संजय राऊत पत्रकार परिषद: 'यंत्रणा राबवून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे'

पीएमसी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे.

राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर होतो आहे. वैफल्य, हतबलता यातून ही राजकीय कारवाई केली गेली आहे असा राऊत यांनी आरोप केला.

"घरातल्या मुलांवर, बायकांवर हल्ले करणाऱ्यांना नामर्द म्हणतात. असा नामर्दपणा कोणी करत असेल तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल. कोणत्याही थराला जायला आम्ही घाबरत नाही". असं राऊत यांनी सांगितलं.

नोटिशीच्या तपशीलाविषयी विचारलं असता राऊत म्हणाले, "नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तुम्हाला घाबरावं लागेल. ईडी गेले वर्षभर पत्रव्यवहार करतंय. त्यांना माहिती हवी होती. आम्ही कागदपत्रं वेळोवेळी पुरवली आहेत. ईडीने पत्रात पीएमसी बँकेचा संदर्भ दिलेला नाही".

भाजपची माकडं उड्या मारत आहेत. यांची आणि ईडीची हातजुळवणी आहे का?भाजपच्या कार्यालयात ईडीचं टेबल टाकलं आहे का? का ईडीने त्यांच्या कार्यालयात भाजपला स्थान दिलंय? असा सवाल राऊत यांनी केला.

"सरकार पाडायचं आम्ही ठरवलं आहे असे इशारे दिले जात आहेत. वेगवेगळ्या मार्गाने धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला यादी दाखवली गेली. 22 आमदारांची नावं त्यात होतीय शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची नावं दाखवली. यांना केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेईल, अटक केली जाईल. सरकार पाडलं जाईल. प्रताप सरनाईक हे त्याचं प्रतीक आहे असं सांगण्यात आलं", असं राऊत म्हणाले.

"सरकारचे खंदे प्रवर्तक आणि कुटुंबीयांना त्रास देण्याचं ठरलं. ईडीने, सीबीआय, इन्कम टॅक्सने करावं. दहशतवादी गँग वापरायची असेल तर ती वापरा. या सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही", असं राऊत म्हणाले.

'बायकांच्या पदराआडून खेळी करण्याची भाजपवर वेळ'

"नोटिशीला उत्तर दिलं जाईल. बायकांच्या पदराआडून खेळी करण्याची वेळ भाजपवर आली आहे. मराठी मध्यमवर्गातील महिलेने तिच्या मैत्रिणीकडून घर घेण्यासाठी 50 लाख कर्ज घेतलं आहे. 10 वर्षांनंतर ईडीला जाग आली आहे. मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करता. भाजपचे अकाऊंट उघडा. गेल्या तीन वर्षात, एसबीआयने भाजपला किती देणग्या दिल्यात याचा तपशील द्यावा", असं राऊत म्हणाले.

नीरव मोदी आणि विजय मल्या यांच्याबरोबरीने भाजप नेत्यांना उभं करीन असा दावा राऊत यांनी केला.

"मी मध्यमवर्गीय माणूस. आम्ही रीतसर कर्ज घेतलं आहे. राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. बाळासाहेबांची शिकवण की मुलांबाळांना मध्ये आणायचं नाही", असं राऊत म्हणाले.

"भाजप खासदारांच्या कुटुंबीयांची संपत्ती1600 कोटी रूपयांनी वाढली. त्याची चौकशी कोण करणार ? मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील. तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीच सर्व माझ्याकडे आहे. राजकीय सूडाने घेणार असेल तर राजकीय पद्धतीने उत्तर दिलं जाईल", असं राऊत यांनी सांगितलं.

"चौकशीला सामोरं जायचा निर्णय अजून नाही, याबद्दल पवार साहेब आणि इतरांशी चर्चा केली जाईल. मी तोंड उघडलं तर तुम्हाला देश सोडून जावं लागेल. माझं तुम्ही काय उखाडणार? असंही राऊत म्हणाले.

-अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे सरकार पाडण्यासाठी यंत्रणा राबवली जात असल्याची माहिती भाजपच्याच नेत्यांकडून मला मिळाली आहे, असं राऊत म्हणाले.

रविवारी (27 डिसेंबर) संजय राऊत यांनी ट्विट करून यासंदर्भात आपल्या शैलीत भाष्य केले होते. 'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया', असा इशारा राऊत यांनी ट्वीट करत दिला.

पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत यांची नेमकी भूमिका काय, याबद्दल विचारलं असता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, "मला संजय राऊत यांना विचारायचं आहे. तुम्ही पीएमसी बॅंक घोटाळ्याचे लाभार्थी आहात? तुमच्या कुटुंबाचा या प्रकरणाशी काय संबंध? या प्रकरणी आधी चौकशी करण्यात आली होती का? ईडीने काही माहिती मागितली असेल तर त्याला राजकीय स्वरूप कसं देता येईल."

तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, "चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं.

यावेळी फडणवीस म्हणाले, "मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. याबाबत तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे."

दोन दिवसांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंना ईडीने नोटीस बजावली होती. तर, टॉप सिक्युरिटी घोटाळ्या प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची ईडीने चौकशी केली आहे.

विरोधीपक्षाच्या नेत्यांना केंद्रीय यंत्रणांकडून येणाऱ्या नोटीशीवरून महाविकास आघाडीतील पक्षांनी केंद्र सरकारवर सूडाचं राजकारण करण्याचा आरोप केला होता.

दरम्यान वर्षा राऊत यांना आलेल्या नोटिशीबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, "ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंन्डरिंग कायद्यांतर्गत काम केलं पाहिजे. पण, खरंतर गेली सहा वर्ष प्रिव्हेन्शन ऑफ ओपोझिशन लीडर्स असं काम केलं जात आहे."

केंद्राविरोधात बोलणाऱ्यांवर ईडी सोडली जाते ही वस्तुस्थिती आहे. "राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे हे प्रयत्न आहेत. विधानपरिषद निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस येऊ लागणार असा अंदाज होता,' असं ते पुढे म्हणाले."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)