You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस
पीएमसी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
ईडीतील उच्चपदस्थ सूत्रांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली आहे.
ईडीच्या नोटीशीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. 'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया', अशा ओळी राऊत यांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.
पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत यांची नेमकी भूमिका काय, याबद्दल विचारलं असता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, 'मला संजय राऊत यांना विचारायचं आहे. तुम्ही पीएमसी बॅंक घोटाळ्याचे लाभार्थी आहात? तुमच्या कुटुंबाचा या प्रकरणाशी काय संबंध? या प्रकरणी आधी चौकशी करण्यात आली होती का? ईडीने काही माहिती मागितली असेल तर त्याला राजकीय स्वरूप कसं देता येईल.'
दोन दिवसांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंना ईडीने नोटीस बजावली होती.
तर, टॉप सिक्युरिटी घोटाळ्या प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची ईडीने चौकशी केली आहे.
विरोधीपक्षाच्या नेत्यांना केंद्रीय यंत्रणांकडून येणाऱ्या नोटीशीवरून महाविकास आघाडीतील पक्षांनी केंद्र सरकारवर सूडाचं राजकारण करण्याचा आरोप केला होता.
दरम्यान वर्षा राऊत यांना आलेल्या नोटिशीबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, 'ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंन्डरिंग कायद्यांतर्गत काम केलं पाहिजे. पण, खरंतर गेली सहा वर्ष प्रिव्हेन्शन ऑफ ओपोझिशन लीडर्स असं काम केलं जात आहे. केंद्राविरोधात बोलणाऱ्यांवर ईडी सोडली जाते ही वस्तुस्थिती आहे.''राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे हे प्रयत्न आहेत. विधानपरिषद निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस येऊ लागणार असा अंदाज होता,' असं ते पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)