IPL 2023: त्रिशतकानंतर विजनवासात गेलेला करुण नायर आयपीएलमध्ये दिसणार

फोटो स्रोत, BCCI
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लखनौ सुपरजायंट्स संघाने दुखापतग्रस्त कर्णधार के.एल.राहुलच्या ऐवजी करुण नायरला संघात समाविष्ट केलं आहे.
बंगळुरूविरुद्धच्या लढतीत राहुलला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. उपचारादरम्यान दुखापत गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. राहुलला आता शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. तो आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळू शकणार नाही. जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो खेळू शकणार नाही. राहुलच्या अनुपस्थितीत लखनौने करुण नायरला ताफ्यात समाविष्ट केलं आहे.
इंग्लंड संघ 2016 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्या सीरिजमध्ये चेन्नई टेस्टमध्ये भारतातर्फे करुण नायरने त्रिशतकी खेळी साकारली होती. मॅरेथॉन अशी खेळी साकारल्यानंतर करुण नायर भारतासाठी फारसं खेळलाच नाही. करुण नायर सध्या काय करतो?
त्रिशतकी आविष्कार
पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये भारत आणि इंग्लंड संघांमध्ये चेन्नईत झालेल्या टेस्टमध्ये करुण नायरने त्रिशतकी खेळी साकारली होती. करुण नायरचं ते पहिलंच शतक होतं.
पहिलं शतक त्रिशतक हा अनोखा विक्रम नावावर करणारा करुण टेस्ट क्रिकेटमधला केवळ तिसरा बॅट्समन ठरला होता.
टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय बॅट्समन ठरला होता.
करुणने 565 मिनिटं खेळपट्टीवर ठाण मांडत, 32चौकार आणि 4 षटकारांच्या साह्याने नाबाद 303 रन्सची खेळी केली होती.

फोटो स्रोत, Parag Phatak
करुणने त्याच मालिकेत इंग्लंडविरुद्ध मोहालीत पदार्पण केलं. पहिल्या डावात त्याला चार रन्स करता आल्या. दुसऱ्या डावात त्याला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. मुंबई टेस्टमध्ये त्याने 13 रन्स केल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये त्रिशतक झळकावत करुणने नवनवे विक्रम रचले.
टीम इंडियाला भरवशाचा बॅट्समन मिळाला अशी चर्चा करुणच्या त्या इनिंग्जने सुरू करून दिली होती. मात्र प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच आहे. त्रिशतकानंतरच्या पुढच्या टेस्टमध्ये करुणला संघातून वगळण्यात आलं. अजिंक्य रहाणे संघात परतला आणि करुण नायर बाहेर पडला. त्रिशतक दुर्मीळ गोष्ट आहे.
मात्र त्रिशतकानंतर करुण फक्त तीन टेस्ट खेळला आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतात झालेल्या मालिकेत करुणला संधी मिळाली. मात्र करुणला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
बेंगळुरू टेस्ट (26,0), रांची (23) आणि धरमशाला (5) अशी करुणची कामगिरी झाली. सद्यस्थितीत करुणच्या नावावर फक्त 6 टेस्ट आहेत. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र करुण संघात नाही.
वनडे पदार्पण
2016 मध्ये भारतीय संघ झिम्माब्वेच्या दौऱ्यावर होता. प्रमुख खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. करुण नायरने या दौऱ्यात वनडे पदार्पण केलं.

फोटो स्रोत, JEKESAI NJIKIZANA
करुण दोन मॅच खेळला. मात्र प्रमुख खेळाडू संघात परतल्यानंतर करुणचा वनडे संघासाठी विचारही झाला नाही.
कर्नाटकचा आधारस्तंभ
2015 मध्ये करुणने रणजी करंडक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध खेळताना कर्नाटकसाठी त्रिशतकी खेळी साकारली होती. कर्नाटकच्या गेल्या दशकभरातील रणजी विजयात करुणचा मोलाचा वाटा आहे. कर्नाटकसाठी चारदिवसयी, वनडे तसंच ट्वेन्टी-20 प्रकारात सातत्याने धावांच्या राशी ओतल्यानेच करुणची राष्ट्रीय संघात निवड झाली होती.
करुणने नियमितपणे कर्नाटक संघाचं नेतृत्व करतो.
मात्र कर्नाटकचा भरवशाचा बॅट्समन आहे. मात्र टेस्ट, वनडे, ट्वेन्टी-20, चारदिवसीय सामने असे सगळे सामने पकडले तर करुणला गेल्या 56 मॅचमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही.
2017-18 रणजी करंडक हंगामात करुणने सेमीफायनलमध्ये विदर्भ संघाविरुद्ध शतकी खेळी साकारली होती.

फोटो स्रोत, Matt Roberts
काही दिवसांपूर्वीच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत करुणने कर्नाटकचं नेतृत्व केलं होतं.
इंडिया रेड संघासाठी खेळताना करुणची कामगिरी चांगली झाली होती. त्या संघाच्या नेतृत्वाची धुरा करुणने सांभाळली आहे.
आयपीएल स्पर्धेतला प्रवास-9 वर्षात 4 संघ
करुण नायरला आयपीएलमध्ये स्थैर्य लाभलेलं नाही. 9 वर्षात करुण 5 संघांकडून खेळला आहे. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी करुणची गुणवत्ता हेरली आणि त्याला संघात समाविष्ट केलं.
पहिल्या हंगामात त्याला फक्त दोन मॅचमध्ये संधी मिळाली. 2014मध्ये मात्र त्याने 330 रन्स केल्या. 2015 हंगामात करुण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी खेळला. मात्र त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली.
दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्या गुणवत्तेवर विश्वात ठेऊन त्याच्यासाठी 4 कोटी रुपये खर्चून त्याला संघात समाविष्ट केलं. 2016 हंगामात करुण दिल्लीसाठी सगळ्या मॅचेस खेळला. त्याने 14 मॅचेसमध्ये 357 रन्स करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. 2017 हंगामात दिल्लीने अनेक प्रयोग केले.

फोटो स्रोत, Hindustan Times
करुणने काही सामन्यांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचं नेतृत्वही केलं. मात्र या हंगामात बॅट्समन म्हणून त्याची कामगिरी सर्वसाधारणच राहिली. हंगामानंतर दिल्लीने करुणला करारातून मुक्त केलं.
2018 हंगामापूर्वी झालेल्या लिलावात करुणचं नाव होतं. त्याची बेस प्राईज 50 लाख रुपये होती. किंग्ज इलेव्हन पंजाबने करुणसाठी 5.60 कोटींची बोली लावत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.
आधीच्या हंगामात रन्ससाठी झगडणाऱ्या बॅट्समनकरता एवढी बोली ऐकून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. करुणने पंजाबसाठी 13 मॅचेसमध्ये 301 रन्स केल्या.

फोटो स्रोत, KXIP
2019 हंगामात पंजाबची कामगिरी ढासळतच गेली मात्र करुणला फक्त एका मॅचमध्ये संधी देण्यात आली. असं असलं तरी पंजाबने 2020 हंगामासाठी करुणला संघात कायम ठेवलं.
कोरोनामुळे दुबईत झालेल्या हंगामात करुणला 4 मॅचेसमध्ये संधी देण्यात आली. 4 सामन्यात 16 रन्स करता आल्याने करुणचं काय होणार हे स्पष्ट झालं होतं. काही दिवसांपूर्वी आयपीएल संघांनी संघाची रचना स्पष्ट केली. त्यानुसार किंग्ज इलेव्हन पंजाबने करुणला करारमुक्त केलं.
त्यानंतर करुण कोलकाता नाईट रायडर्सकडे होता. यंदाच्या हंगामाआधीच्या लिलावात करुण नायर अनसोल्ड गेला होता. पण राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर लखनौने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.
करुण बेंचवर, विहारीला संधी
2018 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. करुण नायर भारतीय संघाचा भाग होता. ढगाळ वातावरण, स्विंग बॉलिंगसाठी अनुकूल खेळपट्या यामुळे भारतीय बॅट्समनना तिथे खेळणं कठीण जात होतं. तीन टेस्टवेळी करुणचा अंतिम अकरासाठी विचार झाला नाही. यानंतर दोन बॅट्समनचा संघात समावेश करण्यात आला.
चौथ्या टेस्टमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. खेळणाऱ्या खेळाडूंना पाणी, एनर्जी ड्रिंक देणं, हेल्मेट-बॅट-गार्ड पुरवणं या गोष्टी करुण करत राहिला. अख्खा दौरा करुण संघाबरोबर होता. पाचव्या टेस्टमध्ये संघव्यवस्थापनाने हनुमा विहारीला संधी दिली.

फोटो स्रोत, Ryan Pierse
आंध्र प्रदेशसाठी खेळताना हनुमाची कामगिरी चांगली होती. मात्र आधीपासून संघाचा भाग असलेल्या करुणला एकही संधी न देता संघव्यवस्थापनाने थेट हनुमाला संधी दिल्याने चर्चेला उधाण आलं.
अनेक माजी खेळाडूंनी या निर्णयप्रक्रियेवर आवाज उठवला होता. करुणने नंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये निवडसमिती तसंच संघव्यवस्थापनाने निवड का झाली नाही यासंदर्भात संभाषण झालं नसल्याचं सांगितलं. निवडसमितीचे तत्कालीन अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र करुणला कल्पना देण्यात आल्याचं म्हटलं.
बोट अपघातातून सुदैवी बचावला
2016 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केल्यानंतर करुण केरळमधील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी गेला होता. मंदिराच्या दिशेने बोटीतून जात असताना, बोट उलटली. त्या अपघातात स्थानिकांनी करुणला वाचवलं. त्या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातातून सुरक्षितपणे बचावलो हे निव्वळ नशीब असल्याचं करुणने सांगितलं होतं.
कोरोनाची शिकार
करुणला कोरोनाने ग्रासलं होतं. मात्र योग्य उपचारांनंतर तो कोरोनातून बरा झाला. आयपीएल 2020 साठी करुण फिट असेल का याविषयी साशंकता होती. मात्र दोन आठवडे विलगीकरण आणि औषधौपचार यामुळे करुण आयपीएल हंगामासाठी फिट होऊ शकला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








