: खूप चांगलं खेळलं म्हणजे कॅप्टन्सी होत नाही.
सगळं चांगलं असताना कर्णधाराचं काम सोपं असतं. पण खरी परीक्षा गोष्टी विपरीत घडताना होते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये विराट आणि सूर्यकुमार यादव यांच्यात जे घडलं त्यातून कोहलीच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मोक्याच्या क्षणी डावपेचात्मक निर्णय घेण्यात कोहली कमी पडतो असं जाणकार, तज्ज्ञ वारंवार सांगतात.

फोटो स्रोत, BCCI/IPL
उदाहरणार्थ एलिमिनेटर मॅचला कोहलीने सलामीला येण्याचा निर्णय घेतला. ही प्रयोग करण्याची जागा नाही. प्रयोग करायचा होता तर आधी करून बघायला हवा होता. सगळं चांगलं असताना विराट उत्तम नेतृत्व करतो पण गोष्टी घरंगळू लागतात तसा त्याचा संयम सुटतो. विजयाचा सुटलेला दोर खेचून आणण्यात तो कमी पडतो.
आठ वर्षांनंतर जेतेपद जिंकून देता येत नसेल तर आरसीबीने कर्णधारपदासाठी कोहलीपल्याड विचार करायला हवा असं परखड मत माजी खेळाडू आणि आयपीएल विजेता कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.
विराट-एबी
विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे जागतिक क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्या कर्तबगारीविषयी दुमत असण्याचं कारणच नाही. वर्षानुवर्षे हे दोघं धावांची टांकसाळ उघडतात. परंतु क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. आरसीबीचं सगळं धोरण विराट-एबी केंद्रितच असतं.
सलामीवीर-मधली फळी-स्पिनर-पेसर-कीपर अशा सगळ्यांचा मिळून संघ असतो. प्रत्येकाची एक भूमिका असते. आरबीसीने तसा विचारच केलेला दिसत नाही. विराट-एबी खेळणारच हे नक्की पण पुढच्या मॅचला हमखास संघात असेलच अशी माणसं निवडायची म्हटली तर पंचाईत होते. कारण आरसीबीने तशा खेळाडूंची फौज तयार केलेली नाही.

फोटो स्रोत, BCCI/IPL
विराट-एबी सोडून बाकी बहुतांशजण बदलत राहतात. दरवर्षी ते बराचसा संघही बदलतात. कोणत्या भूमिकेची काय भूमिका असेल याचं त्रैराशिक आरसीबीकडे निश्चित नसतं. विराट-एबी असतात, बाकीचे त्यांच्याभोवती फिरतात अशी स्थिती असते. दर मॅचला बदल करण्याच्या धरसोड वृत्तीमुळे खूप नुकसान होतं.
विराट-एबी सोडून बाकी खेळाडूंना माहिती नसतं की आपण पुढची मॅच खेळू की नाही. संघातल्या स्थानाविषयी अस्थिरता असेल तर खेळाडू शंभर टक्के कसं देणार?
आरसीबीची सोशल मीडिया हँडल्स घ्या, त्यांच्याविषयी बातम्या पाहा- सगळं विराट-एबीभोवती केंद्रित असतं. या दोघांच्या गारुडाखाली आरसीबीचा बाकीचा संघ झाकोळला जातो.
'लाईक अ लाईक रिप्लेसमेंट' नाहीत
आयपीएल जेतेपदाची मोहीम ऑक्शन टेबलवर जिंकली जाते असं या क्षेत्रातले दर्दी सांगतात. लिलावात योग्य खेळाडू घेतले तर अर्धी मोहीम फत्ते होते असा त्याचा अर्थ. आरसीबीकडे यंदा असणाऱ्या खेळाडूंकडे नजर टाकूया.
दणकट बांध्याचा आणि तडाखेबंद बॅटिंग करणाऱ्या आरोन फिंचला आरबीसीने यंदा समाविष्ट केलं. फिंचच्या तंत्रात अनेक उणीवा आहेत. कोणताही विचारी आणि अभ्यासपूर्ण बॉलर फिंचला झटपट गाशा गुंडाळायला लावतो.
फिंच याआधी आयपीएल स्पर्धेत सात संघांसाठी खेळला आहे. कुठलाही संघ त्याला रिटेन करत नाही याचा अर्थ तो अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकत नाही. अशा खेळाडूला आरसीबीने घेतलं.

फोटो स्रोत, Hindustan Times
फिंच सामान्यत: सलामीला येतो. यंदाच्या हंगामात फिंचला बऱ्याच मॅचेस ओपनर म्हणून खेळवण्यात आलं. एकदाही मोठी खेळी करू न शकल्याने त्याला वगळण्यात आलं. त्याच्या जागी जोश फिलीपला घेतलं. तोही अपयशी ठरल्याने एलिमिनेटर मॅचला फिंचला संघात घेतलं.
हंगामात आतापर्यंत सलामीला आलेल्या फिंचला तिसऱ्या क्रमाकांवर धाडलं. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त रन्स करणं ही फिंचवरची जबाबदारी. फिंच नाही मग कोण याचा विचार आरसीबीने केलेला दिसला नाही.
आरबीसीने यंदा ख्रिस मॉरिसला ताफ्यात समाविष्ट केलं. उत्तम वेगाने बॉलिंग आणि उपयुक्त बॅटिंग ही मॉरिसची गुणवैशिष्ट्यं. आकडेवारी आणि इतिहास पाहिला तर आयपीएल स्पर्धेत कोणत्याच संघाने मॉरिसला प्रमुख फास्ट बॉलर म्हणून खेळवलेलं नाही.
तो विविध संघांकडून खेळलाय पण कोणत्याही टीमचं प्रमुख बॉलिंग अस्त्र कधीही नव्हता. आरसीबीने मॉरिसवर ती जबाबदारी टाकली. मॉरिसच्या कारकीर्दीला दुखापतींचा शाप आहे. मॉरिस यंदा ज्या मॅचेस खेळला त्यात त्याने उत्तम कामगिरी बजावली परंतु मॉरिस बहुतांशकाळ दुखापतग्रस्त होता.

फोटो स्रोत, BCCI/IPL
मॉरिस नसेल तर सक्षम पर्याय आरबीसीने तयार ठेवायला हवा होता. तसं झालं नाही. आरसीबीकडे डेल स्टेन होता. स्टेन हा दिग्गज बॉलर आहे. चाळिशीकडे झुकलेल्या स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. असंख्य दुखापती आणि प्रदीर्घ काळ सातत्याने खेळल्याने स्टेनचा आता पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही. मॉरिस-स्टेन आरसीबीसाठी कच्चे दुवे झाले.
यंदा आरसीबीने इसरु उदाना या श्रीलंकेच्या खेळाडूवर विश्वास ठेवला. डावखुरा फास्ट बॉलर असणारा उदाना फटकेबाजीही करू शकतो. त्याला खेळवलं तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली परंतु महत्त्वाच्या मॅचेसवेळी उदानाला काढण्यात आलं.
उदानाला पर्याय केन रिचर्डसन नावाचा ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर होता. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याच्याऐवजी आरबीसीने अडम झंपा नावाच्या स्पिनरला घेतलं.
आयपीएलसारख्या दीड महिना चालणाऱ्या स्पर्धेत लाईक अ लाईक रिप्लेसमेंट महत्त्वाचा मुद्दा ठरतो. खेळाडूंना विश्रांती देणं, दुखापतीतून सावरू देणं यासाठी समान कौशल्य असणारे खेळाडू संघात असणं आवश्यक ठरतं. जेणेकरून एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याचा पर्यायी खेळाडू खेळू शकतो. आरसीबीचं यंदा आणि त्याआधीच्या हंगामातही या मुद्याकडे दुर्लक्ष झालं आहे.
काय गमावलं?
आरसीबी संघव्यवस्थापन लिलावावेळी उत्साहात असतं. खूप मोठी रक्कम खर्चून खेळाडूंना घेतात. पण त्या खेळाडूंचं करायचं काय याचा विचार ते लिलावापूर्वी करत नाहीत. उदाहरणार्थ 2013 मध्ये त्यांनी लोकेश राहुलला ताफ्यात समाविष्ट केलं. कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करण्याची तयारी, विकेटकीपिंग करू शकण्याची क्षमता यामुळे राहुल अंतिम अकरात खेळू लागला.

फोटो स्रोत, BCCI/IPL
विराट-एबीनंतर संघात स्थान पक्कं असलेल्या खेळाडूत राहुलची गणना होऊ लागली. तो सातत्याने रन्स करू लागला. मात्र मानधनाच्या मुद्यावरून न पटल्याने त्यांनी राहुलला सोडून दिलं. राहुलसारखा उमदा, गुणी खेळाडू आरसीबीचं भविष्य होतं. पण त्यांनी तसा विचार केला नाही.
राहुल आजच्या घडीला किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आहे. यंदा ऑरेंज कॅपही मानकरीही तोच असण्याची शक्यता आहे. आपण काय गमावलं हे एव्हाना आरसीबीच्या लक्षात आलं असेल.
काही वर्षांपूर्वी आरसीबीने सर्फराझ खानला रिटेन केलं होतं. जेव्हा एखादा खेळाडू तुमच्या भविष्यकालीन योजनेचा भाग असतो, तो सातत्याने विकेट्स काढत असतो किंवा रन्स करत असतो. अशाच खेळाडूला रिटेन केलं जातं. रिटेन केलेल्या सर्फराझला आरसीबीने नंतर सोडून दिलं.
खरंतर विराट-एबीनंतर फिनिशर म्हणून सर्फराझला खेळवता आलं असतं. परंतु फिटनेसच्या मुद्यावरून फिसकटल्याने सर्फराझला दूर करण्यात आलं. सर्फराझ आता किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे.
मुंबई इंडियन्सला सातत्याने दमदार सुरुवात करून देणारा क्विंटन डी कॉक आरसीबीकडे होता. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम कीपर-बॅट्समन अशी त्याची ख्याती आहे. आता तर तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारही आहे. बेंगळुरूला क्विंटनचा उपयोग करून घेता आला नाही. तोच क्विंटन मुंबईचा हुकमी एक्का झाला आहे.
भरपूर ताकदीच्या बळावर फटकेबाजी, चार ओव्हर्स टाकू शकेल अशी बॉलिंग आणि अफलातून फिल्डर ही मार्कस स्टॉइनिसची ओळख. स्टॉइनस आरसीबीकडे होता. त्याचं काय करायचं हे त्यांना कळलं नाही. सध्या स्टॉइनस दिल्ली कॅपिटल्सकडे आहे. अंतिम अकराचा भाग असतो आणि तिन्ही आघाड्यांवर चांगलं प्रदर्शन करतोय.
हे एक नाही अशी असंख्य उदाहरणं देता येतील.
काय कमावलं?
युझवेंद्र चहल हा आरसीबीने घडवलेला खेळाडू असं म्हटल्यास वावगं ठरू नये. छोट्या चणीचा युझवेंद्र बेंगळुरूच्या छोट्या आकाराच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर निधड्या छातीने स्पिन बॉलिंग करतो. त्याच्या चार ओव्हर्समध्ये हाणामारी करण्यापेक्षा खेळून काढणं योग्य असा पवित्रा बॅट्समन घेतात.
बॉलला फ्लाईट देणं, गुगली, फ्लिपर, राँगवन अशी एकापेक्षा एक अस्त्रं भात्यात असलेला युझवेंद्र खऱ्या अर्थाने आरसीबीसाठी मॅचविनर आहे. संघाची अवस्था कशीही असेल युझवेंद्र जीव तोडून बॉलिंग करतो. चहलभोवती आरसीबीने चांगल्या बॉलर्सची ताकद उभी केली तर संघाचे दिवस बदलू शकतात.

फोटो स्रोत, BCCI/IPL
पहिला आयपीएल हंगाम खेळणाऱ्या देवदत्त पड्डीकलने 473 रन्स केल्या. भारतासाठी न खेळलेल्या खेळाडूने आयपीएल पदार्पणात केलेल्या या सर्वाधिक रन्स आहेत. डावखुरा शैलीदार बॅटिंग करणाऱ्या देवदत्तने आपल्या बॅटिंगने सगळ्यांना प्रभावित केलं.
देवदत्त आरसीबीसाठी लंबी रेस का घोडा ठरू शकतो. मात्र तीस रन्सनंतर क्रॅम्प आणि दमायला होणं यावर देवदत्तला प्रचंड मेहनत करावी लागेल.

फोटो स्रोत, BCCI/IPL
कंजूष अशी टिच्चून बॉलिंग, चांगली बॅटिंग आणि उत्तम फिल्डिंग यांच्या बळावर वॉशिंग्टन सुंदरने छाप उमटवली आहे. वॉशिंग्टनच्या गुणकौशल्यांचा उपयोग करून घेतल्यास आरसीबीला फायदा होऊ शकतो.
मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी ही युवा भारतीय फास्ट बॉलरची जोडगोळी आरसीबीकडे आहे. त्यांचा योग्य उपयोग करून घेणं कर्णधार आणि संघव्यवस्थापनाच्या हाती आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








