विराट कोहलीचं ऑस्ट्रेलिया लव्ह अफेअर

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया, भारतीय क्रिकेट टीम, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचं खास नातं आहे.
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

विराट कोहलीने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक साकारत ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

लाखभर चाहत्यांच्या साक्षीने कोहलीने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं हे सिद्ध केलं. कोहलीने ऑस्ट्रेलियात 13 टेस्टमध्ये 54.08च्या दमदार सरासरीसह 1352 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

सार्वकालीन सर्वोत्तम फिनिशर्स मांदियाळीत गणना होणाऱ्या कोहलीने ऑस्ट्रेलियात 29 वनडेत 51.03च्या सरासरीने 1327 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. फिनिशर म्हणून कोहली ऑस्ट्रेलियातच श्रीलंकेविरुद्ध होबार्ट इथे केलेल्या खेळीदरम्यान नावारुपास आला होता.

कोहलीने ऑस्ट्रेलियात 12 ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये 76.14च्या सरासरीने खेळताना 533 धावा केल्या आहेत. कोहलीचा स्ट्राईकरेट 146.02 आहे आणि त्याच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत.

सामना संपल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, "मला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं. इथे खेळताना कस लागतो. चाहत्यांचं अपार प्रेम लाभतं".

विराटच्या ऑस्ट्रेलिया प्रेमाचा घेतलेला आढावा

लुसलुशीत गवत अंथरलेलं हिरवंगार अॅडलेड ओव्हल हे मैदान विराट कोहलीच्या आयुष्यात खास आहे. सात वर्षांपूर्वी याच मैदानात कोहलीने दोन्ही डावात शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं होतं.

तिथूनच खऱ्या अर्थाने रनमशीन कोहलीपर्वाची सुरुवात झाली. या शतकांपूर्वीही विराट हे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकत होतं. पण वर गेलेली प्रत्येक गोष्ट खाली येतेच हा उशाप विराटच्याही माथी होता.

ढगाळ वातावरण आणि हातभर स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडमध्ये विराट कोहलीला जेम्स अँडरसनने अक्षरक्ष: मामा बनवलं. वनडेत आणि टेस्टमध्ये धावांची रास मांडणारा हाच का तो विराट असा प्रश्न त्याच्या चाहत्यांनाही पडला. इंग्लंडमध्ये पाच टेस्ट झाल्या. ही सीरिज इंग्लंडने 3-1 अशी जिंकली.

यामध्ये विराटची कामगिरी होती- 1, 8, 25, 0, 39, 28, 0, 76, 20.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया, भारतीय क्रिकेट टीम, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2014 इंग्लंड दौऱ्यात विराटची कामगिरी सर्वसाधारण अशी झाली होती.

सर्वसाधारण आणि सुमार म्हणता येईल असे हे आकडे विराटचे आहेत यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. जगभर धावांची टांकसाळ उघडणाऱ्या कोहलीचे गर्वाचे घर खाली अशी टीका तीव्र होऊ लागली.

त्याच्या आक्रमक बोलण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. त्यावेळच्या नियमांनुसार भारतीय क्रिकेट संघ विदेश दौऱ्यावर असताना आईवडील, भाऊ-बहीण, बायको-मुलं यांनाच बरोबर घेऊन जाण्याची अनुमती होती.

चार वर्षांपूर्वी विराटचं लग्न झालं नव्हतं. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याची गर्लफ्रेंड होती. त्यांच्या रिलेशनशीबाबत सगळीकडे चर्चा सुरू होत्या. इंग्लंड दौऱ्यादरम्यान अनुष्का बरोबर असावी याकरता विराटने बीसीसीआयला विनंती केली होती.

तांत्रिकतेनुसार, गर्लफ्रेंड सोबत असण्याला अनुमती नव्हती. मात्र बीसीसीआयने विराटसाठी नियम शिथिल करत अनुष्काला सोबत नेण्याची परवानगी दिली होती.

अनुष्कामुळेच विराट दौऱ्यात चित्त एकाग्र करू शकला नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. बाकी कशापेक्षाही विराटने खेळाकडे लक्ष द्यावं असे सल्लेही अप्रत्यक्षपणे देण्यात आले.

कोहलीच्या भरधाव वारूला अचानक ब्रेक लागला होता. सगळी टीका पचवून विराट भारतात परतला. भारतात श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तुलनेने सोप्या मालिकांमध्ये त्याची कामगिरी सुरेख झाली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं खडतर आव्हान समोर होतं. ऑस्ट्रेलियाच्या तेजतर्रार माऱ्यासमोर कोहलीची फेफे उडेल असे अंदाज वर्तवण्यात आले. त्याला अंतिम अकरात घ्यावं का यावरही तज्ज्ञांनी मतमतांतरं केली.

पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झालेल्या दुखापतीमुळे संघाचा मुख्य फलंदाज असणाऱ्या कोहलीच्या गळात कॅप्टन्सीची माळ देण्यात आली.

आधीच बॅटिंग धड होत नाहीये म्हणून टीकेच्या रडावर आणि त्यात भर म्हणून कॅप्टन्सीचा काटेरी मुकूट अशा कोंडीत विराट सापडला.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीही विराटला टार्गेट केलं होतं. इंग्लंड दौऱ्यानंतर बॅटिंगमधल्या त्रुटी दूर करणाऱ्या विराटने अॅडलेड कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावत टीकाकार, समीक्षकांना उताणं पाडलं.

ऑस्ट्रेलियाच्या बोलंदाजीलाही तो पुरून उरला. भारतीय संघाने अॅडलेड टेस्ट गमावली. मात्र फास्ट बॉलिंगचा सामना करू शकत नाही, चेंडूला दमदार उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर खेळू शकत नाही, स्लेजिंगमुळे एकाग्र होऊ शकणार नाही अशा नानाविध थिअरींना विराटने आपल्या बॅटने निष्प्रभ ठरवलं.

4 टेस्टच्या सीरिजमध्ये विराटने 692 रन्स कुटून काढल्या. आपण सीरिज हरलोच पण विराटचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध झालं.

पहिली टेस्ट सेंच्युरी अॅडलेडमध्येच

2011-12मध्ये ऑस्ट्रेलियात झालेली ही सीरिज चांगलीच लक्षात राहण्यासारखी होती. भारतीय संघ चार टेस्टच्या या सीरिजमध्ये चारीमुंड्या चीत झाला. पण विराटसाठी ही सीरिज खास होती कारण याच सीरिजमध्ये विराटने टेस्ट करिअरमधलं पहिलंवहिलं शतक झळकावलं.

सहकारी एकापाठोपाठ एक बाद होत असताना विराटने ठेवणीतल्या फटक्यांसह शतक साजरं केलं. तेंडुलकर-द्रविड-गंभीर असे मोठे प्लेयर लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. मात्र विराटने या शतकासह आगमनाची वर्दी दिली.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया, भारतीय क्रिकेट टीम, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अॅडलेडच्या मैदानावरच विराटने पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावलं होतं.

विराट आणि ऑस्ट्रेलियातलं साम्य-अॅग्रेशन

स्लेजिंग हे ऑस्ट्रेलियाच्या अनेक प्रभावी अस्त्रांपैकी एक. स्लेजिंगचा अर्थ होतो शेरेबाजी. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ही क्लृप्ती लढवतो.

शेरेबाजीत शिव्या तसंच टोमणेही असतात. समोरच्या खेळाडूची एकाग्रता भंग व्हावी हा यामागचा उद्देश. भलेभले प्लेयर्स या अस्त्राने घायाळ होतात. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर हरवणं कठीण का? याचं एक कारण हेही आहे.

विराट या अस्त्राचा वापर सकारात्मक पद्धतीने करून घेतो. शेरेबाजीने खचून न जाता विराट अरे ला का रे करतो. मात्र त्याचवेळी त्याची बॅट गर्जत असते.

प्रतिस्पर्धी बॉलर्सचा सखोल अभ्यास, ऑस्ट्रेलियातल्या मैदानांचा-खेळपट्टीबाबत चोख आकलन, आपल्या तंत्रात काय बदल करायला हवेत याची स्पष्ट जाणीव, कोणते फटके कधी खेळायचे याचं शास्त्र, भागीदारी रचत स्कोअरबोर्ड हलता ठेवण्याची रणनीती या समांतर डावपेचांमुळे विराट ऑस्ट्रेलियात वर्चस्व गाजवतो. ऑस्ट्रेलियातर्फे होणारं स्लेजिंग तो एन्जॉय करतो. स्लेजिंगने त्याला स्फुरण चढतं.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया, भारतीय क्रिकेट टीम, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली आणि मिचेल जॉन्सन यांच्यात झालेली शाब्दिक वादावादी

2014-15च्या दौऱ्यात विराटला spoilt brat अर्थात बिघडलेला मुलगा असं संबोधण्यात आलं.

या दौऱ्यातला एक प्रसंग खास लक्षात राहण्यासारखा. मिचेल जॉन्सनने टाकलेला एक चेंडू विराटने तटवला. चेंडू जॉन्सनच्या दिशेने गेला आणि त्याने रनसाठी पुढे सरसावलेल्या कोहलीच्या दिशेने चेंडू फेकला. चेंडू कोहलीला लागला आणि तो खाली पडला. कोहलीने जळजळीत कटाक्ष टाकला, जॉन्सनने तात्काळ माफी मागितली.

त्यानंतर थोड्याच वेळात कोहलीच्या बॅटची कड घेऊन चेंडू बाऊंड्रीच्या दिशेने गेला. कोहली आणि जॉन्सन यांच्यात शाब्दिक चकमक रंगली. यानंतर कोहलीला वॉटसन आणि हॅडीन यांच्याकडून जीवदान मिळालं. तेव्हाही कोहली-जॉन्सन समोरासमोर उभे ठाकले. अखेर अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं.

आदर-सन्मानाची गोष्ट (28 डिसेंबर 2014)

जॉन्सनच्या वागण्यासंदर्भात विराटने काढलेले उद्गार चांगलेच चर्चेत राहिले होते. ''रनआऊट करायचं असेल तर स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेक. माझ्या शरीराच्या दिशेने नाही. समोरच्या व्यक्तीला समजेल अशा स्पष्ट शब्दांत संदेश पोहोचवणं आवश्यक आहे. उगाच कोणाकडून काहीही मी ऐकून घेणार नाही. मी क्रिकेट खेळायला आलो आहे, ते मी खेळेन. मला आदर न देणाऱ्यांना मी सन्मान का द्यावा''? असा सवाल विराटने केला.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया, भारतीय क्रिकेट टीम, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ एकमेकांशी भिडले तो क्षण.

स्लेजिंगचं बुमरँग कसं उलटतं हे कोहलीने उलगडून सांगितलं. "तुम्ही माझा तिरस्कार करता. ते मला आवडतं. मैदानावर तू-तू-मैं-मैं व्हायला माझा विरोध नाही. ते माझ्या पथ्यावर पडतं. मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आवडतं कारण ते शांतपणे खेळू शकत नाहीत. मला शाब्दिक देवघेव आवडते, त्याने मला बळ मिळतं. सर्वोत्तम खेळ करण्यासाठी मला त्यातून प्रेरणा मिळते. ते यातून धडा घेत नाहीत".

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांशी पंगा (5 जानेवारी 2012)

आपल्या टीमला समर्थन देण्यात ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक आघाडीवर असतात. प्रतिस्पर्ध्यांना उकसवण्यासाठी अनेकदा चाहतेही शेरेबाजी करतात.

सहा वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. भारतीय संघाने या दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांच्या शेरेबाजीला प्रत्युत्तर म्हणून कोहलीने मधलं बोट दाखवलं.

कोहलीने आपल्या वागण्याबाबत बोलताना सांगितलं, "खेळाडूंनी अशा पद्धतीने व्यक्त व्हायला नको. पण प्रेक्षक, चाहत्यांकडून आक्षेपार्ह भाषेत टीकाटिप्पणी होत असेल तर काय करायचं. आतापर्यंत मी ऐकलेली सगळ्यांत खराब शेरेबाजी होती. ही विकृत मानसिकता आहे."

हे चित्र हळूहळू बदलू लागलं आहे. 'प्ले हार्ड' ही लढवय्या विराटची वृत्ती ऑस्ट्रेलियन चाहत्यांनाही आवडू लागली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातही त्याच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली आहे.

फॉकनर-स्मिथ-वॉनर्रशी हुज्जत

'तू तुझी एनर्जी फुकट घालवतो आहेस. त्याने तुझा काहीही फायदा होणार नाही. तुला मी आयुष्यात पुरेसं चोपून काढलं आहे. जा आणि बॉलिंग टाक,' असं कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनरला सुनावलं होतं.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसंच त्यांचा रनमशीन स्टीव्हन स्मिथ यांच्याशी विराटचे खटके उडले आहेत. मात्र या घटनांनी विराट विचलित होत नाही हे महत्त्वाचं.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया, भारतीय क्रिकेट टीम, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात झालेली हुज्जत सोडवायला पंचांना हस्तक्षेप करावा लागला होता.

'चेस'मास्टर बिरुदावलीवर ऑस्ट्रेलियातच शिक्कामोर्तब

वनडे क्रिकेटमध्ये चेस अर्थात धावांचा पाठलाग करताना संघाला जिंकून देण्याचं आव्हान विराटने सातत्याने पेललं आहे. वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाची विराटची आकडेवारी अचंबित करणारी आहे.

सहा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातच विराटच्या या क्षमतेवर शिक्कामोर्तब झालं. तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने साकारलेली 133 धावांची खेळी वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशर खेळीपैकी एक मानली जाते. भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या लसिथ मलिंगाला विराटने अक्षरक्ष: फोडून काढलं होतं.

मीडिया, जाणकारांकडून लक्ष्य

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या सीरिजपूर्वी विदेशी संघाच्या प्रमुख खेळाडूला विविध मार्गांनी लक्ष्य केलं जातं. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराटच्या वर्तनावर अनेकदा भाष्य केलं आहे.

जेवढी विराटबद्दल चर्चा होते तेवढी त्याची कामगिरी उत्तम होते असं सातत्याने घडतं आहे. या मालिकेपूर्वीच्या चर्चेचा केंद्रबिदूही विराटच आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्यांचा सखोल अभ्यास

ऑस्ट्रेलियात चेंडूला उत्तम उसळी मिळते. बॅटिंगचं तंत्र पक्कं नसेल तर उसळते चेंडू सळो की पळो करून सोडू शकतात.विराटचं तंत्र याबाबतीत उजवं आहे.

उसळत्या चेंडूवर हवेत मारून आऊट न होता पूल आणि हूकचे फटके मारण्याचं कौशल्य त्याने आत्मसात केलं आहे. भन्नाट वेगासाठी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ओळखले जातात.

पण विराटने त्यांच्या वेगाचा उपयोग करुन घेत खेळण्याचं तंत्र विकसित केलं आहे. ऑस्ट्रेलियातली मैदानं मोठ्या आकाराची असतात.

अन्य देशातल्या मैदानांवर जे फटके सहज चौकार जाऊ शकतात त्यावर ऑस्ट्रेलियात दोन किंवा तीन धावा मिळू शकतात. 'रनिंग बिटवीन द विकेट' अर्थात धावणं तगडं असण्याची आवश्यक असतं.

धावून रन्स काढण्याच्या बाबतीत कोहलीचं नैपुण्य वाखाणण्याजोगं आहे. आऊट होण्याची शक्यता कमीत कमी करण्यासाठी विराटने ऑफस्टंपच्या बाहेर उभं राहून खेळण्याची शैली अंगीकारली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे ऑस्ट्रेलियात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या विदेशी बॅट्समनच्या यादीत विराट अव्वल पाचमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराटला मिळणारं यश सहजासहजी नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)