You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: चेन्नईसाठी ही माझी शेवटची मॅच नाही, नक्कीच नाही- धोनी
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
चेन्नईसाठी माझी ही शेवटची मॅच नाही, नक्कीच नाही असं धोनीने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये सांगितल्याने चेन्नईच्या वास्तूपुरुषाचं कर्तेपण धोनीकडेच राहील हा चाहत्यांसाठी आशेचा किरण आहे.
प्रतिस्पर्धी संघांना घरी धाडून दिमाखात बादफेरीत जाणारा चेन्नईचा विजयरथ यंदा लीग स्टेजला गाळात रुतला. बारा वर्षांपूर्वी आयपीएल अवतरलं तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिलावहिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकप पटकावला होता.
लांब केसांचा, धष्टपुष्ट शरीरयष्टीचा, मिश्कील हसणारा आणि पल्लेदार फटके मारणारा रांचीचा राजकुमार माही अर्थात महेंद्रसिंग धोनी दूरवरच्या चेन्नईच्या ताफ्यात गेला. तेव्हा कोणाला वाटलंही नव्हतं की धोनी चेन्नईकरांचा लाडका थाला होईल.
धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज हे एकमेकांचे समानार्थी शब्द होतील. धोनी आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल होई तेव्हापासून जल्लोषाला उधाण येई. धोनीच्या सराव सत्राला हजारो चाहत्यांची गर्दी उसळत असे.
आयपीएलच्या निमित्ताने फ्रँचाईज पद्धतीचं क्रिकेट आपल्याकडे रुजवण्यात आलं. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी चेन्नईकरांना धोनीरुपी बीज दिलं. एक तपानंतर चेन्नईकरांच्या थालाचा लोकप्रियतेच्या, जिंकण्याच्या, जेतेपदांच्या बाबतीत डेरेदार वृक्ष झाला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या या संघाने जिंकण्याची सवय अंगी बाणवली. चाहत्यांनाही तीच सवय लावली. धोनीच्या या संघाने ओल्ड स्कूल थिकिंगची तत्वं अंगीकारली. कॉर्पोरेट कल्चरमध्ये 'हायर अँड फायर' नीती राबवली जाते.
धोनी आणि चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने लिलावात विचारपूर्वक खेळाडू घेतले. त्या माणसांवर विश्वास ठेवला. संपूर्ण हंगाम फॉर्मसाठी झगडणाऱ्या खेळाडूवरही चेन्नईने विश्वास ठेवला.
अनेकदा संपूर्ण हंगामभर चेन्नईची प्लेइंग इलेव्हन कायम असे. खेळणारे खेळत, बेंचवरचे बेंचवर बसत. पण कधीही बंडाचा एल्गार, संधी न मिळाल्याची तक्रार ऐकू आली नाही.
कॉर्पोरेट कल्चरमध्ये मीटिंग्जना महत्त्व असतं. गोल गोल, घोळ घोळ बोलूनही हाती फारसं काही लागत नाही आणि अमाप वेळही जातो अशा बैठकांमध्ये. धोनीच्या या संघाच्या मीटिंग्ज कमी असत आणि झाल्या तरी झटपट उरकत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना कसं खेळा हे सांगायची गरज नाही. नव्या दमाच्या खेळाडूंनी आयपीएलचा माहोल अनुभवावा, त्यासमोर दबून जाऊ नये हे धोनीचं तत्व असे. तुमच्या हातून चुका होतील, पण सैरभैर होऊ नका, नवीन आहात, असं होणं साहजिक आहे, मी जबाबदारी घेतो हे धोनीचं म्हणणं होतकरू खेळाडूंना धीर देत असे.
आतापर्यंतच्या हंगामात प्लेऑफ्स अर्थात बादफेरी गाठण्याचा दुर्मीळ विक्रम चेन्नईच्या नावावर आहे. यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. पिच, हवामान, मैदानाचे बारकावे ओळखून शंभर टक्के योगदान द्यावं.
प्रोसेसप्रती सर्वस्व झोकून दिल्यानंतरही पराभव पदरी पडला तर चिंता नको. हा खेळ आहे. कधीतरी हार होणारच हा धोनीचा आणि संघव्यवस्थापनाचा मंत्र असे. प्रोसेसवर प्रचंड भर देणाऱ्या चेन्नईने अंतिम उद्दि वर म्हणजे जेतेपदावरची पकड ढळू दिली नाही. तीन जेतेपदं पटकावली आणि दरवर्षी ते जेतेपदाच्या आसपास असत. कधी रनरअप, कधी प्लेऑफ्स. जेतेपद नेहमी त्यांच्या दृष्टिक्षेपात असे.
प्रतिभावान किती आहात, यापेक्षा तुम्ही प्रत्येक वेळी सर्वोत्तम प्रयत्न देताय ना? स्वत:मध्ये सुधारणा करताय ना यावर चेन्नईने भर दिला. चमत्कारापेक्षा सातत्यावर लक्ष केंद्रित केलं.
लिलावात खेळाडूंची निवड, अंतिम संघनिवड, सपोर्ट स्टाफची निवड या कशातही चेन्नईने धरसोडपणा केला नाही. कदाचित म्हणून चेन्नई सुपर किंग्स म्हणजे एक कुटुंब आहे असं या संघासाठी खेळणारे अनेकजण म्हणतात.
धोनी माझा भाऊ आहे असं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस तसंच आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर्सपैकी एक ड्वेन ब्राव्हो म्हणतो.
धोनीने आणि चेन्नईने असंख्य नव्या खेळाडूंना संधी दिली, चुका झाल्या तरी साथ सोडली नाही. चुकांमधून काय शिकायचं ते शिकवलं. चूक होऊ नये यासाठी बळ दिलं. तंत्रकौशल्यं घोटीव होण्यासाठी फौज उभी केली.
एक तपाच्या कालावधीत चेन्नईकडून खेळणारा रवीचंद्रन अश्विन टीम इंडियाचा मुख्य फिरकीपटू झाला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं खेळणाऱ्या अनेकांना चेन्नईने सामावून घेतलं.
मनप्रीत गोणी, इश्वर पांडे, सुदीप त्यागी, शदाब जकाती, मोहित शर्मा, पवन नेगी, के.एम. आसिफ, करण शर्मा अशा अनेक खेळाडूंना चेन्नईने व्यासपीठ दिलं. या खेळाडूंनी चांगलं खेळत धोनी आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे खेळाडू, भारतासाठी खेळणारे खेळाडू, नव्या दमाचे खेळाडू या सगळ्यांची मोट बांधण्याचं काम धोनीने केलं. होतकरू खेळाडूंसाठी धोनी माहीभाई झाला. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी तो एमएमस झाला. हा माणूस कोणत्याही परिस्थितीत इतका थंड, शांत कसा राहू शकतो याचं त्यांना अप्रूप आहे.
कर्णधारपदाचा काटेरी मुकूट आणि बॅटिंग करताना फिनिशरची जबाबदारी या दोन्ही आघाड्या धोनीने समर्थपणे सांभाळल्या. धोनीने 187 मॅचमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 109 मॅचमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे तर 77मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जिंकण्याची टक्केवारी 58.29 म्हणजे जवळपास साठ टक्के आहे. दोनशेपेक्षा जास्त मॅचेस खेळताना धोनीच्या नावावर 4632 रन्स आहेत. 136चा स्ट्राईकरेट धोनीच्या तडाखेबंद बॅटिंगचं द्योतक आहे.
अशक्यप्राय स्थितीत गेलेल्या मॅच जिंकून देण्यात धोनीचा हातखंडा आहे. बारा वर्षात चेन्नईने कॅप्टन बदलला नाही याचं कारण धोनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जिंकण्याची प्रोसेस करत राहिला. या मेहनतीला अपेक्षित फळं मिळत राहिली. यंदा मात्र हा मिडास टच हरवला आणि चेन्नईला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागत आहे.
एखादं शहर, परिसर एखाद्या खेळाडूला, संघाला किती आपलंसं करू शकतो याचं चेन्नई उत्तम उदाहरण आहे. बदल हा काळाचा स्थायीभाव आहे. बारा वर्षांपूर्वी तरुण तडफदार असणारा धोनी आता चाळिशीत आलाय. त्याचे काही सहकारी आता थकलेत. काहींचा खेळही जीर्णशीर्ण झालाय.
चेन्नईच्या वास्तुपुरुषाची डागडुजी करण्याची घटिका समीप आली आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक मॅचनंतर प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू धोनीसमोर शिकवणीसाठी बसलेले दिसत.
"तुम्ही अवघड कामगिरी हाती घेता, या वाटेवर खाचखळगे लागतात. तरी तुम्ही हार मानता चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वाटचाल करता. कटू क्षण तुमचं मनोधैर्य हिरावू पाहतात पण तुम्ही अविचल राहता. 2020 वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच आघातांचं राहिलं आहे. पण काहीही झालं तरी आपण खेळत राहू"- भैरवीची, निरोपाची ही पोस्ट आहे चेन्नई सुपर किंग्सची.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)